जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/17 प्रकरण दाखल तारीख - 13/01/2010 प्रकरण निकाल तारीख – 22/04/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.एस.आर.देशमुख. - सदस्या मा.श्री.सतीश सामते. - सदस्य देवराव .पि.रघुनाथ होनराव, वय वर्षे 37, धंदा नौकरी, अर्जदार. रा.इस्लापूर ता.किनवट जि.नांदेड. विरुध्द. 1. शाखा पोस्ट मास्तर, गैरअर्जदार. पोस्ट ऑफिस इस्लापुर ता.किनवट, जि.नांदेड. 2. मा.अधिक्षक, मुख्य डाकघर,नांदेड विभाग नांदेड. 3. मा.महासंचालक, डाक विभाग जनरल पोस्ट मास्तर विभाग, छावणी पोस्ट ऑफिस जवळ,औरंगाबाद. अर्जदारा तर्फे वकील - अड.सुनिल भिमराव जाधव. गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.डी.जी.शिंदे. निकालपत्र (द्वारा- मा.श्रीमती.एस.आर.देशमुख,सदस्या) अर्जदार यांची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 कडुन दि.16/02/1998 रोजी पोस्ट ऑफिस इस्लापुर, ता.किनवट या कार्यालयाकडुन ग्रामीण डाक विमा पॉलिसी काढली व विमा धारकाने दि.16/02/1998 रोजी प्रतिज्ञापत्रानुसार महिना रक्कम रु.160/- नगदी भरुन विमा शाखा पोस्ट मास्तर पोस्ट ऑफिस इस्लापूर या कार्यालयाने स्विकृत केला व विम्याचा हप्ता दरमहा रु.160/- प्रमाणे भरुन घेतला त्या विमा पॉलिसीचा क्र.R/MH/AR/CWL-1011221 असा आहे. अर्जदाराने दि.14/01/2004 रोजी क्षेत्रिय अधिक्षक, तिकीट भांडार, ग्रामीण डाक जिवन विमा, कार्यालय उपनगर, नाशिक ता.जि.नाशिक या कार्यालयाकडे अर्ज केला त्यामध्ये असे नमुद केले आहे की, अर्जदाराने विमा क्र.R/MH/AR/CWL-1011221 या पॉलिसीचे परिवर्तन करणे बाबत मार्फत पोस्ट मास्तर, पोस्ट ऑफिस इस्लापूर,ता.किनवट यांच्याकडे अर्ज केला होता. नंतर गैरअर्जदार खात्याचे कार्यालय क्षेत्रीय अधिक्षक साहेब तिकीट भांडार, ग्रामीण डाक जिवन विमा, कार्यालय उपनगर, नाशिक ता.जि.नाशिक या कार्यालयाचे पत्र दि.11/05/2004 रोजी अर्जदारास पत्र आले, त्या पत्रामध्ये असे नमुद केले होते की, अर्जदाराने फेब्रुवारी 2004 ते मे 2004 या चार महिन्याचे हप्ते भरलेले नाहीत व ते भरुन आमच्या कार्यालयाला मुळ पास बुक व हप्ते भरलेल्या पावत्याची प्रतीक्षा पाठवून द्या असे सांगण्यात आले. त्यानंतर अर्जदाराने फेब्रुवारी 2004 ते मे 2004 अशा पाच महिन्याचे हप्ते भरुन मुळ पासबुक व हप्ते भरल्याची पावती असे दि.29/06/2004 रोजी गैरअर्जदार क्र. 1 यांच्या शिफारशीने गैरअर्जदार क्र. 3 च्या कार्यालयाला पाठवले. ज्याचा रजिस्टर नं.677 असा आहे. शिफारस पत्र दि.04/03/2004 रोजी दिले. अर्जदाराने दि.29/06/2004 रोजी पाठविलेले मुळ पास बुक व मुळ पॉलिसी बॉंड परिवर्तन होऊन आले नाही व पत्र दि.11/05/2004 रोजी दिलेल्या क्षेत्रिय कार्यालय उपनगर नाशिक या कार्यालयाने पाठविलेल्या पत्राचा संदर्भ देऊन पून्हा दि.03/11/2004 रोजी व दि.02/02/2005 रोजी दोन अर्ज केले. तरीपण आजपर्यंत मुळ पासबुक व मुळ पॉलिसी बॉंड परिवर्तन होऊन आलेले नाही. म्हणुन अर्जदाराची मागणी आहे की, अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दिलेले मुळ पासबुक, मुळ पॉलिसी बॉंड अर्जदारास गैरअर्जदाराकडुन परत देण्यात यावेत. तसेच अर्जदाराची सदर पॉलिसी गैरअर्जदाराने सदर खंड कालावधीचे पूर्ण हप्ते भरुन पुन्हा पुर्ववत नियमित सुरु करावी असे आदेश गैरअर्जदारास देण्यात यावे. अर्जदारास झालेल्या नुकसानी बाबत रु.25,000/- व मानसिक, आर्थीक, शारिरीक त्रासापोटी रु.15,000/- गैरअर्जदाराकडुन देण्यात यावेत व दावा खर्च म्हणुन रु.5,000/- अर्जदारास देण्यात यावा. सदर प्रकरणांत गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांना नोटीस देण्यात आली ते त्यांनी हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांचे म्हणणे असे की, गैरअर्जदारांनी कोणतीही त्रुटीची सेवा अर्जदारांना दिली नाही. अर्जदार यांनी पॉलिसीचा हप्ता न भरुन पॉलिसी चालु ठेवली नाही. त्यामुळे नियम व अटी क्र. चाप्टर एक्स 1 (व्हि.आय) नुसार तक्रार मंजुर करण्यात येत नाही. अर्जदार यांनी एक वर्षात आत राहीलेले हप्ते व्याजसहीत भरणे आवश्यक होते परंतु त्यांनी ते भरले नाही. म्हणुन त्यांची तक्रार खारीज करण्यात यावी. अर्जदार यांनी पॉलिसी काढली हे गैरअर्जदार यांना मान्य आहे. अर्जदार यांनी थकीत हप्ते भरतांना तबीयती विषयी डॉक्टरांचे प्रमाणपत्र दाखल करणे आवश्यक होते ते त्यांनी केलेले नाही. अर्जदार हा मासिक हप्ते नियमित भरीत नव्हता.त्यामुळे गैरअर्जदार त्यासाठी जबाबदार नाही. गैरअर्जदार यांनी कोणतीही त्रुटीची सेवा अर्जदारांना दिली नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदारांना वेळोवेळी कळविलेले आहे. गैरअर्जदार हे अर्जदार यांना कोणतेही मानसिक त्रास व शारीरिक त्रासापोटी रक्कम देण्यास जबाबदार नाही. गैरअर्जदार हे अर्जदार यांची पॉलिसी पुन्हा चालु करण्यास तयार आहेत पण त्यासाठी अर्जदार यांनी राहीलेले हप्ते व्याजासहीत भरावे. असे करुन गैरअर्जदार यांनी कोणतीही त्रुटीची सेवा अर्जदारांना दिलेली नाही. त्यामुळे अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी. अर्जदार यांचा अर्ज,शपथपत्र त्यांनी दाखल केलेले दस्तऐवज, गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे, शपथपत्र त्यांनी दाखल केलेले दस्तऐवज,युक्तीवाद याचा विचार होता, खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. गैरअर्जदार यांच्या सेवेतील त्रुटी अर्जदार सिध्द करतात काय? होय. 2. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 – अर्जदार यांनी ग्रामीण डाक विमा पॉलिसी क्र.R/MH/AR/CWL-1011221 गैरअर्जदाराकडुन दि.16/02/1998 रोजी पोस्ट ऑफिस इस्लापुर ता.किनवट येथुन रु.160/- प्रती महीना प्रिमीअम हप्ता याप्रमाणे घेतली होती. यानंतर दि.14/01/2004 रोजी सदर पॉलिसी पॉलिसीचे परिर्वतन करण्यासाठी नाशिक कार्यालयास प्रस्ताव पाठविला. नाशिक कार्यालयाच्या सांगण्यावरुन मुळ पास बुक व फेब्रुवारी 2004 ते मे 2004 या चार महिन्याचे हप्ते भरुन पावत्या पाठवून देण्यात आल्या होत्या व यासंबंधात शिफारस दि.29/04/2003 गैरअर्जदार क्र. 3 यांनी केलेली होती. परंतु मुळ पॉलिसी व बॉंण्ड परिर्वन होऊन आले नाही. यानंतर दि.02/02/2005 पर्यंत याचा पाठपुरावा केला व पॉलिसीचे परिर्वतन झाले नाही. यासंबंधात दि.14/07/2009 रोजी गैरअर्जदार यांना कायदेशिर नोटीस देण्यात आली. गैरअर्जदाराचे नाशिक कार्यालयाने चार महिन्याचे हप्ते भरुन मुळ पास बुक व प्रिमीअम भरल्याचे पावत्या पाठविण्यासाठी जे पत्र पाठविले ते पत्र याप्रकरणांत दाखल आहे. यानंतरचा पत्र व्यवहार जो अर्जदाराने केला होता तेही याप्रकरणांत दाखल आहे. दि.04/03/2004 चे शिफारस प्रमाणपत्र पोस्टमास्तर इस्लापुर यांनी पाठविले होते. यात पासबुकचा उल्लेख केला होता की, यात अर्जदाराचे मार्च 2004 पर्यंत नियमित हप्ते भरणे चालू आहे व पुढील चार हप्ते भरलेले आहे यात मुदत वाढवुन देण्याची शिफारस करण्यात आलेले आहे. एकंदरीत नियमाप्रमाणे सर्व माहीतीवरुन असे दिसते की, जेंव्हा गैरअर्जदाराने शिफारस पत्र दिले त्याचा अर्थ अर्जदार हे पॉलिसी परिवर्तनासाठी पात्र होता पण अर्जदार पात्र असतांना आज 2010 म्हणजे जवळपास सहा वर्ष होत आले तरी अर्जदाराची पॉलिसी परिर्वतन झाले नाही आणि मुळ कागदपत्र भरलेले प्रिमीअमचे हप्ते गैरअर्जदारांना कबुल आहे मग कशासाठी विलंब केला व पॉलिसी परिवर्तन पेंडींग ठेवले त्याचा समर्पक उत्तर गैरअर्जदाराने दिलेले नाही. गैरअर्जदार यांनी आपले लेखी म्हणण्यात हे कबुल केले की, अर्जदाराने दि.14/01/2004 पासुन जवळपास पाच वर्षानंतर पॉलिसी परिवर्तनाचा अर्ज दिलेला आहे. त्यामुळे त्यांना अशा प्रकारचे परिवर्तन करता येणार नाही असे AR/RPLI/conversion/CWA-1011221/DRH/06 दि. 19/07/2007 रुल क्र.11 (6) याप्रमाणे पॉलिसी परिवर्तन हे पॉलिसी घेतल्यानंतर एक वर्षापर्यंत करता येते यानंतर करता येत नाही व थकीत हप्ते हे व्याजासह भरल्यासच परिवर्तन दिल्या जाऊ शकते व अर्जदार हे डिफॉल्टर आहत असे म्हटलेले आहे. गैरअर्जदार क्र. 1 ने जे शिफारस पत्र दिले आहे. याप्रमाणे अर्जदार हे त्या दिवशी प्रस्ताव दिला त्या दिवशीचे ते पत्र होते व गैरअर्जदाराचे नाशिक कार्यालयाचे पत्राप्रमाणे त्यांनी पेंडींग असलेले प्रिमीअमचे हप्ते भरुान पावत्या पाठविलेले आहे व असे असतांना गैरअर्जदार म्हणतात त्याप्रमाणे अर्जदारांना अपात्र ठरविता येणार नाही व पॉलिसी परिवर्तन करुन दिले पाहीजे. गैरअर्जदार यासाठी तयार आहेत व त्यांचे म्हणण्याप्रमाणे आजही पॉलिसी परिवर्तन करुन देण्याची त्यांची तयारी आहे व अर्जदार यांनी मागील थकीत सर्व हप्ते व्याजासह भरणे आवश्यक आहे व ते मुळ पासबुक व बॉण्ड ते न सापडल्यास डुप्लीकेट बॉण्ड अर्जदारास देण्याची तयारी दर्शविली आता येथे पाहीले असता, अर्जदार यांनी प्रस्ताव 04 मध्ये दिले होते व त्यात ज्या काही त्रुटी होत्या त्या गैरअर्जदाराचे सुचनेनुसार पुर्ण केले आहे तरी गैरअर्जदार यांनी 2007 पर्यंत त्यांना या पॉलिसी परिवर्तना विषयी काहीच कळविले नाही व 2007 मध्ये परत एक वर्षाचे आंत पॉलिसी परिवर्तनाचा अर्ज दिला पाहीजे असे म्हणतात व थकीत हप्ते व्याजासह भरा असे म्हण्तात. अर्जदार यांचा अर्ज नामंजुर केला म्हणजे तीन वर्ष दिरंगाई करुन त्यानंतर अजुन तीन वर्ष अर्जदार गप्प बसले व पुढील प्रिमीअम भरण्यासंबंधी नोटीस त्यांना दिली म्हणजे सरळ सरळ ही सेवेतील त्रुटी असे म्हणता येईल यासाठी अर्जदाराची नुकसान करु नये म्हणुन गैरअर्जदार यांनी 2004 पासुन त्यांचे सर्व थकीत हप्ते अर्जदार यांचेकडुन स्विकारावेत व यानंतर अर्जदाराची जबाबदारी असल्या कारणाने त्यांना त्या प्रिमीअमवर व्याज आकारता येत नाही व गैरअर्जदाराने कबुल केल्याप्रमाणे ते हप्ते मिळाताच मुळ किंवा डुप्लीकेट पॉलिसी बॉण्ड व पासबुस अर्जदार यांना द्यावे व सदरील पॉलिसी पुर्ववत चालु करण्यात यावे व अर्जदाराची अशी मागणी आहे की, आता पॉलिसी परिवर्तनासाठी न जाता मधील खंड कालावधीचे हप्ते घेऊन ते पुर्ववत नियमित करावे याप्रमाणेच आदेश करण्यात येते. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज मंजुर करण्यात येतो. 2. हा निकाल लागल्यापासुन 30 दिवसांचे आंत गैरअर्जदार यांनी पॉलिसी क्र.R/MH/AR/CWL-1011221 यासाठी व जुन 04 पासुन किंवा जे काही प्रिमीअमचे आजपर्यंतचे थकीत हप्ते असतील ते विना व्याजी हप्ते स्विकारावेत. या कालावधीसाठी विलंब आकार किंवा व्याज आकारु नये. 3. अर्जदार यांनी वरील आदेशा प्रमाणे त्यांचेकडे असलेले थकीत सर्व हप्ते गैरअर्जदार यांच्या कार्यालयात जमा करावेत व ते जमा करताच गैरअर्जदार यांनी अर्जदाराची पॉलिसी नियमित करुन मुळ पॉलिसी बॉण्ड किंवा डुप्लीकेट बॉण्ड व पासबुक अर्जदारास द्यावे. तसेच आरोग्य प्रमाणपत्र अर्जदारांनी द्यावे. 4. अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासाबद्यल रु.5,000/- व दावा खर्चाबद्यल रु.2,000/- गैरअर्जदार यांनी द्यावे, ही रक्कम गैरअर्जदार अर्जदाराकडुन येणे असलेली रक्कमेत समायोजित करु शकतील. 5. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार.लघूलेखक |