अर्जदारासाठी वकील श्री.नागवेकर. गैर अर्जदार क्र.1 साठी वकील श्री. तळाशीकर. गैर अर्जदार क्र.2 स्वतः मा.अध्यक्षानुसार दिलेले निकालपत्र. तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालील प्रमाणे. 1. दिनांक 22.02.2008 रोजी तक्रारदाराने सावंत टी अन्ड कोल्ड्रींक हाऊस म्हणजे सा.वाले क्र.2 यांचे दुकानात जावून एका 200 एम एल पेप्सीकोलाच्या बाटलीची ऑर्डर दिली. वेटरने ती बाटली आणल्यानंतर ती उघडण्याच्या अगोदरच तक्रारदाराने बाटलीतील द्रव निरखून पाहिला. कारण पुर्वी पेप्सीच्या बाटलीचा त्याला वाईट अनुभव होता. त्यावेळी त्याला आढळून आले की, त्या बाटलीतील द्रवात बरीच घाण व इतर कण आहेत. त्याने ती बाटली त्या दुकानाच्या मालकाला दाखविली. दुकानदाराने त्याला सांगीतले की, तो काही करु शकत नाही. इच्छा असेल तर तो कंपनीकडे म्हणजे सा.वाले क्र.1 कडे तक्रार करु शकतात. तक्रारदाराने बाटलीचे पैसे देवून दुकानदाराकडून बाटली व पावती घेतली. तसेच दुकानदाराने पेप्सीच्या बाटल्या सोनी डिस्ट्रीब्युटर या वितरकाकडून आणल्या होत्या त्या बाबतचे दिनांक 20.02.2008 च्या बिलाची छायांकित प्रतही त्यांनी पुढील कार्यवाहीसाठी तक्रारदाराला दिली. 2. त्यानंतर तक्रारदाराने सोनी डिस्ट्रीब्युटर या वितरकाकडे संपर्क साधला. त्यांनी कंपनीशी म्हणजे सा.वाले क्र.1 यांचेशी संपर्क साधण्यास तक्रारदाराला सांगीतले. म्हणून दि.25.02.2008 रोजी तक्रारदाराने सा.वाले क्र.1 च्या सेल्स एक्झिक्यूटिव्ह यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी त्याला सा.वाले क्र.2 यांचे दुकानात बैठकीसाठी बोलाविले. त्याप्रमाणे मि.सागर मेहता व मि.नलावडे हे सा.वाले यांचे ऑफिसर आले. बाटली पाहुन त्यांनी सांगीतले की, ती बाटली नकली आहे. नंतर तक्रारदाराचे बोलणे ऐकुन ती बाटली त्यांचीच आहे हे कबुल करुन तक्रारदाराकडून ती त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये तपासण्यासाठी परत मागीतली. तक्रारदाराने ती बाटली देण्यास नकार दिला. त्यानंतर तक्रारदाराने दि.05.03.2008 रोजी 10.30 वाजता सा.वाले क्र.1 कंपनीकडे पहिली तक्रार केली, 12.45 वाजता दुसरी तक्रार केली व 20.30 वाजता तिसरी तक्रार केली. त्या तक्रारीचे नंबर तक्रारदाराने तक्रारीत नमुद केले आहेत. त्यानंतर दोन दिवसांनी तक्रारदाराने सा.वाले यांच्या दिल्ली येथील ऑफिसरकडे तक्रार केली. परंतु त्यांनी त्याच्या तक्रारीची दखल घेतली नाही. व त्यांचे अधिकारी श्री.सागर मेहता यांनी त्याला सांगीतले की, त्याला काय वाटेल ते त्यांनी करावे. म्हणून तक्रारदाराने सदरची तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराने त्याला झालेल्या मानसिक त्रासापोटी रु. 20 लाख नुकसान भरपाई मागीतली आहे. व त्यावर व्याजाची मागणी केली आहे. तसेच खर्चाचीही मागणी केली आहे. 3. तक्रार दाखल झाल्यानंतर दि.17.12.2008 रोजी तक्रारदाराने सदरची बाटल मंचात दाखल केली. ती मंचाने सूक्ष्म निरीक्षणासाठी फुड टेस्टींग लॅबौरटरी, मुंबई यांचेकडे पाठविली. दिनांक 19.01.2009 रोजी बाटलीची रासायनीक चाचणी होऊन दि.23.1.2009 रोजी पब्लीक अनालिस्ट यांनी रिपोर्ट दाखल केला. पब्लीक अनालिस्ट यांनी रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, त्या बाटलीतील द्रवाची ओळख पटली नाही. ती मनुष्याला पीण्यास योग्य नाही. 4. सा.वाले क्र.1 यांचे म्हणणे आहे की, तक्रारदाराने पेप्सीच्या बॉटलचे दाखल केलेले बिल हे बनावट आहे. त्यावर तक्रारदाराचे नांव नाही. तसेच पेप्सीच्या 200 मिली लिटरच्या बाटलीची किंमत 9 रुपये आहे. मात्र सा.वाले क्र.2 यांनी रु.6 ला तक्राराला ती बाटली दिली. तक्रारदार हा ग्राहक नाही. कारण ती बाटली त्याने प्यायली नव्हती. 5. सा.वाले क्र.1 यांचे म्हणणे की, तथाकथीत पेप्सीची बाटली हे त्यांचे उत्पादन नाही. ती बाटली बनावट आहे. कोणीतरी त्या बाटलीत बनावट द्रव भरलेला दिसतो. तक्रारदाराने ती बाटली त्यांच्यापासुन विकत घेतलेली नाही. त्याच्यात व तक्रारदारात कराराचे संबंध नाहीत. त्यामुळे तक्रारदार हा त्यांचा ग्राहक होत नाही. त्यांच्या सर्व उत्पादनावर बॅच नंबर व उत्पादनाची तारीख टाकली जाते व या बाटलीवर बॅच क्रमांक व उत्पादनाची तारीख नव्हती. 6. सा.वाले क्र.1 यांचे म्हणणे की, तक्रारदाचे असे म्हणणे आहे की, त्याने दि.22.02.2008 रोजी बाटली विकत घेतली. त्यानंतर दि.19.01.2009 रोजी तीची तपासणी करण्यात आली. म्हणजे तो पर्यत ती बाटली तक्रारदाराकडे होती. त्या दरम्यान तक्रारदाराने त्यात ढवळाढवळ किंवा हस्तक्षेप केला असेल. ज्या प्रयोगशाळेत तीची तपासणी केली होती ती प्रयोगशाळा ही ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतूद नमूद केलेली प्रयोगशाळा नाही. म्हणून तो रिपोर्ट ग्राहय धरता येत नाही. सा.वाले यांचे म्हणणे की, त्यांच्या बाटल्यांचा वापर करुन पुष्कळ उत्पादक त्यांनी तंयार केलेले द्रव त्यांच्या बाटलीत भरतात व त्यांच्या नांवाखाली त्या बाटल्या विकतात. अशा ब-याच तक्रारी त्यांच्याकडे आलेल्या आहेत. त्याची चौकशी चालु आहे. त्यांचे विरुध्द योग्य ती कारवाई केली जाईल. 7. सा.वाले क्र.1 चे म्हणणे की, ते अति आधुनिक प्लॉन्टमध्ये सॉप्टड्रींग तंयार करतात व त्याबाबत अतिउच्च आंतरराष्ट्रीय दर्जाचा व आरोग्य शास्त्राचा वापर करतात. ते अतिशय स्वच्छता बाळगतात. सॉप्टड्रींकसाठी उच्च दर्जाचा कच्चा माल वापरला जातो. व पाणीही जंतुरहीत करुन घेतले जाते. बाटलीत द्रव भरण्याचे अगोदर ब-याच वेळा पहाणी करुन स्वच्छतेबद्दल खात्री करुन घेतली जाते. त्यामुळे त्यात घाण किंवा इतर कण येण्याचा प्रश्न येत नाही. बाटली भरण्याचे वेळेस त्यात घाण किंवा इतर कण असते तर ते कामगाराच्या नजरेतुन सुटले नसते. सा.वाले यांचे म्हणणे की, त्यांची सेवेत न्यूनता नाही. व त्यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. तक्रारदाराने केलेली तक्रार खोटी व अवास्तव आहे, ती रद्द करण्यात यावी. 8. सा.वाले क्र.2 यांनी कबुल केले आहे की, दि.22.2.2008 रोजी तक्रारदार त्यांचेकडे आला होता व पेप्सीकोलाची 200 एम एल ची बाटलीची ऑर्डर दिली होती. व त्यात घाण आणि इतर कण असल्याचे त्यांना दाखविले होते. त्याला त्यांनी कंपनीकडे म्हणजे सा.वाले क्र.1 कडे त्याची इच्छा असेल तर तक्रार करावयास सांगीतले. तक्रारदाराने दाखल केलेली दोन बिलं ही त्यांनी तक्रारदाराला दिली होती हे त्यांनी मान्य केले आहे. परंतु सा.वाले क्र.2 चे म्हणणे आहे की, तक्रारदाराने ज्याबद्दल तक्रार केली आहे, तो बाटलीतील द्रवातील दोष उत्पादन दोष असल्यामुळे त्याचा त्याचेशी काही संबंध नाही. त्यांनी त्याच्या विरुध्दची तक्रार रद्द करण्यात यावी अशी विनंती केली. 9. तक्रारदाराने तक्रारीच्या पृष्ठर्थ त्याचे शपथपत्र, दि.22.2.2008 ची सा.वाला क्र.2 कडून बाटली विकत घेतल्याची पावती, सा.वाले क्र.2 यांनी सोनी वितरक यांचेकडून दि.20.02.2008 रोजी पेप्सीकोलाच्या बाटल्या विकत घेतल्या बाबतचे बिल दाखल केले आहे. तसेच फुड टेस्टींग प्रयोगशाळा, मुंबई व बाटलीतील द्रवा बाबतचा दिलेला रिपोर्ट रेकॉर्डवर आहे. सा.वाले क्र.1 यांनी मा.राज्य आयोग, युनियन टेरीटोरी, चंदीगड, मा.राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली, आणि मा.उच्चतम न्यायालय यांच्या निकालाच्या प्रती दाखल केल्या आहेत. 10. आम्ही तक्रारदारातर्फे त्याचे वकील श्री.नागवेकर व सा.वाले क्र.1 साठी वकील श्री.तळाशीकर यांचा युक्तीवाद ऐकला व कागदपत्रं वाचली. 11. सा.वाले क्र.1 यांचे म्हणणे की, तक्रारदार हा त्यांचा ग्राहक नाही. यामध्ये तथ्य आहे असे मंचाला वाटते. तक्रारदाराने सा.वाले क्र.2 यांचे दुकानातुन ही बाटली विकत घेतली हे सा.वाले क्र.2 यांनी कबुल केले आहे. मात्र ती बाटली सा.वाले क्र.1 यांचे प्रॉडक्ट आहे हे तक्रारदाराने पुराव्यानिशी सिध्द केलेले नाही. कारण त्या बाटलीवर उत्पादनाचा महिना किंवा वर्ष लिहिलेले नव्हते व बॅच नंबरही नव्हता असे तपासणी अहवालावरुन दिसून येते. अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा 32 एफ च्या तरतुदीनुसार ज्या प्रॉडक्टची " Best Before Date " तिन महिन्यापेक्षा जास्त आहे त्या प्रॉडक्टवर त्याचा उत्पादन आवेष्टन आणि पुर्नआवेष्टनाचा महिना व वर्षे लिहिणे आवश्यक आहे. परंतु तक्रारदाराने विकत घेतलेल्या बाटलीवर प्रॉडक्टच्या उत्पादनाचा महिना व वर्ष लिहिलेले नव्हते त्यावर बॅच नंबरही नव्हता, त्यामुळे ती बाटली सा.वाले क्र.1 चे उत्पादन आहे याबाबत काही पुरावा नाही. सा.वाले क्र.2 ने सदरची बाटली सोनी डिस्ट्रीब्युटरकडून विकत घेतली होती परंतु सोनी डिस्ट्रीब्युटरने ती कोणाकडून विकत घेतली होती हे रेकॉर्डला आलेले नाही. सोनी डिस्ट्रीब्युटर या तक्रारीत आवश्यक पक्षकार असुनही त्यांना यात सामील केलेले नाही. तक्रारदाराने विकत घेतलेली बाटली बनावट असल्याचे नाकारता येत नाही. तक्रारदार हा सा.वाले क्र.1 चा ग्राहक आहे हे तक्रारदाराने पुराव्यानिशी सिध्द केलेले नाही. 12. दुसरे असे की तक्रारदाराने ती बाटली दि.22.2.2008 रोजी विकत घेतली व दिनांक 17.12.2008 रोजी मंचाकडे सुपुर्द केली. त्यानंतर दि.19.1.2009 रोजी तीची प्रयोगशाळेत चाचणी झाली. दिनांक 22.2.2008 ते 17.12.2008 पर्यत सदरची बाटली तक्रारदाराच्या ताब्यात होती. त्या बाटलीवर उत्पादनाची तारीख लिहिलेली नसल्याने तिची Expiary डेंट काय होती हे कळायला मार्ग नाही. मात्र ज्या दिवशी तिची प्रयोगशाळेत तपासणी झाली, त्या दिवशी तिची Expiary डेट निश्र्चीत संपलेली होती, कारण विकत घेतल्यापासूनच 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला होता. त्यांनी ज्या दिवशी ती विकत घेतली त्या दिवशीसुध्दा तिची Expiary डेट संपल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या बाटलीत घाण व इतर कण हे त्या बाटलीची मुदत संपल्यामुळे निर्माण झाले की अगोदरच त्यात होते या बद्दल नेमका पुरावा नाही. त्यामुळे त्या बाटलीतील द्रवात उत्पादन दोष होता असेही खात्रीलायकरित्या म्हणता येत नाही. 13. वरील विवेचनावरुन मंचाचे असे मत आहे की, सा.वाले यांच्या सेवेत न्यूनता आहे हे तक्रारदाराने सिध्द केलेले नाही. ही तकार रद्द होण्यास पात्र आहे. म्हणून मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे. आदेश 1. तक्रार क्र. 96/2010(जुना क्र.327/2008) रद्दबातल करण्यात येते. 2. उभय पक्षकारांनी आपापला खर्च सोसावा. 3. आदेशाच्या प्रमाणित प्रती दोन्ही पक्षकारांना विनामूल्य पाठविण्यात याव्या
| [HONORABLE G L Chavan] Member[HONABLE MRS. S P Mahajan] PRESIDENT | |