तक्रार अर्ज क्र. 215/2015.
तक्रार दाखल दि.08-09-2015.
तक्रार निकाली दि.23-06-2016.
1. श्री.शंकरराव बुवासो तावरे,
2. सौ. रत्नप्रभा शंकरराव तावरे,
3. श्री. नितीन शकरराव तावरे,
4. श्री. सचिन शकरराव तावरे
सर्व रा. मु.पो.सांगवी,
ता. बारामती, जि. पुणे. .... तक्रारदार
विरुध्द
1. फलटण ट्रेडर्स नागरीसहकारी पतसंस्था मर्या.,फलटण,
ता.फलटण, जि.सातारा.
2. चेअरमन, श्री. हिंदूराव निळकंठराव नाईक-निंबाळकर
3. व्हा.चेअरमन,श्री. सचिन सुधाकर कांबळे
4. संचालक, श्री. समशेरसिंह हिंदूराव नाईक-निंबाळकर
5. संचालक, श्री. रविंद्र औदुंबर पवार,
6. संचालक, श्री. सदाशिव मारुती गुरव,
7. व्यवस्थापक, फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी
पतसंस्था मर्या.,फलटण
डेक्कन चौक, लक्ष्मीनगर,
ता.फलटण, जि.सातारा
8. माजी चेअरमन, श्री. शंतनु दुर्योधन रणनवरे,
9. संस्थापक अध्यक्ष, श्री. दुर्योधन दत्तात्रय रणनवरे,
10. व्हा.चेअरमन, श्री. सुधाकर गजानन कांबळे,
नं. 8 ते 10 रा. दत्तकृपा, गोळीबार मैदान,
लक्ष्मीनगर, फलटण, ता. फलटण,जि.सातारा. .... जाबदार
तक्रारदारातर्फे –अँड.विक्रम गायकवाड.
जाबदार क्र.1 ते 7 तर्फे– अँड.आनंद कदम
जाबदार क्र. 8,9,10 एकतर्फा.
न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.श्री. श्रीकांत कुंभार सदस्य यानी पारित केला)
1. प्रस्तुत तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 प्रमाणे जाबदारांनी दिलेल्या सदोष सेवेबद्दल जाबदारांविरुध्द दाखल केलेली आहे.
2. तक्रारदाराचे तक्रार अर्जातील थोडक्यात कथन खालीलप्रमाणे,-
तक्रारदार क्र. 1 ते 4 हे सर्व एकत्र कुटूंबातील असून तक्रारदार क्र.3 व 4 ही त्यांची मुले असून ते सर्व तक्रारीत नमूद केलेल्या पत्त्यावर एकत्रित रहात आहेत. ते मु.पो. सांगवी ता.बारामती, जि.पुणे येथील कायमस्वरुपी रहिवाशी आहेत. तसेच जाबदार पतसंस्था ही सहकार कायद्याप्रमाणे स्थापन झालेली असून जाबदार क्र. 1 पतसंस्थेचा कारभार सुरळीत चालविण्याची जबाबदारी जाबदार क्र. 2 ते 10 यांचेवर आहे. संस्थेचे कामकाज व्यवस्थित चालावे व ठेवीदारांना ठेवी वेळेवर मिळाव्यात अशा पध्दतीचा कारभार करण्याची कायदेशीर जबाबदारी ही जाबदार क्र. 2 ते 10 यांचीच आहे. सभासदांना कर्ज देणे नियमितपणे कर्ज वसुल करणे तसेच कर्ज वसुली व ठेवीदारांना ठेवी देणे, त्या अनुषंगाने योग्य ती कारवाई करणे इत्यादी सर्व जबाबदारी सामुहिकरित्या जाबदार यांचीच आहे. प्रस्तुत पतसंस्थेत तक्रारदारांनी तक्रारदार स्वतः व त्यांचे कुटूंबियांचे नावे खालीलप्रमाणे वैयक्तिकरित्या व स्वतंत्रपणे रकमा मुदत ठेवी व दामदुप्पट ठेवींमध्ये गुंतविल्या आहेत. त्याचा तपशिल खालीलप्रमाणे,-
1. तक्रारदार क्र. 1 श्री. शंकरराव बुवासो तावरे
अ.क्र. | ठेव पावती क्रमांक | ठेव रक्कम रुपये | ठेव ठेवलेला दिनांक | ठेव मुदत पूर्ण होणारा दिनांक | ठेवीवरील व्याजदर द.सा.द.शे |
1 | 64015 | 15,000/- | 25-03-2008 | 25-03-2010 | 13% |
2 | 64013 | 15,000/- | 25-03-2008 | 25-03-2010 | 13% |
3 | 64014 | 15,000/- | 25-03-2008 | 25-03-2010 | 13% |
4 | 60777 | 17,000/- | 15-05-2007 | 15-05-2009 | 13% |
5 | 053301 | 16,015/- | 07-07-2007 | 07-07-2009 | 13% |
6 | 056878 | 17,000/- | 04-12-2007 | 04-12-2008 | 12% |
7 | 053299 | 17,000/- | 07-07-2007 | 07-07-2009 | 13% |
8 | 053300 | 17,000/- | 07-07-2007 | 07-07-2009 | 13% |
9 | 61896 | 40,000/- | 17-07-2007 | 17-07-2009 | 13% |
10 | 60778 | 17,000/- | 15-05-2007 | 15-05-2009 | 13% |
11 | 60779 | 16,000/- | 15-05-2007 | 15-05-2009 | 13% |
12 | 61675 | 50,000/- | 30-06-2007 | 30-06-2009 | 13% |
13 | 5452 | 10,000/- | 14-11-2003 | 14-11-2008 | दामदुप्पट |
| | 2,72,015/- | | | |
तक्रारदार क्र. 2- सौ. रत्नप्रभा शंकरराव तावरे
अ.क्र. | ठेव पावती क्रमांक | ठेव रक्कम रुपये | ठेव ठेवलेला दिनांक | ठेव मुदत पूर्ण होणारा दिनांक | ठेवीवरील व्याजदर द.सा.द.शे |
1 | 61855 | 50,000/- | 12-07-2007 | 12-07-2009 | 13% |
2 | 60781 | 17,000/- | 15-05-2007 | 15-05-2009 | 13% |
3 | 60780 | 17,000/- | 15-05-2007 | 15-05-2009 | 13% |
4 | 61676 | 50,000/- | 30-06-2007 | 30-06-2009 | 13% |
5 | 60782 | 16,000/- | 15-05-2007 | 15-05-2009 | 13% |
6 | 60589 | 10,000/- | 10-05-2007 | 10-05-2009 | 13% |
7 | 053304 | 16,015/- | 07-07-2007 | 07-07-2009 | 13% |
8 | 053300 | 17,000/- | 07-07-2007 | 07-07-2009 | 13% |
9 | 053302 | 17,000/- | 07-07-2007 | 07-07-2009 | 13% |
10 | 053303 | 17,000/- | 07-07-2007 | 07-07-2009 | 13% |
| | 2,10,015/- | | | |
तक्रारदार क्र. 3- श्री.नितीन शंकरराव तावरे
अ.क्र. | ठेव पावती क्रमांक | ठेव रक्कम रुपये | ठेव ठेवलेला दिनांक | ठेव मुदत पूर्ण होणारा दिनांक | ठेवीवरील व्याजदर द.सा.द.शे |
1 | 053296 | 17,000/- | 07-07-2007 | 07-07-2009 | 13% |
2 | 053298 | 16,015/- | 07-07-2007 | 07-07-2009 | 13% |
3 | 36828 | 15,000/- | 11-02-2004 | 11-02-2009 | दामदुप्पट |
4 | 053297 | 17,000/- | 07-07-2007 | 07-07-2009 | 13% |
| | 95,015/- | | | |
तक्रारदार क्र. 4- श्री. सचिन शंकरराव तावरे
अ.क्र. | ठेव पावती क्रमांक | ठेव रक्कम रुपये | ठेव ठेवलेला दिनांक | ठेव मुदत पूर्ण होणारा दिनांक | ठेवीवरील व्याजदर द.सा.द.शे |
1 | 053305 | 17,000/- | 07-07-2007 | 07-07-2009 | 13% |
2 | 053307 | 16,015/- | 07-07-2007 | 07-07-2009 | 13% |
3 | 36591 | 25,000/- | 11-02-2004 | 11-02-2009 | दामदुप्पट |
4 | 053306 | 17,000/- | 07-07-2007 | 07-07-2009 | 13% |
| | 1,00,015/- | | | |
वरीलप्रमाणे नमूद ठेवी मुदत ठेव व दामदुप्पट ठेव स्वरुपात तक्रारदार क्र. 1 ते 4 यांनी जाबदार यांचेकडे वैयक्तिक नावे ठेवलेल्या असून त्या आजमितीस जाबदार यांचेकडे जमा असून शिल्लक आहेत. सदरील मुदतठेव रकमेचा कालावधी पूर्ण झालेला असल्याने व सदरील रकमांची तक्रारदार यांना आवश्यकता असल्याने त्यांनी जाबदार यांचे शाखेत जावून अनेक हेलपाटे मारुन सदरील रकमांची मागणी केली असता, जाबदार यांनी “सदरील ठेव रक्कम आज देतो, उद्यड देतो. वसुली चालू आहे. वसुली झाल्यानंतर देतो” अशा स्वरुपाची विविध प्रकारची खोटी कारणे सांगून सदरील रकमा तक्रारदार यांना देण्याविषयी टाळाटाळ केली व रकमा परत दिल्या नाहीत. तदनंतर तक्रारदारांनी जाबदार क्र. 2 चेअरमन यास जुलै,2015 मध्ये सदरील दामदुप्पट ठेव,मुदत ठेव रकमा नमूद व्याजासहीत परत मिळण्याकरीता रितसर समक्ष जावून भेटून मागणी केलेली होती. परंतु तक्रारदार यांच्या मागणीप्रमाणे संपूर्ण व्याजासह ठेव रक्कम जाबदार यांनी तक्रारदार यांना न देवून यातील जाबदार यांनी या तक्रारदारांना सदोष सेवा दिलेने सदरील तक्रार अर्ज तक्रारदार यांनी या मे मंचात दाखल केला आहे व यातील तक्रारदार यांनी यातील जाबदारांकडून वैयक्तिक व संयुक्तिरित्या त्यांना जबाबदार धरुन ठेवीची एकूण रक्कम रु.6,77,060/- त्यावर द.सा.द.शे. मुदत पूर्ततेपर्यंत 13 टक्के व्याजासह होणा-या रकमेवर मुदत पूर्ततेनंतर द.सा.द.शे. 12 टक्के व्याजाने होणारी रक्कम मानसिक शारिरीक त्रासापोटीपोटी रु.25,000/- व अर्ज खर्चापोटी रक्कम रु.25,000/- जाबदारांकडून मिळावेत अशी विनंती मागणी या मंचाकडे केली आहे.
3. प्रस्तुत तक्रारदार यांनी त्यांची तक्रार नि.1 कडे त्यांच्या तक्रारीपृष्ठयर्थ निशाणी क्र.2 ते निशाणी क्र.5 शपथपत्र, नि.7 कडे तक्रारदाराचे वकील, विक्रम गायकवाड यांचे वकीलपत्र, नि. 8 सोबत नि.8/1 ते नि.8/19 कडे ठेवपावत्यांच्या सत्यप्रती नि. 8/20 कडे मुखत्यारपत्र, नि. 39 कडे पुरावा संपलेची पुरसीस, नि. 31कडे लेखी युक्तीवाद, नि.36 कडे साक्षीदाराचे पुराव्याचे शपथपत्र इत्यादी कागदपत्रे प्रकरणी दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत जाबदारांना मे. मंचातर्फे प्रस्तुत प्रकरणाच्या नोटीसा रजि.पोष्टाने पाठविण्यात आल्या. प्रस्तुत नोटीस सर्व जाबदारांना मिळाल्या. त्यांच्या नोटीसा मिळाल्याच्या पोहोच पावत्या प्रकरणी नि. 11 ते नि. 18 व नि.28 कडे असून यातील जाबदार क्र. 8,9,10 यांना नोटीस मिळूनही ते मंचात गैरहजर त्यामुळे त्यांचेविरुध्द नि. 1 वरती मे. मंचाने एकतर्फा आदेश पारित केले आहेत. यातील जाबदार क्र. 1 ते 7 तर्फे अँड. कदम यांनी नि.19 कडे त्यांचे वकीलपत्र दाखल करुन ते प्रकरणी हजर झाले व त्यांनी त्यांचे जाबदारांतर्फे अधिकारपत्र नि.22/1 कडे दाखल केले असून नि. 23 कडे म्हणणे व त्याचे पृष्ठयर्थ नि.24 कडे शपथपत्र, नि.30 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि.33/1 कडे सहकार आयुक्त पुणे यांचे आदेशाची प्रत नि.35/1 कडे चौकशी अहवालाची प्रत इत्यादी कागदपत्रे दाखल केली असून प्रस्तुत जाबदार यांनी तक्रारदाराचे तक्रारीसंबंधी खालीलप्रमाणे आक्षेप नोंदलेले आहेत.
“तक्रारदारांचा अर्ज खोटा व लबाडीचा आहे. ठेव पावत्या मान्य व कबूल नाहीत, त्यामुळे ठेवी देण्याचा प्रश्नच येत नाही. मुळातच हे तक्रारदार या जाबदारांकडे कधीच ठेवीची रक्कम मागणीस आले नव्हते. प्रस्तुत संस्था ही सहकारी कायद्यान्वये स्थापन झालेली असलेने त्यांचेविरुध्द सहकार न्यायालयात कलम 91 खाली दाद मागणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रस्तुत तक्रार येथे चालण्यास पात्र नाही. तक्रारदारांनी ज्यावेळी ठेवी ठेवल्या त्यावेळचे जाबदार क्र. 8 ते 10 हे त्यांचे ठेवी परत करण्यास जबाबदार आहेत. तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये सेवापुरवठादार व ग्राहक हे नाते नाही. यातील सर्व जाबदार यांची ठेवी परत करण्याबाबत तक्रारदाराचे ठेवकाळातील संचालक मंडळावर कलम 88 अन्वये चौकशी होऊन नुकसानीची जबाबदारी कायम केली असल्याने त्यांचेकडून या तक्रारदारांनी त्यांना सामील पक्षकार कडून ती वसूल करावी. तसेच या तक्रारदारांनी सर्व संचालकांना सामिल पक्षकार केलेले नाही त्यामुळे तक्रारदारांची तक्रार फेटाळण्यात यावी असे आक्षेप प्रकरणी नोंदलेले आहेत.
5. प्रस्तुत तक्रारदारांची तक्रार त्यातील कथने, पुरावे व जाबदारांचे म्हणणे, त्यातील कथने व दाखल पुरावा यांचा विचार करता प्रस्तुत प्रकरण न्यायनिर्गत करण्यासाठी खालील मुद्दयांचा विचार करण्यात आला.
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. प्रस्तुत तक्रारदार हा जाबदारांचा ग्राहक आहे काय? होय.
2. यातील जाबदारानी या तक्रारदारांच्या मुदत पूर्ण
झालेल्या ठेवी त्यांच्या वारंवारच्या मागणीवरुन वा
वकिलामार्फत नोटीस पाठवून मागणी करुनही त्यांना रक्कम
न देवून या तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे काय? होय.
3. ठेव काळातील संचालकांचेविरुध्द कलम 88 प्रमाणे
चौकशी होऊन त्यांना दोषी धरलेने त्यांचेकडून प्रस्तुत
ठेवीची रक्कम या तक्रारदारांना मागता येथील संस्था
जरी चालू असली तरी चालू संचालकांकडून ती मागता
येणारनाही हा मुद्दा जाबदार शाबीत करतात काय ? नाही.
4. अंतिम आदेश काय? तक्रार अर्ज अंशतः मंजूर.
कारणमिमांसा-
मुद्दा क्र. 1 ते 4
6. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार ही वित्तिय संस्था असून संस्थेच्या विविध कर्ज प्रकरणे वगैरे प्रकारच्या कारणासाठी भांडवलवृध्दी आवश्यक असते. सदर भांडवलवृध्दी जाबदार संस्था जनतेमधून मुदतबंद ठेव स्वरुपात पैसे गोळा करते व ठेवीदार ग्राहकाला त्याची घेतलेली ठेव मुदतपूर्तीनंतर सव्याज परत करणेचे वचन देते व तशी ठेवपावती की जी ठेवीदार व जाबदार यांचेमधील लिखित करार असतो व नि.8/1 ते नि.8/16 प्रकरणी दाखल पावत्या पाहता अशाप्रकारे प्रस्तुत जाबदार संस्थेकडे यातील तक्रारदाराने न्यायनर्णिय कलम 2 मध्ये नमूद तपशीलाप्रमाणे मुदत ठेव स्वरुपात एकूण रक्कम रु.6,77,060/- (रुपये सहा लाख सत्त्याहत्तर हजार साठ मात्र) पावती क्र. 64013 ते पावती क्र. 64015,60777, 053301, 056878, 053299, 053300, 61896, 60778, 60779, 61675, 34187, 61855, 60781, 60780, 61676, 60782, 60589, 053304, 053302, 053303, 053296, 053298, 36828, 053297, 053305, 053307, 36591, 053306 ने एकूण 30 मुदतबंद व दामदुप्पट पावत्यांव्दारे ठेवलेले होते. त्यामुळे याठिकाणी यातील जाबदार हे सेवापुरवठादार व तक्रारदार हा सेवा घेणारा असे नाते असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे प्रस्तुत तक्रारदार हा जाबदारांचा ग्राहक असल्याचे निर्विवादरित्या शाबित होते. त्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो.
प्रस्तुत तक्रारदारांची जाबदाराकडील ठेवीची मुदत अनुक्रमे 2009, 2010 साली संपली तेव्हापासून यातील तक्रारदारांनी यातील सर्व जाबदारांकडे स्वतः भेटून वारंवार त्यांच्या ठेवीची रक्कम सव्याज परत मिळणेची मागणी केली परंतु जाबदारांनी तक्रारदारांना त्यांच्या मुदतपूर्ण झालेल्या ठेवींची रक्कम तक्रारदाराला परत दिली नाही. आज देतो, उद्या देतो अशी कारणे सांगून ठेवीची रक्कम देणेचे टाळले व या जाबदारांनी या तक्रारदार यांना ठेव रक्कमा त्यांना दिले वचनाप्रमाणे परत केल्या नाहीत. या सर्व बाबी प्रस्तुत जाबदारांनी या तक्रारदारांना वरीलप्रमाणे ठरले मुदतीनंतर लगेच त्यांच्या ठेव रकमा देणेचे टाळून तक्रारदारांना अत्यंत गंभीर स्वरुपाची सदोष सेवा दिली आहे हे पूर्णतः शाबीत होते.
त्यामुळे प्रस्तुतची तक्रारदारांची तक्रार ही अंशतः मंजूरीस पात्र असून प्रस्तुत तक्रारदार, यांनी नि.36/1 कडे दाखल केलेल्या संचालक यादीप्रमाणे त्यातील जाबदार क्र. 1 ते 7 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्या त्यांचे न्यायनिर्णय कलम 2 मध्ये दिलेल्या तपशिलातील ठेवपावती क्र.64013 ते पावती क्र.64015, 60777, 053301, 056878, 053299, 053300, 61896, 60778, 60779, 61675, 34187, 61855, 60781, 60780, 61676, 60782, 60589, 053304, 053302, 053303, 053296, 053298, 36828, 053297, 053305, 053307, 36591, 053306 या सर्व ठेवपावत्यांच्या नमूद ठेव रकमेवर ठेव ठेवलेल्या नमूद दिनांकापासून ठेवीची मुदत संपले तारखेपर्यंत द.सा.द.शे. 13 टक्के व्याजदराने होणा-या संपूर्ण व्याजासह होणा-या संपूर्ण रकमेवर ठेव मुदत संपले तारखेनंतर सुरु होणा-या दुसरे दिवशीच्या तारखेपासून द.सा.द.शे.10 टक्के व्याजदराने संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंतचे होणारे तारखेपर्यंतच्या संपूर्ण व्याजासह होणारी संपूर्ण रक्कम त्याचप्रमाणे पावती क्र.34187 याची ठेव रक्कम रु.10,000/- त्याची दामदुप्पट रक्कम रु.20,000/- त्यावर दि.15/11/2008 पासून द.सा.द.शे. 10 टक्के व्याजदराने, पावती क्र.26828 ठेव रक्कम रु.15,000/- त्याची दामदुप्पट रक्कम रु.30,000/- या रकमेवर दि.21/2/2009 पासून द.सा.द.शे. 12 टक्के व्याजदराने व पावती क्र.36591 ठेव रक्कम रु.25,000/- त्यांची दामदुप्पट रक्क्म रु.50,000/- त्यावर दि.12/2/2009 पासून द.सा.द.शे.12 टक्के व्याजदराने संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंतच्या होणा-या संपूर्ण व्याजासह होणारी संपूर्ण रक्कम जाबदारांकडून मिळणेस व मानसिक शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रार अर्ज खर्च रु.5,000/- या जाबदारांकडून जाबदार क्र. 1 ते 7 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्या मिळणेस हा तक्रारदार पात्र असून वरील सर्व ठेवींच्या रकमा तक्रारदार क्र. 2 ते 4 यांचे कुलमुखत्यार या नात्याने तक्रारदार क्र. 1 यांना मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हा मंच आला आहे. त्यामुळे या तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूरीस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हा मंच आला आहे. त्यामुळे मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो.
7. यातील जाबदार क्र. 1 ते 7 यांचेतर्फे नि.35 कडे प्रकरणी दाखल केलेला कलम 88 प्रमाणेचा चौकशी अहवाल पाहिला असता, प्रस्तुतची पतसंस्था सध्या चालू आहे. त्यांनी किंवा शासनाने कलम 88 प्रमाणे दोषी ठरलेल्या संचालकांकडून त्यांचेवर निश्चित केलेल्या जबाबदारीप्रमाणे वसुली करावी ती जबाबदारी या ग्राहकांची नसते. जाबदार संस्थेचा अंतर गैरकारभार व कोणत्याही त्रुटीसाठी वा चालणा-या कामकाजासाठी ठेवीदार ग्राहक जबाबदार नसतो व प्रस्तुत संस्था सध्या चालू आहे. त्यामुळे प्रस्तुत जाबदार पतसंस्था व तिचे सर्वांगीण कामकाज पाहणारे विद्यमान संचालक हे या तक्रारदाराच्या ठेवी देण्यास वैयक्तिक व संयुक्तिरित्या जबाबदार आहेत असे आमचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे कलम 88 च्या चौकशी अहवाल व त्याबाबतचे जाबदारांचे आक्षेप हे गैरलागू आहेत असे आमचे स्पष्ट मत आहे.
8. वरील सर्व कारणमीमांसा व विवेचन यांना अधीन राहून खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करणेत येत आहेत.
आदेश
1. तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करणेत येते.
2. यातील जाबदारांनी या तक्रारदार यांच्या मुदतपूर्ण झालेल्या ठेवींच्या रकमा संपूर्ण व्याजास तक्रारदार यांनी स्वतः वारंवार मागणी करुनही व वकिलांमार्फत नोटीस पाठवून मागणी करुनही त्यांना परत न करुन या तक्रारदाराला गंभीर स्वरुपाची सदोष सेवा दिली आहे असे घोषित करण्यात येते.
3. यातील जाबदार क्र. 1 ते 7 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या न्यायनिर्णय कलम 2 मधील तपशीलातील या तक्रारदारांची मुदत ठेवपावती क्र.64013 ते पावती क्र.64015, 60777, 053301, 056878, 053299, 053300, 61896, 60778, 60779, 61675, 34187, 61855, 60781, 60780, 61676, 60782, 60589, 053304, 053302, 053303, 053296, 053298, 36828, 053297, 053305, 053307, 36591, 053306 या सर्व ठेवपावत्यांच्या नमूद ठेव रकमेवर ठेव ठेवलेल्या नमूद दिनांकापासून ठेवीची मुदत संपले तारखेपर्यंत द.सा.द.शे. 13 टक्के व्याजदराने होणा-या संपूर्ण व्याजासह होणा-या संपूर्ण रकमेवर ठेव मुदत संपले तारखेनंतर सुरु होणा-या दुसरे दिवशीच्या तारखेपासून द.सा.द.शे.8 टक्के व्याजदराने संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंतचे होणारे तारखेपर्यंतच्या संपूर्ण व्याजासह होणारी संपूर्ण रक्कम सदर आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयांचे आत तक्रारदार क्र. 1 (मुखत्यार) यांना अदा करावी.
4. यातील जाबदार क्र. 1 ते 7 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या न्यायनिर्णय कलम 2 मधील तपशीलातील या तक्रारदारांची दामदुप्पट ठेव पावती क्र.34187 याची ठेव रक्कम रु.10,000/- त्याची दामदुप्पट रक्कम रु.20,000/- त्यावर दि.15/11/2008 पासून द.सा.द.शे. 10 टक्के व्याजदराने, व पावती क्र.26828 ठेव रक्कम रु.15,000/- त्याची दामदुप्पट रक्कम रु.30,000/- या रकमेवर दि.21/2/2009 पासून द.सा.द.शे. 10 टक्के व्याजदराने व पावती क्र.36591 ठेव रक्कम रु.25,000/- त्यांची दामदुप्पट रक्कम रु.50,000/- त्यावर दि.12/2/2009 पासून द.सा.द.शे.10 टक्के व्याजदराने संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंतच्या होणा-या संपूर्ण व्याजासह होणारी संपूर्ण रक्कम सदर आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयांचे आत तक्रारदार क्र.1 मुखत्यार यांना अदा करावी.
5. यातील जाबदार क्र. 1 ते 7 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या यातील तक्रारदार यांना मानसिक,शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व अर्ज खर्चापोटी रक्कम रु.5,000/- सदर आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयांच्या आत तक्रारदार यांना अदा करावी.
6. वरील आदेशाचे पालन जाबदारांनी विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द कलम 25 व 27 अन्वये पुढील कार्यवाही करु शकतील.
7. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
8. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि.23-06-2016.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (श्री.मिलींद पवार-हिरुगडे)
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.