( आदेश पारित द्वारा : श्री. विजयसिंह ना. राणे, अध्यक्ष ) आदेश ( पारित दिनांक : 27 आक्टोबर, 2010 ) यातील तक्रारदार श्री सुनिल शंकरराव बोंदरे यांची गैरअर्जदार पिरॅमिड डेव्हलपर्स यांचे विरुध्द तक्रार अशी आहे की, गैरअर्जदार यांचे सोबत त्यांनी दिनांक 3.09.2008 रोजी मौजा-झरी, तहसिल- नागपूर,जिल्हा-नागपूर येथील प.ह.नं. 73, खसरा नं.102/133, या जमिनीतील भुखंड क्रमांक 15, क्षेत्रफळ 1744 चौ.फुट. हया प्रमाणे रुपये 345/- प्रति चौ.फुट या भावाने भुखंड विकत घेण्याचा सौदा केला. त्यांनी कराराचे वेळी रुपये 2,40,000/- एवढी रक्कम दिली आणि पुढे वेळोवेळी एकुण 5,90,812/- एवढी रक्कम दिली व गैरअर्जदार यांना उर्वरित रक्कम घेऊन विक्रीपत्र करुन दयावे अशी विनंती केली. मात्र सध्या विक्रीपत्र नोंदणी बंद आहे असे खोटे उत्तर गैरअर्जराने दिले. दिनांक 9.2.2010 रोजी तक्रारदाराने त्यांची भेट घेऊन उर्वरित रक्कत रुपये 10,564/- घेऊन विक्रीपत्र नोंदवुन दयावे अशी विनंती केली. मात्र आणखी रुपये 50/- प्रति चौरस फुट प्रमाणे जास्तीचे दयावे लागतील असे गैरअर्जदाराने सांगीतले व जास्तीच्या रक्कमेची मागणी केली व रुपये 25,500/- विक्रीपत्र नोंदणी शुल्काकरिता असे एकुण 1,23,518/- रुपये जमा करावे असे सांगीतले. गैरअर्जदाराने जास्तीची रक्कम मागून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे निर्देशनास येते आणि त्याकारणावरुन तक्रारदारास विक्रीपत्र नोंदवुन न देणे ही त्यांचे सेवेतील त्रुटी ठरलेली आहे. तक्रारदार राहीलेली रक्कम रुपये 10,868/- देण्यास नेहमीच तयार होते व आजही तयार आहेत. तसेच विक्रीपत्र करुन घेण्यास नेहमीच तयार होते व आजही आहे. तसेच विक्रीपत्राचा खर्च सहन करण्याची जबाबदारी तक्रारदाराची आहे. तक्रारदाराने गैरअर्जदारास नोटीस दिली परंतु गैरअर्जदाराने त्यांचे उत्तर दिले नाही म्हणुन तक्रारदाराने ही तक्रार दाखल करुन गैरअर्जदाराने भुखंडाचे विक्रीपत्र करुन नोंदवुन, भुखंडाची मोजणी करुन त्याचा ताबा तक्रारदारास दयावा. तसेच मानसिक, शारिरिक त्रासापोटी रुपये 50,000/- मिळावे व आर्थिक नुकसानीबाबत रुपये 1,00,000/- मिळावे अशी मागणी केली. यात गैरअर्जदार यांना नोंदणीकृत डाकेद्वारे दिनांक 27.4.2010 रोजी नोटीस पाठविण्यात आली. ती नोटीस 30 दिवसापेक्षा जास्त कालावधी होऊन परत आली नाही व त्याची पोचपावती अथवा लिफाफा परत आला नाही म्हणुन ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 28-ए (3) प्रमाणे सदर नोटीस गैरअर्जदारास प्राप्त झाल्याचे घोषित करुन त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फी चावविण्याचा आदेश दिनांक 29.9.2010 रोजी पारित करण्यात आला. तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून दस्तवेजयादीनुसार विशेष मुख्यत्यारपत्र, करारपत्र, गैरअर्जदाराचे पत्र, लेआऊटचा नकाशा, आदेश पत्र, मागणी पत्र, देय रक्कमेची यादी, रक्कम अदा केल्याच्या पावत्या, पावती रसिद, कायदेशिर नोटीस, पोचपावती इत्यादी कागदपत्रे दाखल केली. गैरअर्जदार हजर झाले नाही व आपला लेखी जवाब दाखल करुन आपला बचाव केला नाही. #####- का र ण मि मां सा -##### तक्रारीतील दस्तावेज व शपथपत्र यावरुन तक्रारदाराने गैरअर्जदारासोबत भुखंड खरेदी बाबत केलेला करार, दिलेली रक्कम इत्यादी संबंधी तक्रारीतील सर्व बाबी व मांडलेली वस्तुस्थिती सत्य आहे हे पुराव्याने सिध्द केले. तक्रारदाराने, गैरअर्जदार यांनी जास्तीची रक्कम मागीतल्या बाबत जी चिठ्ठी दिली आहे ती चिठ्ठी दाखल केली. त्याप्रमाणे तक्रारदाराजवळुन रुपये 5,90,812/- एवढी रक्कम मिळाली. त्यापैकी रुपये 10,686/- राहीलेली आहे आणि रुपये 87,150/- एवढया जास्त रक्कमेची मागणी तसेच नोंदणी खर्च रुपये 25,500/- रक्कमेची मागणी केल्याचे त्यामध्ये दिसुन येते. गैरअर्जदारास अशा प्रकारे जास्तीच्या रक्कमेची मागणी करण्याचा अधिकार नाही व अशी मागणी करुन गैरअर्जदाराने तक्रारदारास विक्रीपत्र करुन दिले नाही ही गैरअर्जदार यांचे सेवेतील त्रुटी आहे हे सिध्द होते. सबब आदेश. // अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर 2. गैरअर्जदार यांनी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आत तक्रारदारास नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस देऊन उक्त वादातील भुखंडाचे विक्रीपत्रासाठीचा खर्च, मुद्रांक शुल्क व नोंदणीचा खर्च याचा तपशील व विक्रीपत्र नोंदवुन देण्याची तारीख कळवावी. अशी नोटीस प्राप्त होताच तक्रारदाराने गैरअर्जदारास उर्वरित मोबदला रक्कम रुपये 10,868/- अधिक विक्रीपत्र नोदणीसाठी लागणारे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी खर्चाची रक्कम धनाकर्षाद्वारे (डि.डि.) गैरअर्जदार यांना पाठवावी. त्यानंतर गैरअर्जदार यांनी दिलेल्या तारखेस विक्रीपत्र करुन नोंदवुन तक्रारदारास दयावे. तसेच भुखंडाची मोजणी करुन त्याचा ताबा दयावा. 3. गैरअर्जदाराने तक्रारदारास झालेल्या मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासापोटी रुपये 15,000/- (रुपये पंधरा हजार फक्त ) आणि तक्रारीचा खर्च रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्त ) असे एकुण 16,000/- रूपये दयावे. 4. तक्रारदार सदर रक्कम रुपये 16,000/- गैरअर्जदारास देय असलेल्या रक्कमेमध्ये समायोजीत करु शकतील. गैरअर्जदार यांनी सदर आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 3 महिन्याचे आत करावे.
| [HONABLE MRS. Jayashree Yangal] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT[HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER | |