(द्वारा मा. सदस्या – श्रीमती. माधुरी एस. विश्वरुपे)
1. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडुन नवीन डबलडोअर कपाट घरगुती वापरासाठी विकत घेण्यासाठी ता. 06/08/015 रोजी रक्कम रु. 18,500/- भरणा केले. सामनवेाले यांनी या संदर्भात तक्रारदार यांना सदर रकमेची पोच बील क. 1822 अन्वये दिली आहे. सदर बिलाची प्रत मंचात दाखल केली आहे.
2. सामनेवाले यांच्या कर्मचा-यांनी तक्रारदारांना ता. 25/08/2015 रोजी कपाटाची डिलेव्हरी दिली. सामनेवाले यांनी तक्रारदारांना त्यांनी दुकानात पसंत केलेले कपाट न पाठवता दुसरे तथा सदोष कपाटाची डिलेव्हरी दिल्याची बाब लक्षात आली. सामनेवाले यांनी पाठवलेल्या कपाटाच्या आरशाची काच फुटलेली असुन त्यावर स्टीकर लाबुन तक्रारदारांची फसवणुक झाल्यामुळे सदर बाब डिलेव्हरी देणा-या कर्मचा-यांच्या निर्देशनास आणुन दिली. त्याप्रमाणे सामनेवाले यांना ता. 25/08/2015 रोजी फोन वर याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केला तथापी सामनेवाले यांनी फोन रिसिव्ह केला नाही. तक्रारदार यांनी या संदर्भात सामनेवाले यांना लेखी पत्र पाठवले.
3. तक्रारदार यांची सामनेवाले यांनी सदोष फर्निचरची डिलेव्हरी देवुन फसवणुक केलयाची बाबत consumer Guidance Society of India यांचेकडे केली असता त्यांनी सामनेवाले यांना या संदर्भात दोन पत्र पाठवुन जाब विचारला तथापी सामनेवाले यांनी कोणत्याही पत्राचे उत्तर दिले नाही. सामनेवाले यांनी तक्रारदारांना फर्निचर दुरूस्त करुन अथवा बदलुन दिले नाही. अशी तक्रारदाराची तक्रार आहे.
4. सामनेवाले यांना मंचाची नोटिस प्राप्त होऊनही ते गैरहजर असल्याने दि. 15/10/2016 रोजी यांच्या विरुध्द प्रस्तुत प्रकरण एकतर्फा चालविण्याचे आदेश पारित करण्यात आला.
5. तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार, दाखल कागदापत्रे हेच पुरावा शपथपत्र लेखी युक्तिवाद तोंडी युक्तिवाद समजण्यात यावा अशी पुर्सिस दाखल केली. सबब उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मंच खालील प्रमाणे निष्कर्ष काढत आहे.
6. कारणमिमांसा
अ) तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडुन ता. 06/08/2015 रोजी रक्कम रु. 18,500/- किमतीचे “Double Door (Heavy)(grey)” कपाट विकत घेतल्याची पोच बिल क्र. 1822 ची प्रत मंचात दाखल आहे. सदर बिलावर सामनेवाले यांनी रु.600/- डिलेव्हरी चार्जेसची आकारणी केल्याची बाबत नमुद आहे.
ब) तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार सामनेवाले यांचे कर्मचा-यांनी ता. 25/08/2015 रोजी संध्याकाळी 7 वाजता कपाटाची डिलेव्हरी दिली. तेव्हा कपाटाची काच तुटलेली असून एक काचेचा बोल्ट नसल्याचे कर्मचा-यांच्या निदर्शनास आणून दिले व कपाटाची डिलेव्हरी घेण्यास नकार दिला परंतु कर्मचा-यांनी कपाट परत नेले नाही. सामनेवाले यांना फोन वर संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पत्रे पाठवली, कन्झ्शुमर गाईडंस सोसायटी कडे या संदर्भात तक्रार केली असता त्यांनी सामनेवाले यांना दोन पत्रे पाठवली परंतु सामनेवाले यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार यांनी या संदर्भात कपाटाचे फोटो मंचात दाखल केले आहेत. सामनेवाले यांचेतर्फे आक्षेप दाखल नाही. त्यामुळे तक्रारदार यांचा पुरावा अबाधित आहे.
क) तक्रारदार यांनी रक्कम रु. 18,500/ सामनेवाले यांचेकडे भरणा करुनही सामनेवाले यांनी सदोष फर्निचरची डिलेव्हरी देवुन तक्रारदार यांना त्रृटीची सेवा दिल्याची बाब स्पष्ट होते असे मंचाचे मत आहे.
7. उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येते.
आदेश
1) तक्रार क्र. 343/2016 अंशतः मंजुर करण्यात येते.
2) सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोष फर्निचरची विक्री करुन त्रृटीची सेवा दिल्याचे जाहीर करण्यात येते.
3) सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदार यांना डबल डोअर कपाटाची किंमत रु. 18,500/- (अक्षरी रु. अठरा हजार पाचशे फक्त) ता. 06/08/2015 पासून ता. 30/12/2016 पर्यंत द.सा.द.शे 6% दराने परत करावी. विहित मुदतीत अदा न केल्यास दि. 01/01/2017 पासून आदेशाच्या पुर्ततेपर्यंत द.सा.द.शे 9% व्याजदरासह द्यावे.
4) सामनेवाले यांनी आदेश क्र. 3 ची पुर्तता केल्यानंतर 30 दिवसात तक्रारदार यांनी जुने डब्ल डोअर कपाट सामनेवाले यांना परत द्यावे.
5) सामनेवाले यांनी तक्रारदार यांना खर्चाची रक्कम रु. 5,000/- (अक्षरी रु. पाच हजार फक्त) ता. 31/12/2016 पर्यंत द्यावी. विहित मुदतीत अदा न केल्यास दि. 01/01/2017 पासून आदेशाच्या पुर्ततेपर्यंत द.सा.द.शे 9% व्याजदरासह द्यावे.
6) आदेशाच्या प्रती उभय पक्षकाराना विनाविलंब, विनाशुल्क पाठविण्यात याव्यात.
7) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारांना परत करण्यात यावेत.