निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 11/04/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 20/04/2011 तक्रार निकाल दिनांकः- 15 /09/2011 कालावधी 04 महिने 26 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. डिगांबर पिता दत्तराव काळे. अर्जदार वय 45 वर्ष.धंदा.मजुरी. अड.एस.पी.देशपांडे. रा.दुधगांव,ता,जिंतूर जि.परभणी. विरुध्द 1 पोस्ट मास्तर जनरल. गैरअर्जदार. औरंगाबाद विभाग.औरंगाबाद. अड.ए.के.दुर्राणी. 2 अधीक्षक,डाक घर, परभणी. 3 उपडाकघर,झरी,ता.जि.परभणी. 4 बी.पी.एम.शाखा डाकपाल,दुधगांव. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – श्रीमती. अनिता ओस्तवाल.सदस्या.) गैरअर्जदार क्रमांक 1 ते 4 यांनी त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. अर्जदारांची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदाराने आर.पी.एल.आय.पॉलिसी ईए-113094 शाखा डाकपाल दुधगांव मार्फत दिनांक 29/02/2002 रोजी काढली होती.पॉलिसी घेते वेळेस गैरअर्जदार यांनी हप्ता पावती पुस्तक दिले त्यावर रु. 210/- हप्ता दर महिन्याला भरण्याचे सुचीत केले होते.त्यानुसार अर्जदार नियमिपणे रु.210/-हप्ता भरला.पुढे पत्नीच्या आजारपणासाठी औषघोपचार खर्चासाठी अर्जदाराला पैशाची गरज होती त्यासाठी त्याने आर.पी.एल.आय.या पॉलिसी अंतर्गत दिनांक 19/02/2010 रोजी कर्ज मिळण्यासाठी दुधगांव पोस्ट कार्यालयात अर्ज केला.तो अर्ज अधीक्षक मुख्य डाकघर परभणी मार्फत पोस्ट मास्तर जनरल यांचेकडे आवश्यक कागदपत्रासह पाठविण्यात आला,परंतु अर्जदाराने विमा हप्ता रु.1/- चे कमी भरला म्हणून 02 जून ते फेब्रु 2010 पर्यंत रु.81/- + व्याज रु.402/- अशी एकुण रक्कम रु.483/- चा भरणा करण्याचे अर्जदारास सांगण्यात आले.अर्जदारास पैश्याची नितांत गरज असल्यामुळे अर्जदाराने दिनांक 06/07/2010 रोजी रक्कम रु.483/- दुधगाव येथील पोष्टात भरले.तदनंतर कर्ज मिळण्यासाठी पुन्हा आवश्यक कागदपत्राची पुतर्ता संबंधीत कार्यालयाकडे करण्यात आली.कर्ज रक्कम मिळण्याठी अर्जदाराने सतत गैरअर्जदाराकडे पाठपुरावा करुन देखील अद्याप पावेतो अर्जदारास कर्ज रक्कम देण्यात आली नाही.म्हणून अर्जदाराने मंचासमोर तक्रार दाखल करुन गैरअर्जदाराने अर्जदारास पॉलिसी वरील कर्ज रक्कम द्यावी तसेच नुकसान भरपाई पोटी रक्कम रु.15000/- व एक रुपया कमी व व्याज असे एकुण भरलेले रु. 483/- द्यावे अशा मागण्या मंचासमोर केल्या आहेत. तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि.2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.5/1 ते नि.5/6 मंचासमोर दाखल केले. मंचाची नोटीस गैरअर्जदाराना तामील झाल्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 ते 4 यांनी लेखी निवेदन नि.16 वर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहूतअंशी अमान्य केले आहे.गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, आकडे शास्त्रीय चुकांमुळे मासिक हप्ता रक्कम रु.211/- च्या ऐवजी रक्कम रु.210/- काढण्यात आला व त्यानुसार पावती पुस्तक तयार करण्यात आले परंतु अर्जदारास देण्यात आलेल्या पॉलिसी बॉंडवर मासिक हप्ता रु.211/- असल्याचे नमुद केलेले आहे.तेव्हा अर्जदाराचे सुध्दा योग्य रक्कमेचा हप्ता भरण्याचे कर्तव्य आहे.दिनांक 29/2/2010 रोजी अर्जदाराने पॉलिसी वरील कर्ज मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता त्याची पडताळणी केली असता मासिक हप्ता रक्कम रु.211/- च्या ऐवजी रक्कम रु.210/- चा भरण्यात आल्याचे लक्षात आले व ही बाब दिनांक 07/06/2010 रोजी अर्जदारास कळविण्यात आली व जुन 2002 ते फेब्रु 2010 या कालावधीत मासिक हप्त्याची रक्कम रु.1/- ने कमी भरलेली व त्यावरील व्याज असे एकुण रक्कम रु.483/- अर्जदारास भरावयास सांगीतले त्यानुसार अर्जदाराने दिनांक 06/07/2010 रोजी उपरोक्त रक्कम भरली तदनंतर अर्जदाराने दिनांक 26/12/2010 रोजी पॉलिसी वरील कर्ज रक्कम मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. व दिनांक 30/04/2011 रोजी अर्जदाराने कर्ज रक्कम रु.10,000 उचलली व पोस्ट खात्याच्या विरोधात त्याची कुठलीही तक्रार नसल्याचे त्याने लिहून दिलेले आहे.त्यामुळे अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करावी अशी विनंती गैरअर्जदारांनी मंचासमोर केली आहे. गैरअर्जदारानी लेखी निवेदना सोबत शपथपत्र नि.19 व पुराव्यातील कागदपत्र नि.18/1 ते 18/3 व नि.21/1 वर मंचासमोर दाखल केली. दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 गैरअर्जदाराने अर्जदारास त्रुटीची सेवा दिल्याचे शाबीत झाले आहे काय ? होय. 2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 अर्जदाराने आर.पी.एल.आय. पॉलिसी गैरअर्जदाराकडून दिनांक 29/02/2002 रोजी घेंतली होती हप्ता पावती पुस्तका प्रमाणे अर्जदाराने दरमहा रक्कम रु.210/- हप्ता भरला पत्नीच्या आजारपणासाठी औषधोपचार खर्चासाठी पैशासाठी गरज असल्याने अर्जदाराने दिनांक 19/02/2010 रोजी कर्ज पॉलिसी अंतर्गत कर्ज मिळण्यासाठी अर्ज केला तेव्हा जुन 2002 फेब्रुवारी 2010 या कालावधीसाठी अर्जदाराने रु.दरमहा 1/- रु प्रमाणे हप्ता कमी भरल्याचे लक्षात आल्यामुळे अर्जदारास रु.81/- व त्यावरी व्याज रु.402/- असे एकुण रु.483/- भरावे लागले व अर्जदारास वेळोवेळी मागणी करुन गैरअर्जदाराने कर्ज ही दिले नाही. अशी अर्जदाराची थोडक्यात तक्रार आहे. यावर गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अर्जदारास पॉलिसी बॉंड देण्यात आलेला होता व त्यावर मासिक हप्ता रु.211/- चा असल्याचे नमुद केले होते त्यामुळे योग्य रक्कमेचा मासिक हप्ता भरण्याचे अर्जदाराची जबाबदारी होती.तसेच कर्ज रक्कम ही अर्जदारास दिल्याचे गैरअर्जदाराचे म्हणणे आहे. मंचासमोर गैरअर्जदाराने नि.21/1 वर कर्ज मंजुरीच्या पत्राची झेरॉक्स प्रत लावली आहे.त्याची पडताळणी केली असता अर्जदारास रक्कम रु.10,000/- चे कर्ज दिनांक 30/04/2011 रोजी मिळाल्याचे स्पष्ट होते व आता मुद्दा उरता तो फक्त अर्जदाराने भरलेल्या रक्कम रु.483/- या बाबतचा उपरोक्त रक्कमे अंतर्गत जुन 2002 ते फेब्रु 2010 या कालावधीसाठी दरमहा रु.1/- या प्रमाणे कमी भरल्यामुळे ती रक्कम रु.81/- होते व त्यावरील व्याज 402/- असे एकुण रककम रु.483/- अर्जदाराकडून वसुल करण्यात आली आहे.यावर मंचाचे असे मत आहे की, वर्ष 2002 ते फेब्रु 2010 पर्यंत अर्जदाराने मासिक हप्ता पोटी भरलेली रक्कम गैरअर्जदाराने विना तक्रार स्वीकार केली वास्तविक पाहता गैरअर्जदाराच्या त्याच वेळेस ही बाब लक्षात यावयास हवी होती.अर्जदारास जर कर्ज रक्कमेची गरज भासली नसती तर गैरअर्जदारास हप्ता नेमक्या किती रक्कमेचा होता हे ही लक्षात आले नसते. याला सवस्वी गैरअर्जदार जबाबदार आहे.त्यामुळे व्याजापोटी रक्कम वसुल करण्याचा अधिकार गैरअर्जदारास नसल्याचे मंचाचे मत आहे.म्हणून व्याजापोटी अर्जदाराने भरलेली रक्कम त्यास परत करण्याचे आदेश देणे सर्वथा न्यायोचित असल्यामुळे आम्ही खाली प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत. आदेश 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदारांनी निकाल कळाल्यापासून 30 दिवसांच्या आत व्याजापोटी भरलेली रक्कम रु.402/- अर्जदारास परत करावी. 3 गैरअर्जदारांनी तक्रारीच्या खर्चापोटी व मानसिक त्रासाबद्दल एकुण रक्कम रु.1,500/- आदेश मुदतीत द्यावे. 4 दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |