(आदेश पारीत द्वारा- श्रीमती जयश्री येंडे, मा.सदस्या) -/// आ दे श ///- (पारीत दिनांक – 02 मे, 2011) तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तूत तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे. प्रस्तूत प्रकरणातील तक्रारदाराचे म्हणण्यानुसार तक्रारदाराची घोगळी गांव, तह. नागपूर, जि. नागपूर येथे 0.60 गुंठे आर शेतजमिन आहे. तक्रारदाराचे मते गैरअर्जदाराने सन 2008 मध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे पिकांना पाणीपुरवठा केलेला नव्हता. तसेच सन 2009 मध्ये देखील पाण्याच्या कमतरतेमुळे पिकांना पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही असे गैरअर्जदाराने तक्रारदाराला कळविले. त्यामुळे तक्रारदाराने आपल्या शेतात कमी पाणी लागणारे हरबरा (चना) चे पिकाची पेरणी केली व त्याला भरपूर पिक झाले. गैरअर्जदाराने पेंच प्रकल्पाचे पाणी आवश्यकता नसतांना सब मायनरद्वारे (पाटचारी) तक्रारदाराचे चना पिकाला जास्त प्रमाणात सोडले, त्यामुळे चना पिक वाजवीपेक्षा जास्त आले झाल्याने चन्याचे संपूर्ण पिकाचे रुपये 30 ते 40,000/- चे नुकसान झाले. म्हणुन तक्रारदाराने संबंधित विभागाला सदरच्या पिकाची मौका चौकशी करावी म्हणुन वारंवार विनंती केली व नोटीस दिली, परंतू गैरअर्जदाराने त्याची दखल घेतली नाही. शेवटी दिनांक 31/3/2010 रोजी तक्रारदाराचे नोटीसला उत्तर दिले त्यात सुध्दा त्यांनी आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. तसेच तक्रारदार व आजुबाजूच्या इतर शेतक-यांनी वृत्त्पत्रामध्ये देखील आपली व्यथा मांडली, परंतू गैरअर्जदाराने तक्रारीची काहीही दखल घेतली नाही. म्हणुन तक्रारदाराने गैरअर्जदाराकडून नुकसान भरपाईपोटी रुपये 1 लक्ष मिळावे या मागणीकरीता सदरची तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे. तक्रारदाराने सदर तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केलेली असून, सोबत 7/12 चा उतारा, पाणीपट्टीच्या रकमेची पावती, पाण्याचे वापरासाठी केलेला पत्रव्यवहार, गैरअर्जदार यांचेशी केलेला पत्रव्यवहार, वृत्तपत्रातील बातमीचे कात्रण, नोटीस, पोस्टाच्या पावत्या व पोचपावत्या इत्यादी दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केलेले आहेत. सदर प्रकरणात गैरअर्जदार यांना मंचातर्फे नोटीस बजाविण्यात आली. त्यावरुन हजर होऊन त्यांनी आपला लेखी जबाब मंचासमक्ष दाखल केलेला आहे. गैरअर्जदार नं.2 यांचे कथनानुसार तक्रारदार हा ‘ग्राहक’ नाही आणि सदरची तक्रार मंचाचे कार्यक्षेत्रात येत नाही. तक्रारदाराने त्याचे शेतात हरबरा पिकाचे उत्पादन घेतल्याचे म्हणणे मान्य केले, परंतू तक्रारदाराचे इतर आरोप अमान्य केले आहेत. गैरअर्जदाराच्या मते सन 2008—09 मध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे सिंचनाकरीता पाण्याचा पुरवठा करण्यात आला नाही. शेतक-यांचे मागणीनुसार व पाण्याचे उपलब्धतेनुसार पाणीपुरवठा करण्यात येतो. सन 2009 ते 10 मध्ये रब्बी हंगामात पाण्याची कमतरता राहील असे कळविण्यात आलेले नव्हते. पाणी वापर संस्थेची मागणीअर्ज प्राप्त झाल्याने रब्बी हंगामात सन 2009 ते 10 मध्ये पाणी सोडण्यात आले. शेतातील पाटचारी साफ न केल्याने पाण्याचा पाझरा तक्रारदाराचे शेतात गेलेला असावा. सोडलेले पाणी तक्रारदाराचे शेतात साठलेले नव्हते. पाटचारी मधुन पाझरा होता. तक्रारादाराला सूचना देऊनही तो त्यावेळेस हजर नव्हता, त्याचे वडील हजर होते. तक्रारदाराचे व्यतिरिक्त इतर कोणत्याही शेतक-यांची नुकसानीची तक्रार प्राप्त झालेली नाही आणि तक्रारदाराचे सुध्दा कोणतेही नुकसान झालेले नसल्यामुळे नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. गैरअर्जदार यांनी आपला जबाब प्रतिज्ञालेखावर दाखल केला असून, अन्य कोणतेही दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केले नाहीत. // का र ण मि मां सा // प्रस्तूत प्रकरणातील एकंदरीत वस्तूस्थिती पाहता, तक्रारदार हा मोबदला देऊन गैरअर्जदार यांचेकडून सिंचनाकरीता पाण्याची सेवा घेत होता, म्हणुन तक्रारदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे आणि सदरची तक्रार चालविण्याचा या मंचाला अधिकार आहे निर्विवादपणे तक्रारदाराची घोगळी गांव, तह. नागपूर, जि. नागपूर येथे 0.60 गुंठे आर शेतजमिन आहे. तसेच तक्रारदाराने सन 2009 ते 10 च्या रब्बी हंगामात हरब-याचे पिक घेतलेले होते. तक्रारदाराचे तक्रारीचे अनुषंगाने खालील मुद्दे मंचाचे विचारार्थ येतत. (1) गैरअर्जदाराने सन 2009 मध्ये पाण्याचे कमतरतेमुळे पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही असे तक्रारदार व इतर शेतक-यास कळविले होते काय ? (2) गैरअर्जदार यांनी पाण्याची आवश्यकता नसतांना सब मायनरद्वारे (पाटचारी) तक्रारदाराचे हरबरा (चना) पिकला जास्त प्रमाणात पाणी सोडल्यामुळे तक्रारदाराचे हरबरा पिकाचे नुकसान झाले आहे काय ? मुद्दा क्र.1 :- गैरअर्जदार यांनी सन 2009 मध्ये पाण्याचे कमतरतेमुळ पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही असे तक्रारदार व इतर शेतक-यांना कळविले होते हे तक्रारदार यांचे म्हणणे पुराव्याअभावी या मंचाला मान्य करता येणार नाही. त्याचप्रमाणे शेतात पिक कोणते घ्यावयाचे याचा निर्णय सर्वस्वी शेतक-याचा असतो. मुद्दा क्र.2 :- गैरअर्जदार यांनी सुरुवातील पाण्याच्या कमतरतेमुळे पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही असे सांगून नंतर पाणीपुरवठा केला, त्यामुळे सबमायनरद्वारे (पाटचारी) तक्रारदाराने शेतात वाजवीपेक्षा जास्त पाणी जाऊन तक्रारदाराच्या हरबरा पिकाचे नुकसान झाले या म्हण्याचे पुष्ठ्यर्थ तक्रारदाराने कुठलाही तज्ञाचा अहवाल अथवा सबळ पुरावा सादर केला नाही. त्यामुळे अतिरिक्त पाण्याने तक्रारदाराच्या हरबरा पिकाचे संपूर्ण नुकसान झाले हे तक्रारदाराचे म्हणणे मान्य करता येणार नाही. परंतू तक्रारदाराने कागदपत्र क्र.11 ते 13 वर दाखल केलेले दिनांक 26/11/2009, 29/12/2009 व 30/12/2009 ची पत्रे, तसेच दिनांक 2/3/2010 ची नोटीस आणि इतर दस्तऐवज पाहता असे निदर्शनास येते की, गैरअर्जदाराने सदर तक्रारीसंदर्भात वारंवार विनंती करुनही गैरअर्जदाराने तक्रारदाराच्या तक्रारींची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही केलेली नाही ही गैरअर्जदाराने तक्रारदारास दिलेल्या सेवेतील कमतरता आहे. गैरअर्जदार यांनी तक्रारदाराचे विनंतीवरुन तक्रारदाराच्या शेताची मौका चौकशी केली, परंतू सदर चौकशीचे वेळी तक्रारदाराला कळवूनही ते हजर राहिले नाहीत या म्हणण्याचे पुष्ठ्यर्थ कोणताही योग्य पुरावा सादर केला नाही, म्हणुन गैरअर्जदाराचे हे म्हणणे या मंचाला पुराव्याअभावी मान्य करता येणार नाही. वरील सर्व वस्तूस्थिती पाहता हे मंच अशा निष्कर्षाप्रत येते की, तक्रारदाराने वारंवार तक्रारी करुनही गैरअर्जदाराने तक्रारदाराच्या तक्रारींची दखल न घणे ही गैरअर्जदाराची कृती तक्रारदारास दिलेल्या सेवेतील कमतरता आहे असे या मंचाचे मत आहे. सबब हे मंच खालीप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. -/// अं ती म आ दे श ///- 1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार नं.1 व 2 यांनी संयुक्तिक वा वैयक्तिकरित्या तक्रारदारास दिलेल्या सेवेतील कमतरतेमुळे त्याला झालेल्या मानसिक त्रासापोटी रुपये 5,000/- (रुपये पाच हजार फक्त) तक्रारदारास द्यावेत. 3) गैरअर्जदार नं.1 व 2 यांनी संयुक्तिक वा वैयक्तिकरित्या तक्रारदारास दाव्याचे खर्चापोटी रुपये 2,000/- (रुपये दोन हजर फक्त) द्यावेत. गैरअर्जदार यांनी उपरोक्त आदेशाचे पालन त्यांना आदेशाची प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून तीस दिवसाचे आत करावे.
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT | |