न्या य नि र्ण य : (व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा)
1) तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986, कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे
तक्रारदार हे कोल्हापूर येथील राहणारे असून त्यांनी त्यांनी वि.प. नं.1 ते 4 यांचेतर्फे तुकडी व जलअप कोल्हापूर, पोट तुकडी, गडहिंग्लज, पंचायत समिती गडहिंग्लज पैकी बडयाची वाडी अयोध्यानगर येथील सर्वे नं. 70/1/7अ प्लॉट नं. 1 ब चे क्षेत्रफळ 528 चौ.मी. या मिळकतीवर बांधणेत आलेल्या रेणुका अपार्टमेंट या इमारतीमधील पहिले मजल्यावरील फ्लॅट नं. एफ-2 चे चटई क्षेत्र 811 चौ.फूट आणि 1 कार पार्किंग जीना असे एकूण बिल्टअप क्षेत्र 1054 चौ. फूटची मिळकत येणेप्रमाणे फ्लॅट तक्रारदाराने खरेदी करावा अशी वि.प. नं. 1 व 2 ने विनंती केली. वि.प.ने बांधकामाचा दर्जा व ठरले मुदतीत मिळकतीचा ताबा याची हमी व खात्री देवून वि.प. यांनी सदर तक्रारदार यांना सदर फ्लॅट खरेदी करणेस भाग पाडले. उभयतांमध्ये प्रस्तुत फ्लॅटची किंमत रक्कम रु.19,00,000/- ( रक्कम रु. एकोणीस लाख मात्र) ठरली पैकी तक्रारदाराने वि.प. यांना वेळोवेळी चेकने एकूण रक्कम रु. 13,50,000/- ( रक्कम रु. तेरा लाख पन्नास हजार मात्र) अलाहिदा अदा केलेले असून उर्वरीत रक्कम रु. 5,50,000/- ( रक्कम रु. पाच लाख पन्नास हजार मात्र) करारपत्रानुसार सदर फ्लॅटचे खरेदीपत्र पूर्ण झालेनंतर व फ्लॅटचा ताबा तक्रारदाराला दिलेनंतर वि.प. यांना अदा करणेचे ठरले होते.
करारपत्राप्रमाणे वि.प. यांनी तक्रारदार यांना दि. 30-04-2013 रोजी नमूद फ्लॅटला ताबा देणेचे करारपत्रामध्ये मान्य केले होते. वि. प. ने प्रस्तुत फ्लॅटची मुदतीत पूर्तता करुन ताबा देणेस टाळाटाळ केली आहे. अंतिमता तक्रारदाराने दि. 12-02-2015 रोजी सदर फ्लॅटचे खरेदीपत्र व ताबा देणेबाबत विनंती केली असता वि.प. ने तकारदाराला कोणताही प्रतिसाद दिला नाही. तक्रारदार यांची करारपत्राप्रमाणे वि.प. ला उर्वरीत रक्कम देणेची तयारी असतानादेखील वि.प. यांनी संगनमताने दि. 27-012-2012 रोजीच्या करारपत्रातील अटींचे पालन केलेले नाही. व वि.प. ने तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत अक्षम्य कसूर केली आहे व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे. त्यामुळे तक्रारदाराला विनाकारण बँकेचे हप्ते भरावे लागत असून घरभाडे अदा करावे लागत आहे. व तक्रारदाराचे स्वत:चे घरात राहण्याचे स्वप्न भंग पावलेले आहे. त्यामुळे तक्रारदाराला प्रचंड मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागत आहे. सबब, तक्रारदाराने वि.प. यांचेकडून नमूद फ्लॅटची तक्रारदाराने वि.प. कडे जमा केलेली रक्कम द.सा.द.शे. 12 % व्याजासह मिळणेसाठी व इतर नुकसान भरपाई मिळणेसाठी प्रस्तुत तक्रार अर्ज दाखल केला आहे.
2) तक्रारदाराने प्रस्तुत कामी तकारदाराला तक्रार अर्ज खर्चासह मंजूर करणेत यारवा. वि.प. यांनी करारपत्रात ठरलेप्रमाणे तक्रारदार यांना कायदेशीर बाबींची पूर्तता करुन तक्रारदाराला कलम 2 मध्ये नमूद केले मिळकतीचा ताबा व खरेदीपत्र पूर्ण करुन देणेचे आदेश व्हावेत, वैकल्पीक मागणी की काही कायदेशीर तांत्रिक कारणामुळे तक्रारदाराचे खरेदीपत्र पूर्ण होऊ शकत नसेल तर वि.प. यांनी तक्रारदाराकडून करारपत्राने स्विकारलेली रक्कम रु. 13,50,000/- तसेच प्रस्तुत रक्कमेवर रक्कम पूर्ण फेड होईपर्यंत द.सा.द.शे. 12 % व्याजाची रक्कम वि.प. यांनी तक्रारदाराला अदा करणेचे आदेश व्हावेत, मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 50,000/-, शारिरीक त्रासापोटी रक्कम रु. 50,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 20,000/- अशी एकूण रक्कम रु. 19,56,000/- वि. प. ने तक्रारदाराला अदा करणेचे आदेश व्हावेत अशी विनंती या कामी तक्रारदाराने केली आहे.
3) तक्रारदाराने प्रस्तुत कामी अॅफिडेव्हीट, करारपत्र, बांधकाम परवाना, वि.प. नं.4 ने लिहून दिलेल्या रक्कम मिळालेच्या पावत्या, पुराव्याचे शपथपत्र, पुरावा संपलेली पुरसीस, लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे या कामी तक्रारदाराने दाखल केली आहेत.
4) प्रस्तुत कामी वि.प. ने प्रस्तुत कामी म्हणणे, वि.प. नं. 1 ते 4 यांची पुराव्याची शपथपत्र, पुरावा संपलेची पुरसीस, वि.प. नं. 1 ते 4 चा लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. वि.प. ने दि. 1-12-2016 रोजी पुरावा संपलेची पुरसीस दिली त्यानंतर दि. 6-01-2017 लेखी युक्तीवाद दाखल केला. आणि त्यांनतर दि. 17-01-2017 रोजी दि गडहिंग्लज अर्बन को. ऑप.बँक लि, गडहिंग्लज यांनी तक्रारदाराला पाठविलेली नोटीस दाखल करुन घेणेसाठी अर्ज दिला. प्रस्तुत अर्जावर तक्रारदाराने तीव्र आक्षेप नोंदवले. पुरावा संपलेनंतर व लेखी युक्तीवादानंतर सदर कागद दाखल करणे न्यायोचीत होणार नाही. म्हणून प्रस्तुत कागद यादीवर व अर्जावर तसा आदेश करणेत आला आहे. अशा प्रकारे वि.प. ने कागदपत्रे या कामी दाखल केली आहेत.
वि.प.ने त्यांचे म्हणणे/कैफियतीमध्ये तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. त्यांनी पुढीलप्रमाणे आक्षेप तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. त्यांनी पुढीलप्रमाणे आक्षेप तक्रारदाराचे तक्रार अर्जावर नोंदवलेले आहेत त्यांनी पुढीलप्रमाणे आक्षेप तक्रारदाराचे तक्रार अर्जावर नोंदवलेले आहेत.
(i) तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्यातील मजकूर मान्य व कबूल नाही.
(ii) तक्रारदार स्वचछ हाताने मे. कोर्टात आलेले नाहीत.
(iii) वि.प. नं. 1 ते 4 यांचा बिल्डर व डेव्हलपर्स असा व्यवसाय कधीही नव्हता व नाही. वि.प. यांनी त्यांचे राहते घराचे बांधकाम चालू केले होते. त्यासाठी दि गडहिंग्लज अर्बन को. ऑप.बँक लि, गडहिंग्लज बँकेतून उचल व कर्जाचे फेड करणे अडचणीचे झाले होते. त्यामुळे आर्थिक अडचणीतून बाहेर पडणेसाठी वि. प. नं.नं. 1 व 2 यांनी घराचे वर एकूण 4 सदनिकांचे बांधकाम करुन विक्री करण्याचे ठरवले. तक्रारदाराने दि. 27-12-2012 रोजी नमूद सदनिका फ्लॅट नं. ब मधील इमारतीतील फ्लॅट नं. एफ-2 क्षेत्र 811 चौ. फू. ही सदनिका रक्कम रु. 19,00,000/- या किंमतीस घेणेचे तक्रारदार नं. 1 व 2 यांनी ठरवले. व त्याप्रमाणे करारपत्र करुन वि.प. यांना तक्रारदाराने एकूण रक्कम रु. 13,50,000/- अदा केले. उर्वरीत रक्कम रु. 5,50,000/- जमा करुन खरेदीपत्र पूर्ण करण्याचे तक्रारदाराला वि.प. ने विनंती केली परंतु तक्रारदाराने कोणताही प्रतिसाद दिला नाही. मिळकतीवर कर्ज असण-या दि गडहिंग्लज अर्बन को. ऑप.बँक लि, गडहिंग्लज बँकेने तसेच तक्रारदाराचे जावई शैलेश रेडेकर यांनी ही तक्रारदाराला वि.प. ची रक्कम अदा करुन खरेदीपत्र करुन घेणेविषयी तक्रारदाराला सांगितले होते. परंतु तक्रारदाराने काहीही लक्ष दिले नाही. बँकेने कर्जाचा तगादा चालू केलेने व तक्रारदार खरेदी करणेसाठी उर्वरीत रक्कम घेऊन आला नाही त्यामुळे बँकेने दिले सुचनेप्रमाणे प्रस्तुत वादातीत फ्लॅट श्री. विजय कुरणकर यांना रजि. खरेदीपत्राने विक्री केला आहे. तक्रारदार केंव्हाही वि.प. कडे खरेदीपत्र करुन दया म्हणून आले नव्हते विनाकारण खोटी तक्रार वि.प. ने दाखल केली आहे. वि.प. ने कोणतीही सेवात्रुटी दिलेली नाही अथवा अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. सबब, तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा असे म्हणणे वि.प.ने दाखल केले आहे. व रक्कम रु. 10,000/- कॉम्पेनसेटरी कॉस्ट तक्रारदाराकडून वि.प. ला वसूल होऊन मिळावी असे वि.प. ने म्हटले आहे.
5) वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय |
2 | वि.प. ने तक्रारदाराला अचुनित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदार वि.प. कडून खरेदीपत्र करुन मिळणेस अथवा रक्कम परत मिळणेस पात्र आहेत काय ? | होय |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे |
वि वे च न –
मुद्दा क्र. 1 ते 3 –
6) वर नमूद मुद्दा क्र. 1 ते 3 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण तक्रारदाराने वि.प. बांधीत असलेल्या वादातीत मिळकतीवरील रेणुका अपार्टमेंट मधील फ्लॅट युनिट नं. एफ-2 खरेदी करणेसाठी वि.प. नं. 1 व 2 यांनी तक्रारदारांना दि. 27-12-2012 रोजी करारपत्रानुसार तक्रारदाराने वि.प. यांना वेळोवेळी एकूण रक्कम रु. 13,50,000/- चे धनादेश अदा केले आहेत. व उर्वरीत रक्कम रु. 5,50,000/- खरेदीपत्रावेळी वि.प. ला देणेचे तक्रारदाराने मान्य व कबूल केले होते. तसेच सदर करारपत्रानुसार (दि. 27-27-12-2012 रोजीचे) तक्रारदाराला दि. 30-04-2013 रोजी फ्लॅटचा ताबा देणेचे वि.प. ने मान्य व कबूल केले होते परंतु वि.प. ने करारपत्रात ठरलेप्रमाणे अटी व शर्तीची पूर्तता केली नाही. उलट तक्रारदाराने घेतले फ्लॅटची विक्री वि.प. ने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदाराने वि.प. यांचेकडे वारंवार मागणी करुनही वि.प. ने वादातीत फलॅटचे खरेदीपत्र तक्रारदाराला करुन दिलेले नाही. तसेच प्रस्तुत कामी वि.प. ने वादातीत फ्लॅट विजय कुरणकर यांना विक्री केलेचे खोटे कथन करत असून असे कोणतेही खरेदीपत्र/दस्त वि.प. ने या कामी दाखल केलेले नाही. परंतु तक्रारदाराला नमूद फ्लॅटचा ताबा व खरेदीपत्र दयायला लागू नये यासाठी वि.प. मे. मंचाची दिशाभूल करणेच्या प्रयत्नात आहेत हे स्पष्ट व सिध्द झाले आहे. वि.प. ने त्यांचे बचावात्मक कथन सिध्द करणेसाठी कोणताही लेखी अथवा तोंडी पुरावा या कामी दाखल केलेला नाही. महाराष्ट्र ओनरशिप अॅन्ड फ्लॅटस अॅक्ट (मोफा) कायदयानुसार वि.प. ने तक्रारदाराला दि. 27-12-2012 रोजी तक्रारदार व वि.प. यांचेत झाले करारपत्राप्रमाणे वादातीत फ्लॅटचे उर्वरीत रक्कम स्वीकारुन खरेदीपत्र करुन देणे बंधनकारक असतानाही वि.प. ने तक्रारदाराला करुन दिले नाही त्यामुळे प्रस्तुत वि.प. यांनी तक्रारदाराला वादातीत फ्लॅटचे उर्वरीत रक्कम रु. 5,50,000/- (रक्कम रु. पाच लाख पन्नास हजार मात्र) तक्रारदाराकडून स्वीकारुन नमूद फ्लॅट तक्रारदारांचे नावे नोंदणीकृत खरेदीपत्र करुन देणे व ताबा देणे न्यायोचित होणार आहे. यदाकदाचित काही तांत्रिक अडचणीमुळे वि.प. ला नमूद फ्लॅटचे नोंदणीकृत खरेदीपत्र तक्रारदाराचे नावे करुन देणे व ताबा देणे अशक्य असलेस वि.प. यांनी नमूद फ्लॅटचे तक्रारदाराकडून करारपत्राने स्विकारलेली रक्कम रु. 13,50,000/- (रक्कम रु. तेरा लाख पन्नास हजार मात्र) करारपत्राचे तारखेपासून दि. 27-12-2012 पासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 % व्याज दराने होणारी संपूर्ण रक्कम तक्रारदाराला अदा करणे न्यायोचित होणार आहे असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे. तसेच वि.प. ने तक्रारदाराला झाले मानसिक, शारिरीक त्रासापोटी रक्कम रु. 15,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु. 5,000/- अदा करणे न्यायोचित होणार आहे;
सबब, प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत. सबब, आदेश.
- आ दे श -
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2) प्रस्तुत कामातील वि. प. नं. 1 ते 4 यांनी तक्रारदाराला दि. 27-12-2012 रोजी उभयतांमध्ये झाले कराराप्रमाणे सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करुन देऊन तक्रारदाराला वादातीत मिळकतीचा ताबा व नोंदणीकृत खरेदीपत्र करुन दयावे.
अथवा
कायदेशीर तांत्रिक अडचणीमुळे वि.प. वादातीत मिळकतीचे रजि. खरेदीपत्र तक्रारदाराला करुन देणेस अमर्थ असतील तर वि.प. नं. 1 ते 4 यांनी तक्रारदार यांचेकडून करारपत्राने स्वीकारलेली रक्कम रु. 13,50,000/- (रुपये रक्कम तेरा लाख पन्नास हजार फक्त) तक्रारदाराला अदा करावी. प्रस्तुत रक्कमेवर करारपत्र झाले तारखेपासून (दि. 27-12-2012) पासून पूर्ण फेड होईपर्यंत द. सा.द.शे. 9 % व्याज वि. प. नं. 1 ते 4 यांनी तक्रारदाराला अदा करावे.
3) मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु. 15,000/- (अक्षरी रक्कम रुपये पंधरा हजार फक्त) तसेच अर्जाचा खर्च रक्कम रु. 5,000/-(अक्षरी रक्कम रुपये पाच हजार फक्त) वि. प. नं. 1 ते 4 यांनी तक्रारदाराला अदा करावी.
4) वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. नं. 1 ते 4 यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे वि.प. नं. 1 ते 4 विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.