अॅड. मयुरा कुलकर्णी तक्रारदारांतर्फे
जाबदेणार क्र.1 ते 3 एकतर्फा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
द्वारा- श्रीमती, अंजली देशमुख, मा. अध्यक्ष यांचेनुसार,
** निकालपत्र **
दिनांक 31/07/2012
1. तक्रारदार जेष्ठ नागरिक असून त्यांनी दिनांक 15/3/2010 रोजी फिलीप्स FWD 872 DVD जाबदेणार क्र.3 यांच्याकडून खरेदी केला. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या वडिलांकडे 50 वर्षापासून फिलीप्स कंपनीचा रेडिओ होता. तो अजुनही चालू स्थितीत आहे. म्हणूनच तक्रारदारांनी फिलीप्स कंपनीचा FWD 872 DVD खरेदी केला होता परंतु खरेदी केल्यापासूनच कॅसेट प्लेअर व्यवस्थित चालत नव्हता. तक्रारदारांनी जाबदेणार क्र.3 यांच्याकडे जाऊन समस्या सांगितली. जाबदेणार क्र.3 यांनी तक्रारदारास जाबदेणार क्र.2 – अधिकृत सर्व्हिस सेन्टर यांच्याकडे जाण्यास सांगितले. तक्रारदारांनी दिनांक 8/4/2011 रोजी जाबदेणार क्र.2 यांच्याकडे डी व्ही डी प्लेअर दुरुस्तीसाठी दिला. त्यानंतर तक्रारदारांनी जाबदेणारास ई-मेल द्वारे दुरुस्ती झाल्याबाबत विचारणा केली तसेच एस एम एस ही पाठविला. तक्रारदार जाबदेणार क्र.1 व 2 यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करीत होते. परंतु उपयोग झाला नाही. त्यामुळे तक्रारदारांना त्रास सहन करावा लागला. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून फिलीप्स FWD 872 DVD बदलून मागतात. तसेच नुकसान भरपाई पोटी मानसिक त्रास व प्रवास खर्चापोटी प्रत्येकी रुपये 10,000/- 12 टक्के व्याजासह मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार क्र.1 ते 3 यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून जाबदेणार क्र.1 ते 3 यांच्या विरुध्द मंचाने एकतर्फा आदेश पारीत केला.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी दिनांक 15/3/2010 रोजी फिलीप्स FWD 872 DVD जाबदेणार क्र.3 यांच्याकडून खरेदी केल्याचे महाविर इलेक्ट्रॉनिक्स व फर्निचर यांच्या दिनांक 15/3/2010 च्या पावतीवरुन स्पष्ट होते. परंतु खरेदी केल्यापासूनच कॅसेट प्लेअर व्यवस्थित चालत नसल्यामुळे तक्रारदारांनी दिनांक 8/4/2010 रोजी दुरुस्तीसाठी डी व्ही डी प्लेअर जाबदेणार क्र.2 यांच्याकडे दिल्याचे जाबदेणार क्र.2 यांच्या दिनांक 8/4/2011 च्या पावतीवरुन दिसून येते. या पावतीमध्ये कॅसेट प्रॉब्लेम व रिमोट प्रॉब्लेम असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. तक्रारदारांनी यासंदर्भात जाबदेणारांकडे पाठपुरावा केल्यासंदर्भात व जाबदेणार यांनी तक्रारदारांच्या डी व्ही डी मधील तक्रारीचे निराकरण लवकर करण्यासंदर्भात पाठविलेले ई-मेल दिनांक 2/5/2011 मंचासमोर दाखल केलेले आहेत. यासर्वांवरुन तक्रारदारांनी खरेदी केलेल्या डी व्ही डी प्लेअर मध्ये कॅसेट प्रॉब्लेम व रिमोट प्रॉब्लेम होते. पाठपुरावा करुनही जाबदेणार यांनी समस्यांचे निराकरण केले नाही ही बाब स्पष्ट होते, ही जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे. किरकोळ दुरुस्तीसाठी तक्रारदार डी व्ही डी प्लेअर बदलून मागतात. डी व्ही डी प्लेअर मध्ये उत्पादकीय दोष होता यासंदर्भात तक्रारदारांनी कुठलाही कागदोपत्री पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारदारांची ही मागणी मंच अमान्य करीत आहे. तक्रारदारांनी वॉरंटी कार्ड दाखल केलेले नाही. त्यामुळे डी व्ही डी प्लेअर ला किती वर्षाची वॉरंटी होती हे मंचास कळू शकत नाही. इलेक्ट्रॉनिक वस्तूला एक वर्षाची वॉरंटी असते असे गृहित धरले असता एक वर्षाचा कालावधी संपण्या आधीच डी व्ही डी प्लेअर मध्ये कॅसेट प्रॉब्लेम व रिमोट प्रॉब्लेम उदभवल्याचे दिसून येते. कॅसेट प्रॉब्लेम व रिमोट प्रॉब्लेम या दुरुस्त्या किरकोळ स्वरुपाच्या आहेत असे मंचाचे मत आहे. त्या जाबदेणार क्र.2 यांनी दुरुस्त करुन दयाव्यात असा मंच जाबदेणार क्र.2 यांना आदेश देत आहे. तक्रारदारांनी जाबदेणार क्र.3 यांच्या विरुध्द कोणतीही मागणी केलेली नाही. त्यामुळे जाबदेणार क्र.3 यांच्या विरुध्द मंच कुठलाही आदेश देत नाही.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार जाबदेणार क्र.1 व 2 यांच्या विरुध्द अंशत: मान्य करण्यात येत
आहे. जाबदेणार क्र.3 यांच्याविरुध्द आदेश नाही.
[2] जाबदेणार क्र.2 यांनी तक्रारदारांच्या FWD 872 DVD डी व्ही डी प्लेअर मधील कॅसेट प्रॉब्लेम व रिमोट प्रॉब्लेम आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दुरुस्त करुन दयावेत.
[3] जाबदेणार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारीचा खर्च
रुपये 1000/- तक्रारदारांना दयावा.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.