निकालपत्र
( पारीत दिनांक : 08/07/2014)
( मा. प्रभारी अध्यक्ष, श्री मिलींद आर.केदार यांच्या आदेशान्वये).)
तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये विरुध्द पक्ष यांच्या विरुध्द दाखल केली असून, तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे आहे.
01 तक्रारकर्ता हा मौजा सालोड (हिरापूर) ता.जि. वर्धा येथील रहिवासी असून तो अत्यंत गरीब असल्याचे त्याने आपल्या तक्रारीत नमूद केले. त्याने पुढे नमूद केले की, वि.प. 1 ही विमा कंपनी आहे व वि.प. 2 ही कर्ज देण्याचे काम करते. तक्रारकर्त्याची पत्नी मय्यत प्रतिभा गोवर्धन ठाकरेनी दि. 23.10.2010 रोजी वि.प. 2 यांच्याकडून रुपये 20,000/- चे कर्ज घेतले होते, त्यावेळी वि.प. 2 यांनी रुपये 1,00,000/- ची विमा पॉलिसी तिच्या नावांने काढली होती व पॉलिसीचा विमा हप्ता रुपये 240/- घेतला होता. सदर विमा पॉलिसी ही वि.प. 1 यांच्याकडे काढली होती व त्या पॉलिसीचा क्रं. 16060147102400201189 हा आहे.
02 दि. 05.11.2010 रोजी त.क. याची पत्नी स्वयंपाक करीत असतांना रात्री अंदाजे 8.00 वाजता जळाली, तिला सरकारी दवाखाना वर्धा येथे भरती केले असता दि. 15.12.2010 ला तिचा मृत्यु झाला. त.क. यांनी पुढे नमूद केले की, विमा पॉलिसीचा कालावधी दि. 16.11.2010 ते 15.11.2015 पर्यंत असल्यामुळे व त्याच्या पत्नीचा मृत्यु हा पॉलिसी अवधी सुरु होण्यापूर्वी झालेला असल्यामुळे दावा नाकारण्यात येत असल्याबाबत त.क. यांना वि.प. क्रं. 2 ने कळविले. त.क. यांनी दि. 18.10.2011 रोजी अडव्होकेट विजय चोरे यांच्या मार्फत विरुध्द पक्ष यांना कायदेशीर नोटीस पाठवून विमा दाव्याची रक्कम देण्याबाबत विनंती केली.
03 सदर नोटीस वि.प. यांना मिळाली. विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी सदर नोटीसला चुकिचे उत्तर दिल्याचे त.क. चे म्हणणे आहे. तर वि.प. 1 यांनी सदर नोटीसला कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी पुन्हा वि.प. क्रं. 1 यांना दि. 18.10.2012 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली. सदर नोटीस मिळून ही वि.प. 1 यांनी उत्तर दिले नाही. दरम्यानच्या काळात विरुध्द पक्ष क्रं. 1 यांचे कर्मचारी त.क. यांच्या घरी आले व दावा निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते असे त.क. यांनी तक्रारीत नमूद केले आहे. तक्रारकर्त्याचा दावा निकाली न काढल्याने त.क. यांनी सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली असून विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/-, शारीरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारीचा खर्च म्हणून एकूण रु.50,000/- असे एकूण रु.1,50,000/- ची मागणी केली असून त्यावर व्याजाची मागणी केली आहे.
04 विरुध्द पक्ष यांना मंचातर्फे प्रस्तुत प्रकरणात नोटीस बजाविण्यात आली. वि.प. यांनी खालीलप्रमाणे आपले उत्तर दाखल केले आहे.
05 विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी आपल्या उत्तरात ते विमा कंपनी असल्याचे मान्य केले आहे. त्यांनी आपल्या उत्तरात मान्य केले की, दि. 23.10.2010 रोजी वि.प. क्रं. 2 यांच्याकडून रु.20,000/- चे कर्ज घेतल्यामुळे वि.प. 1 यांनी मय्यत प्रतिभा ठाकरे यांच्या नावाची विमा पॉलिसी काढली होती व त्या पॉलिसीच्या हप्त्यापोटी रु.120/- वि.प. 1 यांनी घेतले होते. त्यांनी पुढे नमूद केले की, त.क. यांची पत्नी प्रतिभा ठाकरे ही दि. 05.11.2010 रोजी स्वयंपाक करीत असतांना अंदाजे रात्री 8.00 वाजता जळाली व सरकारी दवाखाना वर्धा येथे उपचाराकरिता भरती केले. उपचारा दरम्यान दि. 15.12.2010 रोजी तिचा मृत्यु झाला. पॉलिसीचा कालावधी हा दि. 16.11.2010 ते 15.11.2015 असा 5 वर्षाचा होता. त्यांनी पुढे नमूद केले की, वि.प. 1 यांनी सेवा देण्यात कोणताही कसूर केला नाही. त.क. ची पत्नी जळण्याची घटना दि. 05.11.2010 ला घडली व त्यामुळे प्रतिभा ठाकरे हिचा मृत्यु झाला. सदर घटना पॉलिसी कालावधी सुरु होण्यापूर्वी घडल्यामुळे विमा दावा नाकारण्यात आला. यामध्ये विरुध्द पक्ष क्रं. 1 यांचा कोणताही कसूर नसल्याचे त्यांनी आपल्या उत्तरात नमूद केले असून तक्रारकर्त्याचे इतर सर्व म्हणणे माहिती अभावी नाकारले आहे.
06 वि.प. 2 यांनी आपले उत्तर दाखल केले असून त्यांनी आपल्या उत्तरातील प्रारंभिक आक्षेप नमूद केले आहे की, वि.प. 2 यांनी अनेक लोकांना कर्ज दिले. त्यापैकी दि. 2.11.2010 रोजी हप्त्याची रक्कम वि.प. 1 यांना पाठविली व त्याच दिवशी पासून मूळ विमा कालावधी सुरु झाला आहे असे अपेक्षित असते. त्यामुळे वि.प. 2 त्यांचे नांव सदर प्रकरणातून कमी करण्यात यावे असा आक्षेप घेतला आहे. त्यांनी पुढे नमूद केले आहे की, दि. 23.10.2010 रोजी मय्यत प्रतिभा गोवर्धन ठाकरे यांनी त्यांच्याकडून (वि.प. 2) रुपये 20,000/- चे कर्ज घेतले होते. त्याकरिता तिच्या नावाने रुपये 1,00,000/- ची विमा पॉलिसी काढण्यात आली व त्याचा प्रिमियम (हप्ता) दि.02.11.2010 रोजी वि.प. क्रं. 1 कडे पाठविला. तक्रारकर्त्याची पत्नी दि. 05.11.2010 रोजी रात्री 8.00 वाजता स्वयंपाक करतांना जळली व उपचारा दरम्यान तिचा मृत्यु दि.15.12.2010 रोजी झाला. विमा पॉलिसीचा कालावधी हा दि. 16.11.2010 ते 15.12.2015 असा आहे. सदर विमा पॉलिसीचा हप्ता वि.प. 2 यांनी दि. 02.11.2010 रोजी वि.प. 1 यांच्याकडे सुपूर्द केला तरी अशा परिस्थितीत पॉलिसी उशिरा काढल्यामुळे विम्याची पूर्ण रक्कम देण्याची जबाबदारी वि.प. 1 ची आहे. त्यांनी पुढे नमूद केले आहे की, धनादेश क्रं. 181231 वर्धा नागरी बँक बोरगांव मेघे शाखेचा धनादेश दि. 02.11.2010 रोजी वि.प. 1 यांच्या प्रतिनिधी कडे दिला व त्याबाबत त्याची स्विकृती घेतली. त्यामुळे सदर विमा पॉलिसीचा दावा देण्याची संपूर्ण जबाबदारी वि.प. 1 ची असल्याचे त्यांनी (वि.प.क्रं. 2 ) आपल्या उत्तरात नमूद केले. तक्रारकर्त्याने सदर प्रकरणामध्ये त्यांचे नांव विना कारण टाकल्यामुळे त.क. यांच्यावर रु.25000/- चा दंड आकारण्यात यावे असे नमूद केले व त.क. यांचे सर्व म्हणणे फेटाळून लावले. तसेच प्रस्तुत प्रकरण त्यांच्या विरुध्द खारीज करण्याची विनंती केली.
07 सदर प्रकरण मंचासमक्ष दि. 27.06.2014 रोजी युक्तिवादासाठी आले असता त.क. स्वतः हजर. त्यांचा युक्तिवाद ऐकून घेण्यात आला. वि.प. 1 चे वकील हजर. त्यांचा ही युक्तिवाद ऐकून घेण्यात आला. वि.प. 2 च्या युक्तिवादाकरिता अंतिम संधी म्हणून दि. 30.06.2014 ला प्रकरण नेमण्यात आले. दि. 30.06.2014 रोजी वि.प. 2 यांना युक्तिवादाकरिता अंतिम संधी दिली असता ते मंचासमक्ष हजर झाले नाही व युक्तिवाद केला नाही. त्यामुळे प्रकरण निकालाकरिता बंद करण्यात आले.
08. सदर प्रकरणात उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेण्यात आला. तसेच त्यांनी दाखल केलेले दस्ताऐवज, प्रतिज्ञालेख यांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षा प्रत पोहचले.
-: कारणे व निष्कर्ष :-
09 सदर प्रकरणात तक्रारकर्त्याची पत्नी मय्यत प्रतिभा गोवर्धन ठाकरे यांनी दि. 23.10.2010 रोजी वि.प.क्रं. 2 यांच्याकडून रुपये 20,000/- चे कर्ज घेतले होते , ही बाब तक्रारकर्त्याने दाखल केलेले नि.क्रं. 4 (दस्ताऐवज क्रं. 8) वरुन तसेच वि.प. 2 यांनी त्यांच्या लेखी उत्तरावरुन स्पष्ट होत असल्यामुळे त.क. च्या पत्नीने वि.प. 2 यांच्याकडून कर्ज घेतले होते ही बाब स्पष्ट होते. तसेच वि.प. 2 यांनी त.क. ची पत्नी मय्यत प्रतिभा गोवर्धन ठाकरे हिचा वि.प. 1 यांच्याकडे विमा पॉलिसीकरिता रु.120/- प्रिमियम दिला होता ही बाब सुध्दा दस्ताऐवजावरुन स्पष्ट होत असल्यामुळे त.क. हे वि.प. 1 व 2 चे ग्राहक ठरतात असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
10 तक्रारकर्त्याची पत्नी दि. 05.11.2010 रोजी स्वयंपाक करतांना रात्री 8.00 वाजता जळाली व दुर्देवाने दि. 15.12.2010 रोजी तिचा मृत्यु झाला ही बाब सुध्दा तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्ताऐवजावरुन स्पष्ट होते.
त.क. यांच्या नुसार त्याची पत्नी मय्यत प्रतिभा गोवर्धन ठाकरे हिचा मृत्यु उपचारा दरम्यान दि. 15.12.2010 रोजी झाला याबाबत त्यांनी मृत्यु प्रमाणपत्र दाखल केले आहे. यावरुन मय्यत प्रतिभा गोवर्धन ठाकरे हिचा मृत्यु दि. 15.12.2010 रोजी झाला ही बाब सिध्द होते.
त.क.च्या पत्नीच्या मृत्युला कारण दि. 05.10.2011 रोजी जळाल्याने घडले ही बाब सुध्दा नि.क्रं. 4 ( अकस्मात मृत्यु खबरी) या दस्ताऐवजावरुन स्पष्ट होते.
11 सदर प्रकरणामध्ये त.क. च्या पत्नीचा विमा हा वि.प. क्रं. 1 यांच्याकडे वि.प. 2 यांनी काढला. वि.प. 1 यांनी सदर विमा दावा नाकारला व तसे आपल्या लेखी उत्तरात नमूद केले आहे की, त.क. च्या पत्नीचा विमा हा दि. 16.11.2010 ते 15.11.2015 या 5 वर्षाकरिता काढण्यात आला होता परंतु त.क. च्या पत्नीचा मृत्यु दि. 15.12.2010 रोजी झाला व त्याचे कारण दि.05.11.2010 रोजी जळाल्याने घडले. अपघात दि. 05.11.2010 रोजी झाला व त्यावेळी सदर विमा पॉलिसीचा विमा कालावधी सुरु व्हायचा होता व त्यामुळे त्यांनी सदर विमा दावा नाकारला. सदर प्रकरणामध्ये विमा पॉलिसीचे अवलोकन केले असता ही बाब स्पष्ट आहे की, विमा पॉलिसीचा कालावधी हा दि. 16.11.2010 ते 15.11.2015 हा दर्शविण्यात आला असून विम्याचे आवेदन वर ( Date of proposal) दि. 16.11.2010 असे दर्शविलेले आहे.
12 वि.प. 2 यांनी आपल्या लेखी उत्तरामध्ये नमूद केले आहे की, त्यांनी त.क. ची पत्नी मय्यत प्रतिभा गोवर्धन ठाकरे हिला दि. 23.10.2010 रोजी कर्ज दिला व विम्याचा हप्ता दि. 02.11.2010 रोजी वि.प. 1 यांच्याकडे सुपूर्द केला. त्याकरिता त्याने धनादेश क्रं.181231 वर्धा नागरी बँक बोरगांव मेघे शाखेचा धनादेश दिल्याचे आपल्या लेखी उत्तरात नमूद केले आहे. परंतु त्यांनी सदर उत्तरासोबत कोणतेही दस्ताऐवज दाखल केलेले नाही. ज्याद्वारे हे सुनिश्चित होऊ शकेल की, वि.प. 2 यांनी वि.प. 1 यांच्याकडे दि. 02.11.2010 रोजी विमा पॉलिसीच्या प्रिमियमची रक्कम वि.प. 1 ला दिली. सदर प्रकरणामध्ये वि.प. 1 यांनी जेव्हा विमा पॉलिसी काढली त्या पॉलिसीवर सुध्दा वि.प. 2 यांनी कोणताही आक्षेप , प्रकरण दाखल होण्यापूर्वी घेतल्याचे दस्ताऐवज दाखल केले नाही. तसेच आक्षेप घेतल्याबाबत कोणतेही कथन वि.प. 2 यांनी केलेले नाही.
13 वि.प. 2 यांनी वि.प. यांना विमा पॉलिसीच्या प्रिमियमची रक्कम दि. 2.11.2010 रोजी दिली तर वि.प. 1 यांनी विमा पॉलिसीचा कालावधी दि. 16.11.2010 कां दर्शविला ?, याबाबतचा कोणताही पत्र व्यवहार वि.प. 2 यांनी वि.प. 1 यांच्याशी केलेला नाही. सदर प्रकरणामध्ये विम्याची हप्ता राशी ही वि.प.क्रं. 1 यांना दि. 02.11.2010 ला दिली ही बाब सिध्द करण्याची जबाबदारी वि.प.क्रं. 2 ची आहे. वि.प.क्रं. 2 ने सदर बाब सिध्द केलेली नाही.
सदर प्रकरणामध्ये वि.प. 2 यांच्या सेवेतील त्रृटीमुळे व निष्काळजीपणामुळे त.क.च्या पत्नीचा विमा पॉलिसी काढण्यात विलंब झाला हे स्पष्ट होते. त्यामुळे अपघात होऊन मृत्यु झाला असतांना सुध्दा तक्रारकर्ता यांना विमा दाव्याची राशी मिळू शकली नाही.
14 सदर प्रकरणामध्ये दोन्ही विरुध्द पक्षांनी आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला असला तरी देखील वि.प. 2 यांनी जर विम्याच्या प्रिमियमची रक्कम वेळेत वि.प. 1 यांच्याकडे सुपूर्द केली असती तर त.क. यांना विमा दाव्याची रक्कम पूर्ण मिळाली असती. त्यामुळे मंचाचे स्पष्ट मत आहे की, वि.प. 2 यांच्या निष्काळजीपणामुळे तक्रारकर्त्याचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या आर्थिक नुकसानीकरिता वि.प. 2 हेच सर्वस्व जबाबदार आहेत. तेव्हा मंचाचे स्पष्ट मत आहे की, विमा दाव्यापोटी मिळणारी संपूर्ण रक्कम देण्याची जबाबदारी वि.प. 2 यांची आहे.
15 तक्रारकर्ता यांनी सदर प्रकरणात आपल्या मागणीत विम्याच्या दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- व शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु.50,000/-ची मागणी केली तरी सदर सर्व मागणीचा विचार करता , तक्रारकर्ता हा विमा दाव्याची रक्कम वि.प. 2 यांच्याकडून नुकसान भरपाई म्हणून मिळण्यास पात्र ठरतो. त्यामुळे विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी तक्रारकर्ता यांना रुपये 1,00,000/- आदेश प्राप्त झाल्यापासून 30 दिवसात द्यावे. अन्यथा सदर रक्कमेवर द.सा.द.शे. 6%दराने व्याज रक्कम अदा होईपर्यंत देय राहील.
तक्रारकर्ता यांनी शारीरिक, मानसिक व तक्रारीच्या खर्चापोटी केलेली मागणी रुपये 50,000/- ची आहे. सदर मागणी ही अवाजवी असल्यामुळे नैसर्गिक न्यायाचा विचार करता तक्रारकर्ता शारीरिक, मानसिक व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 10,000/- मिळण्यास पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे.
16 विरुध्द पक्ष क्रं. 1 यांच्या विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते. त्यांच्या विरुध्द कोणताही आदेश नाही.
उपरोक्त सर्व विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) विरुध्द पक्ष क्रमांक 1 यांच्या विरुध्द तक्रार खारीज करण्यात येते.
3) विरुध्द पक्ष 2 यांनी विमा दाव्याच्या नुकसान भरपाई पोटी तक्रारकर्ता यांना रुपये 1,00,000/- आदेश प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाच्या आत द्यावे. अन्यथा त्यानंतर सदर रक्कम प्रत्यक्ष प्राप्त होईपर्यंत द.सा.द.शे.6% दराने व्याज देय राहील.
4) तक्रारकर्ता यांना विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी आर्थिक, शारीरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारीचा खर्च म्हणून रु.10,000/- द्यावे.
5) मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत घेवून
जाव्यात.
निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्तव व उचित
कार्यवाही करिता पाठविण्यात याव्यात.