(पारित व्दारा- श्रीमती मनिषा यशवंत येवतीकर, मा.सदस्या)
( पारित दिनांक- 21 नोव्हेंबर, 2015 )
01. उपरोक्त नमुद तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष बांधकाम फर्म विरुध्द प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये मंचासमक्ष दाखल केली.
02. तक्रारकर्त्याची थोडक्यात तक्रार अशी आहे की, विरुध्दपक्षाचा भूखंड विक्रीचा व्यवसाय आहे आणि ते मे.पवनसुत रियल इस्टेट लॅन्ड डेव्हलपर्स या नावाने नागपूर शहरात व्यवसाय करतात. प्रथम सदरचा व्यवसाय श्री संतोष बुरेवार पाहत होते. आता सदर व्यवसाय त्यांच्या पत्नी श्रीमती ज्ञानदेवी उर्फ बेबीताई संतोष बुरेवार पाहत आहे.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याचे कुटूंबातील सदस्यांची संख्या मोठी असल्याने त्याने घर बांधण्यासाठी मोठा भूखंड असावा म्हणून विरुध्दपक्षाची भेट घेतली. विरुध्दपक्षाने मौजा वडद, तालुका उमरेड, जिल्हा नागपूर येथील शेत सर्व्हे क्रं-98/1, 98/2, 54/1, 54/2, पटवारी हलका क्रं-12 या ले आऊटची माहिती दिली. त्यानुसार तक्रारकर्त्याने सदर ले आऊटमधील भूखंड क्रं-20,21,22,37,38 आणि 39 एकूण भूखंडांचे क्षेत्रफळ-10656.3 चौरसफूट, भूखंडाची एकूण किंमत रुपये-5,00,846/- मध्ये खरेदी करण्याचे इसारपत्र/बयानापत्र विरुध्दपक्षा सोबत दि.24.11.2006 रोजी केले. तक्रारकर्त्याने इसारा दाखल त्याच दिवशी दिनांक-24.11.2006 रोजी धनादेशाव्दारे रुपये-75,000/- दिले आणि उर्वरीत रक्कम मासिक किस्तीव्दारे भरण्याचे ठरविले.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याने इसारातील भूखंडापोटी विरुध्दपक्षाकडे दि.24.11.2006 पासून ते 01.06.2013 या कालावधी पर्यंत इसाराची रक्कम आणि मासिक किस्तीव्दारे भूखंडाची रक्कम रुपये-5,06,000/- आणि खरेदीखर्चापोटी रक्कम रुपये-1,08,680/- अशाप्रकारे एकूण रक्कम रुपये-6,14,680/- जमा केली परंतु सततचे पाठपुराव्या नंतरही विरुध्दपक्षाने करारातील भूखंडाचे विक्रीपत्र आज पावेतो करुन दिलेले नाही.
विरुध्दपक्ष श्री संतोष बुरेवार यांचेशी भूखंड विक्रीचे इसारपत्र करण्यात आले होते. दरम्यानचे काळात मूळ प्रोप्रायटर श्री संतोष बुरेवार यांचे निधन झाले व त्यांची पत्नी श्रीमती ज्ञानदेवी उर्फ बेबीताई संतोष बुरेवार यांनी सदर संस्थेचा प्रोप्रायटर म्हणून कार्यभार स्विकारला. श्रीमती बुरेवार यांनी तक्रारकर्त्यास वेळोवेळी भूखंडाचे विक्रीपत्र किंवा पर्यायी भूखंड देण्याचे आश्वासन दिले. तक्रारकर्त्याने इसारापत्रा प्रमाणे भूखंडाचे विक्रीपत्र करुन मिळावे यासाठी वेळोवेळी विरुध्दपक्षाचे कार्यालयास भेटी दिल्यात परंतु प्रतिसाद मिळाला नाही. विरुध्दपक्षा तर्फे भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून न मिळाल्यामुळे वि.प.ने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन त.क.ला दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. तक्रारकर्त्याने भूखंडाचे विक्रीपत्र करुन मिळावे म्हणून विरुध्दपक्षास दिनांक-21.03.2014 रोजी नोटीस पाठविली परंतु प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून शेवटी प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल केली.
तक्रारकर्त्याची मागणी-
विरुध्दपक्षाने मौजा वडद, तालुका उमरेड, जिल्हा नागपूर येथील शेत सर्व्हे क्रं-98/1, 98/2, 54/1, 54/2, पटवारी हलका क्रं-12 या ले-आऊटमधील भूखंड क्रं-20,21,22,37,38 आणि 39 एकूण भूखंडांचे क्षेत्रफळ-10656.3 चौरसफूट विक्रीपत्र तक्रारकर्त्याचे नावे नोंदवून, मोजणी करुन ताबा देण्याचे आदेशित व्हावे. काही कायदेशीर अडचणीस्तव असे करणे विरुध्दपक्षास शक्य नसल्यास विरुध्दपक्षाचे त्याच ले आऊट मधील तेवढयाच आकाराच्या अन्य भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून मोजणी करुन ताबा देण्याचे आदेशित व्हावे व असेही करणे विरुध्दपक्षास शक्य नसल्यास तक्रारकर्त्याने भूखंडापोटी विरुध्दपक्षाकडे जमा केलेली एकूण रक्कम रुपये-6,14,680/- रक्कम अदा केल्यचे दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-18% दराने व्याजासह देण्याचे आदेशित व्हावे. तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई दाखल रुपये-3,00,000/- द.सा.द.शे.-18% दराने व्याजासह देण्याचे आदेशित व्हावे व नोटीस खर्चापोटी रुपये-2500/- विरुध्दपक्षाने देण्याचे आदेशित व्हावे. याशिवाय योग्य ती दाद तक्रारकर्त्याचे बाजूने मिळावी अशा मागण्या केल्यात.
03. प्रस्तुत तक्रारीमध्ये विरुध्दपक्ष क्रं-1) मे. पवनसुत रियल इस्टेट आणि
लॅन्ड डेव्हलपर्स-कार्यालय-प्रिन्स कॉम्प्लेक्स, चौथा माळा, धुन बिअर बारचे वर, छत्रपती नगर, वर्धा रोड, नागपूर-440025 तर्फे- प्रोप्रायटर आणि विरुध्दपक्ष क्रं-2) श्रीमती ज्ञानदेवी उर्फ बेबीताई संतोष बुरेवार, राहणार- प्लॉट क्रं-सी-5,
कॉस्मोपोलीटन सोसायटी, मनिष नगर, रेल्वे क्रॉसींग जवळ,सोमलवाडा, नागपूर
या नाव आणि पत्त्यावर मंचा तर्फे नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविली असता सदरच्या नोटीसेस अनुक्रमे लेफ्ट रिर्टन टू सेंडर आणि रेफूज्ड या पोस्टाचे शे-यासह मंचात परत आल्यात. सदरच्या नोटीसेस अनुक्रमे नि.क्रं-6 व 7 प्रमाणे अभिलेखावर दाखल आहेत. विरुध्दपक्ष क्रं-1 फर्मची नोटीस लेफ्ट शे-यासह परत आल्याने वि.प.क्रं-1 फर्मची नोटीस दैनिक भास्कर या वृत्तपत्रातून दिनांक-04.08.2015 रोजी प्रकाशित करण्यात आली. अशाप्रकारे दोन्ही विरुध्दपक्षानां न्यायमंचाची नोटीसची सुचना प्राप्त होऊनही ते मंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा त्यांनी आपले लेखी उत्तर न्यायमंचा समक्ष सादर केले नाही म्हणून दोन्ही विरुध्दपक्षां विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने अनुक्रमे दि.09.09.2015 आणि दिनांक-31.03.2015 रोजी प्रकरणात पारीत केला.
04. तक्रारकर्त्याने तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून, दस्तऐवज यादीनुसार कागदपत्रांच्या प्रती दाखल दाखल केल्यात ज्यात उभय पक्षातील भूखंडाचे इसारपत्र/बयानापत्र, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे भूखंडापोटी मासिक किस्ती जमा केल्या बाबतच्या पावत्यांच्या प्रती, मासिक किस्ती भरल्या बाबत विरुध्दपक्ष फर्म तर्फे केलेल्या नोंदीचा दस्तऐवज तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास पाठविलेली नोटीस, पोस्टाची पावती व परत आलेल्या नोटीस अशा दस्तऐवजांच्या प्रतींचा समावेश आहे.
05. प्रस्तुत तक्रारीमध्ये त.क. तर्फे वकील श्री शुक्ला यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला.
06. त.क.ची प्रतिज्ञालेखावरील तक्रार, तक्रारीतील दाखल दस्तऐवज आणि त.क.चे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन न्यायमंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे-
::निष्कर्ष::
07. तक्रारकर्त्याने पुराव्या दाखल विरुध्दपक्षाचे मौजा वडद, तालुका उमरेड, जिल्हा नागपूर येथील शेत सर्व्हे क्रं-98/1, 98/2, 54/1, 54/2, पटवारी हलका क्रं-12 या ले-आऊटमधील भूखंड क्रं-20,21,22 एकूण क्षेत्रफळ-5812.5 चौरसफूट, प्रतीचौरसफूट रुपये-47/- प्रमाणे रुपये-2,73,187/- आणि भूखंड क्रं-37,38 आणि 39 एकूण क्षेत्रफळ-4843.8 चौरसफूट प्रतीचौरसफूट रुपये-47/- प्रमाणे रुपये-2,27,658/- मध्ये खरेदी करण्या बाबत दि.24.11.2006 रोजी उभय पक्षांमधील झालेल्या इसारपत्र/बयानापत्राच्या दोन प्रती दाखल केल्यात. या दोन्ही इसारपत्रातील भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ हे 10656.3 चौरसफूट असून भूखंडाची एकूण किंमत ही रुपये-5,00,846/- एवढी येते. इसारपत्रा नुसार रजिस्ट्रीची मुदत दिनांक-24.06.2009 पर्यंत वाढवून देण्यात आली होती. तक्रारकर्त्याचे म्हणण्या नुसार सदरचे इसारा पत्रा नुसार त्याने विरुध्दपक्षास इसारापोटी आणि मासिक किस्तीपोटी वेळोवेळी दिनांक-24.11.2006 पासून ते दि.01.06.2013 या कालावधीत भूखंडाची संपूर्ण रक्कम रुपये-5,06,000/- तसेच रजिस्ट्रीचा खर्च म्हणून रुपये-1,08,680/- असे मिळून एकूण रक्कम रुपये-6,14,680/- अदा केल्याची बाब प्रकरणात दाखल इसारपत्रा वरुन तसेच विरुध्दपक्षा तर्फे किस्त मिळाल्या बाबत दिलेल्या नोंदीचे दस्तऐवजावरुन दिसून येते. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष फर्म तर्फे निर्गमित दिनांक-01.06.2013 रोजीची रक्कम रुपये-1,00,000/- आणि दिनांक-01.06.2013 रोजीची रक्कम रुपये-1,08,680/- एवढया रकमेच्या दोन पावत्यांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत, उर्वरीत पावत्यांच्या प्रती दाखल केलेल्या नाहीत.
08. दोन्ही विरुध्दपक्षानां न्यायमंचाचे नोटीसची सुचना प्राप्त होऊनही ते मंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा त्यांनी आपले लेखी उत्तर न्यायमंचा समक्ष सादर केले नाही. थोडक्यात तक्रारकर्त्याचे तक्रारीतील विधाने तसेच त्याने भूखंडापोटी विरुध्दपक्षाकडे जमा केलेल्या रकमा इत्यादी बाबी या उभय विरुध्दपक्षांनी खोडून काढलेल्या नाहीत. तक्रारकर्त्याची तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल आहे. तक्रारकर्त्याने पुराव्या दाखल दस्तऐवजांच्या प्रती सादर केल्यामुळे तक्रारकर्त्याचे प्रतिज्ञालेखावरील तक्रारीतील मजकूरास पुष्टी मिळते. भूखंडाची संपूर्ण किंमत रजिस्ट्रीचे खर्चासह विरुध्दपक्षास अदा करुनही तक्रारकर्त्यास नोंदणीकृत विक्रीपत्र विरुध्दपक्षाने करुन दिले नाही वा कोणताही प्रतिसाद दिला नाही.
09. तक्रारकर्त्याचे प्रतिज्ञालेखावरील तक्रारी प्रमाणे पवनसुत रियल इस्टेट लॅन्ड डेव्हलपर्स, नागपूर तर्फे श्री संतोष बुरेवार यांचेशी भूखंड विक्रीचे इसारपत्र करण्यात आले होते. दरम्यानचे काळात मूळ प्रोप्रायटर श्री संतोष बुरेवार यांचे निधन झाले व त्यांची पत्नी श्रीमती ज्ञानदेवी उर्फ बेबीताई संतोष बुरेवार यांनी सदर संस्थेचा कार्यभार स्विकारला. तक्रारकर्त्याने इसारापत्रा नुसार भूखंडाचे विक्रीपत्र करुन मिळावे म्हणून विरुध्दपक्ष मे.पवनसुत रियल इस्टेट लॅन्ड डेव्हलपर्स तर्फे श्रीमती ज्ञानदेवी उर्फ बेबीताई संतोष बुरेवार यांचे नावावर दिनांक-21.03.2014 रोजी कायदेशिर नोटीस पाठविली, सदर नोटीस विरुध्दपक्ष श्रीमती बुरेवार यांनी स्विकारली नसल्याने कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
10. उपरोक्त नमुद घटनाक्रम पाहता तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष पवनसुत रियल इस्टेट लॅन्ड डेव्हलपर्स, नागपूर कार्यालयात इसारापत्रातील नमुद भूखंडापोटी इसारापोटी आणि मासिक किस्तीपोटी वेळोवेळी दिनांक-24.11.2006 पासून ते दि.01.06.2013 या कालावधीत भूखंडाची संपूर्ण रक्कम रुपये-5,06,000/- तसेच रजिस्ट्रीचा खर्च म्हणून रुपये-1,08,680/- असे मिळून एकूण रक्कम रुपये-6,14,680/- अदा केल्याची बाब प्रकरणात
दाखल इसार पत्रा वरुन व दाखल पावत्यांच्या प्रतीवरुन तसेच नोंदीचे दस्तऐवजावरुन सिध्द झालेली आहे. त्यामुळे इसारपत्रातील नमुद भूखंडाचे विक्रीपत्र विरुध्दपक्षा कडून नोंदवून मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे. वि.प. पवनसुत रियल इस्टेट लॅन्ड डेव्हलपर्स, नागपूर तर्फे मूळ श्री संतोष बुरेवार यांचे निधन झाले असल्यामुळे त्यांचे निधना नंतर त्यांची पत्नी श्रीमती ज्ञानदेवी उर्फ बेबीताई संतोष बुरेवार यांची इसारापत्रातील नमुद भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन देण्याची कायदेशीर जबाबदारी येते. तक्रारकर्त्याने नोव्हेंबर,2006 पासून भूखंडाची किस्त देण्यास सुरुवात केली आणि जुन-2013 पर्यंत रक्कम भरली. त्यामुळे एवढया मोठया कालावधी करीता रक्कम विरुध्दपक्षाने वापरलेली असल्याने शेवटच्या मासिक किस्ती पासून संपूर्ण रक्कम जास्त व्याजदराने म्हणजे वार्षिक 15% दराने व्याजासह मिळण्यास त.क. पात्र आहे. त्यामुळे इसारापत्रातील भूखंडाचे विक्रीपत्र त.क.चे नावे नोंदवून देणे विरुध्दपक्षास शक्य नसल्यास तक्रारकर्त्याने इसारपत्रातील भूखंडांपोटी जमा केलेली एकूण रक्कम रुपये-6,14,680/- शेवटची मासिक किस्त जमा केल्याचा दिनांक-01.06.2013 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे. 15% व्याजासह तसेच त.क. शारिरीक व मानसिक त्रासा बाबत रुपये-10,000/-आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/- विरुध्दपक्ष क्रं-1 व क्रं-2 कडून वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या परत मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे. त्यावरुन, आम्ही प्रस्तुत तक्रारीमध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
तक्रारकर्ता श्री शरदचंद्र भरतचंद्र दास यांची तक्रार विरुध्दपक्ष क्रं-1) मे. पवनसुत रियल ईस्टेट लॅन्ड डेव्हलपर्स छत्रपती नागपूर आणि विरुध्दपक्ष क्रं-2) मृतक प्रोप्रायटर श्री संतोष बुरेवार यांचे कायदेशीर वारसदार म्हणून श्रीमती ज्ञानदेवी उर्फ बेबीताई संतोष बुरेवार यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
1) दोन्ही विरुध्दपक्षांना निर्देशित करण्यात येते की, विरुध्दपक्ष फर्म तर्फे दि.24.11.2006 रोजी तक्रारकर्त्यास करुन दिलेल्या इसारापत्र/ बयानापत्रा नुसार विरुध्दपक्षाचे मौजा वडद, तालुका उमरेड,
जिल्हा नागपूर येथील शेत सर्व्हे क्रं-98/1, 98/2, 54/1, 54/2, पटवारी हलका क्रं-12 या ले-आऊटमधील भूखंड क्रं-20,21,22 एकूण क्षेत्रफळ-5812.5 चौरसफूट आणि भूखंड क्रं-37,38 आणि 39 एकूण क्षेत्रफळ-4843.8 चौरसफूट भूखंडाचे विक्रीपत्र तक्रारकर्त्याचे नावे नोंदवून देऊन तसेच मोजणी करुन ताबा देण्यात यावा व आवश्यक सर्व सरकारी दस्तऐवजांच्या प्रती ताबापत्रासह तक्रारकर्त्यास पुरवाव्यात. विरुध्दपक्षास इसारातील नमुद भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र त.क.चे नावे नोंदवून देणे शक्य नसल्यास व त.क.ला मान्य असल्यास त्याच ले आऊट मधील जवळपास तेवढयाच थोडयाफार कमी-जास्त आकाराच्या क्षेत्रफळाचे भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र उभय पक्षातील इसारपत्र/ बयानात्रातील नमुद प्रतीचौरसफूट दर रुपये-47/- प्रमाणे विरुध्दपक्षाने त.क.चे नावे नोंदवून द्दावे. तक्रारकर्त्याने जमा केलेल्या रकमांचे योग्य समायोजन केल्या नंतर उभय पक्षांनी इसारा पत्रातील नमुद भूखंड दरा नुसार भूखंड थोडाफार कमी-जास्त आकाराचा झाल्यास त्याप्रमाणे किंमतीचे योग्य ते समायोजन करावे. अथवा
2) विरुध्दपक्ष यांना आदेशातील कलम-1) नुसार उपरोक्त नमुद वर्णनातीत भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीखत त.क.चे नावे नोंदवून देणे शक्य नसल्यास तक्रारकर्त्याने भूखंडापोटी विरुध्दपक्षाकडे जमा केलेली संपूर्ण रक्कम रुपये-6,14,680/- (अक्षरी रुपये सहा लक्ष चौदा हजार सहाशे ऐंशी फक्त)शेवटची मासिक किस्त जमा केल्याचा दिनांक-01.06.2013 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे. 15% व्याजासह तक्रारकर्त्यास परत करावी.
3) तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचे खर्चा बद्दल रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास द्दावेत.
4) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या प्रस्तुत निकालपत्राची प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसाचे आत करावे.
5) निकालपत्राची प्रमाणित प्रत उभय पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन
देण्यात यावी.