निकालपत्रः- श्रीमती सुमन प्र.महाजन, अध्यक्षा ठिकाणः बांद्रा निकालपत्र तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालीलप्रमाणेः- सामनेवाले क्र.1–कंपनी-विद्युत् उपकरणं जसे की, टेलीव्हीजन, म्युझिक सिस्टीम, प्लाझमा टेलीव्हीजन, इत्यादी तयार करण्याचा व्यवसाय करते. सामनेवाले क्र.2 हे त्यांचे अधिकृत विक्रेते आहेत. सामनेवाले क्र.3 हे त्यांचे अधिकृत सर्व्हिस सेंटर आहे. सामनेवाले क्र.3 चे पूर्वीचे नांव –फाईव्ह स्टार सर्व्हिसेस असे होते. 2 दि.07.07.2000 रोजी तक्रारदाराने सामनेवाले क्र.2 कडून सामनेवाले क्र.1 यांनी उत्पादित/तयार केलेला प्लाझमा टि.व्ही.मॉडेल क्र.42पीएफ9952/एजी-050015301892 चा रु.7,40,000/- ला विकत घेतला. त्याला वॉरंटी दिली होती. सामनेवाले क्र.2 यांनी आश्वासन दिले होते की, या टि.व्ही.चा दर्जा चांगला असून त्यावर चित्रं स्पष्ट येते. तसेच त्याला चांगली सेवा दिली जाते. तक्रारदाराला सदरच्या टि.व्ही.ची डिलेव्हरी दिल्यानंतर लगेचच त्यात समस्यां सुरु झाल्या. टि.व्ही. चालू असताना अचानक बंद व्हायचा, म्हणून तक्रारदाराने सामनेवाले क्र.1 यांना त्याबद्दल कळविले. त्यावेळी टि.व्ही. वॉंरटी कालावधीत होता. त्यांनी तो टि.व्ही. दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो दुरुस्त झाला नाही. 3 याप्रमाणे एवढी मोठी रक्कम खर्च करुनही टि.व्ही. चांगला चालत नव्हता, म्हणून तक्रारदार दि.11.02.2004 रोजी टि.व्ही.सामनेवाले क्र.3 यांचेकडे घेऊन गेला. तरीही टि.व्ही. व्यवस्थित चालत नव्हता, म्हणून दि.13.04.2004 रोजी पुन्हा तो सामनेवाले क्र.3 कडे टि.व्ही. घेऊन गेला. त्यावेळी सामनेवाले क्र.3यांनी पुन्हा एकदा टि.व्ही. चे डिस्प्ले पॅनेल बदलले. परंतु टि.व्ही.त समस्यां चालूच होत्या. त्यासाठी तक्रारदाराने सामनेवाले क्र.3 कडे पाठपुरावा केला. दि.20.09.2004 रोजी त्याला सामनेवाले क्र.3 यांनी पाठविलेले एक पत्र मिळाले, त्यात त्यांनी लिहीले होते की, त्या टि.व्ही.चे Gadget हे सदोष आहे व त्याकरिता तक्रारदाराला खर्च करावा लागेल. हे तक्रारदाराला मान्य नव्हते, कारण त्याचा काहीही दोष नव्हता व तोपर्यंत त्याला टि.व्ही. परत दिला नव्हता. 4 तक्रारदाराची तक्रार की, सामनेवाले यांनी त्याला सेवा बरोबर दिली नाही. त्यामुळे त्याला खूप मानसिक त्रास झाला व आर्थिक नुकसान झाले. त्याची नुकसानभरपाई मिळण्यासाठी सदरची तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडून टि.व्ही.ची संपूर्ण रक्कम व त्यावर दि.07.07.2000 पासून व्याज तसेच त्याला झालेल्या खर्चापोटी रु.75,000/- ची मागणी केली आहे. 5 तक्रार दाखल करण्यासाठी उशिर झाला म्हणून तक्रारदाराने विलंब क्षमापित करुन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे, त्याचे म्हणणे की, सामनेवाले टि.व्ही.दुरुस्त करुन देऊ असे सांगत होते, त्याने त्यांच्यावर विश्वास ठेवला त्यामुळे तक्रार दाखल करण्यास उशिर झाला. 6 सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारीला कैफियत दिली व त्यातच विलंब क्षमापित करण्याच्या अर्जाला उत्तर दिले आहे असे म्हटले केले आहे. 7 सामनेवाले क्र.1 यांचे म्हणणे की, तक्रारदाराने सदरचा प्लॉझमा टि.व्ही.विकत घेतल्याबद्दलचा पुरावा दाखल केला नाही. त्याने फक्त पेमेंट व्हाऊचर व स्टँम्प नसलेली पावती दाखल केली आहे. त्यावरुन त्याने टि.व्ही. विकत घेतला होता हे सिध्द होत नाही. तक्रारदाराने वॉरंटी कार्ड दाखल केले नाही. 8 तसेच त्यांचे म्हणणे की, तक्रारदाराने म्हटलेल्या कालावधीमध्ये त्यांना तक्रारदाराकडून किंवा सामनेवाले क्र.2 व 3 यांचेकडून या टि.व्ही.बाबत तक्रारीं आलेल्या नाहीत. तक्रारदाराने चार वर्षांनी म्हणजे वॉरंटीचा कालावधी संपल्यानंतर पहिल्यांदा तक्रार केली, म्हणजेच चार वर्षांपेक्षा जास्त त्याने तो टि.व्ही. वापरला व त्या कालावधीत त्याला टि.व्ही.बद्दल काहीं तक्रारीं नव्हत्या. टि.व्ही. त्यांच्या सर्व्हिस सेंटरला आला, त्यावेळी तो पोस्ट वॉरंटी स्किमखाली होता व त्या स्किमखाली टि.व्ही.चे सुटे भाग व सर्व्हिस चार्जेस याबद्दलचा खर्च तक्रारदाराने करावयाचा होता. परंतु त्यांच्या सर्व्हिस सेंटरने टि.व्ही. विकत घेतल्याचा पुरावा न पाहता व वॉरंटीची खात्री करुन न घेता, तो टि.व्ही. स्विकारला. तंत्रज्ञांनी त्या टि.व्ही.ची सविस्तर तपासणी केल्यानंतर, त्यांना आढळून आले की, टि.व्ही. भरपूर वापरल्यामुळे [Due to Wear and Tear] त्याचा एफटीआर बॉक्स सदोष (Defective) झाला आहे म्हणून त्यांनी पैसे न घेता नविन एफटीआर बॉक्स बसवून दिला. त्यानंतर, दोन महिन्याने त्या टि.व्ही.त अजूनही समस्यां आहेत असे तक्रारदाराने सांगितले. म्हणून त्यांच्या सर्व्हिस सेंटरने तो टि.व्ही. स्विकारला व तक्रारदाराला पैसे न घेता एक दुसरा टि.व्ही. वापरण्यासाठी दिला. तो टि.व्ही. अजूनही तक्रारदाराकडे आहे. 9 सामनेवाले क्र.1 चे म्हणणे की, सामनेवाले क्र.3 च्या तंत्रज्ञांनी टि.व्ही.ची तपासणी केली असता, त्यांना आढळून आले की, त्या टि.व्ही.चा प्लाझमा डिस्प्ले पॅनेल टि.व्ही.चा भरपूर वापर [Due to Wear and Tear] झाल्यामुळे बदलणे गरजेचे आहे अशा प्रकारची समस्यां व्होल्टेजमध्ये चढउतार झाल्यामुळे, टि.व्ही.चा वापर केल्यामुळे किंवा वातावरणाच्या परिस्थितीमुळे निर्माण होऊ शकतो व तसे तक्रारदाराला सांगितले होते. त्याला असेही कळविले होते की, पीडीपी बदलविण्याचा खर्च खूप आहे म्हणून त्याला पर्यायी प्रस्ताव दिला होता. ते त्याला एक रु.2,34,990/- चा टि.व्ही. रु.1,60,000/- ला देण्यास तयार होते. त्याबद्दल तक्रारदार व सामनेवाले क्र.1 मध्ये जवळ जवळ पाच महिनें बोलणे चालू होते. परंतु तक्रारदाराने त्यांचा तो प्रस्ताव स्विकारला नाही. म्हणून सर्व्हिस सेंटरने दि.20.09.2004 रोजी पत्र पाठवून त्याचा अंतिम निर्णय विचारला. परंतु तक्रारदाराने त्याला उत्तर पाठविले नाही. त्यामुळे त्यांचा सेवेत निष्काळजीपणा आहे हा तक्रारदाराचा आरोप खोटा आहे. तक्रारदाराला मानसिक त्रास झाला व त्याचे आर्थिक नुकसान झाले हे खोटे आहे. तक्रारदाराच्या मागण्यां मंजूर करता येत नाहीत. त्याची तक्रार रद्द करण्यात यावी. 10 सामनेवाले क्र.2 व 3 यांना या तक्रारीची नोटीस मिळूनही ते हजर झाले नाहीत, म्हणून त्यांचेविरुध्द एकतर्फाचा आदेश करण्यात आला. 11 आम्हीं तक्रारदारातर्फे–श्रीमती नाडर यांचा युक्तीवाद ऐकला. सामनेवाले क्र.1 यांनी त्यांचा लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. मात्र, तोंडी युक्तीवादाच्या वेळेस ते गैरहजर राहिले. आम्हीं या केसमध्ये दाखल केलेली कागदपत्रं वाचली व सामनेवाले क्र.1 यांचा युक्तीवाद ऐकला. 12 सामनेवाले क्र.1 यांनी त्यांच्या कैफियतीत विलंब क्षमापित का करु नये याबद्दल काहीच उल्लेख केलेला नाही. तक्रारदाराचे म्हणणे की, सामनेवाले टि.व्ही. दुरुस्त करुन देऊ असे सांगत असल्यामुळे त्याने तक्रार दाखल केली नाही. हे तक्रारदाराचे म्हणणे सामनेवाले यांनी नाकारले नाही, अशा परिस्थितीत तक्रारदाराचा विलंब क्षमापित करण्याचा अर्ज मंजूर करण्यात येतो. 13 तक्रारदाराने तक्रारीसोबत पेमेंट व्हाचरची प्रत दाखल केली आहे. त्यावरुन असे दिसून येते की, सामनेवाले क्र.2 यांना श्री.राजेंद्र गोयंका यांचे खात्यातून रु.7,40,000/- दिले होते. तक्रारदाराने त्याला सामनेवाले क्र.3 यांनी दिलेल्या दोन जॉबशिटच्या प्रतीं दाखल केल्या आहेत. त्यावरुन असे दिसते की, त्यांनी तक्रारदाराच्या या टि.व्ही.चे एफटीआर बदलून दिले होते. नंतर त्याला स्टॅन्ड बाय टि.व्ही. दिला होता. सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदाराला दि.20.09.2004 रोजीचे पत्र पाठविले होते व त्यात तक्रारदाराच्या टि.व्ही.चा उल्लेख आहे. या सर्व कागदपत्रांवरुन सिध्द होते की, तक्रारदाराने वर उल्लेख केलेला प्लाझमा टि.व्ही. सामनेवाले क्र.2 कडून विकत घेतला होता. जर त्याने हा टि.व्ही. विकत घेतला नसता तर सामनेवाले क्र.3 यांनी त्याला जी सेवा दिली ती दिली नसती. सामनेवाले क्र.2 व 3 यांनी येऊन हे नाकारले नाही की, तक्रारदाराने सदरचा टि.व्ही. विकत घेतला होता. सबब, सामनेवाले क्र.1 यांनी उपस्थित केलेला मुद्दा की, तक्रारदाराने हा टि.व्ही.विकत घेतला होता हे सिध्द केले नाही, हा नाकारण्यात येतो. 14 सामनेवाले क्र.3 यांनी दिलेल्या दि.10.02.2004 च्या जॉब शिटवरुन असे दिसून येते की, त्यावेळी तक्रारदाराच्या या टि.व्ही.चे एफटीआर नवे बसवून दिले होते. तसेच दि.13.01.2004 च्या जॉबशिटवरुन असे दिसून येते की, त्याला स्टॅन्ड बाय टि.व्ही. दिला होता. या दोन्हीं गोष्टीं सामनेवाले क्र.1 व 3 यांनी नाकारलेल्या नाही. 15 सामनेवाले क्र.3 यांनी दि.20.09.2004 रोजीच्या पाठविलेल्या पत्रांवरुन असे दिसून येते की, या टि.व्ही.चा प्लाझमा डिस्प्ले पॅनल (पीडीपी) सदोष आहे, त्यावेळी पार्टची किंमत त्याची किंमत रु.5.5 लाख होती. दुरुस्तीचा एवढा मोठा खर्च लक्षात घेता, त्यांनी तक्रारदाराला रु.2,34,990/- चा प्लाझमा टि.व्ही.मॉडेल क्र.42 पीएफ 9952/एजी-050015301892 रु.1,60,000/- देऊ केला होता. त्याबरोबर, तक्रारदाराने जर रु.12,500/- दिले तर दोन वर्षाची वाढीव वॉरंटी देऊ असेही सांगितले. तक्रारदाराचे म्हणणे की, त्याचा टि.व्ही. अजून वॉरंटी कालावधीत होता म्हणून त्याला प्लाझमा डिस्प्ले पॅनेलचे पैसे देण्याची गरज नव्हती, सामनेवाले यांनीच ते दुरुस्त करुन द्यायला पाहिजे होते. सामनेवाले क्र.1 यांनी त्यावेळी तो टि.व्ही. वॉरंटी कालावधीत होता हे नाकारले आहे. तक्रारदाराने वॉरंटी दाखल केली नाही. सामनेवाले यांनी त्यांच्या कैफियतीमधील परिच्छेद क्र.4.4 मध्ये असे म्हटले आहे की, त्यावेळी तक्रारदाराचा टि.व्ही. पोस्ट वॉरंटी स्किमखाली येत होता व तक्रारदारास सुटेभाग व सर्व्हिसचे चार्जेस द्यावयाचे होते. सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदाराच्या टि.व्ही.चे एफटीआर बदलून दिले. त्याला स्टॅन्ड बाय टि.व्ही. दिला व त्यासाठी काही चार्ज केला नाही, हा त्यांचा माणुसकीचा व चांगुलपणाचा भाग आहे. म्हणून तक्रारदाराचे म्हणणे की, त्याचा टि.व्ही. वॉंरंटी कालावधीत होता हे पुराव्याअभावी मंच अमान्य करीत आहे. टि.व्ही. वॉरंटी कालावधीत बसल्याने सामनेवाले यांनी त्याच्या दुरुस्तीचा खर्च करावा असे तक्रारदार म्हणू शकत नाही तसेच टि.व्ही. ची किंमत परत मागू शकत नाही. कारण टि.व्ही.मध्ये निर्मिती दोष आहे असा तक्रारदाराचा आरोप नाही किंवा तसा पुरावा नाही. सामनेवाले सेवेत न्यूनता केली असे तक्रारदाराने सिध्द केलेले नाही. सदरची तक्रार रद्द होणेस पात्र आहे. मंच खालीलप्रमाणे आदेश करीत आहे. आदेश (1) तक्रार क्र.316/2005 ही रद्द करण्यात येते. (2) उभय पक्षकारांनी आपापला खर्च सोसावा. (3) आदेशाच्या प्रमाणित प्रतीं दोन्हीं पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MR. G L Chavan] Member[HONABLE MRS. S P Mahajan] PRESIDENT | |