(घोषित द्वारा श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराचे पती मयत सुभाष पाटील यांनी गैरअर्जदाराकडून दिनांक 31/1/2004 रोजी विमा पॉलिसी घेतली होती. पॉलिसीची रक्कम रु 50,000/- इतकी असून त्याचा हप्ता दरमहा रु 258/- असा होता. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार त्यांचे पती दरमहा नियमीतपणे रु 258/- पॉलिसीचा हप्ता भरत होते. कधी हप्ता भरण्यास विलंब झाल्यास गैरअर्जदार त्या विलंबाबद्दल दंड व व्याज सुध्दा आकारीत होते. दिनांक 27/3/2008 रोजी तक्रारदाराच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर तक्रारदारानी रक्कम मागितली असता गैरअर्जदारानी दिहनांक 27/9/2008 रोजी दावा नामंजूरीचे पत्र दिले व त्यात खालीलप्रमाणे कारण दिले. 1. विमाधारकाने फेब्रूवारी 2004 या महिन्याचा हप्ता भरलेला नाही. 2. मूळ पासबूक नुसार विमाधाकाने जून 2004 ते प्टेबर 2004 चा हप्ता दिनांक 31/10/2004 रोजी भरलेला आहे. परंतू प्रत्यक्षात तो प्रिमीयम जून 2004 ऑगस्ट चा दिनांक 18/2/2005 ला भरलेला असून तो मुदतीनंतर भरला आहे. 3. जून 2004 ते ऑगस्ट 2004 व ऑक्टोबर 2004 चा प्रिमीयम सहा महिन्यानंतर भरलेला आहे. त्यावेळी पॉलिसी चालू नव्हती. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार सन 2008 च्या मार्च महिन्यापर्यंतचे नियमीत हप्ते भरलेले होते व असे असूनही गैरअर्जदारांनी क्लेमची रक्कम दिली नाही म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार गैरअर्जदाराकडून रु 50,000/- 18 टक्के व्याजदराने, रु 25,000/- मानसिक त्रासापोटी व तक्रारीचा खर्च रु 5000/- मागतात. तक्रारदाराने शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी त्यांचा लेखी जवाब दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार मयत सुभाष पाटील यांनी रुरल पोष्टल लाईफ इन्शुरन्स पॉलिसी रु 50,000/- ची घेतली होती. त्याचा मासिक हप्ता रु 258/- असा होता. या पॉलिसीच्या मॅच्युरीटीची तारीख 31/5/2020 अशी होती. ही पॉलिसी 31 जानेवारी 2004 ला घेण्यात आली. मयत सुभाष पाटील हे पॉलिसीचा हप्ता नियमितपणे भरत नव्हते. फेब्रूवारी 2004 चा हप्ता त्यांनी भरलेला नव्हता. 31 जानेवारी 2004 रोजी हप्ता जो भरलेला आहे तो जानेवारी 2004 चा भरलेला आहे. फेब्रूवारी 2004 चा हप्ता त्यांनी भरलेला नव्हता. गैरअर्जदारानी विनंती करुनही तो हप्ता त्यांनी भरलेला नाही. त्यानंतरही जून 2004 ते ऑगस्ट 2004 चे ठरलेल्या कालावधतील हप्ते त्यांनी भरलेले नव्हते. त्यानंतर दिनांक 18 फेब्रूवारी 2005 रोजी त्यांनी रक्कम भरली. पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार दिलेल्या कालावधीमध्ये रक्कम सस्पेंस प्रिमीयम अकाऊंट म्हणून भरून घेतली जाते. संबंधित पोष्ट मास्तरने विमाधारकास पॉलिसी पूर्नजिवीत करुन घेण्यासाठी अर्ज करा असे तोंडी सांगितले होते. त्या सोबत प्रकृतीस्वास्थाचे प्रमाणपत्रही द्यावे लागेल असेही सांगण्यात आले होते. परंतु विमाधारकाने तसे केले नाही आणि त्यांची पॉलिसी पूनर्जिवीत करुन घेतली नाही. त्यामुळे विमाधारकाची पॉलिसी लॅप्स स्थितीमध्ये होती. ही रक्कम पॉलिसीच्या नियम 39 प्रमाणे त्यांना देय होत नाही. विमाधारक नियम 39(3), 40(4), आणि 41 प्रमाणे त्यांची पॉलिसी पूनर्जिवीत केली नाही म्हणून ही सर्व रक्कम त्यांना मिळू शकत नाही. पॉलिसी घेतेवेळेस पॉलिसीच्या अटी व शर्ती, नियम पॉलिसीच्या बॉण्ड पेपरवर लिहीलेल्या आहेत. तसेच पासबुकवरही लिहीलेल्या आहेत. वरील सर्व कारणावरुन तक्रारदाराची तक्रार अमान्य करावी अशी मागणी ते करतात. दोन्हीही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्राची मंचाने पाहणी केली. तक्रारदारानी दिनांक 31/1/2004 रोजी गैरअर्जदाराकडून विमा पॉलिसी घेतली होती. फेब्रूवारी 2004 या महिन्याचा हप्ता भरला नाही तसेच जून 2004 ते सप्टेबर 2004 चा हप्ता दिनांक 31/10/2004 रोजी भरलेला आहे. परंतु प्रत्यक्षात ते हप्ते जून 2004 आणि ऑगस्ट 2004 चे दिनांक 18/2/2005 रोजी भरलेले आहेत. म्हणजेच हे हप्ते मुदतीनंतर भरलेले आहेत. जून 2004 ते ऑगस्ट 2004 , ऑक्टोबर 2004 चा हप्ता 6 महिन्यानंतर भरलेला आहे. त्यावेळेस पॉलिसी चालू नव्हती असे गैरअर्जदारांचे म्हणणे आहे. याच कारणावरुन तक्रारदाराच्या क्लेमची रक्कम त्यांनी नामंजूर केलेली आहे. गैरअर्जदारांनी टपाल जीवन बिमा निधी यांचे विमाधारकासाठीच्या सूचना ज्या असतात त्या दाखल केलेल्या आहेत. त्यामध्ये खालीलप्रमाणे लिहिलेले आहे. खंडीत पॉलिसी / LAPSING OF POLICIES 8. विमा घेतलेल्या तारखेपासून तीन वर्षाच्या (36 महीने) कालावधीत अगर देय हप्ता महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत नियमिपतणे भरला नाही तर अशी पॉलीसी देय हप्ता न भरलेल्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून 6 महिन्याचा कालावधी उलटल्यावर रद्द समजण्यात येईल अशी पॉलिसी पुनर्जिवीत करुन घेतली नसल्यास भरलेली रक्कम (सरकार जमा) जप्त करण्यात येते. ही पुस्तिका व पॉलीसीच्या अटी व शर्ती गैरअर्जदारांनी तक्रारदारास पॉलिसी घेतेवेळेसच दिलेल्या आहेत. विमा पॉलिसी हा एक करार असतो व त्याच्या अटी व शर्ती दोघांनाही बांधील असतात. पॉलिसीबद्दल जे नियम दाखल केलेले आहेत ते दोघांवर बंधनकारक असतात. या नियमानुसार तक्रारदाराने जर पॉलिसी लॅप्स झाल्यानंतर रक्कम भरली असली तरी क्लेमची रक्कम आणि त्यांनतर भरलेली रक्कमही त्यांना मिळणार नाही. म्हणून मंच तक्रारदाराची तक्रार नामंजूर करीत आहे. वरील विवेचनावरुन व कागदपत्रावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे. (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |