जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच बीड यांचे समोर.
तक्रार क्रमांक – 35/2012 तक्रार दाखल तारीख – 15/02/2012
तक्रार निकाल तारीख– 19/03/2013
अमोल पि. अंबादासराव आबुज
वय 25 वर्षे, धंदा सुशिक्षीत बेरोजगार,
रा.कॅनॉल रोड,बीड ता.जि.बीड. ... अर्जदार
विरुध्द
1) पोस्ट मास्तर,
पोस्ट ऑफिस,मुख्य नांदेड ता.जि.नांदेड
2) पोस्ट मास्तर,
पोस्ट ऑफिस, मुख्य डाक घर,राजुरी वेस
बीड ता.जि.बीड. ...गैरअर्जदार
समक्ष - श्रीमती निलीमा संत, अध्यक्ष
श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्य.
तक्रारदारातर्फे - अँड.आर.बी.धांडे
गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे – अँड.सयद अझर अली.
------------------------------------------------------------------------------------ निकालपत्र
(घोषित द्वारा ः-श्रीमती नीलिमा संत,अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हा सुशिक्षीत बेरोजगार तरुण आहे. तो नोकरीच्या शोधात असताना त्याने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नांदेड यांचे कडे नोकरीसाठी अर्ज केला होता. त्यांला 21.11.2011 रोजी मुलाखतीस हजर राहणे बाबत पत्र मिळाले पण मुलाखत 14.11.2011 रोजी सकाळी 10.30 वाजता नांदेड येथे होती.
जिल्हा ग्रामीण यंत्रणेने दि.08.11.2011 रोजी तक्रारदारास पत्र पाठवले होते. परंतु ते तक्रारदारास उशीर मिळाल्याने त्यांला नोकरी पासून वंचित रहावे लागले आणि त्यांचे नुकसान झाले. पत्र वेळेवर न मिळणे ही सेवेतील त्रुटी आहे म्हणून तक्रारदाराने ही तक्रार दाखल केली आहे.
गैरअर्जदार क्र.1 व 2 मंचासमोर हजर झाले. त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेंडर व तोच त्यांचा यूक्तीवाद समजावा अशी पुर्सीस दिली. त्यांच्या लेखी जवाबाप्रमाणे तक्रारदाराने केवळ कॉल लेटरची पूढची बाजू हजर केली त्यावर नांदेड पोस्टाचा 9.11.11 तारखेचा शिक्का आहे. पण ते पत्र बीडला कधी पोहोचले ते त्यावरुन दिसत नाही. त्याचप्रमाणे जिल्हा ग्रामीण यंत्रणेने बीड येथील पीन कोड नं.431112 असा दिला आहे तो चुकीचा आहे. त्यामुळे देखील पत्राला उशीर झाला असेल त्यामुळे ते तक्रारदाराला कोणतीही भरपाई देण्यास बांधील नाहीत. त्यांनी सेवेत कोणतीही त्रूटी केलेली नाही. गैरअर्जदारांनी त्यांच्या म्हणण्यासोबत इंडीयन पोस्ट ऑफिस अँक्ट 1898 चा लागू असलेला भागही दाखल केला. त्यातील कलम.6 प्रमाणे पोस्टातील कागदपत्रांना झालेल्या नूकसान, उशीर इ. गोष्टींना गैरअर्जदार जबाबदार नाहीत. त्यांच्या अधिका-यांनी जाणीवपूर्वक उशीर अथवा नुकसान केले असेल तरच त्यांची जबाबदारी आहे.
मंचाने समोर असलेली कागदपत्रे तपासली. तक्रारदाराला दि.14.11.2011 रोजी नांदेड येथे मुखाखतीसाठी बोलावणे आले होते. तसेच त्याने दाखल केलेल्या लिफाफयावर दि.9.11.11 चा नांदेड येथील तसेच 21.11.11 रोजीचा बीड येथील शिक्का दिसत आहे. त्याच प्रमाणे बीड येथील चुकीचा पीन कोड नंबर ही दिसत आहे.
अर्जदाराचे विद्वान वकील श्री. धांडे यांचा युक्तीवाद ऐकला. त्यांनी त्यांच्या म्हणण्याच्या पूष्टयर्थ वेस्ट बंगाल राज्य आयोगाने दिलेला निकाल दाखल केला. ( IV (2009) CPJ 334—Post Master TAPAN Vs. Nihar Mahalat सदरच्या निकालात मा.राज्य आयोगाने म्हटले आहे की, मुलाखतीचे पत्र पोहोचण्यास 41 दिवसांचा अक्षम्य उशीर झाला आहे. त्यामुळे गैरअर्जदाराची सुवर्णसंधी हुकली म्हणून रु.3000/- इतकी नुकसान भरपाई गैरअर्जदारांला दिली आणि इंडीयन पोस्ट ऑफिस अँक्ट चे कलम 6 तील पोस्ट अधिकारी जाणीवपूर्वक निष्काळजीणे वागले तरच ते नुकसानीस जबाबदार असतील हा युक्तीवाद नामंजूर केला.
सदरच्या तक्रारदाराची तक्रार पूर्णपणे वरील घटनेशी मिळतीजुळती आहे. सबब पोस्ट अधिकारी त्यांची जबाबदारी झटकून टाकू शकत नाहीत. तरी देखील मुलाखतीच्या पत्रावर बीड चा पीन कोड नंबर चुकीचा टाकलेला आहे ही बाब देखील दुर्लक्षित करता येणारी नाही. त्यामुळे गैरअर्जदाराने सेवेत त्रूटी केलेली आहे. त्यामुळे तक्रारदाराला रु.2000/- शारीरिक व मानसिक त्रासापोटी व रु.1000/- तक्रारीचा खर्च देणे न्यायोचित होईल असे मंचाचे मत आहे.
म्हणून मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना एकत्रितपणे आदेश देण्यात येतो की,
तक्रारदाराला सेवेतील त्रुटीमूळे झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी
रु.2000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) व तक्रारदाराला
तक्रारीच्या खर्चापोटी रु.1000/- (अक्षरी रु.एक हजार फक्त)आदेश
मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत दयावेत, सदर रक्कम विहीत
मुदतीत अदा न केल्यास वरील रक्कमेवर तक्रार दाखल दिनांक
म्हणजे दि. 15.02.2012 पासून पूर्ण रक्कम वसूल होईपर्यत 9 टक्के
व्याजदराने संपूर्ण रक्कम दयावी.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड