न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ सविता प्रकाश भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 2019 चे कलम 34 व 35(1) प्रमाणे दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे -
तक्रारदाराचे पती मयत श्री रावसाहेब मारुती माने हे सिव्हील कॉन्ट्रॅक्टर म्हणून माने कॉन्ट्रॅक्टर एंटरप्राईज या नावाने व्यवसाय करत होते व त्यांचे वार्षीक अंदाजे रु.2,85,000/- उत्पन्न होते. तक्रारदाराचे मयत पती आयकर भरत होते व पॅनकार्डधारक होते. वि प क्र.1 ही जीवन विमा व्यवसाय करणारी कंपनी असून वि प क्र.2 ही त्यांची कोल्हापूरमधील शाखा आहे. वि प कंपनीचे पुणे शाखेतील आर्थिक सल्लागार श्री नितीन जयस्वाल यांनी तक्रारदाराचे मयत पती श्री रावसाहेब मारुती माने यांची भेट घेऊन त्यांना वि प कंपनीच्या विमा प्लॅनबाबत माहिती दिली व जीवन विमा घेणेबाबत आग्रह केला. त्याप्रमाणे तक्रारदाराचे मयत पती श्री रावसाहेब मारुती माने यांनी पीएनबी मेटलाईफ एडॉव्हमेंट सेव्हींग प्लॅन प्लस पॉलीसी क्र.22795307 ही पॉलीसी दि.02/02/2019 रोजी घेतली. सदर पॉलीसीचा प्रिमियम भरणेचा कालावधी 18 वर्षे होता व दर सहा महिन्यांनी विमा हप्ता रक्कम रु.48,257/- चा होता. सदर पॉलीसी क्र.22795307 चे अटी व नियमाप्रमाणे तक्रारदारचे पतीचे मृत्यूसमयी ऑप्शन अ प्रमाणे नॉमीनीस विमा सरंक्षण खालीलपैकी जी रक्कम जादा असेल ती देणेचे मान्य व कबूल केले होते व आहे.विमा पॉलीसीमध्ये तक्रारदार यांना मयत श्री रावसाहेबत मारुती माने यांनी नॉमीनी नेमलेले आहे.
- वार्षिक विमा हप्त्याचे 10 पट अगर
ब) मॅच्युरिटीनंतर देणेत येणारी रक्कम जी विमा पॉलीसीचे काळानंतर देणेत येणारी गॅरंटेड रक्कम अगर
क)बेसिक विमा संरक्षणाची रक्कम रु.14,90,560/-
तक्रारदाराचे पती श्री रावसाहेबत मारुती माने यांना दि.26/05/2019 रोजी त्यांचे घरी दुपारी 1.30 वाजता छातीत दुखावयास लागून कळ येऊ लागलेने फॅमिली डॉक्टर श्री दिलीप कोळेकर, भारत नगर, मिरज यांचेकडे दाखल केले. तथापि डॉ. दिलीप कोळेकर यांनी श्री रावसाहेब मारुती माने यांना तपासून ते ह्रदयविकाराचे धक्क्याने मयत झालेचे सांगितले व तसा दाखलाही दिला. तदनंतर तक्रारदार यांनी वि प क.2 यांचे सांगली येथील शाखेत मयत श्री रावसाहेब मारुती माने यांचे मृत्यूबाबत दि.07/07/2019 रोजी जरुरी त्या सर्व कागदपत्रानिशी विमा प्रस्ताव दाखल करणेसाठी गेले असताना वि प कंपनीचे सांगली शाखेतील अधिकारी यांनी तक्रारदाराचा विमा प्रस्ताव घेणेचे नाकारले व तक्रारदारांना त्यांचे पतीची पॉलीसी रद्द झाली असलचे तोंडी सांगितले. त्यानंतर वि प यांनी दि.01/11/2019 चे पत्र तक्रारदाराचे पतीचे नांवे पाठवून तक्रारदाराचे पतीचे नांवे दिलेली विमा पॉलीसी रद्द केलेचे व विमा हप्त्याची रक्कम जप्त केलेबाबत कळविले. तदनंतरही तक्रारदाराने विमा प्रस्तावाचा पुन्हा विचार करणेसाठी म्हणून वकीलांमार्फत दि.10/04/21 व दि.28/05/21 रोजी नोटीस व सर्व कागदपत्रासह विमा प्रस्ताव पाठवूनही वि प यांनी तक्रारदाराचा कायदेशीर क्लेमबाबत कारवाई न करुन व विमा प्रस्ताव न स्विकारुन तक्रारदारांना दयावयाचे सेवेत अक्षम्य कसूर केलेला आहे.वि प यांनी तक्रारदाराचां क्लेम न देऊन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे व तक्रारदारास दयावयाच्या सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. सबब, तक्रारदाराने सदरचा विमाक्लेम वि.प. विमा कंपनीकडून वसूल होवून मिळणेसाठी तसेच दिलेल्या सेवात्रुटीसाठी व नुकसान भरपाई मिळावी म्हणून प्रस्तुत तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने याकामी वि.प. विमा कंपनीकडून तक्रारदारचे मयत पती श्री रावसाहेब मारुती माने यांचे नांवे उतरविण्यात आलेल्या विम्याची रक्कम रु.14,90,560/- त्यावर दि.07/07/2020पासून द.सा.द.शे.12 टक्के व्याजाने होणारी रक्कम रु.1,80,000/- व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.10,000/- व नोटीस खर्च रु.15,000/- असे एकूण रक्कम रु.17,20,560/- वि.प.कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने प्रस्तुतकामी अॅफिडेव्हीट, नि.3 चे कागदयादीसोबत अ.क्र. 1 ते 13 कडे विमा पॉलीसी क्र.22795307 प्रपोजल फॉर्मसह, डेथ क्लेम फॉर्म, मृत्यू दाखला, डॉ. दिलीप कोळेकर यांचा दाखला, वि प यांनी तक्रारदाराचा क्लेम नाकारलेचे पत्र, मयत श्री रावसाहेब मारुती माने यांचे सन-2017-18 व 2018-19 चे आयकर रिर्टन, वि प यांना पाठविलेली नोटीस, त्याची पोहोच पावती व परत आलेला लखोटा इत्यादी कागदपत्रे तसेच पुराव्याचे शपथपत्र याकामी दाखल केले आहे.
4. वि.प. क.1 व 2 यांना प्रस्तुत तक्रारअर्जाची नोटीस लागू होवूनही ते सदर प्रकरणी गैरहजर राहिलेने नि.1 वर वि.प. क्र.1 व 2 यांचेविरुध्द दि.18/05/2022 रोजी " एकतर्फा " आदेश करण्यात आला.
5. वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मंचाने प्रस्तुत तक्रारअर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्यांचा विचार केला.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि प हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि प विमा कंपनीने तक्रारदारास सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. विमा कंपनीकडून विमाक्लेमची रक्कम व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
-वि वे च न –
7. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदाराने तक्रारीसोबत दाखल केलेल्या कागदपत्र यादीमध्ये अ.क्र.1 कडे पॉलीसी प्रपोजल फॉर्मसह दाखल केली आहे. सदरच्या पॉलीसीचा नंबर 22795307 असून पॉलीसीवर विमाधारक म्हणून तक्रारदाराचे पती श्री रावसाहेब मारुती माने यांचे नांव आहे. सबब सदरची पॉलीसी वि.प. विमा कंपनीकडे उतरविली होती ही बाब वि.प. कंपनीने आयोगासमोर हजर होऊन नाकारलेल्या नाहीत. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे.सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
8. वर नमूद मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे कारण तक्रारदाराचे मयत पती श्री रावसाहेब मारुती माने यांनी वि प विमा कंपनीकडून प्लॅन-PNB MetLife Endowment Saving Plan Plus असलेली पॉलीसीचा नंबर 22795307 ही पॉलीसी घेतलेली असून त्यांची Sum Assured Rs.1490560/- असून Premium Rs96514.14 व Premium Term 18-आणि Frequency – Half yearly असून पॉलीसीवर Date of issue 30/01/2019 अशी तारीख नमुद आहे.
तक्रारदाराचे मयत पती श्री रावसाहेबत मारुती माने यांना दि.26/05/2019 रोजी त्यांचे घरी दुपारी 1.30 वाजता छातीत दुखावयास लागून कळ येऊ लागलेने फॅमिली डॉक्टर श्री दिलीप कोळेकर, मिरज यांचेकडे दाखल केले. तथापि डॉ. दिलीप कोळेकर यांनी श्री रावसाहेब मारुती माने यांना तपासून ते ह्रदयविकाराचे धक्क्याने मयत झालेचे सांगून तसा दाखला दिला.
तक्रारदार यांनी वि प क्र.2 यांचे सांगली येथील शाखेत मयत श्री रावसाहेब मारुती माने यांचे मृत्यूबाबत दि.07/07/2019 रोजी जरुरी त्या सर्व कागदपत्रानिशी विमा प्रस्ताव दाखल करणेसाठी गेले असताना वि प कंपनीचे सांगली शाखेतील अधिकारी यांनी तक्रारदाराचा विमा प्रस्ताव घेणेचे नाकारले व तक्रारदारांना त्यांचे पतीची पॉलीसी रद्द झाली असलचे तोंडी सांगितले. त्यानंतर वि प यांनी दि.01/11/2019 रोजी तक्रारदाराचे पतीचे नांवे पत्र पाठवून तक्रारदाराचे पतीचे नांवे दिलेली विमा पॉलीसी रद्द केलेचे व विमा हप्त्याची रक्कम जप्त केलेबाबत कळविले. तक्रारदार यांनी वि प यांचेकडे वेळोवेळी विनंती केली. तथापि वि प यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे तक्रारदार यांनी वि प यांचेकडे रजिस्टर ए;डी.पोस्टाने नोटीस व क्लेम मागणी अर्ज कागदपत्रांसह पाठविला. सदरचा क्लेम अर्ज वि प क्र.1 यांना मिळूनदेखील त्यांनी क्लेमबाबत काहीही कळविले नाही व वि प क्र.2 यांनी सदर नोटीस न स्विकारलेने लखोटा परत आला असे तक्रारदाराने कथन केले आहे.
9. प्रस्तुत कामी तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्र यादीमध्ये अ.क्र.1कडे तक्रारदाराचे मयत पती श्री रावसाहेब मारुती माने यांनी वि प विमा कंपनीकडून दि.30/01/2019 रोजी प्लॅन-PNB MetLife Endowment Saving Plan Plus असलेली पॉलीसी नंबर 22795307 ही पॉलीसी घेतलेली असून त्यांची Sum Assured Rs.1490560/-, Premium Rs96514.14, Premium Term 18-आणि Frequency – Half yearly असून पॉलीसीवर Date of issue 30/01/2019 अशी तारीख नमुद आहे.
तक्रारदाराचे मयत पती श्री रावसाहेबत मारुती माने यांचे दि.26/05/2019 रोजी त्यांचे घरी दुपारी 1.30 वाजता छातीत दुखावयास लागून कळ येऊन ह्रदयविकाराचे धक्क्याने मयत झालेचे डॉ दिलीप कोळेकर यांनी दाखला दिला. त्यानंतर तक्रारदाराने दि.07/07/2019 रोजी वि प यांचेकडे क्लेम फॉर्म भरलेबाबत क्लेम फॉर्मची प्रत कागदयादीमध्ये अ.क्र.1 कडे दाखल केला आहे. तसेच वि प यांनी क्लेम नाकारलेचे दि.01/11/2019 रोजीचे पत्र अ.क्र.6 कडे दाखल आहे. तक्रारदाराने भरलेला क्लेम फॉर्म व वि प यांचे क्लेम नाकारलेचे दि.1/11/2019 रोजीचे पत्राचे अवलोकन करता वि प यांनी तक्रारदाराने वि प यांचे दि.10/10/2019 रोजीचे पत्राप्रमाणे पूर्तता न केलेने तक्रारदाराची पॉलीसी रद्द झालेली आहे व पॉलीसीचा हप्तादेखील जप्त झालेबाबत कथन केले आहे. परंतु तक्रारदार यांनी त्यांचे तक्रारीमध्ये वि प यांचेकडून तक्रारदारास दि.10/10/2019 रोजीचे कोणतेही पत्र मिळालेले नाही असे कथन केले आहे. सदरची बाब तक्रारदाराने त्यांचे पुराव्याचे शपथपत्रात नमुद केलेली आहे. त्याबाबत वि प यांना सदर कामी हजर राहून कोणताही खुलासा दिलेला नाही. तसेच तक्रारदाराने वकीलांमार्फत नोटीस पाठविली असता त्यास वि प यांनी कोणताही प्रतिसाद अथवा उत्तर दिलेले नाही. सदरची बाब वि प यांनी हजर होऊन नाकारलेली नाही किंवा ही बाब सबळ व ठोस पुराव्यासह सिध्द केलेली नाही. वि प क्र.1 व 2 यांना सदर तक्रारीमध्ये नोटीस लागू होऊनही ते सदर कामी हजर राहिलेले नाहीत. सबब वि प क्र.1 व 2 यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत केलेला आहे. तसेच वि प क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराने दाखल केलेली कोणतेही कागद नाकारलेले नाहीत अथवा तक्रारदाराची तक्रार नाकारलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराचे तक्रारीतील कथन व कागदपत्रे आयोग मान्य करीत आहे. तक्रारदाराने वि प यांचेकडे विमा क्लेमबाबत मागणी करुनही वि प यांनी सदर न्याययोग्य व कायदेशीर विमा क्लेम नाकारुन वि.प. ने तक्रारदाराला दिलेली सेवात्रुटीच आहे असे या आयोगाचे स्पष्ट मत आहे.
11. वरील सर्व बाबींचा ऊहापोह करता तसेच तक्रारदार यांनी दाखल केले पुराव्याची शपथपत्रे, व तक्रारदाराचा युक्तीवाद यांचे अवलोकन करता प्रस्तुत वि.प. विमा कंपनीकडून विमा क्लेमपोटी रक्कम रु.14,90,560/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. सदर रक्कमेवर तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.6 % दराने व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे तसेच वि प यांनी तक्रारदारांचा न्याययोग्य क्लेम न दिलेने तक्रारदारास निश्चितच मानसिक व शारिरीक त्रास झालेला आहे. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराची विमा क्लेमपोटी रक्कम रु.14,90,560/- (रुपये चौदा लाख नव्वद हजार पाचशे साठ फक्त) व सदर रक्कमेवर तक्रार दाखल तारखेपासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.6 टक्के दराने होणारे व्याज अशी एकूण रक्कम तक्रारदारास अदा करावी.
3) वि प क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- (रुपये दहा हजार फक्त) व अर्जाचा खर्च रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. क्र.1 व 2 यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 71 व 72 अन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.