जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 47/2011 तक्रार दाखल तारीख –06/07/2011
अनिल पि. बाबुराव वाघमारे
वय 35 वर्षे धंदा सुशिक्षीत बेकार .तक्रारदार
रा.रुईछत्तीसी ता.जि.अहमदनगर
विरुध्द
1. पटवा सप्लायर्स
प्रो.प्रा.राहूल चंद्रकांत पटवा
रा.केरुळ चौक, कडा, ता.आष्टी जि.बीड सामनेवाला
2. उत्पादक व्यवस्थापक (प्रॉडक्शन मॅनेजर)
मु.पो.हिंदूस्थान स्टील लिमिटेड
322,जोडभावी पेठ,सोलापूर ता.जि.सोलापूर
3. शाखा व्यवस्थापक,
टाटा शक्ती, टाटा सेंटर, सातवा मजला, 43,
जवाहरलाल नेहरु रोड, कोलकत्ता
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.ए.जी.काकडे
सामनेवाला क्र.1 व 2 तर्फे :- अँड.आर.बी.भंडारी
सामनेवाला क्र.3 तर्फे ः- स्वतः
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार मौजे रुईछत्तीसी ता.जि.अहमदनगर येथील रहिवासी आहेत. सुशिक्षीत बेरोजगार आहे.
सामनेवाला क्र.1 यांचे सिमेंट पत्रे लोंखंड विक्रीचा व्यवसाय आहे. सामनेवाला क्र.2 हे वितरक असून सामनेवाला क्र.3 उत्पादक कंपनी आहे.
सामनेवाला क्र.3 चे उत्पादीत पत्रे सामनेवाला क्र.2 कडून सामनेवाला क्र.1 ने विकत घेऊन तक्रारदारांना विकत दिले. तक्रारदाराने ग्रामीण भागातील रोजगार मिळावा या उददेशाने मागील आर्थिक वर्ष 2009-10 मध्ये पी.एम.ई.जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत ,खादी व ग्रामोद्योग आयोगाकडून अखाद्य तेलापासून साबण निर्मीतीचा उद्योग करण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा रुईछत्तीसी यांचेकडून रु.6,44,000/- चे कर्ज मंजूर करुन घेतलेले आहे. तक्रारदारांनी वैभव सोप इंडस्ट्रीज नांवाने उद्योग सुरु करण्यास सुरुवात केली.
सदर कर्जाची रक्कम मंजूर झाल्यानंतर युनिट बांधकामासाठी देणेत आलेल्या रु.2,50,000/- यापैकी रु.1,60,000/- चे लोखंड व पत्रे तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 कडून वरीलप्रमाणे खरेदी केले.त्या बाबत सामनेवाला क्र.1 यांनी पावती दिलेली आहे. पत्रे घेतेवेळी सामनेवाला क्र.1 ने चांगल्या प्रकारचे उत्पादन असल्याची गॅरंटी वॉरंटी देण्यात येईल अशी कबूली दिली आहे. पत्रे 20 वर्षापर्यत खराब होणार नाही अशी तोंडी हमी दिली होती. त्यावर विश्वास ठेऊन तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 कडून दि.15.2.2010 रोजी पत्रे खरेदी केलेले आहेत.
खरेदीनंतर साधारणपणे कालावधी उलटल्यानंतर पत्रांना गंज पडण्यास सुरुवात झाली.त्यानंतर 15-20 दिवसांचा कालावधी गेल्यानंतर सदर पत्रांना जास्त प्रमाणात गंज पडून छोटी छोटी छिद्रे पडू लागली.तक्रारदारांनी तात्काळ सदर प्रकार सामनेवाला क्र.1 यांना सांगितला. त्यावर त्यांनी पत्रे बदलून मिळतील, काळजी करु नका असे सांगितले. त्यावर विश्वास ठेऊन पत्रे बदलून मिळण्याची वाट पाहत राहीलो. काही महिन्याचा कालावधी उलटला तरी देखील कोणत्याही प्रकारचा माल पत्रे तक्रारदारास बदलून दिलेली नाही अथवा रक्कम देखील परत दिलेली नाही. सामनेवाला क्र.1 ने तक्रारदारास पत्राचे फोटो,बिलाची झेरॉक्स , सामनेवाला क्र.2 कडे कूरिअरने अथवा पोस्टाने पाठवा असे सांगितले. त्याप्रमाणे जूलै 2010 मध्ये बी.सोमानी कूरिअरने पत्राचे फोटो व बिलाची झेरॉक्स पावती पाठविलेली आहे. सामनेवाला क्र.2 चे एक कर्मचारी तक्रारदारांचे गांव पाहणी करता आले. त्यांने प्रत्यक्ष पाहणी करुन आठ दिवसाचे आंत तुम्हाला योग्य प्रकारचा माल बदलून देण्याचे आश्वासन दिले.दोन महिन्याचा कालावधी उलटला तरी पत्रे बदलून दिले नाही व रक्कम परत केली नाही. उडवाउडवीची उत्तरे दिली. तक्रारदाराची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तक्रारदाराने लेखी नोंदणीकृत पोस्टाद्वारे दि.25.1.2011, 28.1.2011 रोजी कागदपत्र पाठविली. दि.29.1.2011 रोजी सामनेवाला यांनी सदरचे अर्ज मिळून देखील त्यांनी उत्तरे दिली नाही. पत्रे बदलून दिली नाही. तक्रारदारांना जाणीवपूर्वक सेवा देण्यास कसूर केल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदार खालीलप्रमाणे नूकसान भरपाई हक्कदार आहेत.
अ. खराब झालेल्या पत्राची किंमत रु.43,200/-
ब. पत्रे वेळेवर बदलून न मिळाल्यामूळे व्यवसायात
झालेले नूकसान रु.1,34,000/-
क. अर्जदारास गैरअर्जदाराकडे येणे-जाणे साठी झालेला
खर्च रु.2,000/-
ड. अर्जदारास झालेल्या मानसिक, शारीरिक व आर्थिक
त्रासापोटी रु.15,000/-
इ. दाव्याचा खर्च रु.2,000/-
एकूण खर्च रु.1,96,200/-
सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे नि.13 दि.31.5.2011 रोजी दाखल केला. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. पत्रे विकत घेतल्याची बाब मान्य केली आहे. सामनेवाला क्र.2 विरुध्द दावा कायदेशीरपणे चालू शकत नाही. सामनेवाला क्र.2 पत्राचे उत्पादक कंपनी नाही. पत्राची उत्पादक कंपनी टाटा शक्ती असून सामनेवाला क्र.2 हे वितरक असून त्यांचेमार्फत सामनेवाला क्र.1 कडे पुरवठादार नात्याने पत्रे विकण्यासाठी येतात.
त्यामुळे सामनेवाला क्र.2 विरुध्द तक्रार कायदयाने दाखल होऊ शकत नाही.
मूळ पत्र उत्पादक टाटा कंपनी यांना दाव्यात शरीक करणे आवश्यक आहे. त्यामुळे तक्रार चालू शकत नाही. टाटा कंपनीचे पत्रे टिकाऊ दर्जेदार व उत्तम प्रतीचे पत्रे आहेत. पत्रे विकत घेतल्यानंतर पत्रेचे हाताळणी साठवण या बाबत कंपनीने लेखी स्वरुपात प्रत्येक खरेदीदारास सुचना दिल्या त्याचे पालन खरेदीदाराने करणे आवश्यक आहे, न केल्यास पत्रे खराब झाल्यास विक्रेत्यावर जबाबदारी नाही व ती खरेदीदारावर आहे.
पत्रे वापरताना दिलेल्या सुचनेप्रमाणे जर पत्राचा वापर लगेच करण्यात येणार नसेल तर पत्रे बंद खोलीत जमिनीपासून उंच ठिकाणी ढिग ठेवणे आवश्यक आहे. तसेच असे ठेवलेले पत्रे यांचा पाण्याशी संपर्क येऊ नये या बाबत काळजी घेणे आवश्यक आहे. ढिग केलेले पत्रे पावसाचे पाण्यामूळे पांढरा गंज या प्रक्रियेमूळे खराब होण्यास सूरुवात होते. कालांतराने छिद्रे पडतात. अशा वेळी पाण्याचा शिरकाव झालेले पत्रे ताबडतोब वेगळे करुन त्यांचे कपडयाने किंवा भुश्याने पूर्णपणे कोरडे करुन उन्हा मध्ये वाळवणे आवश्यक आहे. या बाबी हजगर्जी व निष्काळजीपणा केला आहे.
तक्रारदार मा.कोर्टापासून खरी वस्तूस्थिती लपवून ठेवीत आहे. तक्रारदाराने पत्रे खरेदी केल्यानंतर त्या पत्राचा एकत्रित ढिग जमिनीवर व तेही झाडाच्या सावलीमध्ये साठवणे करुन ठेवले. तक्रारदाराने पत्राच्या उपयोग लगेच करावयाचा नव्हता,2010 सालच्या मे महिन्यात रोहीणी नक्षत्राचा पाऊस तक्रारदाराने साठवून ठेवलेल्या पत्रावर झाला व त्यानंतर जून, जूलै या दोन महिन्यात मृग नक्षत्र व इतर नक्षत्राचा पाऊस भरपूर प्रमाणात झाला.त्यावेळी खरेदी केलेले पत्रे एकाच ठिकाणी झाडाच्या सावलीत एकावर एक थप्पी लावून ठेवले. पावसाचे पाणी थप्पी लावलेल्या पत्रामध्ये उतरुन ओलावा तयार झाला. झाडाच्रूा सावलीमूळे व सततच्या पावसामूळे ओलाव्याचे बाष्पीकरण झाले नाही. त्यामुळे पत्रे पांढरा गंज या प्रक्रियेमूळे खराब झाले व त्यांना छिद्रे पडली. सूचनाचे व नियमाचे पालन झाले नाही. पर्यायाने तक्रारदाराच्या निष्काळजीपणामुळे पत्रे खराब झाली. यात सामनेवाला क्र.1 व2 यांचा दोष किंवा सेवेत कसूर नाही.
पत्रे खरेदी केल्यानंतर जूलै 2010 मध्ये पत्रे खराब झाल्याची बाब निदर्शनास आली. त्या बाबत तक्रारदारानी प्रथमतः जूलै 2010 व त्यानंतर जानेवारी 2011 मध्ये तक्रार केली.तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
सामनेवाला क्र.3 यांनी त्यांचा खुलासा दि.2.2.2012 रोजी दाखल केला. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. तक्रारदारानी महत्वाच्या बाबी लपवून ठेवलेल्या आहेत. मदतीचा दुरुपयोग करुन तक्रार दाखल केली आहे. पत्राचे दोषाबददल विधाने हे मोघम आहेत. तक्रारदाराचे सदरचा विवाद हा ग्राहक विवाद होत नाही. तसेच सामनेवाला यांनी अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेला नाही तथा सेवेत कसूरही केलेला नाही. तक्रारदाराची मागणी ही ग्राहक संरक्षण कायदयातील कलम 14 प्रमाणे नाही. सामनेवाला क्र.2 चे खुलाशानुसारच पांढरा गंजचे संदर्भात येथे सामनेवाला यांनी खुलासा आहे. तक्रारदारांनी सदरची पत्राची देखभाल व्यवस्थीत ठेवलेली नाही.तक्रार खर्चासह रदद व्हावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला क्र.1 व 2 यांचा खुलासा, शपथपत्र सामनेवाला क्र.3 चा खुलासा यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.काकडे व सामनेवाले क्र.1 व 2 यांचे विद्वान वकील श्री.शिंदे यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता सामनेवाला क्र.3 यांनी उत्पादित केलेले पत्रे सामनेवाला क्र.2 यांचेकडून सामनेवाला क्र.1 यांनी विकत घेऊन तक्रारदारांना रक्कम रु.43,200/- विकले आहेत. त्या बाबतची पावती सामनेवाला क्र.1 ने दिलेली आहे. पत्रे विकल्या बाबत सामनेवाला क्र.1 ते 3 यांना मान्य आहे. पत्रामूळे पांढरा गंज आला व छिद्रे पडली ही बाब सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी खुलाशात दिलेली आहे. सामनेवाले क्र.2 चे प्रतिनिधी यांनी भेट देऊन पत्रांची पाहणी केली आहे.सामनेवाला क्र.3 यांनी सामनेवाला क्र.1 व 2 नुसारच या संदर्भात खुलासा दिलेला आहे. सामनेवाला क्र.3 उत्पादक कंपनी असून त्या बाबत सामनेवाला क्र.3 चे त्यांचे खुलाशासोबत शपथपत्र नाही. तसेच या संदर्भात त्यांचे कोणतेही कागदपत्र दाखल नाही.
तक्रारदारानी पत्रे खराब झाल्या बाबतचे पत्राचे फोटो दाखल केलेले आहेत. त्या वरुन पत्रावरुन गंज व छिद्रे पडली आहेत.
या संदर्भात सामनेवाला क्र.1 ते 3 यांचे खुलाशात स्वंयस्पष्ट आहे . पत्राची योग्य निगा न घेतल्यास पत्रे खराब होतात असे सामनेवाला यांचे म्हणणे आहे. या संदर्भात सामनेवाला क्र.1 व 2 यांनी विशिष्ट विधाने केलेली आहेत व तक्रारदारानी झाडाखाली थप्पी लावून ठेवली व पावसाचे पाण्याची पत्रे खराब झाली आहेत. त्यात सामनेवाला यांचे उत्पादक दोष नाही असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु या संदर्भात पत्रे ठेवण्याचे संदर्भात सूचना दिलेल्या आहेत. त्यांचेही पालन तक्रारदारांनी केलेली नाही. सामनेवालाच्या सदर खुलाशाच्या संदर्भात पाऊस आला व पावसाचे पाण्याने पत्रे खराब झाली या बाबत सामनेवाला यांचे फक्त विधाने आहेत त्या बाबत कोणताही पुरावा नाही. ज्या प्रतिनिधीने पाहणी केली त्यांचा उल्लेख नाही.तक्रारदारांनी पत्रे विकत घेतल्यानंतर ते उपयोगात आणण्याचे पूर्वीच त्यांना छिद्रे पडल्याने खराब झाली ही वस्तूस्थिती आहे. तसेच तक्रारीवरुन स्पष्ट होते की, तक्रारदारांनी स्वतःचा उद्योग सूरु करण्यासाठी वैभव सोप इंडस्टीजसाठी सदरची पत्रे घेतली आहेत. त्यासाठी तक्रारदारानी बँकेकडून कर्जही घेतले आहे. सामनेवाला क्र.1 ते 3 यांचेकडे सदर पत्रा बाबत तक्रारदारांनी तक्रार ही केलेली आहे परंतु त्यांनी सदरची पत्रे बदलून दिलेली नाहीत.
पत्रे खराब झाल्याची बाब वरील सर्व परिस्थितीवरुन स्पष्ट होते. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारांना पत्रे बदलून देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे. तसेच पत्रे खराब झाल्याने तक्रारदारांना निश्चितच मानसिक त्रास झालेला आहे. त्यामुळे मानसिक त्रासाची रक्कम रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदारांना देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे. तसेच तक्रारदारांने इतर नुकसान भरपाईची मागणी केली आहे, परंतु ती ग्राहक संरक्षण कायदयातील कलम 14 अंतर्गत येत नसल्याने ती नाकारण्यात येत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला क्र.1 ते 3 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना
आदेश प्राप्तीपासून 30 दिवसांचे आंत पत्रे बदलून दयावेत.
3. सामनेवाला क्र.3 यांना आदेश देण्यात येतो की, मानसिक त्रासाची
रक्कम रु.5000/-(अक्षरी रु.पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चाची
रककम रु.5,000/-(अक्षरी रु. पाच हजार फक्त) आदेश
प्राप्तीपासून 30 दिवसांचे आंत अदा करावी.
4. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड