::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. किर्ती वैदय (गाडगीळ) सदस्या )
(पारीत दिनांक :- 5/05/2018)
1. अर्जदार हे वरील पत्त्यावर राहत असून अर्जदाराचा भाऊ नामे सचीन ओमप्रकाश गाडगे यांनी गै.अ.क्र.1 यांचे कार्यालयातून दोन विमा पॉलिसी काढल्या होत्या..
अ) आरएमएचएनआरडब्ल्युएलए 627252,रू.50,000/-
ब) आरएमएचएनआरडब्ल्यएलए 630239 रू,1,50,000/-
उपरोक्त पॉलिसी ‘अ’ ही दिनांक 19/10/2006 पासून चालू केली होती व मॅच्युरिटी तारीख ही 19/10/2035 होती व मासीक हप्ता रू.130/- होता. तसेच पॉलिसी ‘ब’ ही दिनांक 22/12/2006 पासून चालू केली होती व मॅच्युरिटी तारीख ही 2045 होती व मासीक हप्ता रू.225/- होता. मयत सचीन गाडगे हे सदरहू पॉलिसींचे हप्ते दरमहा भरायचे. अर्जदाराचा भाऊ दि.25/5/2007 रोजी मृत्यू झाला असल्यामुळे सदर पॉलिसीची रक्कम नॉमीनीला मिळणे आवश्यक होते. अर्जदाराने मुळ पॉलिसी धारक यांच्या मृत्युची तोंडी सुचना गैरअर्जदारांना दिल्यानंतर त्यांनी दि.13/11/2007 रोजी लेखी पत्र देऊन कळविले की, मुळ पॉलिसीसह इतर दस्ताऐवज कार्यालयात जमा करावे व त्यानंतर पॉलिसी क्लेम देण्यांत येईल. त्यानंतर दि.18/8/2011 रोजी सुध्दा लेखी सुचनापत्र दिले होते. त्यानंतर गै.अ.क्र.5 यांनी दि.22/4/2015 रोजी लेखीपत्रान्वये अर्जदाराला कळविले की योग्य कागदपत्रांसह चंद्रपूर येथील कार्यालयात भेटून दाद मागावी. त्यानंतर अर्जदाराने दि.24/11/2015 रोजी चंद्रपूर येथील कार्यालयासयोग्य दस्ताऐवजांसह भेट दिली. त्यानंतर गै.अ.क्र.5 ने अर्जदारालादि.28/8/2015 रोजी लेखी पत्र देऊन कळविले की,अर्जदाराने त्याचे ओळखपत्र, इलेक्शन कार्ड व फोटो कार्यालयात सादर करावे. म्हणून अर्जदारानेसदरहू दस्ताऐवज साध्या पोस्टाने पाठविले व त्यानंतर गै.अ.क्र.4 यांनी फोनद्वारे अर्जदाराला कळविले की तुम्हाला पॉलीसी क्लेमची रक्कम आठ दिवसांनी मिळेल. परंतु त्यानंतर एक महीन्याचा कालावधी गेल्यावरही क्लेम न मिळाल्यामुळे गै.अ.क्र.4 ला विचारणा केल्यास पॉलिसी क्लेम मिळणार नाही असे अर्जदाराला कळविले. ही गैरअर्जदाराची कृती ही सेवेत न्युनता असल्यामुळे अर्जदाराने सदर तक्रार गैरअर्जदारांविरूध्द दाखल केली आहे.
2. प्रस्तूत तक्रारीत गै.अ.क्र.1 ते 5 यांना नोटीस काढण्यांत आले. गै.अ.क्र.1 ते 5 हयांना नोटीस प्राप्त झाल्यावर गै.अ.क्र.4 हयांनी त्यांचे लेखी उत्तरदाखल केले व गै.अ.क्र.1 ते 3 व 5 हयांनी प्रकरणात गै.अ.क्र.4 हयांनी दाखल केलेले उत्तर हेच त्यांचे लेखी उत्तर समजण्यांत यावे अशी पुरसीस दाखल केलेली आहे. सबब गै.अ.क्र.1 ते 5 हयांनी लेखी उत्तरात अर्जदाराचे तक्रारीतील म्हणणे खोडून काढून पुढे नमूद केले की, अर्जदाराच्या भावाने वरील नमूद दोन पॉलीसी गै.अ.कडे काढलेल्या होत्या परंतु सदर पॉलीसीतील पहिला हप्ता भरून त्यानंतरचा एकही हप्ता सचीन गाडगे अर्जदाराचा भाऊ याने गै.अ.कडे भरलेला नाही. पॉलिसी 2011-56(2) (ए) च्या नियमानुसार जर पॉलिसीधारकाचा मृत्यू हा पॉलिसी घेतल्यापासून 36 महीन्याच्या आत होत असेल व महिन्याच्या पहिल्या तारखेचा विमाहप्ता भरलेला नसेल तर अश्या परिस्थितीत नियम 44 नुसार ग्रेसकालावधीमध्ये जर विमाहप्ता भरलेला नसेल तर सदर पॉलिसी ही शुन्य होते व त्यातील पॉलिसीचे हप्तेही संपूष्ठात येतात. त्याचप्रमाणे नियम 56(2) बी (ii) नुसार जर विमाधारकाचा मृत्यू हा 12 महिन्याच्या आत व 6 महिन्याच्या पूर्वी पॉलीसी घेतल्यापासून होत असेल तर अश्या परिस्थितीत ग्रेसकालावधी अतिरीक्त 30 दिवस मिळतात. परंतु सदर प्रकरणात पॉलीसीधारकाने फक्त पहिला हप्ता भरलेला आहे व त्यानंतरचे जवळपास 6 हप्त्याच्या वरची रक्कम पॉलीसीधारकाने भरलेली नाही. त्याचप्रमाणे पॉलीसीधारकाचा मृत्यु त्याच्या म्हणण्यानुसार दि.25/5/2017 रोजी झाला आणी सदर तारखेपर्यंत पॉलीसीचा हप्ता भरलेला दिसून येत नाही. तसेच विमाधारक मृत्युपूर्वी सतत बिमार होता व त्यानंतर त्याचा मृत्यु झाला याबाबतचे कोणतेही दस्ताऐवज प्रकरणात जोडलेले नाही. तसेच मधल्या काळात विमाधारकाने विमाधारकाने विम्याचेहप्ते का भरले नाही याचे कोणतेही संयुक्तीक कारण अर्जामध्ये नमूद नाही. वास्तवीक पाहता ज्या दिवशी दि.25/5/2007 रोजी विमाधारक यांचा मृत्यू झाला त्या दिवसाच्या पूर्वीच दोन्ही पॉलिसीज संपूष्ठात आल्या होत्या. त्याचप्रमाणे पॉलीसी बंद होतांना कुठल्याच प्रकारचा नोटीस विमा कंपनी परस्पर देत नाही. मृत्युपूर्वी पॉलीसीधारक विमा हप्ता भरू शकत होता, परंतु सदर रक्कम त्यांनी भरलेली नाही. त्यामूळे पॉलिसी बंद झाल्या. सबब गै.अ.नी अर्जदाराप्रती कोणतीही अनुचीत पध्दतीचा उपयोग केला नाही. सबब अर्जदाराचा क्लेम नियमात बसत नसल्यामुळे खारिज करण्यांत यावा.
3. तक्रारदारांची तक्रार, दस्ताऐवज, गैरअर्जदाराचे लेखी म्हणणे, तक्रारदारांचे शपथपत्र, उभय पक्षांचा लेखी तसेच तोंडी युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता तक्रार निकाल कामी खालील मुद्दे तयार करण्यांत येतात.
मुद्दे निष्कर्ष
१. गैरअर्जदार १ ते ३ यांनी तक्रारदारास
सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब
तक्रारदार सिद्ध करतात काय ? नाही
२. गैरअर्जदार १ ते ३ तक्रारदारास नुकसानभरपाई अदा
करण्यास पात्र आहेत काय ? नाही
३. आदेश ? अंतिम आदेशानुसार
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 व 2 ः-
4. अर्जदाराने गै.अ.क्र.1 यांचेकडून तक्रारीत नमूद दोन पॉलीसी काढल्या ही बाब विवादीत नसून त्या पॉलीसीचा कालावधी व मासीक हप्ता अनुक्रमे रू.130/- व रू.225/- होता ही बाब सुध्दा दोन्ही पक्षांना मान्य असून त्याबद्दलचे दस्ताऐवज अर्जदाराने तक्रारीत दाखल केलेले आहेत. अर्जदाराने तक्रारीत दाखल केलेल्या दोन्ही पॉलिसी दस्तावेजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनांस येते की पहिली पॉलिसी अर्जदाराचे भावाने दि.19 ऑक्टोबर,2006 रोजी काढलेली होती त्यात त्याने पहिला प्रिमियम हप्ता रू.128/- भरलेले असून नोव्हेंबर,2006 ते मे,2007 महिन्याचे हप्ते 31/5/2007 पर्यंत विनादंड भरण्याची परवानगी गै.अ.ने अर्जदाराला दिलेली होती . परंतु अर्जदाराचे मय्यत भावाने ऑक्टोबर,2006 नंतरचा कोणताही तक्रारीत नमूद दोन्ही पॉलीसीचा मासीक हप्ता गै.अ.कडे भरला नाही किंवा त्याबद्दलची पावती किंवा इतर दस्ताऐवज दाखल केला नाही. अर्जदाराने त्याच्या कथनात व लेखी युक्तिवादात नमूद केले आहे की, त्यानंतरचे हप्ते अर्जदाराचा भाऊ गै.अ.कडे भरायला गेला होता परंतू पासबूक नसल्यामुळे तो हप्ता भरू शकला नाही. परंतु अर्जदाराने तक्रारीत दाखल पॉलीसी दस्तऐवजात नमूद केल्याप्रमाणे मासीक विमा प्रिमियम हे गै.अ.कडे अर्ज स्वीकारूनही अर्जदाराचे भावाला भरता येऊ शकले असते. अर्जदाराच्या भावाचा मृत्यु तक्रारीत दाखल प्रमाणपत्रानुसार दि.25/5/2007 रोजी झाला आणी तक्रारीतील विवादीत दोन्ही पॉलिसीज हया अनुक्रमे दि.19 ऑक्टोबर,2006 व 22 डिसेंबर, 2006 मध्ये काढलेल्या असल्यामुळे पॉलिसीधारकाने ते मासिक हप्ते भरणे नियमाप्रमाणे आवश्यक होते.परंतु मृत्युपूर्वीचे मासीक प्रिमियम का भरले गेले नाही याबद्दल अर्जदाराने योग्य तो खुलासा तक्रारीत केला नाही.हयावरून ही बाब सिध्द होते की अर्जदाराच्या मय्यत भावाने उपरोक्त दोनही पॉलीसींचे पहिल्या हप्त्याशिवाय कोणताही हप्ता भरलेला नाही.सबब गै.अ.च्या पोस्ट ऑफीस विमा नियम 2011 56(2)ए व 56 (2) बी(ii) नूसार अर्जदार हा त्याच्या मय्यत भावाने काढलेल्या दोन्ही विमा पॉलीसींचा विमा लाभ घेण्यांस पात्र नाही. सबब गैरअर्जदारानी विमा नियमानुसार अर्जदाराचा क्लेम नाकारून कोणतीही अनुचीत पध्दती अर्जदाराप्रती अवलंबिलेली नाही असे मंचाचे मत असल्यामुळे मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देण्यांत येत आहे.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
5. मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रार क्र.27/2016 खारीज करण्यात येते.
(2) उभय पक्षांनी आपआपला तक्रारीचा खर्च सोसावा.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
चंद्रपूर
दिनांक – 05/05/2018
( अधि.कल्पना जांगडे (कुटे) ) ( अधि. किर्ती वैदय (गाडगिळ) )( श्री उमेश व्ही.जावळीकर)
मा.सदस्या. मा.सदस्या. मा. अध्यक्ष