द्वारा: मा.सदस्या : श्रीमती सुजाता पाटणकर
// निकालपत्र //
अर्जदारांच्या अर्जातील हकीकत खालील प्रमाणे :
(1) अर्जदार हे शिक्षक आहेत. त्यांचे सख्खे धाकटे बंधू श्री राहूल तुळशीराम तारु यांचा साई टुर्स अण्ड ट्रॅव्हल्स या नावांने प्रवाशांची ने आण करण्याचा प्रमुख उदरनिर्वाहचा छोटा व्यवसाय होता व आहे. अर्जदार शिक्षक असल्याने बँकेकडून कर्ज घेणे सोप पडणार असल्यामुळे भावासाठी स्वत:च्या नावांवर गाडी घेतली आहे आणि या व्यवसायासाठी म्हणून चांगल्या गाडीची आवश्यकता होती त्यामुळे अर्जदारांनी अनेक ठिकाणी चौकशी करुन माहिती घेतल्याने असे लक्षात आले की, जाबदार यांच्या फर्म कडून चांगल्या प्रकारे व रास्त किंमतीमध्ये चांगली गाडी मिळू शकते. तसेच जाबदार फर्म चांगली सर्व्हीस सुध्दा देत असतात त्यामुळे अर्जदारांनी जाबदार कडून गाडी घेण्याचे निश्चित केले. अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान चर्चा होऊन दिनांक 29/07/2010 रोजी अर्जदारांनी तवेरा गाडीसाठी जाबदार यांचेकडे बुकींग फॉर्म भरुन दिला. त्याप्रमाणे जाबदार यांचेकडून अर्जदार यांनी दिनांक 08/10/2010 रोजी तवेरा गाडी नंबर एमएच 12/एमझेड/1165 ही बाडी अर्जदारांनी त्यांच्या भावासाठी खरेदी घेतली. अर्जदारांनी गाडीची किंमत सर्व कर आणि इन्शुरन्स सहीत रक्कम रु 8,55,530/- एवढी रक्कम भरल्यानंतर जाबदार यांनी त्याच दिवशी पावती दिलेली आहे. याबाबत कोणताही वाद नाही. अर्जदार व जाबदार यांचेमध्ये चर्चा होऊन दिनांक 29/07/2010 रोजी अर्जदारांनी तवेरा गाडीसाठी जाबदारांकडे बुकींग फॉर्म भरुन दिला. सदर फॉर्मवर स्पेशल रीमार्क म्हणून गाडी पासींग झालेनंतर तीन महिन्यांनी एक्ससाईज रीफंड म्हणून रक्कम रु 55,000/- ( रु पंचावन्ना हजार) परत मिळतील असा रीमार्क लिहीला असून तो अर्जदार व जाबदार या दोघांना मान्य व कबूल असल्यामुळे त्यावर दोघांनी सहया केल्या आहेत. आणि सदरची रक्कम ठरलेल्या वेळे प्रमाणे तीन महिन्यात देण्याचे पुर्ण आश्वासन जाबदार यांनी अर्जदार व त्यांचे भावाला दिले होते. अर्जदारांनी सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन दिनांक 22/06/2010 रोजी गाडी आर टी ओ कडून पासींग करुन घेतली आणि आपल्या भावास व्यवसाय सुरु करण्यासाठी दिली. त्यानंतर अर्जदारांनी जाबदार यांचेकडे तीन महिन्यां नंतर एक्साईज रीफंड म्हणून देण्यात येणा-या रक्कम रु 55,000/- ची मागणी केली. त्यावेळी थोडयाच दिवसात तुमचे पैसे परत देतो असे सांगून पैसे देण्याची जाबदार टाळाटाळ करु लागले. अनेक वेळा लेखी, तोंडी स्वरुपात विनंतीपुर्वक पैसे मागून सुध्दा जाबदार हे पैसे देण्याचे टाळत आहेत हे लक्षात आल्यावर अर्जदार यांनी अड श्री सुभाष पाटील यांच्या तर्फे दिनांक 20/06/2011 रोजी कायदेशिर नोटीस देऊन एक्साइज रीफंडच्या पैशांची व्याजासह मागणी केली. सदर नोटीस मिळाल्यावर जाबदार यांनी बेकायदेशिर व चुकीच्या मजकुराचे नोटीस उत्तर देऊन अर्जदारांची मागणी फेटाळून लावली. जाबदार यांनी दिलेल्या नोटीस उत्तरामध्ये पैसे रीफंड देण्याबद्यल ज्या एक्साइज संबंधी बाबी लिहीलेल्या आहेत त्या बाबत जाबदार यांनी अर्जदार यांना कोणतीही लेखी व तोंडी कल्पना दिलेली नाही. त्यामुळे अर्जदार यांनी नोटीस उत्तरामधील मजकुर मान्य व कबूल केलेला नाही. जाबदारांकडून अर्जदारांनी तवेरा गाडी खरेदी घेतली असल्यामुळे ते जाबदारांचे ग्राहक आहेत. अर्जदारांनी गाडी बुकींग करताना अर्जदार ग्राहकाला आकर्षीत करण्यासाठी एक्साइज रीफंडचे पैसे परत करण्यात येतील असे लेखी देऊन सुध्दा पैसे देत नाहीत म्हणजेच जाबदार हे ग्राहकां बरोबर अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब करत असून अर्जदार/ ग्राहकाला न्युनतम सेवा देत आहेत. आणि त्यामुळे अर्जदारांचे आर्थिक नुकसान होऊन अर्जदारांना शारीरिक व मानसिक त्रास झालेला आहे. म्हणून सदरची फिर्याद या न्यायमंचात दाखल करणे भाग पडले आहे. तरी अर्जदारांची विनंती
अ. जाबदार यांनी बुकींग फॉर्म वर लेखी स्वरुपात नमुद केल्याप्रमाणे व दिलेल्या वचनाप्रमाणे अर्जदारास एक्साईज रिफंड म्हणून रु 55,000/- गाडी पासींग नंतर तीन महिन्यांनी देणार होते ते दिले नाहीत. म्हणून रिफंड म्हणून देण्यात येणारी रक्कम रु 55,000/- अधिक दिनांक 22/01/2011 पासून पैसे हातात पडेपर्यंन्त 18 टक्के दराने व्याज देण्याचे आदेश पारित करण्यात यावेत.
ब. जाबदार यांच्या बेकायदेशीर व चुकीच्या लोभीवृत्तीमुळे अर्जदारास नाहक शारीरिक व मानसिक त्रास झाला आहे. त्याची भरपाई म्हणून रु 25,000/- देण्याचे हुकूम करावेत.
क. जाबदार यांच्या चुकीच्या धोरणामुळे अर्जदारास या ग्राहक मंचात फिर्याद दाखल करावी लागली. म्हणून कोर्ट खर्च व इतर खर्च म्हणून रु 10,000/- देण्याचे हुकूम पारित करावेत.
ड. इतर योग्य व न्यायाचे हुकूम करावेत अशी विनंती केलेली आहे.
(2) प्रस्तुत अर्जाची जाबदार यांना मे मंचा मार्फत नोटिस काढलेली होती.
सदरची नोटीसची पोहचपावती प्राप्त झाले नंतर नेमल्या तारखेला जाबदार हे मे. मंचामध्ये हजर राहीलेले नाही अगर त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे दाखल केलेले नाही. सबब त्यांचे विरुध्द दिनांक 30/01/2012 रोजी एकतर्फा आदेश निशाणी 1 वर करण्यात आलेले आहेत. अर्जदार यांनी तक्रारअर्जा सोबत शपथपत्र व कागद यादीने जाबदार यांनी दिलेली रिटेल सेल्स ऑर्डर बुकींग फॉर्म आणि अर्जदार यांनी जाबदार यांना वकीलां मार्फत पाठविलेली नोटीस इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहे. तसेच अर्जदार यांनी त्यांचा लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. अर्जदार यांचे तर्फे अड श्री घोणे यांचे तोंडी विनंती नुसार प्रकरण निकालासाठी नेमण्यात आले.
(3) प्रस्तुत प्रकरणातील तक्रारअर्ज, शपथपपत्रे, व दाखल कागदपत्रे याचे अवलोकन केले असता खालील मुद्दे( points for Consideration) मंचाच्या विचारार्थ उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
मुद्या क्र . 1:- जाबदार यांनी अनुचीत व्यापार पध्दतीचा ...
अवलंब करुन अर्जदार यांना न्युनतम सेवा दिली आहे
का ? ... होय.
मुद्या क्र . 2 :- काय आदेश ... अंतिम आदेशाप्रमाणे
विवेचन :-
(3) अर्जदार व जाबदार यांचेमध्ये तवेरा गाडी या वाहनाचे खरेदी विक्री संदर्भात व्यवहार झालेला होता ही बाब अर्जदार यांनी दाखल केलेल्या रिटेल सेल्स ऑर्डर बुकींग फॉर्म यावरुन स्पष्ट होत आहे. सदरची बाब जाबदार यांनी या अर्जाचे कामी हजर राहून कोणत्याही प्रकारे नाकारलेली नाही. याचा विचार होता अर्जदार यांनी जाबदार यांचेकडून वाहन खरेदी केलेले होते ही बाब निर्विवाद आहे. सबब अर्जदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत हा ही मुद्या निर्विवाद आहे असे या मंचाचे मत आहे.
मुद्या क्रमांक 1: अर्जदार यांनी त्यांच्या अर्जात कथन केल्याप्रमाणे जाबदार यांना दिनांक 29/07/2010 रोजी तवेरा गाडी घेणेसाठी बुकींग फॉर्म भरुन दिला. दि. 08/10/2010 रोजी तवेरा गाडी नंबर /एमएच-12 /एफझेड-1165 गाडी रक्कम रु. 8,55,530/- एवढया किंमतीस खरेदी केली. त्याची पावती जाबदार यांनी दिलेली आहे याबद्यल कोणताही वाद नाही.
जाबदार यांनी अर्जदार यांचेकडून बुकींग फॉर्म भरुन घेतला त्यावेळी सदर फॉर्मवर स्पेशल रिमार्क म्हणून गाडी पासींग झाले नंतर तिन महिन्यांनी एक्साईज रिफंड म्हणून रक्कम रु 55,000/- (रु पंचावन्न हजार फक्त ) परत मिळतील असा रिमार्क लिहीला असून तो अर्जदार व जाबदार यांना मान्य असले बाबत दोघांनी त्यावर सहया केलेल्या आहेत. ठरल्याप्रमाणे जाबदार यांनी रक्कम परत दिली नाही म्हणून अर्जदार यांनी त्यांचेकडे वेळोवेळी लेखी व तोंडी मागणी केलेली आहे. अर्जदार यांनी वकीला मार्फत पाठविलेल्या नोटीसीची स्थळप्रत या अर्जाचे कामी दाखल केलेली आहे. अर्जदार यांनी वकीलां मार्फत नोटीस पाठवूनही जाबदार यांनी ठरले प्रमाणे एक्साईज रिफंड अर्जदार यांना दिलेला नाही. अर्जदार यांनी त्यांचे तक्रारअर्जा सोबत दाखल केलेला रिटेल सेल ऑर्डर बुकींग फॉर्मचे अवलोकन केले असता स्पेशल रिमार्क “Excise refund of Rs. 55,000/- after three months of passing “ असे नमूद केल्याचे दिसून येत आहे. सदर रिटेल सेल ऑर्डर बुकींग फॉर्म वर अर्जदार व जाबदार यांची सही आहे. अर्जदार यांनी त्यांच्या अर्जात कथन केल्याप्रमाणे अर्जदार यांनी तवेरा वाहन खरेदी पोटी जाबदार यांना पुर्ण रक्कम अदा केलेली आहे. त्याबाबत दोघांमध्ये कोणताही वाद नाही असे नमूद केलेले आहे. वास्तविक पाहता जाबदार यांनी रिटेल सेल ऑर्डर बुकींग फॉर्मवर लिहून दिले प्रमाणे रक्कम रु 55,000/- अर्जदार यांना वाहनाचे पासींग झाले नंतर तिन महिन्यांनी अदा करणे न्याय्य व आवश्यक होते. जाबदार यांनी अर्जदार यांना वाहन खरेदीच्या वेळेला रक्कम रु 55,000/- परत देण्याची हमी देऊनही त्याची पूर्तता ठरल्याप्रमाणे केलेली नाही. म्हणजेच जाबदार यांनी अर्जदार यांना वाहन खरेदीच्या वेळी एक प्रकारचे आमिष दाखवून वाहनाचे विक्री केलेली आहे व दोघांमध्ये ठरल्याप्रमाणे रक्कम रु 55,000/- ही रक्कम परत केलेली नाही ही बाब दाखल कागदपत्रावरुन स्पष्ट झालेली आहे. अर्जदार यांच्या अर्जातील शपथपत्रावरील मजकूर कागदपत्रांसहीत निर्विवाद राहीलेला आहे. कारण सदर अर्जाचे कामी या अर्जाची नोटीस मिळूनही जाबदार हे या अर्जाचे कामी या मे मंचामध्ये हजर राहीलेले नाहीत. अगर त्यांनी त्यांचे बचावाचे मुद्ये या अर्जाचे कामी दाखल केलेले नाहीत. त्यामुळे अर्जदार यांची तक्रार पुराव्यानिशी सिध्द झालेली आहे.
वरील सर्व विवेचनाचा विचार होता जाबदार यांनी अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब करुन अर्जदार यांना न्युनतम सेवा दिलेली आहे असे या मंचाचे मत आहे. सबब मुद्या क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थि देण्यात येत आहे.
(4) अर्जदार यांची रक्कम रु 55,000/- एवढी रक्कम दिनांक 08/10/2010 पासून जाबदार यांचेकडे जमा आहे. अर्जदार यांनी अर्जात नमूद केल्याप्रमाणे अर्जदार यांनी त्यांच्या वाहनाचे पासींग आरटीओ कडून दिनांक 22/10/2010 रोजी करुन घेतलेले आहे. दिनांक 22/10/2010 पासून तिन महिन्यांनी म्हणजेच दि 22/01/2011 नंतर जाबदार यांनी अर्जदार यांची एक्साईज रिफंड रक्कम रु 55,000/- परत करण्याची होती परंतु अनेकदा लेखी व तोंडी मागणी करुनही जाबदार यांनी अर्जदार यांची एक्साईज रिफंडची रक्कम परत केलेली नाही. त्यामुळे अर्जदार यांनी 20/06/2011 रोजी वकीलां मार्फत नोटीस पाठवून सदर रकमेची मागणी व्याजासहीत केले नंतरही जाबदार यांनी अर्जदार यांची एक्साईज रिफंडची रक्कम परत करणे बाबत कोणतीही पुर्तता केलेली नाही. अर्जदार यांची रक्कम रु 55,000/- एवढी रक्कम आज अखेर जाबदार यांनी स्वत:कडे ठेऊन घेतली आहे. सदरच्या रकमेची अनेकदा लेखी व तोंडी मागणी करुनही जाबदार यांनी अर्जदार यांना एक्साईज रिफंडची रक्कम परत केली नाही. म्हणून अर्जदार यांना या मंचामध्ये सदरची रक्कम परत मिळण्यासाठी अर्ज करावा लागला आहे व त्या अनुषंगाने खर्चही करावा लागलेला आहे. त्यामुळे अर्जदार हे जाबदार यांचेकडून रक्कम रु 55,000/- व सदर रकमेवर दिनांक 22/01/2011 पासून 9 टक्के व्याजासह रक्कम वसूल करुन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. कोणतेही योग्य व संयुक्तिक कारण नसताना जाबदार यांनी अर्जदार यांची रक्कम स्वत:कडे राखून ठेवलेली आहे. त्यामूळे अर्जदार यांना निश्चितच आर्थिक नुकसान व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे याचा विचार होता नुकसानभरपाई पोटी रक्कम रु 10,000/- अर्जदार हे जाबदार यांचेकडून वसूल करुन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. जाबदार यांचेकडून रक्कम वसून करुन घेण्यासाठी अर्जदार यांना या न्यायमंचामध्ये अर्ज करावा लागलेला आहे व त्या अनुषंगे खर्चही करावा लागलेला आहे. त्यामुळे अर्जदार हे जाबदार यांचेकडून अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु 2, 000/- वसूल करुन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
वरील सर्व विवचनाचा विचार होता खालील प्रमाणे आदेश निर्गमित करण्यत येत आहेत.
// आदेश //
(1) तक्रारअर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
(2) जाबदार यांनी अर्जदार यांना खालील प्रमाणे रकमा दयाव्यात.
(i) रक्कम रु 55,000/- ( रु पंचावन्न हजार फक्त) व सदर रकमेवर
दि 22/01/2011 पासून प्रत्यक्ष रक्कम पदरी पडेपर्यन्त 9 %
व्याजासह होणारी एकुण रक्कम दयावी.
(ii) नुकसानभरपाई पोटी रक्कम रु 10,000/- ( रु दहा हजार) दयावेत.
(iii) अर्जाचा खर्च रक्कम रु 2,000/- ( रु दोन हजार) दयावा.
(3) वरील आदेशाची पुर्तता जाबदार यांनी सदर निकालाची प्रत मिळाले
पासून 30 दिवसांचे आत करावी.
(4) निकालपत्राच्या प्रती उभयपक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात