(घोषित दि. 09.11.2010 व्दारा सौ.ज्योती ह.पत्की, सदस्या) या तक्रारीची हकीकत थोडक्यात खालील प्रमाणे आहे. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, त्याने गैरअर्जदारांकडून खरेदी केलेला अपे ट्रक हे वाहन सुरुवातीपासूनच नादुरुस्त होत होता. त्यामुळे त्याने गैरअर्जदारांकडे इंजिन व गिअर बॉक्सची 11 ते 12 वेळा दुरुस्ती केली आणि प्रत्येक वेळी त्यास 25 ते 30 हजार रुपये एवढा खर्च आला. वाहनाच्या वॉरंटी कालावधीत दुरुस्ती करुन देण्याची जबाबदारी गैरअर्जदारांची असून गैरअर्जदारांनी वॉरंटी कालावधीत मोफत दुरुस्ती करुन न देता दुरुस्तीचा खर्च घेतला. गैरअर्जदारांनी नादुरुस्त वाहन त्यास विक्री केले असून आवश्यक सेवा देखील दिली नाही. त्यामुळे त्याचे नुकसान झाले. म्हणून त्याने अशी मागणी केली आहे की, त्यास अपे ट्रक हे वाहन बदलून देण्याचा आदेश गैरअर्जदारांना द्यावा किंवा वाहनाची किंमत परत करावी आणि सेवेतील त्रुटीबद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये 1,73,000/- द्यावेत. गैरअर्जदारांनी लेखी निवेदन दाखल करुन हे मान्य केले आहे की, तक्रारदाराच्या अपे ट्रकच्या इंजिनची 18 महिन्यांची वॉरंटी असून इंजिन सोडून वाहनाची 12 महिन्याची वॉरंटी आहे. गैरअर्जदारांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराच्या अपे ट्रकच्या इंजिन व गिअर बॉक्समधे कोणताही दोष नसून त्याची वारंवार दुरुस्ती करावी लागल्याचे म्हणणे खोटे आहे. तक्रारदाराचा अपे ट्रक वॉरंटी कालावधीमधे वेळोवेळी मोफत दुरुस्त करुन देण्यात आलेला आहे. तक्रारदार अपे ट्रकचा योग्य पध्द्तीने वापर करीत नसून ट्रक वापराबाबतच्या सुचनांचे त्याने पालन केले नाही. तक्रारदाराने अपे ट्रकचे डिझाईन बदलले असून तो क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतुक करतो, म्हणून ट्रकच्या चेसिसला तडे गेले होते. परंतू तक्रारदाराला चांगली सेवा देण्याच्या उद्देशाने त्याच्या ट्रकचे चेसिस मोफत बदलून देण्यात आले. तक्रारदाराला विक्री करण्यात आलेल्या अपे ट्रकमधे कोणताही दोष नाही. तक्रारदाराला योग्य व चांगली सेवा देण्यात आलेली असून त्याने ही खोटी तक्रार दाखल केली आहे. म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदारांनी केली आहे. दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात मुद्दे उत्तर 1.तक्रारदाराने गैरअर्जदारांकडून खरेदी केलेला अपे ट्रक सदोष असल्याचे तक्रारदार सिध्द् करु शकतो काय ? नाही 2.गैरअर्जदारांच्या सेवेत त्रुटी आहे काय ? नाही 3. आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 – तक्रारदाराच्या वतीने अड.बी.के.खांडेकर आणि गैरअर्जदारांच्या वतीने अड.व्ही.जी.चिटणीस यांनी युक्तीवाद केला. तक्रारदाराने गैरअर्जदारांकडून खरेदी केलेल्या अपे ट्रकच्या इंजिन व गिअर बॉक्समधे दोष असल्याचे सिध्द् करण्यासाठी तक्रारदाराने कोणत्याही तज्ञाचे मत मंचासमोर सादर केले नाही. तसेच त्याने ट्रक दुरुस्त केल्याबाबत ज्या पावत्या सादर केल्या आहेत त्यावरुन ट्रकच्या इंजिन व गिअर बॉक्समधे दोष असल्याचे सिध्द् होत नाही. कारण पावत्यांवरुन इंजिन व गिअर बॉक्सची दुरुस्ती केल्याचे दिसून येत नाही. तक्रारदाराने दाखल केलेली पावती नि. 3/1 ही तक्रारदाराशी संबंधित नसून ती वाहन क्रमांक एम.एच.21/9326 ची आहे आणि तक्रारदाराच्या अपे ट्रकचा क्रमांक एम.एच.- 21 एक्स 194 असा आहे. यावरुन तक्रारदाराची वृत्ती दिसून येते. तक्रारदाराने दाखल केलेल्या पावत्या पाहिल्या असता हे स्पष्ट दिसून येते की, गैरअर्जदारांनी त्याच्या वाहनाचे सुटे भाग वेळोवेळी मोफत बदलून दिले आहेत. विशेषत: दिनांक 06.07.2010 रोजी गैरअर्जदारांनी रुपये 46,106/- किंमतीचे चेसीस तक्रारदाराला मोफत बदलून दिलेले आहे. यावरुन गैरअर्जदारांनी तक्रारदाराला योग्य सेवा दिल्याचे स्पष्ट दिसून येते. तक्रारदाराचा अपे ट्रक सदोष असल्याचे सिध्द् झालेले नाही आणि गैरअर्जदारांच्या सेवेत कोणतीही त्रुटी नाही असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
- तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.
| HONORABLE Mrs. Jyoti H. Patki, Member | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | , | |