(आदेश पारीत द्वारा- श्रीमती जयश्री येंडे, मा.सदस्या)
-/// आ दे श ///-
(पारीत दिनांक – 12 जानेवारी, 2012)
तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तूत तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
प्रस्तूत प्रकरणातील तक्रारदाराचे म्हणण्यानुसार तक्रारदाचा संगणकाचा कागद तयार करण्याचा कारखाना आहे. सदर कारखान्यातील मशीन चालविण्यासाठी ए.सी. व डी.सी. ईलेक्ट्रीक मीटरचा वापर होतो. दिनांक 3/8/2009 रोजी तक्रारदाराच्या कारखान्यातील एफ.डी.सी. मोटर नंबर 98100840/26, 15 अश्वशक्तीची किर्लोस्कर कंपनीची मोटर बंद पडली. तक्रारदाराने सदर बाबीसंदर्भात गैरअर्जदार यांचेशी संपर्क साधून गैरअर्जदार यांना बोलाविले. गैरअर्जदार यांचे प्रोप्रायटरने सदर मशीनची तपासणी करुन त्यांचे कार्यशाळेत नेऊन त्याची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे असे सांगीतले. त्यावरुन तक्रारदाराने संमती दिल्यावर गैरअर्जदार यांच्या मोतीराम या माणसाने सदर मोटर मशीनपासून वेगळे करुन दुरुस्तीसाठी नेली. तशी नोंद तक्रारदाराचे जावक रजीस्टरवर घेण्यात आली व त्यावर सदर इसमाने सही केली. त्यानंतर वारंवार मागणी करुनही गैरअर्जदार यांनी तक्रारदाराचे मोटर दुरुस्त करुन दिले नाही. तक्रारदार यांनी नोटीस पाठविल्यावर गैरअर्जदार यांनी वेगळ्या नंबरची अर्धवट स्थितीतील मोटार पुरुषोत्तम नावाच्या माणसासोबत तक्रारदाराकडे पाठविली, परंतू मोटारचे सामान पूर्ण नसल्याने व नंबरमध्ये फरक असल्याने तक्रारदाराने सदर मोटार गैरअर्जदार यांना परत पाठविली. अद्यापपावेतो गैरअर्जदार यांनी सदरची मोटार तक्रारदारास परत दिली नाही, ही गैरअर्जदार यांची कृती त्यांनी तक्रारदारास दिलेल्या सेवेतील कमतरता आहे. म्हणुन तक्रारदाराने ही तक्रार मंचासमक्ष दाखल केली असून, त्याद्वारे किर्लोस्कर कंपनीची 15 अश्वशक्तीची डी.सी. मोटार योग्यरित्या दुरुस्त करुन द्यावी, अथवा मोटारची किंमत रुपये 61,000/- 18% व्याजासह परत मिळावी, तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी रुपये 3,000/- आणि तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत.
तक्रारदाराने सदरची तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केलेली असून, सोबत जावक रजीस्टरची प्रत, नोटीस, पोस्टाची पावती व पोचपावती इत्यादी दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केलेले आहेत.
सदर प्रकरणात गैरअर्जदार यांना मंचातर्फे नोटीस बजाविण्यात आली, त्यावरुन हजर होऊन त्यांनी आपला लेखी जबाब मंचासमक्ष दाखल केला.
गैरअर्जदार यांनी तक्रारदाराचे संपूर्ण आरोप अमान्य केलेले आहेत. गैरअर्जदार यांच्या कथनानुसार तक्रारदाराने सदरचे खोटे डिलीवरी चलान तसेच सदरचे खोटे शपथपत्र आणि खोटी तक्रार दाखल केलेली आहे. गैरअर्जदार यांचे मते गैरअर्जदाराकडे मोतीराम व पुरुषोत्तम ही माणसे काम करीत नाहीत. तक्रारदाराने सदरची खोटी तक्रार दाखल केली, म्हणुन ती रुपये 25,000/- खर्चासह खारीज करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार यांनी केलेली आहे.
// का र ण मि मां सा //
. प्रस्तूत प्रकरणात तक्रारदाराचे म्हणणे की, दिनांक 3/8/2009 रोजी किर्लोस्कर कपनीची डी.सी. मोटार नंबर 98100840/26, 15 अश्वशक्ती ची मोटर मोतीराम नावाचे इसमास दिली होती. सदर जावक रजीस्टरवर सदर इसमाची सही आहे.
कागदपत्र क्रमांक 22 वरील डिलीव्हरी चलान तसेच दिनांक 6/1/2011 ची पुरुषोत्तम दौलत जामलीक यांची नोट हे दस्तऐवज सादर करुन, गैरअर्जदार यांनी सदर इसमासोबत दुस-याच नंबरची अर्धवट स्थितीतील मोटर तक्रारदारास पाठविली व त्यामुळे ती तक्रारदाराने स्विकारली नाही असे म्हटले. गैरअर्जदार यांनी सदर दोन्हीही त्यांची माणसे नाहीत असे म्हटलेले आहे. एवढेच नव्हे तर, तक्रारदाराने जी मशीन दुरुस्तीसाठी दिल्याचे कथन केलेले आहे. तक्रारदाराने आपल्या जावक रजीस्टरवर त्या मशीनसंदर्भात “odd” अशी नोंद आहे. ती किती जुनी होती ? त्यावेळेस तिची किंमत काय होती ? तक्रारदाराने तिचा वापर किती केला ? यासंबंधात कुठलिही दस्तऐवजे दाखल केली नाही. तसेच तक्रारीचे प्रार्थनेमध्ये मशीनपोटी मागीतलेली किंमत रुपये 61,000/- यापोटी मंचास दिनांक 1/42/2011 चे कोटेशन सादर केले.
या सर्व बाबी सिध्द होणे आवश्यक असल्यामुळे व त्यासंबंधात तक्रारदाराने कुठलाही सुस्पष्ट पुरावा न दिल्यामुळे व त्याच्याशिवाय योग्य त्या निष्कर्षाप्रत येणे या मंचाला शक्य नसल्यामुळे तक्रारदाराने या प्रकरणात दिवाणी न्यालयात दाद मागावी या निष्कर्षापर्यंत हे मंच येते. सबब खालील आदेश.