अॅड किरण घोणे तक्रारदारांतर्फे
अॅड राजीव तळाशिकर जाबदेणार क्र 1 यांचेतर्फे
जाबदेणार क्र 2 एकतर्फा
द्वारा- मा. श्री. व्ही.पी.उत्पात, अध्यक्ष
:- निकालपत्र :-
दिनांक 30/7/2014
प्रस्तुतची तक्रार ग्राहकाने शीतपेय कंपनी विरुध्द व शीतपेय विक्रेते यांचे विरुध्द निकृष्ट सेवेसंदर्भात ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 12 अंतर्गत दाखल केली आहे. यातील कथने थोडक्यात खालील प्रमाणे-
1. तक्रारदार हे पर्वतीदर्शन, पुणे येथील रहिवासी असून जाबदेणार क्र 1 ही शीतपेय निर्माण करणारी कंपनी आहे तर जाबदेणार क्र 2 हे शीतपेय विक्रेते आहेत. दिनांक 23/5/2009 रोजी तक्रारदार यांनी जाबदेणार क्र 2 यांचेकडून लहर मिरींडा कंपनीची 200 मि.ली. थंडपेय बाटली खरेदी केली होती व दुकानदारा समक्ष थंडपेय पिण्यास सुरुवात केली. त्यातील काही अंशी शीतपेय पिल्यानंतर तक्रारदारांच्या जीभेस जखम झाल्याचे आढळून आले. दाताला जखम होऊन तोंडातून रक्त येण्यास सुरुवात झाली. तक्रारदारांनी शीतपेय बाटलीची तपासणी केली असता असे लक्षात आले की, सदर पेयाच्या बाटलीत तिक्ष्ण असे काचेचे लहान लहान तुकडे असून त्यामुळे तक्रारदारांव्या जिभेला व दाताला ईजा झाल्याचे दिसून आले. तक्रारदारांनी लगेचच जाबदेणार क्र 2 यांचेकडे तक्रार केली. तक्रारदारांनी झालेल्या प्रकाराची तक्रार दिनांक 25/5/2009 रोजी अन्न व औषध प्रशासन, नवीन गुरुवार पेठ, पुणे 42 यांचेकडे केली. त्या कार्यालयातील संबंधित अधिकारी श्री.अ.गो.भुजबळ यांनी प्रत्यक्ष सदरचे पेय विक्रेते यांच्या दुकानात येऊन तपासणी केली, जाबजबाब नोंदविले व संबंधितांविरुध्द दत्तवाडी पोलिस ठाण्यात तक्रार केली. सदर शीतपेयाची निर्मीती जाबदेणार क्र 1 यांनी केली होती व विक्री जाबदेणार क्र 2 यांनी केली होती. त्यामुळे तक्रारदार व जाबदेणार यांच्यामध्ये ग्राहक व सेवा पुरवठादार असे नाते निर्माण झाले होते. जाबदेणार यांनी निकृष्ट दर्जाचे शीतपेय विक्री करुन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. त्यासाठी तक्रारदारांनी रुपये 4,50,000/- नुकसान भरपाई व शारिरीक त्रासासाठी रुपये 25,000/- व प्रस्तूत तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- मिळावा, अशी विनंती केली आहे.
2. जाबदेणार क्र 1 यांन या प्रकरणात उपस्थित होऊन लेखी जबाब दाखल केला. जाबदेणार क्र 2 यांना नोटीस बजावूनही गैरहजर राहिल्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले.
3. जाबदेणार क्र 1 यांनी सदर तक्रारीतील कथने संपूर्णपणे नाकारलेली आहेत. तक्रारदार यांनी संबंधित शीतपेय खरेदी केल्याबाबतचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. त्याचप्रमाणे शीतपेय बाटली सील करुन योग्य त्या प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविली नाही त्यामुळे जाबदेणार यांनी निकृष्ट सेवा दिलेली आहे असे सिध्द होत नाही. जाबदेणार क्र 1 यांनी पुढे असे कथन केले आहे की, संबंधिन अन्न व औषध निरीक्षकाने सदरची बाटली योग्य पध्दतीने जप्त केली नाही. त्यामुळे सदरची कारवाई निष्फळ झालेली आहे. जाबदेणार कंपनीमध्ये शीतपेय निर्माण करीत असतांना योग्य ती काळजी घेतली जाते त्यामुळे अशा घटना घडणे योग्य नाही. तक्रारदार यांनी सदर घटनेनंतर 14 महिन्यांनी तक्रार दाखल केली आहे. सबब तक्रार फेटाळण्यात यावी, अशी विनंती जाबदेणार क्र 1 यांनी केली आहे.
4. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेली लेखी कथने, कागदपत्रे, पुरावा व युक्तीवाद यांचा विचार करुन खालील मुद्ये निश्चित करण्यात येत आहेत. सदरील मुद्ये, त्यावरील निष्कर्ष व कारणे खालील प्रमाणे-
अ.क्र | मुद्ये | निष्कर्ष |
1 | जाबदेणार यांनी निकृष्ट दर्जाचे शीतपेय विक्री करुन न्यूनतम सेवा दिलेली आहे, असे तक्रारदार यांनी सिध्द केले आहे काय ? | होय |
2 | आदेश काय ? | तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते |
कारणे-
मुद्या क्र 1 व 2-
5. प्रस्तूत प्रकरणात जाबदेणार क्र 2 म्हणजेच शीतपेय विक्रेते गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे त्यांचेविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश झालेले आहेत. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ्य शपथपत्र दाखल केले आहे. त्याचप्रमाणे ते स्वत: दवाखान्यात दाखल झाल्याबाबतची कागदपत्रे, अन्न व औषध निरीक्षकारांनी जाबदेणार क्र 2 यांचे नोंदविलेले जबाब, तक्रारदार यांनी केलेली तक्रार, नोटीसची स्थळप्रत इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत. जाबदेणार यांचेतर्फे युक्तीवादात असे कथन करण्यात आले की, प्रस्तूत प्रकरणात तक्रारदार यांनी संबंधित बाटली खरेदी केल्याबाबतचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. त्याचप्रमाणे अन्न व औषध निरीक्षकांनी सदरची बाटली योग्य पध्दतीने जप्त करुन, प्रयोगशाळेकडे पाठविल्याचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारदारांची तक्रार फेटाळण्यात यावी, असे जाबदेणार यांचे कथन आहे. त्या अनुषंगाने जाबदेणार यांनी मा. राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग यांचा श्री.पी.ए.पोरन विरुध्द मॅकडोवेल अॅन्ड कं. व इतर 1986-94 pg. 153(NS) या निकालाची प्रत दाखल केली आहे. त्याचप्रमाणे मा. उत्तर प्रदेश राज्य ग्राहक वाद निवारण आयोग, लखनौ यांचा अॅक्वेअस व्हिक्टयुअल्स लि. विरुध्द राजेश कुमार बाजपेई I (2004) CPJ 138 या निकालाची प्रत दाखल केली आहे. या दोन्ही निकालातील कथनांचा विचार केला असता असे दिसून येते की, संबंधित प्रकरणातील घटना या मुळ तक्रारदार यांनी ब-याच कालावधीनंतर उघडकीस आणल्या होत्या. त्याचप्रमाणे सदर पेयामुळे तक्रारदार यांना नुकसान पोहोचल्याची नोंदही उशीरा करण्यात आली होती. अशा परिस्थितीत त्या तक्रारी फेटाळण्यात आल्या होत्या.
6. प्रस्तूत प्रकरणात तक्रारदार यांनी अन्न व औषध प्रशासन विभाग यांचेकडे त्वरीत तक्रार नोंदविली होती व त्यासंबंधी तपास अन्न निरीक्षक श्री.अ.गो.भुजबळ यांनी केला होता. सदर तपासा संबंधीची कागदपत्रे तक्रारदार यांनी दाखल केली आहेत. त्यात जाबदेणार क्र 2 श्री.भालचंद्र मधुकर जोशी यांचा जबाब व श्री. भुजबळ यांनी केलेल्या तपासाचा अहवाल दाखल केला आहे. श्री. भालचंद्र मधुकर जोशी यांनी त्यांच्या जबाबामध्ये असे कथन केले आहे की, दिनांक 23/5/2009 रोजी दुपरी 4.30 वा. एका ग्राहकाने शीतपेय मिरींडा 200 मिली बाटली विकत घेतली होती. सदर शीतपेय पितांना संबंधित ग्राहकास काचेचे तुकडे तोंडामध्ये लागले. त्यामुळे त्याच्या जीभेस त्रास झाला. त्यानंतर सदर बाटली काऊंटरवरील काचेवर ओतली असता त्यामध्ये काचेचे तुकडे आढळले, सदर तुकडे आम्ही गोळा करुन रिकाम्या बाटलीत टाकून त्यांनी बाटली स्वत:च्या ताब्यात घेतली व सदर ग्राहकाने पोलिस स्टेशनला रीतसर तक्रार दिलेली आहे. पोलिसांनी जबाब नोंदविले आहेत. या जबाबांवरुन असे स्पष्ट होते की, जाबदेणार क्र 2 यांच्या दुकानातून दिनांक 23/5/2009 रोजी दुपारी 4.30 वा विक्री केलेल्या बाटली मध्ये काचेचे तुकडे आढळून आले होते. या तपासाच्या अनुषंगाने जाबदेणार यांच्या वतीने असा युक्तीवाद करण्यात आला की, या जबाबामध्ये तक्रारदार यांचे नाव आढळून येत नाही. परंतू तक्रारदार यांनी सदरची घटना सविस्तररित्या आपल्या तक्रारीमध्ये कथन केली आहे. त्यामुळे तक्रारदार यांनीच ती बाटली खरेदी केली होती, असे म्हणावे लागेल. जाबदेणार यांच्या वतीने असा युक्तीवाद करण्यात आला की, तक्रारदार यांनी सदर बाटली विकत घेतल्याबाबत बिल हजर केलेले नाही. सर्वसाधारणपणे ग्राहक एखादया शीतपेयाची बाटली विकत घेतांना बिल घेत नाही, असा सार्वजनिक अनुभव आहे व सदर बाटली विकत घेतल्याबाबत अन्न व औषध निरीक्षकांनी नोंदविलेल्या जबाबामध्ये आलेले आहे. अशा परिस्थितीत तक्रारदार व जाबदेणार यांच्यामध्ये ग्राहक व विक्रेते असे संबंध आहेत, हे स्पष्ट होते.
7. जाबदेणार यांच्या वतीने असा युक्तीवाद करण्यात आला की, तक्रारदार यांनी सदरची बाटली अन्न निरीक्षकामार्फत जप्त करुन प्रयोगशाळेत पाठविली नाही. त्यामुळे सदरच्या तक्रारीतील म्हणणे सिध्द होत नाही. प्रस्तूतचे प्रकरण हे दिवाणी स्वरुपाचे आहे. त्यामुळे फौजदारी खटल्यामध्ये आवश्यक असणारे तंतोतंत व तांत्रिक पुरावे दिवाणी स्वरुपाच्या खटल्यात दाखल केले पाहिजेत, असा कायदा नाही. त्याचप्रमाणे ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या तरतूदीनुसार भारतीय पुरावा कायदयातील सर्व तरतूदी या कायदयास लागू होत नाहीत. सदर प्रकरणातील मुद्यांचे निष्कर्ष काढतांना नि:संशय पुराव्यापेक्षा शक्यता व अशक्यता यांची पहाणी करणे जरुरीचे आहे. या ग्राहक मंचाचे असे मत आहे की, अन्न निरीक्षक श्री. भुजबळ यांनी नोंदविलेल्या जबाबामध्ये संबंधित ग्राहकाने शीतपये खरेदी केले होते व त्यामध्ये काचेचे तुकडे आढळून आले, ही बाब सिध्द झालेली आहे. त्यामुळे जाबदेणार हे तक्रारदार यांना नुकसान भरपाई देण्यास बांधिल आहेत.
8. तक्रारदार यांनी या प्रकरणात रुपये 4,50,000/- अशी नुकसान भरपाई मागितलेली आहे. ती अवास्तव आहे. या प्रकरणातील कथनांचा विचार केला असता, जाबदेणार यांनी तक्रारदार यांना मानसिक व शारिरीक त्रासासाठी, सेवेतील त्रुटी यासाठी नुकसान भरपाई व प्रस्तूत तक्रारीचा खर्च यासाठी एकंदरीत रुपये 5000/- दयावी, असे या मंचाचे मत आहे.
वर उल्लेख केलेल्या विवेचनावरुन मुद्यांचे निष्कर्ष काढण्यात येऊन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
2. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना काचेचे तुकडे असलेली
शीतपेयाची बाटली विक्री करुन न्यूनतम सेवा दिलेली आहे, असे जाहिर करण्यात येत आहे.
3. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना मानसिक व शारिरीक त्रासासाठी, सेवेतील त्रुटी यासाठी नुकसान भरपाई व प्रस्तूत तक्रारीचा खर्च यासाठी एकंदरीत रुपये 5000/- [रुपये पाच हजार फक्त ] आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावे.
4. उभय पक्षकारांनी मा. सदस्यांसाठी दिलेले संच आदेशाच्या
दिनांकापासून एका महिन्याच्या आत घेऊन जावेत. अन्यथा संच नष्ट करण्यात येतील.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शूल्क पाठविण्यात यावी.