ग्राहक तक्रार क्र. 38/2013
अर्ज दाखल तारीख : 02/03/2013
अर्ज निकाल तारीख: 09/12/2014
कालावधी: 01 वर्षे 09 महिने 08 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1) अतुल उदयसिंह देशमूख,
वय -32 वर्ष, धंदा – वकिली,
रा. साळूंके नगर, बेंबळी रोड,
उस्मानाबाद, ता. जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1) पोस्ट मास्तर, आर.एम. बेशकवार,
पोस्ट ऑफिस, उस्मानाबाद.
2) अधिक्षक एस.एम. अली,
पोस्ट ऑफिस, राम नगर, उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.एम.बी.इनामदार.
विरुध्द पक्षकारां तर्फे विधीज्ञ : श्री.डी.डब्लू.पाटील.
न्यायनिर्णय
मा. सदस्या श्रीमती विद्युलता जे.दलभंजन यांचे व्दारा :
1) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जाचे थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
अर्जदार हे साळुंके नगर येथील रहिवाशी असून विरुध्द पक्षकार पोष्ट मास्तर या पदावर काम करतात व विरुध्द पक्षकार क्र.2 हे अधिक्षक म्हणून काम करतात. तक्रारदाराने कृषी आयुक्तालयाच्या सहाय्यक अधिक्षक पदासाठी अर्ज केला होता. त्यासाठी लागणारे परीक्षा शूल्क रक्कम रु.400/- धनादेश दि.18/01/2012 रोजी काढून विरुध्द पक्षकारच्या मार्फत कृषी आयुक्तालय पूणे येथे पाठविला जो की वेळेत कृषी आयुक्तालयास प्राप्त झाला त्याप्रमाणे अर्जदार हे कृषी आयुक्तालयाच्या सहाय्यक अधिक्षक पदाच्या परीक्षेसाठी पात्र ठरले व त्याची तयारी त्यांनी चालू केली. दि.25/03/2012 रोजी परीक्षेचे हॉलतिकीट पोष्टाव्दारे दि.10/03/2012 रोजी पाठविले. सदर हॉल तिकीट दि.23/03/2012 पर्यत पोचणे गरजेच होते परंतु विरुध्द पक्षकाराच्या निष्काळजीपणामुळे सदर हॉलतिकीट मुदतीत नमिळाल्याने तक्रारदार सदरहू परीक्षेपासून वंचीत राहिले व कधीही न भरुन येणारे नुकसान झाले. सदर घटनेनंतर तक्रारदाराने विरुध्द पक्षकाराकडे सदर पत्र पोच करण्याबाबत माहिती अधिकारान्वये माहिती मागवली असता विरुध्द पक्षकाराने दि.27/07/2012 रोजी सदर पत्र प्राप्त होणेस जास्तीत जास्त 4 ते 6 दिवसांचा कालावधी लागल्याचे नमूद केले. वास्तविकत: कृषि विभागाने तक्रारदारास परीक्षेचे हॉल तिकीट दि.10/03/2012 रोजी पाठविले असतांना तक्रारदारास ते दि.27/03/2012रोजी प्राप्त झाले. म्हणून विप कडून सदरबाबत रक्कम रु.4,00,000/- नुकसान भरपाईपोटी द.सा.द.शे.12 टक्के व्याजासह, तक्रारदारास झालेल्या मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रासापोटी रु.50,000/- व सदरील तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- देण्यात यावे अशी विनंती केली आहे.
तक्रारदाराने तक्रारीसोबत विरुध्द पक्षकार यांनी दिलेले पत्र, धनादेशाची पावती, हॉलतिकीट, जाहीरात इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
2) सदर प्रकरणात मंचामार्फत विरुध्द पक्षकार यांना नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी दि.13/06/2013 रोजी आपले म्हणणे दाखल केलेले असून ते पुढीलप्रमाणे....
तक्रारदाराने दाखल केलेले पत्र हे साध्या टपालाने पाठवण्यात आलेले असल्यामुळे त्या पत्राची नोंद त्यांच्या प्रेषण दरम्यान कोणतीही नोंद टापाल कार्यालयात केली जात नाही. साध्या टपालाने पाठवलेले पत्र हे केव्हा पोहोचले हे व इतर बाबी नोंद नसल्याने सांगता येत नाही. भारतीय टपाल कार्यालय कायदाचे कलम 6 अन्वये साधारण पत्र हरवले, चुकीच्या पध्दतीने वितरीत होणे किंवा वाटपास विलंब होणे याबाबत कोणत्याही दायीत्वापासून टपाल खात्यास सुट दिलेली आहे. म्हणून तक्रार खर्चासह खारीज करावी असे नमूद केले आहे.
3) तक्रारदाराची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, गैरतक्रारदार यांचे म्हणणे, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, उभयतांचा लेखी युक्तीवाद इत्यादींचा विचार करता आम्ही निष्कर्षासाठी खालील मुद्ये उपस्थित करीत आहोत. त्यांचे निष्कर्ष खाली दिलेल्या कारणांसाठी देतो.
मुदये उत्तर
1) विरुध्द पक्षकार यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) तक्रारदार नुकसान भरपाई रक्कम मिळण्यास पात्र आहे काय ? अंशत: होय.
3) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
निष्कर्ष
4) मुददा क्र.1 व 2 चे उत्तर:
अर्जदार यांना हॉल तिकिटे वेळेत म्हणजे दि.23/03/2012 रोजी च्याआधी मिळाले नाही ही प्रमुख तक्रार अर्जदाराची आहे. अर्जदार यांनी आर.टी.आय. मार्फत जी माहिती मिळवली त्या कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले तर असे निदर्शनास येते कि कुठलेही पार्सल किेंवा पत्र हे 4 ते 10 दिवसात पाठविलेल्या ठिकाणी मिळाले पाहीजे होते. परंतु पाकिटावर दि.27/03/2012 चा शिक्का आहे म्हणजे सदर पार्सल अर्जदाराला ते 17 दिवसांनी मिळाले. कदाचित परीक्षा होण्यापुर्वी म्हणजेच दि.23/03/2012 पूर्वी जर मिळाले असते तर त्यांना परीक्षेला जाता आले असते, त्यांनी लेखी परीक्षा दिली असती इथपर्यंत अर्जदाराचे म्हणणे ग्राहय धरता येईल. पुढे परीक्षा पास होणे न होणे तोंडी मुलखातीला बोलावले असते पदनियुक्ती मिळाली असती अमूक इतका पगार मिळाला असता हा नंतरचा भाग आहे. फक्त विप क्र.1 व 2 यांच्या चूकीमुळे अर्जदारास लेखी परीक्षा देता आली नाही ही सेवेतील गंभीर त्रुटी होय. विप क्र.1 व 2 यांच्या सेवेतील त्रुटीमुळे अर्जदारास मानसिक त्रास सहन करावा लागला ही बाब ग्राहय धरावीच लागेल. त्यामुळे मंचाचे स्पष्ट मत आहे की, विपने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केल्यामुळे विप क्र.1 व 2 हे संयुक्तिक व एकत्रितरीत्या नुकसान भरपाई देण्यास पात्र आहे. म्हणून मुददा क्र.1 व 2 यांचे उत्तर होकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहेत.
आदेश.
1) तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्षकार क्र.1 व 2 यांनी अर्जदारास सेवेत त्रुटी केल्याने नुकसान भरपाई पोटी रक्कम रु.5,000/-(रुपये पाच हजार फक्त) आदेश दिल्या तारखेपासून 30 दिवसात दयावेत.
3) तक्रार खर्चाबाबत रु.1,000/- (एक हजार फक्त) आदेशाच्या तारखेपासून विरुध्द पक्षकार क्र.1 व 2 यांनी अर्जदारास दयावेत.
4) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस
दिवसात करुन विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा,
सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न
केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.