( आदेश पारित द्वारा : श्री. विजयसिंह ना. राणे, अध्यक्ष )
आदेश
( पारित दिनांक : 25 आक्टोबर, 2011 )
तक्रारदार ह्यांनी प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये मंचासमक्ष दाखल केली आहे.
यातील तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, ते शेतकरी असुन त्यांना शेताकरिता पाण्याच्या मशीनची गरज असल्याने त्यांनी गैरअर्जदार यांचेकडुन दिनांक 25/2/2010 रोजी 1.5 एचपी, लक्ष्मी कंपनीची पाण्याची मशीन रुपये 4801/- ला खरेदी केली. गैरअर्जदाराने त्याबाबत पावती व एक वर्षाचे गॅरंटी कार्ड दिले. सदर पाण्याची मशीन खरेदीदिवसा पासुन 40 व्या दिवशी शेतात पाणी पुरवठा करतांना जळुन बंद पडली. त्याबाबत गैरअर्जदार यांना कळविण्यात आले. गैरअर्जदार यांचे सांगण्यावरुन मशीन गैरअर्जदार यांचे दुकानात दुरुस्तीकरिता नेण्यात आली. परंतु गैरअर्जदाराने तक्रारदाराची मशीन दुरुस्त करुन दिली नाही व विनंती करुन देखिल दुसरी मशीन दिली नाही. त्यामुळे तक्रारदारास शेताचे पाणीपुरवठयाकरिता ओलीत पीक घेता न आल्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागले म्हणुन तक्रारदाराने दिनांक 8.5.2010 लेखी पत्राद्वारे नुकसान भरपाईची मागणी केली. परंतु त्याचा काहीही परिणाम झाला नाही म्हणुन तक्रारदाराने दिनांक 29.5.2010 रोजी पत्राद्वारे मशीन नुकसान भरपाईसह बदलवुन देण्याची विनंती केली. परंतु काहीही उपयोग झाला नाही म्हणुन तक्रारदाराने ही तक्रार दाखल केली आणि ती द्वारे गैरअर्जदाराने मशीन बदलवुन द्यावी. तसेच पीकाच्या नुकसान भरपाईबाबत रुपये 50,000/-, 18 टक्के व्याजासह मिळावे. तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रुपये 10,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 5,000/- मिळावे अशी विनंती केली.
सदर प्रकरणात गैरअर्जदार यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्यात आली. नोटीस मिळुन गैरअर्जदार हजर झाले व आपला लेखी जवाब दाखल केला.
गैरअर्जदाराने आपले जवाबात तक्रारदाराची सर्व विपरित विधाने नाकबुल केली व असा आक्षेप घेतला की, तक्रारदाराने कंपनीच्या मालकाला सदर तक्रारीत गैरअर्जदार केले नाही त्यामुळे आवश्यक गैरअर्जदार न केल्यामुळे कायद्याप्रमाणे तक्रार चुकीची ठरते म्हणुन खारीज करावी असा उजर घेतला. गैरअर्जदार पुढे नमुद करतात की, मशीन सोबत गॅरन्टी कार्ड जोडलेले आहे. त्यात स्पष्टपणे नमुद केलेले आहे की, जर निर्मीती दोष असेल तर मशीनचा नंबर बदलवुन देण्यात येतो किंवा त्याची गॅरन्टी घेण्यात येते. विजेच्या कमी अधिक दाबामुळे किंवा विजेच्या तक्रारीमुळे जर मशीन खराब झाली तर कंपनीची कुठलीही जबाबदारी राहणार नाही.
मशीनचे सिल जर अन्य दुस-या कारागीराकडुन उघडले तर कंपनी त्याची गॅरन्टी घेत नाही. तक्रारदाराच्या मशीनची कंपनीनेदेखिल जबाबदारी नाकारलेली आहे. तक्रारदाराचे म्हणण्याप्रमाणे मशीन जळुन बंद झाली. यावरुन हे स्पष्ट आहे की सदर मशीन ही विजेच्या कारणामुळे जळाली. तक्रारदाराने केवळ तोंडी सुचना दिली. लेखी पत्र पाठविले. परंतु जळालेली मशीन कधीच दुकानात आणुन दिली नाही. त्यामुळे ती दुरुस्त करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. मशीन बदलवुन देण्याची हमी गैरअर्जदाराने कधीच घेतली नव्हती. त्यामुळे गैरअर्जदाराचे चुकीमुळे तक्रारदारास ओलीत पिके घेता आले नाही हे म्हणणे खोटे आहे. त्यामुळे गैरअर्जदार तक्रारदाराच्या नुकसानीकरिता जबाबदार नाही. ही तक्रार चालविण्याचे या मंचास अधिकार क्षेत्र नाही. त्यामुळे ती खारीज करावी असा उजर घेतला.
तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असुन, दस्तऐवज यादीनुसार 5 कागदपत्रे दाखल केलीत. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकला.
-: का र ण मि मां सा :-
यातील तक्रारदाराने गैरअर्जदाराकडुन नविन पाण्याची मोटार घेतली आणि ती नादुरुस्त झाल्यामुळे दुसरी पाण्याची मोटर बदलवुन द्यावी अशी तक्रार आहे. मात्र तक्रारदार यांचे म्हणण्याप्रमाणे गैरअर्जदाराने अशी पाण्याची मोटार बदलवुन दिली नाही. तक्रारदाराने गैरअर्जदार यांना दिनांक 8/5/2010 रोजी यासंबंधी नोटीस दिली होती. गैरअर्जदाराचे म्हणणप्रमाणे त्यांनी नोटीसला उत्तर दिलेले आहे. मात्र असे उत्तर गैरअर्जदाराने दाखल केलेले नाही. त्यामुळे त्यांनी नेमके कोणते उत्तर दिले होते हे त्यांनी सिध्द केलेले नाही. यावरुन तक्रारदाराने गैरअर्जदाराचे उत्तराला प्रतिउत्तर दिनांक 29/5/2010 देऊन त्यांनी पाण्याची मोटार गैरअर्जदाराला आणुन दिली होती व गैरअर्जदाराने ती दुरुस्त केली नाही असे त्यात नमुद केले आहे. यावरुन एक बाब स्पष्ट होते की, गैरअर्जदाराचे म्हणण्याप्रमाणे तक्रारदाराने पाण्याची मोटार आणुन दिली नव्हती, हा गैरअर्जदाराचा बचाव पुर्णतः चुकीचा आहे.
गैरअर्जदाराने जरी असा आक्षेप घेतला की, या मंचास अधिकारक्षेत्र नसल्यामुळे अथवा यासबंधी अधिकार क्षेत्र ज्याठिकाण उत्पादक राहतात त्या ठिकाणचे आहे. मात्र यासंबंधी वेगवेगळया वरिष्ठ न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निकालात ही बाब स्पष्ट झालेली आहे की, ही तक्रार या मंचासमक्ष चालविता येते. गैरअर्जदाराने तक्रारदारास मोटार विकत दिली ती या मंचाचे अधिकार क्षेत्रात विकत दिली असल्यामुळे या मंचास या प्रकरणात अधिकाराक्षेत्र आहे.
तक्रारदाराने पाण्याची मोटार गैरअर्जदाराकडे आणली असता, गैरअर्जदाराने ती तपासली नाही आणि दुरुस्त करुन दिली नाही व गैरअर्जदाराने मात्र ती पाण्याची मोटार न पाहता (त्यांचे म्हणण्याप्रमाणे) असा निष्कर्ष काढला आहे की, ती पाण्याची मोटार विजेच्या कमी जास्त दाबामुळे जळली असा निष्कर्ष काढणे, हे पुर्णतः निराधार आहे.
वरील सर्व परिस्थितीचा विचार करता, गैरअर्जदाराने आपले सेवेत त्रुटी ठेवलेली आहे हे स्पष्ट आहे. तक्रारदाराने पिकाचे नुकसीनीची केलेली मागणी ही चुकीची व अवास्तव आहे. त्यासंबंधी कोणताही आधार तक्रारदाराने दिलेला नाही. वरील सर्व परिस्थीतीचा विचार करता आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारित करित आहोत.
// अं ति म आ दे श //-
1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर.
2. गैरअर्जदाराने तक्रारदाराची पाण्याची मोटार पुर्णतः दुरुस्त करुन चालु करुन परत द्यावी.
3. तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रुपये 1,000/-(केवळ एक हजार) व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 1,000/-(केवळ एक हजार) गैरअर्जदाराने द्यावे.
वरील आदेशाचे पालन गैरअर्जदाराने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आत करावे.