निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 14/02/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 02/03/2012
तक्रार निकाल दिनांकः- 18/06/2013
कालावधी 01 वर्ष. 03 महिने. 16 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
निवृत्ती पिता धोंडीबा सांगळे. अर्जदार
वय 60 वर्षे. धंदा.निवृत्त. अड.सुचिता गंगापूरकर.
रा.गंगाखेड ता.गंगाखेड जि.परभणी.
विरुध्द
पाटबंधारे कर्मचारी सहकारी पथपेडी मर्या. गैरअर्जदार.
परभणी तर्फे सचिव जायकवाडी वसाहत, परभणी. अड.एन.बी.उबाळे.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.आर.एच.बिलोलीकर. सदस्य)
अर्जदाराची तक्रार अशी आहे की, गैरअर्जदाराने त्याच्या कर्ज खात्यात जमा केलेले शेअर खाते क्रमांक 721/2 मधील रक्कम 9010/- व तसेच कर्ज खात्यात जमा केलेली रक्कम रु. 626/- गैरअर्जदाराने द्यावे, म्हणून दाखल केलेली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हा पाटबंधारे खात्यामध्ये मजूर म्हणून मासोळी मध्यम प्रकल्प सिंचन शाखा गंगाखेड येथे कार्यरत आहे. अर्जदार हा गैरअर्जदार पतसंस्थेचे 1986 पासून सभासद आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे त्याची शेअर रक्कम 1986 ते 2001 पर्यंत एकुण रु.9010/- जमा केली आहे. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने दिनांक 23/09/1986 रोजी गैरअर्जदाराकडून 9900/- रुपये कर्ज घेतले होते व सदर कर्जाची संपूर्ण रक्कम व्याजासह गैरअर्जदाराकडे परत केली सदर परतफेड करीत असतांना दिनांक 23/04/1987 रोजी पावती क्रमांक 11465 अन्वये रु.309/- व दिनांक 20/05/1987 रोजी पावती क्रमांक 7965 अन्वये भरणा केलेली रक्कम 317/- रुपये असे एकुण 626/- रुपये ही अर्जदाराच्या कर्ज खात्यात जमा केलेले नाही, अर्जदाराने त्यासंबंधी वेळोवेळी सदर रक्कम परत देण्याची विनंती केली, परंतु गैरअर्जदाराने अद्याप रक्कम परत दिली नाही. अर्जदाराने 19/04/2010 रोजी त्याच्या भागाची रक्कम रु.9010/- परत मिळण्यासंबंधी गैरअर्जदार यांना अर्ज केला होता, परंतु गैरअर्जदार यांनी कोणतीही दखल घेतली नाही, त्यानंतर अर्जदाराने दिनांक 03/08/2010 रोजी जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था परभणी यांच्याकडे गैरअर्जदार यांच्या बद्दल तक्रार केली सदर तक्रारीत जिल्हा उप निबंधक परभणी यांनी दिनांक 09/08/2010 रोजी पत्राने गैरअर्जदाराना कळविले की, अर्जदाराची रक्कम नियमा प्रमाणे कार्यवाही करुन देण्यात यावी, परंतु गैरअर्जदार यांनी रक्कम परत केली नाही व दिनांक 24/08/2010 च्या पत्राने कळविले की,सस्थेत मागील चालू काळातील गैरव्यवहार व अफरातफरीमुळे संस्थेच्या मुळ भागाची किंमत शुन्य झालेली आहे. आज मितीस संस्थेस कोणतेही सेवेत कार्यरत असलेल्या सभासदाचे भाग करीत नाही.मात्र मासिक सभेत आलेल्या ठरावात केवळ मयत व सेवानिवृत्त सभासदांचे काही भाग नविन सभासदाचे भाग खाते हस्तातंरित करीत आहे. तसेच पुढे कळविले की, आपण या संस्थेचे कर्जदार सभासद श्री. यु.व्ही.सांगळे याना जामीनदार असून त्यांच्याकडे 30208/- येणे बाकी आहे. त्यामुळे तुमच्या भागाची रक्कम हे तुम्ही निवृत्त झाल्यानंतर व जामिनातून मुक्त झाल्यानंतर देण्यात येईल. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने गैरअर्जदाराकडे सदर रक्कमेची वेळोवेळी मागणी केली व 19/04/2010 रोजी लेखी अर्ज दिला, अर्जदार हा कोणत्याही व्यक्तिस जामिन नाही अर्जदार हा यु.व्हि.सांगळे यांच्या कर्जात जामिन नसून केवळ साक्षिदार आहे. तसेच सदर संस्था ही आजही कर्जवाटप करते जर आर्थीक डबघाईत संस्था आली असेल तर व संस्थेत अफरातफर झालेली असेल तर संबंधीत संचालक मंडाळावर कोणतीही केस झालेली नाही, त्यामुळे सदर संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम आहे तसेच अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने दिनांक 13/09/010 रोजी भाग रक्कम मिळण्यासंबंधी व त्याची जादा घेतलेली रक्कम 626/- रक्कमे बद्दल पुन्हा 13/09/2010 रोजी अर्ज करुन सदर रक्कम देण्यासंबंधी विनंती केली, परंतु आता पर्यंत दोन्ही रक्कम गैरअर्जदारांने दिलेल्या नाहीत, म्हणून गैरअर्जदाराने सेवेमध्ये त्रुटी दिली आहे म्हणून अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, गैरअर्जदारांना असा आदेश देण्यात यावा की, अर्जदाराचे शेअर खाते क्रमांक 721/2 मधील भागाची रक्कम 9010/- ही 15 टक्के द.सा.द.शे. व्याजाने परत करावी व अर्जदाराने त्याच्या कर्जखात्यात जमा केलेली रक्कम रु. 626/- 15 टक्के व्याजासह 20/05/1987 पासून देण्याचा आदेश करावा व मानसिकत्रासापोटी 5,000/- रुपये व तक्रारीचा खर्च 2,000/- रुपये देण्यात यावे, अशी मंचास विनंती केली आहे.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केले आहे. नि.क्रमांक 4 वर 8 कागदपत्रांच्या यादीसह 8 कागदपत्रे दाखल केली आहेत.ज्यामध्ये 4/1 वर सभासद पासबुक, 4/2 वर भागाची रक्कम परत मिळणे बाबतचा अर्ज, 4/3 वर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था परभणी यांच्या अध्यक्षास पत्र, 4/4 वर वादातील रक्कमेचा तपशिल मिळणे बाबतचा अर्ज, 4/5 वर संस्थेकडून सांगळे यांना दिलेले पत्र, 4/6 वर सांगळे कडून पतपेढी यांना भागाची रक्कम मिळणे बाबचे पत्र, 4/7 वर 6 अ, 4/8 वर संस्थेकडून सांगळे यांना पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
तक्रार अर्जावर गैरअर्जदाराना आपले लेखी जबाब दाखल करण्यासाठी मंचातर्फे नोटीसा पाठविण्यात आल्यावर गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 12 वर आपले लेखी जबाब सादर केले. गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने दाखल केलेली तक्रार खोटी असून खारीज करणे योग्य आहे. तसेच गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार संस्थामध्ये मागील काळात 1987-88 व 88-89 या काळात 13,00,000/- अफरातफर झालेली आहे. त्यामुळे गैरअर्जदाराने सदरील रक्कमेवरु बॅकेत व्याज भरल्यामुळे संस्था आज मितीस जवळपास 60,00,000/- तोटयात आहे. त्यामुळे संस्थाचे उप कलम 22 अ नुसार व महाराष्ट्र सहाकारी संस्था अधिनियम 1960 कलम 23 अ नुसार भागाचे मुल्यांकन करुन परत करण्यात यावे असा उल्लेख असल्यामुळे सद्य परिस्थितीत भागाचे मुल्यांकन शुन्य असल्यामुळे भाग परत करता येत नाही व तसेच त्यांचे असे म्हणणे आहे की, सन 1987-88 व 88-89 या काळात झालेली अफरातफरी मध्ये 626/- रुपये गुंतलेले असून सदरील प्रकरण गैरअर्जदार संस्थेने सहकार न्यायालय नांदेड येथे तत्कालीन अध्यक्ष दिलीप किशनराव नरसीकर व्यवस्थापक राजेश्वर दिगंबर सनलापुरकर व लिपीक / कॅशीयर कृष्ण नारायण लंगर यांच्या विरोधात रक्कम वसुलीचे प्रकरण प्रक्रिया दाखल केलेले होते, परंतु त्या प्रकरणाचा निकाल गैरअर्जदाराच्या विरुध्द लागला व त्या निकाला विरोधात अपीलेट कोर्ट औरंगाबाद येथे अपील केले असून त्याचा क्रमांक अ 97/11 असून ते अपील प्रलंबीत आहे आणि अपिलाचे निकालान्ति मा.न्यायालयाचे आदेशान्वये सदरील रक्कमे बाबत कार्यवाही करण्यात येईल, तसेच गैरअर्जदाराचे हे म्हणणे आहे की, अर्जदाराने 19/04/2010 रोजी त्याच्या भागाची रक्कम 9010/- परत करण्यासंबंधी गैरअर्जदार यांना अर्ज केला होता, परंतु गैरअर्जदारानी कोणतीही दखल घेतली नाही हे म्हणणे खोटे आहे.गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, दिनांक 19/04/2010 रोजी रक्कम तपशिल मिळणे बाबत अर्ज केला असून त्याबाबत गैरअर्जदार संस्थेने दिनांक 11/08/2010 रोजी पत्र क्रमांक 295/10-11 अन्वये सविस्तर व्याजाचा तपशिल कळविलेला आहे व तसेच गैरअर्जदाराने अर्जदाराच्या तक्रार अर्जातील संपूर्ण मजकूर फेटाळून गैरअर्जदार यांनी कोणतीही सेवेत त्रुटी दिली नाही,म्हणून तक्रार फेटाळण्यात यावी अशी मंचास विनंती केली आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे उत्तर
1 गैरअर्जदाराने अर्जदाराचे शेअर खाते क्रमांक 721/2 मधील
भागाची रक्कम 9010/- रुपये व तसेच अर्जदाराने त्याच्या
कर्जखात्यात जमा केलेली रक्कम 626/- रुपये अर्जदारास
देण्याचे टाळून सेवेत त्रुटी दिली आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
मुद्दा क्रमांक 1
अर्जदाराने असे म्हंटले आहे की, अर्जदाराने गैरअर्जदाराकडून 9900/- रुपये कर्ज घेतले होते व सदर कर्जाची संपूर्ण रक्कम व्याजासह गैरअर्जदाराकडे परत केली होती, त्याबद्दलचा कोठलाही कागदोपत्री पुरावा अर्जदार अथवा गैरअर्जदाराने मंचासमोर दाखल केलेला नाही, म्हणून 626/- रुपयांचा भरणा जास्तीचा झाला हे अर्जदाराने सिध्द केलेले नाही. अर्जदाराने नि.क्रमांक 4 वर 8 कागदपत्राच्या यादीसह जी कागदपत्रे दाखल केलेली आहेत, त्यामध्ये सभासद पासबुक व्यतिरिक्त इतर सर्व कागदपत्रे ही फक्त अर्जदार व गैरअर्जदार व निबंधक यांच्या मध्ये झालेले पत्रव्यवहार आहे. अर्जदाराने हे ही सिध्द केले नाही की, अर्जदार हा यु.व्हि.सांगळे यांचा जामिनदार नाही, व त्याबाबतचा कोठला ही कागदोपत्री पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. अर्जदाराने नि.क्रमांक 4/1 वर सभासद पासबुक दाखल केलेले आहे, यावरुन असे दिसते की, अर्जदाराच्या खात्यात 9010/- रुपये जमा आहेत. अर्जदाराने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था परभणी यांच्याकडे त्याचे गैरअर्जदाराकडे भागाची रक्कम 9010/- रुपये जमा आहे व ती परत मिळण्याकरीता दिनांक 19/04/2010 रोजी अर्ज केला होता, ही बाब नि.क्रमांक 4/2 वर सिध्द होते व त्यानंतर नि.क्रमाक 4/3 वरील कागदपत्रावरुन हे सिध्द होते की, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था परभणी यांनी सदरच्या अर्जदाराचे पैसे मागणीचा अर्ज नियमा प्रमाणे अर्जदारास पैशे देण्याचा आदेश दिलेला आहे. नि.क्रमांक 4/4 वर दाखल केलेल्या कागदपत्रावरुन हे सिध्द होते की, 626/- ही रक्कम वादातीत आहे, या रक्कमे बद्दल कोठला वाद आहे हे अर्जदार व गैरअर्जदार या दोघांनीही खुलासा केलेला नाही.अर्जदाराने उपनिबंधकाकडे त्याची जमा असलेली रक्कम 9010/- रुपये ही देण्यासाठी अर्ज केलेला होता व त्यावर उपनिबंधकाने सदरची रक्कम नियमा प्रमाणे परत करावी असे गैरअर्जदारास कळविले होते. अर्जदाराने सदरील संस्थेचा बायलॉज (नियमावली) मंचासमोर दाखल केलेली नाही व त्यामुळे सदरच्या संस्थेमध्ये सभासद कोणास होता येते, सभासदाची फी किती, व सभासदत्व रद्द कसे होते व पैसे परत मिळण्याचे नियम व अटी काय ? याचा बोध होत नाही, अथवा त्याबद्दल वरील नियमा बद्दल कागदोपत्री कोठलाही पुरावा अर्जदाराने अथवा गैरअर्जदाराने मंचासमोर आणलेला नाही, त्यामुळे अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदाराने त्याचे जमा रक्कम 9010/- रुपये व 626/- रुपये हे परत न करुन सेवेत त्रुटी दिली आहे. हे अर्जदारास सिध्द करता आले नाही, म्हणून वरील मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देवुन मंच पुढील प्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष