(पारीत व्दारा श्रीमती वृषाली जागीरदार, मा.सदस्या)
(पारीत दिनांक–17 सप्टेंबर, 2021)
01. तक्रारकर्ता यांनी प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष पोस्ट विभागा विरुध्द दोषपूर्ण सेवा दिल्या मुळे त्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता हे उपरोक्त नमुद पत्त्यावर राहतात व त्यांचे पोस्ट ऑफीस भंडारा येथे चालू खाते क्रं-3903060737 आहे आणि त्यामुळे ते पोस्ट विभागाचा ग्राहक आहेत. ते सदर खात्या मध्ये पैसे जमा करीत होते. त्यांनी दिनांक-12.09.2018 रोजी त्यांचे सदरचे चालू खात्या मध्ये रुपये-3000/- जमा केले व पोस्ट ऑफीस मधून रक्कम जमा केल्या बाबत पावती प्राप्त केली, त्यावेळी त्यांनी सोबत पासबुक नेले नसल्याने सदर व्यवहाराची नोंद पास बुक मध्ये केली नाही. त्यानंतर साधारणतः दोन तीन महिन्या नंतर पासबुक मध्ये नोंदी केल्या असता त्यांना सदर दिनांक-12.09.2018 रोजीची रुपये-3000/- जमा केल्याची नोंद दिसून आली नसल्याने दिनांक-19.01.2019 रोजी त्यांनी पोस्ट ऑफीस भंडारा येथे चौकशी केली परंतु काहीही उपयोग झाला नाही. त्यांनी जमा केलेल्या रकमेची अफरातफर झालेली असल्याने त्याची चौकशी करण्या बाबत दिनांक-18.02.2019 रोजी लेखी अर्ज सादर केला परंतु प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्यांनी दिनांक-11.03.2019 रोजी रजिस्टर्ड पोस्टाने विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांना कायदेशीर नोटीस पाठविली परंतु उपयोग झाला नाही म्हणून शेवटी त्यांनी प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करुन त्याव्दारे खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
- तक्रारकर्ता यांची तक्रार खर्चासह मंजूर करण्यात यावी.
- तक्रारकर्ता यांनी त्यांचे खात्यात जमा केलेली रक्कम रुपये-3000/- व्याजासह जमा करण्याचे विरुध्दपक्षांना आदेशित व्हावे.
- तक्रारकर्ता यांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-50,000/- विरुध्दपक्षांनी देण्याचे आदेशित व्हावे.
- तक्रारकर्ता यांना तक्रारीचा खर्च विरुध्दपक्षां कडून देण्याचे आदेशित व्हावे.
- या शिवाय योग्य ती दाद त्यांचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 पोस्ट विभाग, भंडारा तर्फे लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करण्यात आले. त्यांनी तक्रारकर्ता यांचे बचत खाते पोस्ट ऑफीस भंडारा येथे असल्याची बाब मान्य केली. तक्रारकर्ता यांनी दिनांक-15.09.2018 रोजी रुपये-1000/- त्यांचे खात्या मधून काढले होते आणि त्याच दिवशी त्यांनी पासबुक अद्दायावत केले होते. तक्रारकर्ता यांनी दिनांक-27.09.2018 रोजी, चुकीचा दिनांक-12.09.2018 नमुद असलेल्या स्लिपव्दारे रुपये-3000/- जमा केले होते. दिनांक-27.09.2018 रोजीच रक्कम जमा केलेली असल्याने त्या संबधातील व्यवहाराची छापील नोंद दिनांक-27.09.2018 रोजीची पासबुक मध्ये झालेली आहे. पोस्ट विभागाचे पोस्टल असिस्टंट हे रक्कम जमा करण्याचे स्लिपवरील दिनांकाची तपासणी करण्यास चुकले. तसेच रक्कम जमा करण्याचे स्लिपवरील पोस्ट विभागाचा शिक्का असलेला दिनांक हा स्पष्ट व वाचनीय नाही. तक्रारकर्ता श्री एस.आर.डोंगरे यांची तक्रार विरुध्दपक्ष पोस्ट विभागास दिनांक-20.02.2019 रोजी प्राप्त झाली, त्यावर पोस्टल असिस्टंट यांचा खुलासा मागविण्यात आला आणि त्यानंतर दिनांक-26 मार्च, 2019 रोजी तक्रारकर्ता यांना उत्तर देऊन रक्कम जमा केल्याची दिनांक-27.09.2018 ची स्लिप त्यांना सादर करण्यास सुचीत केले होते असे नमुद केले.
04 तक्रारकर्ता यांनी तक्रारी सोबत दिनांक-18.02.2019 रोजीचा विरुध्दपक्षा कडे केलेला लेखी अर्ज, विरुध्दपक्षांना पाठविलेली दिनांक-11.03.2019 रोजीची कायदेशीर नोटीस, दिनांक-12.09.2018 दिनांक नमुद केलेली रुपये-3000/- ची रक्कम जमा केल्याची स्लिप, पोस्ट ऑफीस मधील खात्याचा उतारा अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात. तसेच तक्रारकर्ता यांनी शपथे वरील पुरावा व लेखी युक्तीवाद दाखल केला. तक्रारकर्ता यांनी दिनांक-12.09.2018 रोजीची रक्कम रुपये-3000/- जमा केल्या बाबतची मूळ स्लिप दाखल केली.
05. विरुध्दपक्ष पोस्ट विभागाने लेखी उत्तरा सोबत पोस्ट मास्तर भंडारा यांचा शपथे वरील पुरावा दाखल केला. सोबत सिनीयर सुपरिटेन्डन्ट पोस्ट ऑफीस नागपूर यांना जिल्हा ग्राहक आयोगाचे तक्रारी संबधात पाठविलेला खुलासा, तक्रारकर्ता यांचे पोस्ट खात्याचा उतारा, पोस्टल असिस्टंट यांचा दिनांक-25.03.2019 रोजीचा खुलासा, तक्रारकर्ता यांचे नोटीसला दिलेले उत्तर अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात.
06. प्रस्तुत तक्रारी मध्ये तक्रारकर्ता यांचा स्वतःचा आणि विरुध्दपक्ष पोस्ट विभागा तर्फे वकील श्रीमती पी.डी.पशीने यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात
आला. प्रकरणातील दाखल अभिलेखा वरुन तसेच उभय पक्षांचे मौखीक युक्तीवादा वरुन जिल्हा ग्राहक आयोगा समोर तक्रारीचे न्यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
1 | तक्रारकर्ता यांचे तक्रारी प्रमाणे वादातील व्यवहारा संबधात रक्कम खात्या मध्ये जमा न करुन विरुध्दपक्ष पोस्ट विभागाने त.क. यांना दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय ? | -नाही- |
2 | काय आदेश? | अंतिम आदेशा नुसार |
:: निष्कर्ष ::
मुद्दा क्रं 1 व 2 बाबत
07. या प्रकरणातील संक्षीप्त विवाद असा आहे की, तक्रारकर्ता यांचे म्हणण्या प्रमाणे त्यांनी दिनांक-12.09.2018 रोजी विरुध्दपक्ष पोस्ट ऑफीस भंडारा येथील चालू खाते क्रं-3903060737 मध्ये रुपये-3000/- जमा केले व पोस्ट ऑफीस मधून रक्कम जमा केल्या बाबत पावती प्राप्त केली, त्यावेळी त्यांनी सोबत पासबुक नेले नसल्याने सदर व्यवहाराची नोंद पास बुक मध्ये केली नाही. पुढे त्यांना सदर व्यवहाराची नोंद दिसून न आल्याने दिनांक-19.01.2019 रोजी पोस्ट ऑफीस भंडारा येथे चौकशी केली तसेच दिनांक-18.02.2019 रोजी लेखी अर्ज सादर केला आणि दिनांक-11.03.2019 रोजी रजिस्टर्ड पोस्टाने नोटीस पाठविली.
08. या उलट विरुध्दपक्ष पोस्ट विभागाचे लेखी उत्तरा प्रमाणे तक्रारकर्ता यांनी दिनांक-15.09.2018 रोजी रुपये-1000/- त्याचे खात्या मधून काढले होते आणि त्याच दिवशी त्यांनी पासबुक अद्दायावत केले होते. तक्रारकर्ता यांनी दिनांक-27.09.2018 रोजी, चुकीचा दिनांक-12.09.2018 नमुद असलेल्या स्लिपव्दारे रुपये-3000/- जमा केले होते. दिनांक-27.09.2018 रोजीच रक्कम जमा केलेली असल्याने त्या संबधातील व्यवहाराची छापील नोंद दिनांक-27.09.2018 रोजीची पासबुक मध्ये झालेली आहे. पोस्ट विभागाचे पोस्टल असिस्टंट हे रक्कम जमा करण्याचे स्लिपवरील दिनांक तपासणी करण्यास चुकले. तसेच रक्कम जमा करण्याचे स्लिपवरील दिनांक हा स्पष्ट व वाचनीय नाही.
09. जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे सदर वादातील दिनांक-12.09.2018 रोजीची रक्कम जमा करण्याच्या स्लिपचे अवलोकन केले, त्या स्लिपवर हाताने दिनांक-12.09.2018 अशी तारीख टाकलेली आहे मात्र स्लिपवरील पोस्ट विभागाचा दिनांक असलेला शिक्का वाचनीय नाही व तो अस्पष्ट आहे. विरुध्दपक्ष पोस्ट विभागाचे असे म्हणणे आहे की, तक्रारकर्ता यांनी दिनांक-15.09.2018 रोजी रुपये-1000/- त्याचे खात्या मधून काढले होते आणि त्याच दिवशी त्यांनी त्यांचे पासबुक अद्दायावत केले होते, त्यावेळी त्यांनी दिनांक-12.09.2018 रोजीच्या रक्कम रुपये-3000/- जमा करण्याचे नोंदी संबधाने आक्षेप घेतलेला नाही. तक्रारकर्ता यांनी त्यांचे पोस्ट ऑफीसचे खात्यामध्ये दिनांक-12.09.2018 रोजी रुपये-3000/- चे व्यतिरिक्त दिनांक-27.09.2018 रोजी रुपये-3000/- जमा केले होते असे तक्रारकर्ता यांचे म्हणणे कुठेही नाही. तक्रारकर्ता यांनी त्यांचे विरुध्दपक्ष पोस्ट विभागातील चालू खात्यामध्ये दिनांक-12.09.2018 रोजी रुपये-3000/- जमा केल्याचे व्यतिरिक्त दिनांक-27.09.2018 रोजी पुन्हा रुपये-3000/- जमा केले असतील तर दिनांक-27.09.2018 रोजीची आणखी एक रक्कम जमा करण्याची स्लिप त्यांचे जवळ असावयास हवी होती परंतु तशी दुसरी कोणतीही (दिनांक-12.09.2018 चे रक्कम जमा करण्याचे स्लिप व्यतिरिक्त दिनांक-27.09.2018 रोजीची रक्कम जमा करण्याची स्लिप) रक्कम जमा केल्याची स्लिप त्यांनी पुराव्या दाखल सादर केलेली नाही. याचाच अर्थ स्पष्ट होतो की, विरुध्दपक्ष पोस्ट विभागाचे म्हणण्या प्रमाणे तक्रारकर्ता यांनी दिनांक-27.09.2018 रोजी, चुकीचा दिनांक-12.09.2018 नमुद असलेल्या स्लिपव्दारे त्यांचे खात्या मध्ये रक्कम रुपये-3000/- जमा केले होते. प्रत्यक्षात दिनांक-27.09.2018 रोजी रक्कम जमा केलेली असल्याने त्या संबधातील व्यवहाराची छापील नोंद दिनांक-27.09.2018 रोजीची पासबुक मध्ये झालेली आहे. पोस्ट विभागाचे पोस्टल असिस्टंट हे रक्कम जमा करण्याचे स्लिपवरील दिनांक तपासणी करण्यास चुकले होते, या पोस्ट विभागाचे विधाना मध्ये जिल्हा ग्राहक आयोगास तथ्य दिसून येते. तक्रारकर्ता यांनी गैरसमजूतीमुळे प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केली असल्याचे दिसून येते. तक्रारकर्ता यांनी दिनांक-12.09.2018 व्यतिरिक्त दिनांक-27.09.2018 रोजी रक्कम जमा केल्याचा कोणताही पुरावा जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेला नाही. वरील सर्व नमुद वस्तुस्थिती आणि दाखल पुरावे पाहता तक्रारकर्ता यांचे आरोपा प्रमाणे त्यांचे पोस्ट विभागाचे खात्यात दिनांक-12.09.2018 रोजी जमा केलेली रक्कम रुपये-3000/- ची अफरातफर विरुध्दपक्ष पोस्ट विभागाने केली असल्या बाबत कोणताही पुरावा जिल्हा ग्राहक आयोगा समोर आलेला नाही. तक्रारकर्ता यांना विरुध्दपक्ष पोस्ट विभागाने कोणतीही दोषपूर्ण सेवा दिली नसल्याचे निष्कर्षाप्रत आम्ही आलेलो आहोत त्यामुळे आम्ही मुद्दा क्रं 1 चे उत्तर “नकारार्थी” नोंदवित आहोत. मुद्दा क्रं 1 चे उत्तर “नकारार्थी” आल्याने मुद्दा क्र-2 अनुसार तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असे जिल्हा ग्राहक आयोगाचे स्पष्ट मत आहे.
10. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थिती आणि दाखल पुरावे या वरुन जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येत आहे-
:: अंतिम आदेश ::
- तक्रारकर्ता श्री शैलेश रुस्तम डोंगरे यांची, विरुध्दपक्ष क्रं 1) पोस्ट मास्तर, जनरल पोस्ट ऑफीस भंडारा आणि विरुध्दपक्ष क्रं-2) पोस्ट निरिक्षक उत्तर, पोस्ट ऑफीस भंडारा यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
- खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
(03) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(04) उभय पक्षां तर्फे दाखल अतिरिक्त फाईल्स त्यांनी जिल्हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जाव्यात.