आदेश पारित द्वारा मा. सदस्य श्री. एन. व्ही. बनसोड 1. तक्रारकर्ते 1 व 2 हे क्रमशः आई व मुलगा असून त्यांनी ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अंतर्गत मंचासमक्ष संयुक्त तक्रार दाखल करून त्याद्वारे विरूध्द पक्ष यांनी स्टॅम्प पेपरवर हमीपत्र घेऊन मूळ किसान विकास पत्राशिवाय किसान विकास पत्राची परिपक्व रक्कम द्यावी, परिपक्व रकमेवर परिपक्वता दिनांकापासून 18 टक्के व्याज द्यावे तसेच विरूध्द पक्ष यांचेवर तक्रारीचा खर्च लादण्यात यावा अशी मागणी केली आहे. तक्रारकर्त्यांचे म्हणणे थोडक्यात खालीलप्रमाणेः- 2. तक्रारकर्ती क्र. 1 व तिचे मयत पती नामे आनंदराव सखाराम लोखंडे यांनी दोघे मिळून संयुक्तरित्या विरूध्द पक्ष पोष्टातून दिनांक 19/07/2002 ला ` 50,000/- चे किसान विकास पत्र (रजि. नंबर 27022, खाते क्रमांक 86 बी.बी.606372 ते 606381) घेतले होते. त्याचप्रमाणे तक्रारकर्ती क्र. 1 व तक्रारकर्ता क्र. 2 यांच्या नावे विरूध्द पक्ष पोष्टातून ` 50,000/- चे किसान विकास पत्र (रजि. नंबर 27023, खाते क्रमांक 86 बी. बी. 606382 ते 606391) खरेदी केले होते. तक्रारकर्ती क्र. 1 चे पती आनंदराव सखाराम लोखंडे हे दिनांक 17/01/2004 ला मृत्यु पावले. वरील किसान विकास पत्रे दिनांक 19/03/2010 ला परिपक्व झाली. 3. तक्रारकर्त्यांनी वरील किसान विकास पत्राच्या परिपक्व रकमेची मागणी विरूध्द पक्ष यांच्याकडे केली असता, मूळ किसान विकास पत्र सादर करण्याबाबत विरूध्द पक्ष यांनी तोंडी सांगितले. तक्रारकर्त्यांनुसार त्यांच्याकडे मूळ किसान विकास पत्रे नाहीत कारण तक्रारकर्ती क्र. 1 चे पती आनंदराव सखाराम लोखंडे यांच्या मृत्युनंतर तक्रारकर्त्यांनी किसान विकास पत्रांची शोधाशोध केली, परंतु ती मिळाली नाहीत. म्हणून तक्रारकर्ते किसान विकास पत्रे सादर करू शकले नाहीत. तक्रारकर्त्यांनी डुप्लीकेट किसान विकास पत्र मिळण्यासाठी दिनांक 07/08/2010 ला पैसे भरून डुप्लीकेट प्रत मिळण्याची मागणी केली. तक्रारकर्ते म्हणतात की, तक्रारकर्ता क्र. 1 व 2 हे मृतक आनंदरावचे एकमेव कायदेशीर वारस असल्यामुळे रक्कम मिळण्यास पात्र आहेत. विरूध्द पक्ष यांनी डुप्लीकेट किसान विकास पत्र न दिल्यामुळे व किसान विकास पत्रांची परिपक्व रक्कम न दिल्यामुळे तक्रारकर्त्यांना आर्थिक नुकसान झाले असून ते सतत होत आहे. तसेच त्यांना शारीरिक व मानसिक त्रास देखील होत आहे. तक्रारकर्त्यांनी विरूध्द पक्ष यांचेकडून किसान विकास पत्रे खरेदी केली असल्यामुळे ग्राहक सेवा प्राप्त केली आहे व ते ग्राहक ठरतात. परंतु विरूध्द पक्ष यांना तक्रारकर्त्यांनी स्टॅम्प पेपरवर हमीपत्र लिहून देण्याची तयारी दर्शवून सुध्दा विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यांना त्यांची न्यायोचित रक्कम दिली नाही. सदर तक्रारीच्या वादाचे कारण दिनांक 29/03/2010 ला (किसान विकास पत्राचा परिपक्वता दिनांक) घडले असून वादाचे कारण सतत सुरू आहे. 4. तक्रारकर्त्यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ठ्यर्थ विरूध्द पक्ष यांच्याकडे डुप्लीकेट किसान विकास पत्र मिळण्याकरिता जमा केलेल्या रकमेच्या पावत्या व नोंदीची कागदपत्रे, मृत्यु प्रमाणपत्र इत्यादी अनुक्रमे पृष्ठ क्रमांक 9 ते 13 वर दाखल केलेले आहेत. 5. मंचाने तक्रार दाखल करून विरूध्द पक्ष यांना नोटीस बजावली. विरूध्द पक्ष यांनी आपले लेखी उत्तर दाखल केले असून त्यांचे म्हणणे थोडक्यात खालीलप्रमाणेः- 6. विरूध्द पक्ष यांनी तक्रारीच्या परिच्छेद क्र. 1 ला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, सदरहू परिच्छेदातील मजकूर हा रेकॉर्डशी संबंधित आहे. तसेच तक्रारकर्ती क्र. 1 चे पती आनंदराव सखाराम लोखंडे यांचा मृत्यु दिनांक 17/11/2004 ला झाला असून तक्रारकर्ता क्र. 2 हा अज्ञान असतांना त्याच्या आईने त्याची जन्मतारीख 24/06/1991 दर्शवून त्याच्या नावे ` 50,000/- चे किसान विकास पत्र खरेदी केली. तक्रारकर्ता क्र. 2 हा सज्ञान झाला असल्यामुळे मूळ किसान विकास पत्र दाखल करून विरूध्द पक्ष यांच्याकडून ते भूगतान करू शकतात. 7. विरूध्द पक्ष यांनी तक्रारीचा परिच्छेद क्र. 2 नाकारला असून खातेधारक तक्रारकर्ती क्र. 1 नाही असे म्हटले आहे. तसेच खातेधारक निळकंठ लोखंडे असून त्याने वयाची 18 वर्षे पूर्ण केली असल्यामुळे रक्कम मिळण्यास तो पात्र आहे. तक्रारकर्ती क्र. 1 ने वरील किसान विकास पत्रे सांभाळून ठेवण्याची जबाबदारी होती. परंतु तसे न करता व मूळ किसान विकास पत्रे दाखल न करता परिपक्वता रकमेची मागणी करणे योग्य नाही असे विरूध्द पक्ष यांनी म्हटले. तसेच डुप्लीकेट किसान विकास पत्र मिळाले नाही अशी तक्रारकर्त्यांनी तक्रार केली. परंतु मूळ किसान विकास पत्र हरविले नाही हे विभागीय चौकशीमध्ये सिध्द झाल्यामुळे डुप्लीकेट किसान विकास पत्र जारी करता येत नाही. विरूध्द पक्ष यांनी तक्रारीचा परिच्छेद क्र. 3, 5, 6, 7, 8 व 9 नाकारला व परिच्छेद क्र. 4 च्या उत्तरात म्हटले की, मूळ किसान विकास पत्र सादर न करता किसान विकास पत्राची परिपक्व रक्कम देण्याचा नियम नाही व तक्रार खारीज करण्याची मागणी केली. 8. विरूध्द पक्ष यांनी आपल्या विशेष कथनात म्हटले की, तक्रारकर्त्यांच्या वकिलांनी दिनांक 16/11/2010 रोजी तक्रारकर्त्यांतर्फे विरूध्द पक्ष यांना नोटीस पाठविलेली असून त्यात तक्रारकर्ती क्र. 1 ची सावत्र मुलगी नामे वनिता हरीभाऊ सतीकोसरे हिचे तक्रारकर्ते क्र. 1 व 2 सोबत संबंध चांगले नाहीत व तक्रारकर्ती क्र. 1 चे पती आनंदराव सखाराम लोखंडे यांच्या मृत्युनिमित्त वनिता सतीकोसरे आली असता तिने मूळ किसान विकास पत्र व त्यासोबत अजून काही कागदपत्रे सोबत घेऊन गेली आहे. त्यामुळे मूळ किसान विकास पत्र अस्तित्वात आहे व मूळ किसान विकास पत्र अस्तित्वात असतांना आणि ते हरवले नसल्यामुळे डुप्लीकेट किसान विकास पत्र देता येत नाही. तक्रारकर्ते व त्यांचे नातेवाईक वनिता हरीभाऊ सतीकोसरे यांनी त्यांचा कौटुंबिक वाद आपसात मिटवून मूळ किसान विकास पत्र सादर केल्यास परिपक्व रक्कम कधीही देता येईल. परंतु तक्रारकर्त्यांचे आरोप हे दिशाभूल करणारे आहेत, कारण मूळ किसान विकास पत्र हे वनिता हरीभाऊ सतीकोसरे हिच्या ताब्यात असून तिला तक्रारीत आवश्यक पक्षकार केलेले नाही. वनिता सतीकोसरे हिने ऍडव्होकेट भरणे यांच्यामार्फत दिनांक 09/03/2003 ला विरूध्द पक्ष यांना नोटीस पाठवून असे कळविले होते की, मूळ किसान विकास पत्र हे तिच्या ताब्यात आहेत. त्यामुळे डुप्लीकेट किसान विकास पत्र जारी करण्याचे प्रयोजन नाही. तक्रारकर्त्यांनी मंचासमोर खोटी तक्रार दाखल केली असल्यामुळे ती ` 5,000/- खर्चासह खारीज करण्याची पुन्हा विनंती केली आहे. 9. विरूध्द पक्ष यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ठ्यर्थ पोस्टाची नियमावली, हरविलेल्या/चोरी गेलेल्या सर्टिफिकेट संबंधी नियमावली, किसान विकास पत्राची झेरॉक्स प्रत, तक्रारकर्त्यांनी वकिलामार्फत पाठविलेली नोटीस, वनिता हरीभाऊ सतीकोसरे हिने तिच्या वकिलामार्फत पाठविलेली नोटीस इत्यादी कागदपत्रे अनुक्रमे पृष्ठ क्रमांक 22 ते 33 वर दाखल केली आहेत. 10. मंचाने, दिनांक 02/04/2011 ला तक्रारकर्त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला. तसेच तक्रारीसोबत असलेल्या कागदपत्रांचे, दस्तऐवजांचे तसेच विरूध्द पक्ष यांनी दाखल केलेल्या लेखी युक्तिवादाचे अवलोकन केले. निरीक्षण व निष्कर्ष 11. तक्रारकर्त्यांनी तक्रारीच्या परिच्छेद क्र. 1 मध्ये नमूद केल्याप्रमाणे तसेच पृष्ठ क्रमांक 9 वरील दस्तऐवजावरून हे स्पष्ट होते की, तक्रारकर्ती क्र. 1 चे मृतक पती आनंदराव सखाराम लोखंडे यांनी दिनांक 19/07/2002 रोजी खाली दर्शविल्याप्रमाणे विरूध्द पक्ष यांचेकडून किसान विकास पत्रे खरेदी केली होती. अ.क्र. | किसान विकास पत्र क्रमांक | किसान विकास पत्र धारकाचे नाव | किसान विकास पत्राची रक्कम | खरेदी केल्याचा दिनांक | परिपक्वता दिनांक | 1. | रजि. नं. 27023 (खाता क्र. 86 बी.बी.606372 ते 606381 | आनंदराव सखाराम लोखंडे व सौ. सुमन आनंदराव लोखंडे (संयुक्त) | 50,000/- | 19/07/2002 | 19/03/2010 | 2. | रजि. नं. 27022 (खाता क्र. 86 बी.बी.606382 ते 606391 | निळकंठ आनंदराव लोखंडे (अज्ञान) व सौ. सुमन आनंदराव लोखंडे | 50,000/- | 19/07/2002 | 19/03/2010 |
त्यामुळे तक्रारकर्ती क्र. 1 व तक्रारकर्ता क्र. 2 हे विरूध्द पक्ष यांचे ग्राहक ठरतात व त्याबाबत विरूध्द पक्ष यांचे म्हणणे तथ्थ्यहीन असल्यामुळे मंचाने नाकारले. 12. तक्रारकर्त्यांनी तक्रारीच्या परिच्छेद क्र. 1 मध्ये वेगवेगळी ` 50,000/- ची किसान विकास पत्रे खरेदी केल्याबाबत नमूद केले व ती वस्तुस्थिती दाखल दस्तऐवजांवरून स्पष्ट होते. परंतु विरूध्द पक्ष यांनी तक्रारीच्या परिच्छेद क्र. 1 ला दिलेल्या उत्तरात निव्वळ 86 बी.बी. 606382 ते 606391 ` 50,000/- या किसान विकास पत्राचा उल्लेख करून मान्य केले की, तक्रारकर्ता क्र. 2 हा सज्ञान झाल्यामुळे किसान विकास पत्राची रक्कम मिळण्यास पात्र आहे. तथापि, विरूध्द पक्ष यांनी आनंदराव सखाराम लोखंडे व श्रीमती सुमन आनंदराव लोखंडे यांच्या नावे असलेल्या किसान विकास पत्र क्रमांक 86 बी. बी. 606372 ते 606381, मूल्य ` 50,000/- बाबत काहीही वस्तुस्थिती स्पष्ट केलेली नाही. तक्रारकर्ती क्र. 1 व तिच्या पतीच्या नावे असलेल्या किसान विकास पत्राबाबत स्पष्ट म्हणणे असतांना सुध्दा विरूध्द पक्ष यांनी त्यावर काहीही भाष्य न करणे यावरून विरूध्द पक्ष मंचापासून वस्तुस्थिती लपवित आहेत असा मंचाचा स्पष्ट निष्कर्ष आहे. विरूध्द पक्ष यांनी त्यासंदर्भात त्यांच्या ताब्यात असलेले किसान विकास पत्र खरेदी करतेवेळेस केलेला अर्ज व इतर दस्तऐवज मंचासमोर दाखल केले नाहीत. त्यामुळे सुध्दा विरूध्द पक्ष यांच्याविरूध्द Adverse Inference काढणे मंचास संयुक्तिक वाटते. तसेच विरूध्द पक्ष मंचासमोर स्वच्छ हाताने आलेले नाहीत असे मंचाचे स्पष्ट मत आहे. 13. विरूध्द पक्ष यांनी आपल्या लेखी उत्तराच्या परिच्छेद क्र. 2 मध्ये म्हटले की, मूळ किसान विकास पत्र हरवले नसल्याचे विभागीय चौकशीमध्ये सिध्द झाल्यामुळे डुप्लीकेट किसान विकास पत्र जारी करता येत नाही. परंतु विरूध्द पक्ष यांचे हे म्हणणे वस्तुनिष्ठ पुराव्याअभावी (विरूध्द पक्ष यांचा विभागीय चौकशी अहवाल) मंचास तथ्थ्यहीन वाटते. विरूध्द पक्ष यांनी आपल्या विशेष कथनात तक्रारकर्त्यांनी वकिलामार्फत पाठविलेल्या दिनांक 16/11/2010 रोजीच्या नोटीसचा उल्लेख करून म्हटले की, तक्रारकर्ते व वनिता हरीभाऊ सतीकोसरे (सावत्र मुलगी) यांचे संबंध चांगले नसल्यामुळे आनंदरावचे मृत्युनंतर किसान विकास पत्र व काही कागदपत्रे ती घेऊन गेली आहे आणि मूळ किसान विकास पत्र हे अस्तित्वात असल्यामुळे डुप्लीकेट किसान विकास पत्र देता येत नाही. अनुक्रमे पृष्ठ क्रमांक 29 वरील दिनांक 16/11/2010 रोजीच्या नोटीसच्या परिच्छेद क्र. 2 मध्ये खालीलप्रमाणे नमूद आहे. That, the sister of my client Nilkanth Lokhande namely Wanita w/o. Haribhau Satikosare, R/o. Nagpur is on cross terms with my clients. Therefore, when she came to village Shahapur to perform last rits of Anandrao Lokhande, she might have stolen original Kisan Vikas Patra and some other documents from the custody of my clients. 14. तक्रारकर्त्यानुसार, शोधाशोध करूनही वरील किसान विकास पत्रे न मिळाल्यामुळे ती किसान विकास पत्रे वनिता हरीभाऊ सतीकोसरे हिने चोरी केली असावीत असा संशय तक्रारकर्त्यांनी व्यक्त केला. तक्रारकर्त्यांच्या या संशयास विरूध्द पक्ष यांनी त्याचा योग्य अर्थ न काढता त्यास पुराव्याचे स्वरूप देऊन तक्रारकर्त्यांची वरील किसान विकास पत्रे गहाळ झाल्याबाबतची मागणी व डुप्लीकेट किसान विकास पत्र जारी करण्याची मागणी खारीज केली. हे विरूध्द पक्ष यांचे संपूर्ण कथन पूर्णतः तथ्थ्यहीन असून येनकेनप्रकारे तक्रारकर्त्यांना रक्कम परत मिळण्यास आडकाठी आणण्याचे धोरण आहे असे मंचाचे मत आहे. 15. विरूध्द पक्ष यांनी दाखल केलेल्या दिनांक 09/03/2009 च्या नोटीसचा परिच्छेद क्र. 4 तपासला असता त्यावरून हे स्पष्ट होते की, तक्रारकर्ता क्र. 2 याच्या नावे असलेल्या `50,000/- च्या किसान विकास पत्राबाबत नोंद आहे. परंतु तक्रारकर्ती क्र. 1 हिच्या नावे असलेल्या किसान विकास पत्राबाबत काहीही उल्लेख नाही. त्यामुळे श्रीमती वनिता सतीकोसरे हिचा आनंदराव लोखंडे व श्रीमती सुमन लोखंडे यांच्या संयुक्त नावावर असलेल्या किसान विकास पत्राबाबत वाद नाही असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्ती क्र. 1 ची सावत्र मुलगी वनिता सतीकोसरे हिने वकिलामार्फत दिनांक 09/03/2003 ला नोटीस पाठवून फक्त विरूध्द पक्ष यांना सूचित केले, परंतु तक्रारकर्ते क्र. 1 व 2 यांच्याकडे तिने तिचे म्हणणे मांडलेले नाही. तसेच दिनांक 09/03/2003 ला विरूध्द पक्ष यांना नोटीस दिली, परंतु वडील (मृत्यु दिनांक 17/01/2004) जीवंत असतांना व मृत्युनंतर सुध्दा हक्क प्रस्थापित करण्याकरिता श्रीमती वनिता सतीकोसरे हिने काहीही केलेले नाही असे मंचाचे निदर्शनास येते. तसेच दिनांक 09/03/2003 च्या नोटीस नंतर वनिता सतीकोसरे हिने आपली मागणी किंवा हक्क सिध्द करण्यासाठी कोणतेही वारसान प्रमाणपत्र प्राप्त करून ते विरूध्द पक्ष यांना किंवा तक्रारकर्त्यांना पाठविले नाही त्यामुळे वनिता सतीकोसरे ही सदर तक्रारीत आवश्यक पक्ष आहे असे विरूध्द पक्ष यांचे म्हणणे तथ्थ्यहीन असल्यामुळे मंचाने ते नाकारले. श्रीमती वनिता सतीकोसरे हिने विरूध्द पक्ष यांना पाठविलेल्या नोटीससोबत वरील सर्व 20 ही किसान विकास पत्राच्या झेरॉक्स प्रती न पाठविल्यामुळे तिच्या ताब्यात किसान विकास पत्रे आहेत हे विश्वसनीय वाटत नाही आणि विरूध्द पक्ष यांचा निष्कर्ष (किसान विकास पत्राच्या झेरॉक्स प्रती व विभागीय चौकशी अहवालाअभावी) संयुक्तिक वाटत नसल्यामुळे तो मंचाने नाकारला. तसेच वनिता सतीकोसरे हिची नोटीस व कथन निव्वळ तक्रारकर्त्यांना रक्कम मिळण्यात आडकाठी यावी व विरूध्द पक्ष यांच्यासमोर संभ्रम उपस्थित करण्याचे कृत्य आहे असे दिसते. 16. तक्रारकर्त्यांनी तक्रारीत म्हटल्याप्रमाणे ` 50,000/- चे किसान विकास पत्र क्रमांक 86 बी.बी. 606372 ते 606381 हे आनंदराव लोखंडे व श्रीमती सुमन लोखंडे यांच्या नावे होते हे स्पष्ट होते आणि आनंदराव सखाराम लोखंडे यांच्या दिनांक 17/01/2004 ला झालेल्या मृत्युनंतर संयुक्त खाते असल्यामुळे व पतीचा मृत्यु झाल्यामुळे श्रीमती सुमन आनंदराव लोखंडे ही पूर्ण रक्कम परत मिळण्यास हक्कदार ठरते. त्याचप्रमाणे किसान विकास पत्र क्रमांक 86 बी.बी. 606382 ते 606391 यावर तक्रारकर्ता क्र. 2 निळकंठ आनंदराव लोखंडे याचे नाव असून अज्ञान पालनकर्ता म्हणून श्रीमती सुमन आनंदराव लोखंडे आहे. निळकंठ आनंदराव लोखंडे हा सज्ञान झाल्यामुळे त्या किसान विकास पत्राच्या परिपक्व रकमेचा तो पूर्णपणे हक्कदार आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. 17. विरूध्द पक्ष यांनी त्यांच्या लेखी उत्तरासोबत किसान विकास पत्राच्या Encashment बाबतची नियमावली तसेच डुप्लीकेट किसान विकास पत्र निर्गमित करण्याबाबतची नियमावली मंचासमोर दाखल केली. तक्रारकर्त्यांनी तक्रारीत तसेच वकिलामार्फत पाठविलेल्या नोटीसमध्ये किसान विकास पत्रे हरवली आहेत, गहाळ झाली आहेत अथवा वनिता सतीकोसरे हिने चोरून नेली असावीत असा संशय प्रदर्शित केला आहे. सदरहू किसान विकास पत्राचा परिपक्वता दिनांक हा 19/03/2010 होता. तक्रारकर्त्यांनी दिनांक 07/08/2010 ला विरूध्द पक्ष यांच्या कार्यालयात डुप्लीकेट किसान विकास पत्र मिळण्याबाबत रक्कम जमा केली. परंतु विरूध्द पक्ष यांनी डुप्लीकेट किसान विकास पत्र Indemnity Bond घेऊन न देणे किंवा त्याबाबत वस्तुस्थितीशी तक्रारकर्त्यांना अवगत न करणे ही विरूध्द पक्ष यांच्या ग्राहक सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. 18. तक्रारकर्ती क्र. 1 च्या पतीचा दिनांक 17/01/2004 ला (विरूध्द पक्षाने उत्तराच्या परिच्छेद क्र. 2 मध्ये मृत्यु दि. 17/11/2004 ला झाला असे खोडसाळपणे नमूद केले) मृत्यु झाल्यामुळे तसेच किसान विकास पत्राचा परिपक्वता दिनांक 19/03/2010 ला संपल्यामुळे डुप्लीकेट किसान विकास पत्राबाबत विरूध्द पक्ष यांचे म्हणणे पूर्णतः तथ्थ्यहीन ठरते, कारण परिपक्वता दिनांकानंतर सुध्दा डुप्लीकेट किसान विकास पत्रे देता येतात याबाबत विरूध्द पक्ष यांनी दाखल केलेल्या नियमावलीत कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे परिपक्वता दिनांकानंतर डुप्लीकेट किसान विकास पत्रे जारी करण्याबाबत तक्रारकर्त्यांचे म्हणणे व विरूध्द पक्ष यांचे कथन हे निष्प्रभ ठरते. विरूध्द पक्ष यांनी दाखल केलेल्या अनुक्रमे पृष्ठ क्रमांक 24 वरील पेज क्र. 112 मथळा – LOSS, THEFT, DESTRUCTION, MUTILATION IN THE CUSTODY OF THE HOLDER परिच्छेद 44 (2) मध्ये स्पष्टपणे नमूद आहे की, किसान विकास पत्रे हरवल्यास, चोरी गेल्यास किंवा नष्ट झाल्यास Indemnity Bond घेऊन डुप्लीकेट प्रमाणपत्रे देता येतात. परंतु परिपक्वता दिनांकानंतर डुप्लीकेट किसान विकास पत्रे देता येतात याबाबत काहीही नमूद नाही. त्यामुळे परिपक्वता दिनांकानंतर डुप्लीकेट प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रश्न उद्भवत नाही असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्त्यांच्या वकिलांनी दिनांक 16/11/2010 रोजी पाठविलेल्या नोटीसच्या परिच्छेद क्र. 4 मध्ये स्पष्ट केले की, सावत्र मुलगी वनिता हरीभाऊ सतीकोसरे हिला जर सदर किसान विकास पत्राच्या रकमेमध्ये काही भाग हवा असल्यास तो देण्याची तक्रारकर्त्यांनी तयारी दर्शविली होती. परंतु त्याबाबत वनिता सतीकोसरे हिने कोणतीही मागणी केलेली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्यांचा सद्हेतू स्पष्ट होतो. वरील विवेचनावरून हे स्पष्ट झाले की, किसान विकास पत्राच्या परिपक्वतेनंतर डुप्लीकेट किसान विकास पत्र निर्गमित करण्याची तरतूद विरूध्द पक्ष यांच्या नियमावलीत नाही. म्हणून मंचाचे स्पष्ट मत आहे की, विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्ती क्र. 1 च्या नावे असलेल्या `50,000/- च्या किसान विकास पत्र क्रमांक 86 बी.बी. 606372 ते 606382 ची येणारी परिपक्व रक्कम दिनांक 19/03/2010 पासून (म्हणजेच परिपक्वता दिनांकापासून) तक्रारकर्तीच्या हाती रक्कम पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह परत करावी. तसेच तक्रारकर्ता क्र. 2 चे नावे असलेल्या `50,000/- च्या किसान विकास पत्र क्रमांक 86 बी.बी. 606382 ते 606391 ची परिपक्व रक्कम दिनांक 19/03/2010 पासून तक्रारकर्त्याच्या हाती संपूर्ण रक्कम पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह परत करावी. वरील किसान विकास पत्राच्या परिपक्व रकमेचे भुगतान करतेवेळेस विरूध्द पक्ष यांनी दोन्ही खातेधारकांकडून नियमानुसार Indemnity Bond भरून घ्यावा. विरूध्द पक्ष यांच्या गैरकायदेशीर (हेतूपुरस्सर) व खोडसाळ कार्यपध्दतीमुळे तक्रारकर्ते त्यांच्या न्यायोचित रकमेपासून वंचित आहेत व त्यामुळे तक्रारकर्त्यांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला असून मंचासमोर तक्रार देखील दाखल करावी लागली या तक्रारकर्त्यांच्या म्हणण्याशी मंच सहमत आहे. करिता तक्रारकर्त्यांना एकत्रितरित्या शारीरिक व मानसिक त्रासाकरिता नुकसानभरपाई म्हणून `3,000/- तसेच तक्रारीचा खर्च म्हणून `2,000/- देणे संयुक्तिक होईल असे मंचाचे मत आहे. करिता खालील आदेश. आदेश तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 1. विरुद्ध पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यांकडून नियमानुसार Indemnity Bond प्राप्त करून तक्रारकर्त्यांच्या परिपक्व झालेल्या किसान विकास पत्रांच्या परिपक्व रकमा (किसान विकास पत्र क्रमांक 86 बी.बी. 606372 ते 606381 रक्कम `50,000/- आणि किसान विकास पत्र क्रमांक 86 बी.बी. 606382 ते 606391 रक्कम `50,000/-) दिनांक 19/03/2010 पासून रकमा तक्रारकर्त्यांच्या हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह तक्रारकर्त्यांना अदा कराव्यात. 2. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यांना झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून `3,000/- दोन्ही तक्रारकर्त्यांना एकत्रितरित्या द्यावे. 3. विरुद्ध पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी प्रस्तुत तक्रारीच्या खर्चापोटी दोन्ही तक्रारकर्त्यांना एकत्रितरित्या `2,000/- द्यावे. 4. विरूध्द पक्ष यांनी वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आंत करावी.
| HONABLE MR. N. V. BANSOD, MEMBER | HONABLE MRS. R. D. KUNDLE, PRESIDENT | HONABLE MRS. Geeta R Badwaik, Member | |