नि.22 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 26/2011 नोंदणी तारीख – 2/2/2011 निकाल तारीख – 19/5/2011 निकाल कालावधी – 107 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ 1. सविता सतिश ताटपुजे 2. प्रियांका सतिश ताटपुजे 3. प्रतिक सतिश ताटपुजे 4. रोहीत सतिश ताटपुजे सर्व रा. मु.पो.भाडळे, ता.कोरेगाव जि. सातारा अर्जदार क्र.1 ही अर्जदार क्र. 3 ते 4 करिता मुखत्यार ----- अर्जदार (अभियोक्ता सुप्रिया स्वामी) विरुध्द फयुचर जनराली इंडिया जीवन बिमा निगम लि. मॅनेजर दुर्गेश नागपाल 3रा मजला, लेकसिटी मॉल, कापुरबावाडी जंक्शन, बिग बझारचे पुढे, माझीवाडा, ठाणे (पश्चिम) – 400607 ----- जाबदार (अभियोक्ता सुधीर गोवेकर) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार हिचे पती श्री सतिश रामचंद्र ताटपुजे हे काविळीच्या आजाराने मयत झाले. त्यांनी जाबदार यांचेकडे रक्कम रु.2,20,000/- चा स्वतःचा विमा उतरविलेला होता. त्यांचे मृत्यूसमयी सदरची पॉलिसी अस्तित्वात होती. म्हणून अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे विमा रकमेची मागणी केली असता जाबदार यांनी रक्कम देण्याचे नाकारले. सबब पॉलिसी रक्कम रु.2,20,000/- व मानसिक नुकसानीबद्दल रु.50,000/- मिळावेत यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 2. जाबदार यांनी प्रस्तुतचे कामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि. 16 ला दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. विमा पॉलिसी उतरवितेवेळी अर्जदार यांचे पती यांनी प्रपोजल फॉर्ममध्ये त्यांना कोणताही आजार नव्हता असे नमूद केले होते. त्यांना काविळ झाली होती का, त्याबाबत उपचार चालू होते का याबाबत त्यांनी नकारार्थी उत्तरे दिली आहेत. मयत सतिश यांनी त्यांचे आजाराविषयी महत्वाची माहिती लपवून पॉलिसी उतरविली आहे. जाबदार यांनी इन्व्हेस्टीगेशन केले असता अर्जदार हे क्रोनिक अल्कोहोलिक होते, तसेच त्यांचेवर काविळ इ. आजारांबाबत उपचार चालू होते असे दिसून आले. त्यामुळे जाबदार यांनी अर्जदार यांना विमा रक्कम देण्याचे नाकारले आहे. सबब जाबदार यांनी सेवा देण्यामध्ये कोणतीही त्रुटी केलेली नाही. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये कथन केले आहे. 3. अर्जदार व जाबदारतर्फे अभियोक्त्यांनी केलेला युक्तिवाद ऐकला. तसेच अर्जदार व जाबदारतर्फे दाखल कागदपत्रे पाहिली. 4. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय. ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? नाही. क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. कारणे 5. जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये असे कथन केले आहे की, मयत सतिश यांनी जो प्रपोजल फॉर्म जाबदार यांचेकडे भरुन दिला त्यामध्ये त्यांनी त्यांना कोणताही आजार नसल्याचे नमूद केले आहे. जाबदार यांनी नि.18 सोबत सदरचा प्रपोजल फॉर्म दाखल केला असून त्याचे अवलोकन करता कलम 8.2 मध्ये अर्जदार यांनी त्यांना कोणत्याची स्वरुपाचा आजार नसल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. परंतु नि.18 सोबत जाबदार यांनी अर्जदार यांचे आजाराबाबतचे रिपोर्ट व केसपेपर्स दाखल केले आहेत. सदरची कागदपत्रे पाहिली असता असे स्पष्टपणे दिसून येते की, अर्जदार हे काविळीच्या रोगाने दीर्घकाळापासून आजारी होते. तसेच जाबदार यांनी याकामी नि.18 सोबत इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट दाखल केला आहे. सदरचे रिपोर्टमध्येही अर्जदार यांना पॉलिसी उतरविण्यापूर्वी आजार असल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. सदरची जाबदार यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे पाहता मयत सतिश यांनी विमा पॉलिसी उतरविताना त्यांना असलेल्या आजाराबाबतची माहिती जाणीवपूर्वक लपवून ठेवल्याचे स्पष्टपणे दिसून येते. सबब अर्जदार यांचा विमादावा नाकारण्याचा जाबदार यांचा निर्णय योग्य, संयुक्तिक व पॉलिसीच्या अटी व शर्तींशी सुसंगत असल्याने जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही त्रुटी केलेली नाही असे या मंचाचे मत आहे. 6. जाबदार यांनी याकामी खालील वरिष्ठ न्यायालयाचा निवाडा दाखल केला आहे. 2004 (3) TAC 865 Allahabad High Court Shantabai Vs. LIC of India सदरच्या निवाडयामध्ये मा.उच्च न्यायालयाने असे स्पष्ट मतप्रदर्शन केले आहे की, जर विमाधारकाने पॉलिसी उतरविताना विमा कंपनीकडून काही माहिती लपवून ठेवली व त्या कारणास्तव विमा कंपनीने विमा दावा नाकारला तर विमा कंपनीचा तो निर्णय योग्य आहे. सदरचा निवाडा प्रस्तुत प्रकरणास लागू होतो. सबब सदरचे निवाडयाचा आधार घेता विमादावा नाकारण्याचा जाबदार यांचा निर्णय योग्य व कायेदशीर आहे असे या मंचाचे मत आहे. 7. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत येत आहे. 2. खर्चाबाबत काहीही आदेश करणेत येत नाहीत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 19/5/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |