निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 01/03/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 02/04/2013
तक्रार निकाल दिनांकः- 11/12/2013
कालावधी 08 महिने. 09दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
रघुनाथ पिता नारायणराव गायकवाड. अर्जदार
वय 45 वर्षे. धंदा. शेती./मजुरी, अॅड.सतिष.अ.घुगे.
रा. वाघी ता.जिंतूर जि.परभणी.
विरुध्द
1 कबाल इन्शुरन्स ब्रेाकिंग सर्व्हिसेस प्रा.लि. गैरअर्जदार.
भास्करायण एच.डी.एफ.सी.होम लोन बिल्डींग,
प्लॉट नं. 7, सेक्टर इ /टाउन सेंटर,सिडको औरंगाबाद.
2 युनायटेड इंडिया इन्शुरंन्स कंपनी तर्फे विभागीय व्यवस्थापक, अॅड.जी.एच.दोडीया.
विभागीय कार्यालय,2 अंबीका हाऊस,
तळमजला 19 धरमसेठ एक्सटेंशन शंकर चौक,
नागपूर 440010.
3 तालुका कृषि अधिकारी,
तालुका कृषि कार्यालय,जिंतूर ता.जिंतूर जि.परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय नुकसान भरपाई मयत शेतक-याच्या वारसास देण्याचे विमा कंपनीने नाकारुन त्रुटीची सेवा दिली म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराच्या मयत मुलास नामे विठ्ठल रघुनाथ गायकवाड यांचे नावे मौजे वाघी ता.जिंतूर जि. परभणी येथील नवहाती शिवरामध्ये सर्व्हे नं. 44 मध्ये 20 गुंठे जमीन होती, त्याच्या हयाती वेळी इ.स. 2009 ते 2010 या कालावधी मध्ये महाराष्ट्र शासनाने सर्व शेतक-याचा शेतकरी व्यक्तीगत विमा योजने अंतर्गत विमा काढलेला होता.
अर्जदाराचे म्हणणे की, दिनांक 22/12/2009 रोजी रात्री 9 वाजता जालना जिंतूर रोडवर गणेशपूर फाटा येथे एक दहा टायरचा ट्रक ज्याचा क्रमांक GJ -18/T/114 याने टॅम्पो नं. MH-22-2390 यास समोरुन जोराची धडक दिल्यामुळे अर्जदाराचा मुलगा विठ्ठली रघुनाथ गायकवाड हा गंभीर जखमी होवुन त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेत असतांना वाटेतच मरण पावला. त्याबद्दल सदर घटनेची तक्रार पोलीस स्टेशन बामणी येथे C.R. No 50/2009 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
अर्जदाराचे म्हणणे की,त्याच्या मुलाच्या मृत्यूनंर क्लेम दाखल करण्यासाठी संबंधीत कागदपत्र गोळा करण्यासाठी बराच मानसिक त्रास झाला.
सर्व कागदपत्रे गोळा करुन अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 3 कडे सर्व कागदपत्रासह विमादावा दाखल केला. अर्जदाराचे म्हणणे की, त्याने गैरअर्जदार क्रमांक 3 कडे दाखल केलेला विमादावा गैरअर्जदार क्रमांक 3 याने तो विमादावा गैरअर्जदार क्रमांक 1 कडे पाठवला व गैरअर्जदार क्रमांक 1 ने तो विमादावा मंजुरीसाठी गैरअर्जदार क्रमांक 2 कडे पाठवला.
अर्जदाराचे म्हणणे की, त्याने दाखल केलेल्या विमा दाव्याबाबत गैरअर्जदार क्रमांक 3 कडे चौकशी केली असता त्याने दिनांक 24/03/2011 रोजी अर्जदारास पत्र पाठवुन कळवले की, अर्जदाराने दाखल केलेला विमादावा मुदतबाहय असले कारणाने विमादावा फेटाळण्यात आला, असे कळविले व त्यानंतर अर्जदाराने सदर विमा दाव्याबाबत गैरअर्जदार क्रमांक 2 कडे त्याचा विमादावा मंजूर करावा अशी विनंती केली, परंतु त्याने रक्कम देण्यात टाळाटाळ केली, म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले.
अर्जदाराचे म्हणणे की, त्याच्या मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्यावर व कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला व त्या दुःखातून सावरुन अर्जदारास विमादावा दाखल करण्यासाठी लागणारे कागदपत्रे गोळा करण्यासाठी कालावधी लागला, म्हणून विमादावा दाखल करणेस थोडा उशीर झाला व अर्जदाराने उशीर जाणून बुजून केलेला नाही.
अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराने परत 18/06/2012 रोजी गैरअर्जदारास त्याच्या विमादावा अंतर्गत रक्कम देण्यात यावी. अशी विनंती केली, परंतु त्याने साफ इन्कार केला, म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले. व मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करुन गैरअर्जदारास आदेश करावा की, गैरअर्जदाराने 1,00,000/- रुपये नामंजूर केलेल्या तारखे पासून 18 टक्के द.सा.द.शे. प्रमाणे शेतकरी अपघात विमा योजनेत अंतर्गत अर्जदारास द्यावेत व तसेच गैरअर्जदाराने अर्जदारास मानसिक त्रासापोटी 25,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी 5000/- देण्याचा आदेश व्हावा.
अर्जदाराने तक्रार अर्जास नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
अर्जदाराने पुराव्याबाबत नि.क्रमांक 18 वर 18 कागदपत्राच्या यादीसह 18 कागदपत्रे दाखल केली आहेत. ज्यामध्ये गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्जदारास पाठवलेले Repudiation Letter, व इन्व्हलपची प्रत, क्लेम फॉर्म भाग -1 ची प्रत, क्लेम फॉर्म भाग – 2 ची प्रत, क्लेम फॉर्म -3 ची प्रत, प्रतिज्ञापत्र, 7/12 उतारा, गाव नमुना नं 8 अ ची प्रत, गाव नमुना नं. 6 (ड) ची प्रत, पासबुक प्रत, फेरफार, मृत्यू प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जबाब पोस्टमार्टेम रिपोर्ट, एफ.आय.आर.ची प्रत, घटना स्थळ पंचनामाची प्रत, मरणोत्तर पंचनामा, अपघात रिपोर्ट, इ कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदाराना नोटीसा काढण्यात आल्या, गैरअर्जदार क्रमांक 1 यास मंचाची नोटीस तामील होवुन ही ( नि.क्रमांक 16 वर रशीद पोच पावती ) गैरअर्जदार क्रमांक 1 मंचासमोर हजर झाले नाहीत, त्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
गैरअर्जदार क्रमांक 2 वकीला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 14 वर आपला लेखी जबाब सादर केला, व त्यात त्यांचे असे म्हेणणे आहे की, अर्जदार हा गैरअर्जदार विमा कंपनीचा ग्राहकच नाही व त्यामुळे सदरची तक्रार मंचासमोर चालवणे योग्य नाही, व मंचास सदरची तक्रार चालवण्याचा अधिकार नाही व तसेच त्यांचे म्हणणे आहे की, सदरचा करार हा Tri-Parte करार असले कारणाने शेतक-यास गैरअर्जदार विमा कंपनी विरुध्द तक्रार दाखल करणेचा अधिकार नाही. अर्जदाराने गैरअर्जदार विमा कंपनीकडे 1 रु. देखील विमा हप्त्यापोटी भरलेला नाही व सदरची अर्जदाराची तक्रार ही खोटी व बनावटी आहे व ती खारीज होणे योग्य आहे. गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही.
गैरअर्जदार विमा कंपनीचे म्हणणे आहे की, गैरअर्जदार विमा कंपनीच्या नागपूर शाखेतून माहिती गोळा केली असता व रेकॉर्डचे पहाणी केली असता असे दर्शविते की, अर्जदाराने त्याचा क्लेम मुदतीत दाखल केला नाही व अर्जदाराचा विमादावा हा सदर पॉलिसीची मुदत संपल्यानंतर 90 दिवसानंतर मिळाली व पॉलिसीच्या नियम व अटी प्रमाणे अर्जदाराचा विमादावा पॉलिसीची मुदत संपल्यानंतर 90 दिवसांनतर मिळाली म्हणून गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा सदरचे कारण दाखवून फेटाळले ते योग्यच केले आहे. गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही, म्हणून अर्जदाराची तक्रार खारीज होणे योग्य आहे, म्हणून गैरअर्जदार विमा कंपनीने मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.
गैरअर्जदार विमा कंपनीने लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 15 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीने अर्जदाराच्या
मयत मुलाचा शेतकरी अपघात विम्याची नुकसान भरपाई
विमादावा नामंजूर करुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराचा मयत मुलगा विठ्ठल रघुनाथ गायकवाड हा शेतकरी अपघात विमा पॉलिसीचा लाभार्थी होता ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 4/7 वरील 7/12 उतारा व नि.क्रमांक 4/9 वरील गाव नमुना नं 6 क व नि.क्रमांक 4/8 वरील नमुना नं. 8 अ या रेव्हीन्यू कागदपत्रातील नोंदीवरुन सिध्द होते. अर्जदाराच्या मुलाचा दिनांक 22/12/2009 रोजी रात्री 9.00 वाजण्याच्या सुमारास जालना जिंतूर रोडवर गणेशपूर फाटा येथे ट्रक क्रमांक GJ -18/T/114 ने टेम्पो क्रमांक MH-22-2390 यास समोरुन जोराची धडक दिलेमुळे जखमी होवुन अपघाती मृत्यू पावला होता ही वस्तुस्थिती पुराव्यात दाखल केलेल्या नि.क्रमांक 4/17 वरील बामणी पोलीस स्टेशन गु.र. नं. 50/2009 मधील एफ.आय.आर. व नि.क्रमांक 4/17 वरील घटनास्थळ पंचनामा व नि.क्रमांक 4/15 वर दाखल केलेल्या पोस्टमार्टेम रिपोर्ट वरुन सिध्द होते.
मयत विठ्ठल रघुनाथ गायकववाड हा शेतकरी अपघात विम्याचा लाभार्थी असलेमुळे अर्जदाराने मयताचे वडील विम्याची नुकसान भरपाई रु. 1 लाख मिळावे म्हणून गैरअर्जदार क्रमांक 3 कडे दिनांक 25/08/2010 रोजी विमादावा संपूर्ण कागदपत्रासह दाखल केला होता ही बाब नि.क्रमांक 4/3 वरील कागदपत्रावरुन म्हणजेच क्लेमफॉर्म भाग – 1 व नि.क्रमांक 4/4 वरील क्लेमफॉर्म भाग -2 वरुन सिध्द होते तसेच अर्जदाराचा सदरचा विमादावा गैरअर्जदार क्रमांक 3 ने गैरअर्जदार क्रमांक 2 कडे पाठवला होता हे देखील नि.क्रमांक 4/5 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते. तसेच अर्जदाराचा विमादावा गैरअर्जदार क्रमांक 2 गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 24/03/2011 रोजी “ करारानुसार क्लेम संबंधीत कागदपत्रे पॉलिसी संपल्यानंतर 90 दिवसाच्या आत न दिलेमुळे अर्जदाराचा नुकसान दवा देता येत नाही ” असे कारण दाखवून फेटाळला होता ही बाब नि.क्रमांक 4/1 वरील दाखल केलेल्या Repudiation Letter वरुन सिध्द होते. गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीने घेतलतेल्या लेखी जबाबात बचावात पॉलिसीची मुदत संपल्यानंतर 90 दिवसात दाखल केला नाही, म्हणून क्लेम नामंजूर केल्याचे दिलेले कारण मुळीच ग्राहय धरता येत नाही. कारण शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना संदर्भातील महाराष्ट्र शासनाच्या परिपत्राका मध्ये नुकसान भरपाई क्लेम ठराविक मुदतीतच दाखल केला पाहिजे, ही अट मुळीच बंधनकारक नाही. मुळातच राज्यातील सर्व खातेदार शेतक-यांसाठी महाराष्ट्र शासनातर्फे घेतलेल्या शेतकरी विमा पॉलिसीचा खर्च लाभार्थी शेतक-याच्या अकस्मात अपघाती मृत्यू झाल्यावर त्यांच्या कुटूंबाला आर्थिक हातभार मिळावा व कुटूंबावर उपासमारीची पाळी येवु नये, या उदात्त हेतुने शेतकरी विम्याची कल्याणकारी योजना राबविली गेली आहे. असे असतांनाही विमा कंपनीने क्लेम मुदतीत दाखल केला नाही, हे तांत्रिक कारण दाखवुन अर्जदाराचा क्लेम बेकायदेशिररित्या नाकारुन निश्चितच अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे. या संदर्भातील महाराष्ट्र राज्य आयोगानेही रिपोर्टेड केस 2008 (2) All MR ( Journal) Page No. 13 I C I Lombard V/s Sindhutai Khairnar या प्रकरणात असे मत व्यक्त केले आहे की, क्लेम दाखल करण्यास उशीर झाला. ही अट मुळीच बंधनकारक नाही, हे मत प्रस्तुत प्रकरणालाही लागु पडते. गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास त्याचा विमादावा फेटाळून निश्चितच सेवेत त्रुटी दिली आहे. असे मंचास वाटते. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्जदाराच्या मयत मुलाचा डेथक्लेमची नुकसान भरपाई
रु. 1,00,000/- फक्त ( अक्षरी रु. एकलाख फक्त) आदेश तारखे पासून 30
दिवसाच्या आत द्यावीत.
3 तक्रारीचा खर्च ज्याचा त्याने सोसावा.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.