नि.16 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 107/2010 नोंदणी तारीख – 6/4/2010 निकाल तारीख – 9/7/2010 निकाल कालावधी – 93 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ अभिजीत महादेव देसाई द्वारा यशवंत हायस्कूल शनिवार पेठ, कराड जि. सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री. विनय मुळे) विरुध्द 1. फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण, डेक्कन चॉक, लक्ष्मीनगर, फलटण तर्फे मॅनेजर विजया नामदेव खेडकर 2. श्री शंतनु दुर्योधन रणनवरे, चेअरमन फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण, ता. फलटण जि. सातारा द्वारा रा. डॉ निलेश आर. जगताप रॉयल हॉस्पीटल, अनुपम आर्केड, पुणे-सातारा रोड, कात्रज सर्प उद्यानाच्या मागे, पुणे-46 3. श्री सुधीर गजानन कांबळे, व्हा.चेअरमन फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण, ता.फलटण जि.सातारा रा. माई बझार, गोळीबार मैदान फलटण जि.सातारा ----- जाबदार (एकतर्फा ) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार यांनी जाबदार संस्थेमध्ये दोन वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत रक्कम ठेव म्हणून ठेवलेल्या आहेत. सदरच्या ठेवींची मुदत संपलेली आहे. मुदत ठेव पावतीची मुदत संपलेनंतर देय होणा-या रकमेची मागणी अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे केली. तथापि जाबदार यांनी अर्जदार यांना ठेवीवर व्याजसहित देय झालेली रक्कम देण्यास टाळाटाळ केली. थोडक्यात जाबदार यांनी अर्जदार यांना देण्यात यावयाची रक्कम न दिल्यामुळे सेवेत त्रुटी केली आहे. अर्जदार हे जाबदार संस्थेचे ग्राहक आहेत. त्यामुळे जाबदार संस्थेकडून मुदत ठेव पावतीची एकूण देय रक्कम वसूल होऊन मिळण्यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज केला आहे. सदरचे अर्जामध्ये अर्जदार यांनी एकूण रक्कम रु. 60,154/- ची मागणी केलेली आहे. 2. जाबदार क्र.1 ते 3 यांनी प्रस्तुत तक्रारअर्जाची नोटीस स्वीकारली नाही. नोटीस न स्वीकारलेबाबतचे पोस्टाचे शेरे असलेले लखोटे प्रस्तुतकामी दाखल आहेत. जाबदार क्र. 1 ते 3 हे नेमलेल्या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. तसेच त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब, त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 3. अर्जदार यांनी या अर्जाचे कथनातील सिध्दतेसाठी नि. 2 ला शपथपत्र दिलेले आहे. ते शपथपत्र पाहिले. अर्जदार यांनी नि. 5 सोबत दाखल केलेल्या दोन मूळ ठेवपावत्या पाहिल्या. 4. अर्जदार यांनी दाखल केलेली वर नमूद कागदपत्रे पाहिली असता असे स्पष्ट दिसून येते की, अर्जदार यांनी जाबदार पतसंस्थेमध्ये वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेव म्हणून ठेवलेल्या होत्या व आहेत. सदरच्या ठेवींची मुदत पूर्ण झालेनंतर जाबदार यांनी अर्जदार यांना ठेवीची रक्कम व त्यावर ठेव पावतीमध्ये नमूद केल्याप्रमाणे होणा-या व्याजाची रक्कम देण्याची होती. तथापि, अर्जदार यांचे शपथपत्र व अर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता असे दिसून येते की, जाबदार यांनी अर्जदार यांना देय असलेली रक्कम देण्यास टाळाटाळ केलेली आहे. थोडक्यात जाबदार यांनी अर्जदार यांना द्यावयाच्या सेवेत कमतरता केलेली आहे. सबब या प्रकरणी मंचाचे असे स्पष्ट मत झाले आहे की, अर्जदार यांना जाबदार यांनी कबूल केलेली सेवा म्हणजे ठेव म्हणून ठेवलेल्या रकमेवर व्याजासहित देय झालेली रक्कम ठेवींची मुदत संपलेनंतर दिलेली नाही. अशा प्रकारे अर्जदार हे जाबदार यांचेकडून रक्कम मिळणेस पात्र आहेत असे दिसून येत आहे. 5. एक गोष्ट नमूद करणे जरुरीचे आहे की, जाबदार क्र.2 जे फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या. या संस्थेचे चेअरमन आहेत, अशा या जबाबदारीच्या पदावर काम करणा-या व्यक्तीने प्रस्तुतचे कायदेशीर प्रकरणाची नोटीस/सूचना स्वीकारणे व नेमलेल्या तारखांना या मंचासमोर हजर होणे जरुरीचे होते. तथापि, कसलेही संयुक्तिक कारण जाबदार क्र. 2 यांचेतर्फे याकामी पुढे येत नाही की, जेणेकरुन जाबदार क्र. 2 हे याकामी गैरहजर राहिलेले आहेत. जाबदार यांनी अर्जदार यांचे अर्जातील कोणतेही कथन नाकारलेले अथवा खोडून काढलेले नाही. सबब, अर्जदार यांचे या अर्जातील कथनानुसार अर्जदार यांनी विनंती कलमामध्ये केलेली विनंती अंशतः मान्य करणे जरुरीचे आहे. 6. या सर्व कारणास्तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश करण्यात येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तरित्या अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात. 1. ठेवपावती क्र.11029 व 11030 वरील मूळ रक्कम ठेवपावतीमध्ये नमूद केल्याप्रमाणे देय होणा-या व्याजासह द्यावी तसेच ठेवीची मुदत संपलेनंतरचे तारखेपासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्केंप्रमाणे व्याजासह द्यावी. 2. मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/- द्यावेत. 3. अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- द्यावेत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 9/7/2010 Sd/- Sd/- Sd/- (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Mr. V.D.Deshmukh, PRESIDENT | HONABLE MR. Mr. S. K. Kapse, MEMBER | |