तक्रारदारांकरिता अॅड. धनंजय संत
जाबदेणारांतर्फे अॅड. एस.बी.पाटील व
श्री. केंगार – पोस्टल असिस्टंट
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
द्वारा- श्री. एस. के. कापसे, मा. सदस्य
निकालपत्र
दिनांक 30 मे 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी स्वत:च्या, त्यांच्या आईच्या कै. प्रेम खन्ना व मृदूल चडडा यांच्या नावाचे जाबदेणारांकडे जॉईंट MIS खाते क्र.1051093 रुपये 3,00,000/- भरुन दिनांक 17/3/2003 उघडले होते. या जॉईंट खात्या व्यतिरिक्त तक्रारदारांचे जाबदेणारांकडे दोन स्वतंत्र खाते क्र.1051094 व 1051095 होते. 8 टक्के द.सा.द.शे व्याजाप्रमाणे तक्रारदारांना दरमहा रुपये 2000/- व मॅच्युरिटी दिवशी तक्रारदारांना रुपये 3,30,000/- मिळणार होते, ज्यामध्ये बोनस पोटी रुपये 30,000/- चा समावेश होता. मॅच्युरिटी दिनांकापुर्वी तक्रारदारांच्या आईंचा- जॉईंट खातेधारकांचा दिनांक 1/9/2003 रोजी मृत्यू झाला. दिनांक 6/12/2003 रोजी मृत्यू दाखल्यासह जाबदेणारांना त्याबाबत माहिती देण्यात आली व श्रीमती अंजली चडडा यांचे नाव कै. प्रेम खन्ना यांच्या जागी घालण्यात यावे असेही कळविण्यात आले होते. त्यानुसार जाबदेणारांनी दिनांक 8/1/2004 रोजी पासबुकवर नोंद केली. अचानक जाबदेणारांनी तक्रारदारांना कै. प्रेम खन्ना यांच्या निधनानंतर म्हणजेच दिनांक 1/9/2003 पासून ऑगस्ट 2007 पर्यन्त देण्यात आलेले व्याज रुपये 96,000/- व बोनस रक्कम रुपये 30,000/- वजा करण्यात येतील असे कळविले. तक्रारदारांनी MIS खाते क्र.1051093 बंद केले व तक्रारदारांना रुपये 2,04,000/- जाबदेणार यांनी दिनांक 22/8/2007 रोजी दिले. तक्रारदारांना रुपये 96,000/- व रुपये 30,000/- जाबदेणार यांनी कमी दिले. त्यासाठी जाबदेणार यांनी तक्रारदारांना पुढीलप्रमाणे कारणे दिली- जॉईंट खातेधारकाच्या मृत्यूनंतर दुस-या व्यक्तीस जॉईंट खातेधारक होता येत नाही. जॉईंट खातेधारक कै. प्रेम खन्ना यांच्या निधनाच्या दिनांकापर्यन्त रुपये 3,00,000/- तीन खात्यांपैकी कुठल्याही एका MIS खात्यातून काढून घ्यावयास हवे होते. अधिकच्या गुंतवणूकीमुळे दिनांक 01/09/2003 पासून कुठलेही व्याज अथवा बोनस त्या रकमेवर मिळणार नव्हते. दिनांक 01/09/2003 पासून ऑगस्ट 2007 पर्यन्त दरमहा देण्यात आलेले व्याज वजावटीस पात्र असल्यामुळे रुपये 96,000/- ची वजावट करण्यात आलेली होती. तसेच अतिरिक्त गुंतवणूक केलेल्या रकमेवर देण्यात आलेली बोनसची रक्कम रुपये 30,000/- देखील वजा करण्यात आली होती. या कारणांवरुन तक्रारदारांना कमी रक्कम देण्यात आलेली होती, म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून रुपये 96,000/- 9 टक्के द.सा.द.शे व्याजासह दिनांक 01/09/2003 पासून दिनांक 22/08/2007 पर्यन्त व संपुर्ण रक्कम मिळेपर्यन्त मागतात. तसेच बोनसपोटी रुपये 30,000/- 9 टक्के द.सा.द.शे व्याजासह दिनांक 22/08/2007 पासून संपुर्ण रक्कम तक्रारदारांना मिळेपर्यन्त व तक्रारीचा खर्च रुपये 5000/-, इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. जॉईंट खातेधारकांपैकी एकाचा मृत्यू झाल्यानंतर पोस्ट ऑफिस रुल 5 नुसार जीवंत असलेल्या खातेधारकाच्या नावावर सिंगल खाते असल्याचे ट्रिट केले जाते. त्यामधील गुंतवणूक रुपये 1000/- च्या पटीत व जास्तीत जास्त रुपये 3,00,000/- करता येते. तक्रारदारांनी जॉईंटली MIS खाते क्र् 1051093, 1051094, 1051095 श्रीमती प्रेम खन्ना, किरण खन्ना व मृदूल चडडा यांच्यासमवेत दिनांक 17/3/2003 रोजी उघडले होते. तक्रारदारांना 8 टक्के द.सा.द.शे व्याज देण्यात येणार होते, व्याजापोटी दरमहा रुपये 2000/- मॅच्युरिटी दिवशी म्हणजेच दिनांक 17/3/2009 रोजी तक्रारदारांना रुपये 3,30,000/- ज्यामध्ये बोनस रुपये 30,000/- चा समावेश होता हे जाबदेणार यांना अमान्य आहे. तक्रारदारांचा MIS खाते क्र;1051093 संदर्भात वाद आहे. दिनांक 01/09/2003 रोजी श्रीमती प्रेम खन्ना यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांच्याजागी पोस्टातील कर्मचा-यांनी नॉमिनी श्रीमती अंजली चडडा यांचे नाव खात्यावर लावले. परंतु पोस्ट ऑफिस मंथली इनकम अकाऊंट रुल्स 1987 रुल क्र 15 नुसार जॉईंट खातेधारकापैकी एकाचा मृत्यू झाल्यानंतर जी व्यक्ती जीवंत असेल तिच्या नावाचे सदरहू खाते सिंगल खात्यामध्ये ट्रिट केले जाते. सिंगल खात्याची गुंतवणूक मर्यादा अधिकतम रुपये 3,00,000/- व जॉईंट खात्याची अधिकतम मर्यादा रुपये 6,00,000/- असते. प्रत्येक खातेधारकास अधिकतम गुंतवणूक रुपये 3,00,000/- करता येते. प्रस्तूत प्रकरणी श्रीमती प्रेम खन्ना यांच्या मृत्यूनंतर उर्वरित दोन खातेधारकांची गुंतवणूकीची रक्कम रुपये 9,00,000/- झाली म्हणजेच रुपये 3,00,000/- अतिरिक्त गुंतवणूक झाली. व नियमाप्रमाणे अतिरिक्त गुंतवणूकीवर व्याज देय नव्हते. मा. राज्य ग्राहक वाद निवारण आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी अपील क्र.2568/2006 डिपार्टमेंट ऑफ पोस्ट विरुध्द अदि के. कंगा मध्ये दिनांक 18/10/2008 रोजी दिलेल्या निवाडयाचा आधार जाबदेणार यांनी घेतला. सदरहू निवाडयामध्ये मा. राज्य आयोगाने जॉईंट खाते उघडण्यापुर्वी खातेधारकांनी त्या खात्यासंदर्भातील नियमांची माहिती घेणे आवश्यक आहे असे नमूद केलेले आहे. तसेच अस्तित्वात असलेले नियम सर्वांवर बंधनकारक असल्याचेही त्यात नमूद करण्यात आलेले आहे. तसेच इंडियन पोस्टल सेव्हिंग बँक अॅक्ट कलम 6 चा आधार जाबदेणार घेतात. तक्रारदार खाते क्र.1051093 बंद करण्यासाठी आले, त्याप्रमाणे कार्यवाही केली व व्याजापोटी रुपये 96,000/- व बोनसची रक्कम रुपये 30,000/- नियमाप्रमाणे वजा करुन उर्वरित रक्कम रुपये 2,04,000/- दिनांक 22/8/2007 रोजी तक्रारदारांना देण्यात आली होती. मॅच्युरिटी दिनांकाआधी खाते बंद करण्यात आल्यामुळे तक्रारदारांना बोनसची रक्कम देण्यात आलेली नव्हती. तक्रारदारांच्या उर्वरित दोन खात्यांवर नियमाप्रमाणे प्रत्येकी रुपये 3,30,000/- दिनांक 17/3/2009 रोजी अदा करण्यात आलेले आहेत. जाबदेणार यांच्या सेवेत कोणतीही त्रुटी नाही. म्हणून तक्रार खर्चासह नामंजुर करावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार यांनी शपथपत्र, कागदपत्रे, मंथली इनकम अकाऊंट रुल्स, अकाऊंट ओपनिंग फॉर्म तसेच मा. वरिष्ठ न्यायालयाचे निवाडे दाखल केले आहेत.
3. उभय पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. जाबदेणार यांनी तक्रारदारांचे अकाऊंट ओपनिंग फॉर्म दाखल केलेला असून त्यामध्ये दाखल केलेल्या Form 1, Post Office Savings Bank Application For Opening An Account मध्ये “4. I/we hereby undertake to keep the balances in all my/our savings account, single or joint at any time within the limit specified…” असे नमूद करण्यात आलेले आहे. Chapter 13, Post Office (Monthly Income Account) Rules, 1987 मध्ये “4. Opening of account- A depositor may operate more than one account under these rules subject to the condition that deposits in all accounts taken together shall not exceed rupees three lakhs in single account and rupees six lakhs in joint account. [MOF (DEA) Notification No. GSR 80 (E) dated 1.2.2000 effective from 1.2.2000] असे नमूद करण्यात आलेले आहे. यासंदर्भात नोटिफिकेशही दिनांक 1.2.2000 रोजी प्रसिध्द करण्यात आलेले होते. त्यामुळे जाबदेणार यांचा हा नियम तक्रारदारांवरही बंधनकारक आहे. तक्रारदारांनी खाते क्र. 1051093 हे कै. श्रीमती प्रेम खन्ना यांच्यासह उघडले होते. जॉईंट खात्याची मर्यादा नियमाप्रमाणे रुपये 6,00,000/- होती. जाबदेणार यांच्या Monthly Income Account [D.G. Posts letter No. 97-19/97 SB dated 4/7/1999 20. Status of joint MIS account on the death of one of depositors :- मध्ये … “Further depositors dies in a joint account, the joint account shall, as from the date of death of the said depositor, be deemed to be a single account in the name of the surviving depositor. As such this provision of Savings Account Rules will also apply to the MIS Account Rules. In view of this if one of the depositors of a MIS account dies, the account will be treated a single account in the name of the surviving depositor from the date of death of the said depositor. When a report to this effect is received in the post office, the post master will ask the surviving depositor to withdraw the excess amount in excess of the limit prescribed for a single depositor as this amount will not carry interest from the date of death of the joint depositor. The interest already paid on this excess amount will be recovered or adjusted.” असे नमूद करण्यात आलेले आहे. श्रीमती प्रेम खन्ना यांचा दिनांक 01/09/2003 रोजी मृत्यू झाल्यानंतर वरील नियमाप्रमाणे तक्रारदारांचे जॉईंट खाते सिंगल खात्यात बदलल्यानंतर सिंगल खात्याची मर्यादा रुपये 3,00,000/- होती, जॉईंट खातेधारक श्रीमती प्रेम खन्ना यांच्या निधनानंतर दिनांक 01/09/2003 पासून या खात्यावर कुठलेही व्याज, मुदतपूर्व खाते बंद झाल्यामुळे बोनस मिळणार नव्हता. त्यानुसारच जाबदेणार यांनी तक्रारदारांना अतिरिक्त दिलेली व्याजाची रक्कम रुपये 96,000/- व बोनस रुपये 30,000/- वजा करुन उर्वरित रक्कम रुपये 2,04,000/- तक्रारदारांना दिनांक 22/8/2007 रोजी अदा केल्याने, नियमानुसारच कार्यवाही केल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे जाबदेणार यांच्या सेवेत त्रुटी नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
मा. सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा [1998] 9 Supreme Court Cases 706 पोस्ट मास्तर दर्गामित्ता नेल्लोर विरुध्द राजा प्रमिलम्मा, सिव्हील अपील नं 195/1995 प्रस्तूत प्रकरणी लागू पडतो असे मंचाचे मत आहे.
तसेच मा. राज्य ग्राहक वाद निवारण आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचा निवाडा अपील क्र.1504/2008 श्रीमती पामेला हर्बर्ट सिवेल विरुध्द सिनीअर पोस्ट ऑफिस, पुणे हेड ऑफिस, जनरल पोस्ट ऑफिस, पुणे, निकाल दिनांक 29/06/2010 प्रस्तूत प्रकरणी लागू पडतो असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन, दाखल कागदपत्रांवरुन व मा. वरिष्ठ न्यायालयांच्या निवाडयावरुन खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार नामंजुर करण्यात येत आहे.
[2] खर्चाबद्यल आदेश नाही.
आदेशाची प्रत तक्रारदारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.