नि. 26
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य - श्री के.डी.कुबल
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 589/2010
तक्रार नोंद तारीख : 14/12/2010
तक्रार दाखल तारीख : 21/01/2011
निकाल तारीख : 10/04/2013
-------------------------------------------------
श्री प्रकाश भिमराव पाटील
वय वर्षे – 35, व्यवसाय – शेती
रा.कवलापूर ता.मिरज जि.सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
पार्शोलेक्स अॅग्रोप्लास्ट प्रा.लि.
फॅक्टरी – एम 2/1, एम.आय.डी.सी.
कुपवाड, ता.मिरज जि. सांगली
तर्फे व्यवस्थापक/डायरेक्टर ...... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड डी.एम.धावते
जाबदारतर्फे : अॅड उल्हास शेटे
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. अध्यक्ष: श्री. ए.व्ही.देशपांडे
1. सदरची तक्रार तक्रारदाराने जाबदारांनी दिलेल्या दूषित ग्राहक सेवेकरिता व सेवेत त्रुटी केल्याचे कथनावरुन जाबदारकडून रु.89,591/- ची भरपाई व त्यावर व्याज अधिक अर्जाचा खर्च म्हणून रु.5,000/- मिळावा या मागणीकरिता दाखल केलेली आहे.
2. थोडक्यात हकीकत अशी की, जाबदार हे मोर्लेक्स पाईप्सचे उत्पादक/विक्रेते असून त्यांचा कुपवाड औदयोगिक वसाहत येथे कारखाना आहे. दि.8/3/2010 रोजी तक्रारदाराने जाबदारकडून 15 एम.एम., 32 एम.एम., 50 एम.एम., व्यासाच्या पाईप्सची खरेदी केली. पाईप खरेदी केलेनंतर तक्रारदाराच्या शेतात असणा-या जुन्या 32 एम.एम. व्यासाच्या पाईपलाईनमध्ये त्यांचे फिटींग होत नाहीत आणि नवीन विकत घेतलेल्या पाईपलाईन या 32 एम.एम.च्या पाईपलाईन्स नाहीत असे तक्रारदाराच्या लक्षात आले. सदर पाईपवर आय.एस.आय. मार्क देखील नसल्याचे निदर्शनास आले. तथापि तक्रारदारास देण्यात आलेल्या बिलावर आय.एस.आय. मार्क असल्याचे नमूद आहे. दि.13/3/2000 रोजी तक्रारदाराने जाबदारकडे पाईप बदलून मिळावी व गाडी भाडे रु.500/- मिळावे अशी मागणी केली असता जाबदारने सदर पाईप 32 एम.एम.ची पाईप असल्याचे सांगून पाईप बदलून देण्यास नकार दिला. पाईपलाईन करण्याकरिता तक्रारदाराने शेजारील शेतक-यांचे जमीनीतून व स्वतःचे शेतातून चर काढला होता. पाईपचे फिटींग होत नसल्यामुळे तक्रारदाराने शेजा-याच्या शेतातील चर त्याच्या सांगण्यावरुन मुजवून दिला. जाबदार पाईप बदलून देत नसल्याने नाईलाजाने दि.16/3/2010 रोजी तक्रारदाराने प्रगती एंटरप्राइझेस यांचेकडून नव्याने 1 इंची पाईप खरेदी करुन दि.18/3/2010 रोजी पुन्हा जे.सी.बी. लावून, चर काढून, पाईपलाईनचे काम पूर्ण करुन घेतले. जाबदाराने विकलेल्या दूषित पाईपमुळे तक्रारदारास दोन वेळा चर काढून मजूरांकरवी काम करुन घ्यावे लागले. त्यामुळे अर्जदारास मानसिक आर्थिक व शारिरिक त्रास झाला. जाबदारकडून खरेदी केलेल्या 32 एम.एम.पाईप तक्रारदाराने पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी बुधगांव यांचेकडे अर्ज करुन व रक्कम रु.276/- तपासणी फी भरुन तपासून घेतल्या आहेत. सदर संस्थेने तपासणी करुन जाबदारकडून विकत घेतलेल्या पाईप 32 एम.एम.च्या नसून 25 एम.एम.च्या आहेत असा अहवाल दिला आहे. जाबदारांनी पाईपवर आय.एस.आय.मार्क असल्याचे खोटे कथन करुन व कमी व्यासाच्या पाईपची विक्री करुन अर्जदारची फसवणूक केली, त्याच पध्दतीने इतरही ब-याच शेतक-यांची फसवणूक जाबदारांनी केली असणार. सबब जाबदारांनी अवलंबिलेल्या अनुचित व्यापारी प्रथेबाबत, दूषित सेवेबाबत तक्रारदारास सदरची तक्रार दाखल करणे भाग पडत आहे. अशा कथनांवरुन तक्रारदाराने 32 एम.एम.ची पाईपची किंमत रक्कम रु.2,415/-, गाडी भाडे रु.500/-, जे.सी.बी.खर्च रु.8,400/-, मजूरी रक्कम रु.3,000/-, तक्रारदारास झालेल्या मानसिक, शारिरिक आणि आर्थिक त्रासापोटी रु.25,000/-, जाबदाराच्या अनुचित व्यापारापोटी नुकसान भरपाई म्हणून रु.50,000/- व तपासणी फी रु.276/- अशी एकूण रु.89,591/- रकमेची मागणी केली आहे. अर्जास कारण त्याने दि.8/3/2010 रोजी पाईप खरेदी केली, त्यानंतर दि.12/3/2010 रोजी सदरची पाईप शेतात बसविण्याचा प्रयत्न करताना ती चुकीची असल्याचे दिसून आले व तदनंतर दि.13/3/2010 रोजी जाबदारकडून ती पाईप बदलून मागितली व नुकसान भरपाई मागणी केली व ती मागणी जाबदारने फेटाळली तेव्हा व त्यानंतर दि.16/3/2010 रोजी दुस-या दुकानातून तक्रारदाराने नवीन पाईप विकत घेतली आणि त्यानंतर दि.29/3/2010 रोजी पी.व्ही.पी.आय.टी. बुधगांव या संस्थेकडून तपासून घेवून त्यांचा तपासणी अहवाल आल्यानंतर घडले असे नमूद केले आहे. या कथनावरुन तक्रारदाराने वर नमूद केल्याप्रमाणे मागणी केली आहे.
3. जाबदारने आपली लेखी कैफियत नि.10 ला दाखल करुन तक्रारदाराची संपूर्ण कथने स्पष्टपणे नाकारली आहे. त्यांचे म्हणण्याप्रमाणे जाबदार सांगली येथे पी.व्ही.सी. पाईप तयार व विक्री करणारी जुनी व प्रख्यात कंपनी आहे. भारतीय मानांकन ब्युरो यांचेकडून 1992 साली आवश्यक ते निकष पूर्ण करुन आपल्या काही प्रॉडक्टसकरिता आय.एस.आय. 4985/2000 हे मानांकन देखील जाबदारने मिळविलेले आहे. अर्जदारने जाबदारकडून अर्जात उल्लेख केल्याप्रमाणे 3 प्रकारचे पाईप्स घेतलेले आहेत. तथापि तक्रारदाराने कोठेही सदर पाईपच्या गुणवत्तेबाबत तक्रार केलेली नाही किंवा तक्रारदाराने तक्रार केवळ 32 एमएम च्या पाईपबद्दल, तीही व्यास अयोग्य असल्याबद्दल तक्रार आहे. इतर 2 प्रकारच्या पाईपच्या व्यासाबद्दल किंवा त्यांचे गुणवत्तेबद्दल तक्रारदाराची काही तक्रार दिसत नाही किंव त्यावर आय.एस.आय. मार्क नव्हता अशीही तक्रारदाराची तक्रार नाही. त्यामुळे जाबदार यांनी निर्मिती केलेली पाईप ही चांगल्या दर्जाची असल्याचे आपोआपच सिध्द होते. पी.व्ही.पी.आय.टी. बुधगांव या संस्थेकडून आलेला तपासणी अहवाल पाहता तपासणी करणा-या व्यक्तीने आय.एस.आय. मार्काबद्दल कोणती तपासणी केली, त्याने आय.एस.आय. मार्काचीच केवळ तपासणी केली की, पाईप आय.एस.आय. मार्काच्या निकषानुसार बनविली आहे किंवा नाही, तिचे स्टँडर्ड आणि क्वालिटी आय.एस.आय.मार्काप्रमाणे आहे किंवा नाही याची तपासणी केली, याचा कुठेही उल्लेख आपल्या तपासणी अहवालात केल्याचे दिसत नाही. त्यामुळे तक्रारदाराचे कथन की पाईप आय.एस.आय. मार्काच्या नव्हत्या आणि नाहीत या कथनाला दुजोरा मिळात नाही. तक्रारदाराने आपल्या शेतजमीनीत बागायत करण्याच्या हेतूने शेतात पाईपलाईन करण्याचे ठरविले हे कथन खोटे व चुकीचे आहे. तक्रारदार हा सधन आणि बागायतदार शेतकरी आहे. त्याचे शेतात पूर्वीपासूनच पाईपलाईन आहे ही बाब तक्रारदाराच्या तक्रारीतील कथनावरुन सिध्द होते. जाबदारचे अनुभवानुसार 32 एम.एम. ही पाईप कधीही शेताचे कामाकरिता वापरत नाहीत कारण त्याचा व्यास छोटा असतो आणि शेताकरिता लागणारे पाईप मोठया अश्वशक्तीचे इंजिन किंवा मोटारी लावल्या असल्याने त्यात सदर छोटया व्यासाच्या पार्इप कामी येत नाहीत. सदर 32 एम.एम. व्यासाच्या पाईप घरगुती पाणी पुरवठा करण्याकरिता मुख्यतः वापरल्या जातात. यावरुन तक्रारदाराने खोटी कथने केली आहेत हे सिध्द होते. तसेच तक्रारदाराने विकत घेतलेल्या पाईपला फिटींगकरिता कोणतेही खोदकाम करावे लागत नाहीत. सदरच्या पाईप जमीनीखाली गाडाव्या लागत नाहीत. त्यामुळे अर्जदाराने त्याअनुषंगे आपल्या तक्रारअर्जामध्ये धादांत खोटी विधाने केल्याचे स्पष्ट होते. तक्रारदाराने आपल्या तक्रारीस सहाय्यभूत व्हावे म्हणून खोटी कागदपत्रे तयार करुन घेतली आहेत. विशेषतः तक्रारदाराने हजर केलेल्या पद्मावती अर्थ मूव्हर्सच्या पावतीवरुन तक्रारदाराने आपल्या अर्जात खोटी कथने केली आहेत. तक्रारदाराने जाबदारकडून पाईपबदलीसोबत मोठया रकमेची मागणी केली आणि सदर रक्कम न दिल्यास तुमची बदनामी करुन तुम्हांला धंदा करणे मुश्किल करु अशी धमकी दिली. त्यावेळी जाबदारने अर्जदारास त्यांना पाईप पसंत नसल्यास त्या बदलून देण्याची किंवा त्या पाईपची किंमत अर्जदारांना परत देण्याची तयारी दर्शविली होती परंतु तक्रारदाराने जाबदारकडून, त्यांची खोटी बदनामी व खोटा अपप्रचार करण्याची धमकी देवून ती टाळण्यासाठी मोठी रक्कम मागितली. सदरची मागणी जाबदारांनी ठामपणे नाकारली आणि जाबदारची पाईप पसंत नसल्यास पाईप बदलून देण्यास किंवा त्याची रक्कम परत करण्याची तयारी असल्याचे सांगितले. तथापि तक्रारदाराने सदरची बाब मान्य न करता जाबदारास धमकी देवून ते तेथून निघून गेले. त्यानंतर अर्जदाराने जाबदारास अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा सांगली यांचेकडे अर्ज करुन दि.6/5/2010 रोजी नोटीस देवून बोलावून घेतले. त्यावेळी देखील अर्जदार जाबदारकडून बेकायदेशीरपणे रकमेची मागणी केली. त्यावेळी देखील जाबदारने अर्जदारास पाईप पसंत नसल्यास पाईप बदलून देण्याची किंवा पाईपची रक्कम अर्जदारास परत करण्याची तयारी असलेबद्दल तक्रारदारास आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पदाधिका-यांस स्पष्टपणे सांगितले. त्यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायातीचे पदाधिका-यांनी तक्रारदारास जाबदार म्हणतात ते योग्य आहे असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु कोणाच्या तरी बदसल्ल्याने जाबदारकडून बेकायदेशीररित्या रक्कम उकळण्याच्या हेतूने तक्रारदार त्यास तयार झाले नाहीत आणि त्यानंतर प्रस्तुतची खोटी तक्रार दाखल केली आहे. जाबदारांनी तक्रारदारास कोणतीही दूषित सेवा दिलेली नाही. अर्जदारास त्या पाईप पसंत नसल्यास जाबदार पूर्वीप्रमाणे आजही अर्जदारास पसंतीनुसार पाईप बदलून देण्यास तयार आहेत किंवा अर्जदारकडून जाबदारांनी डिस्काऊंट वजा जाता पाईपपोटी स्वीकारलेली रक्कम त्यांना परत करण्याची तयारी आहे, जाबदारने कोणताही अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही किंवा तक्रारदारास कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. जाबदारास कोणत्याही वागण्याने अर्जदाराचे कोणतेही व कसलेही नुकसान झालेले नाही उलटपक्षी अर्जदाराने मंचापासून खरी वस्तुस्थिती लपवून ठेवून कागदपत्रे तयार करुन त्या आधारे मंचाची दिशाभूल केलेली आहे. आणि मंचाकडून आदेश मिळविण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा कथनांवरुन जाबदारांनी सदरची तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी मागणी केलेली आहे.
4. आपल्या तक्रारीच्या पुष्ठयर्थ तक्रारदाराने नि.3 ला शपथपत्र दाखल करुन नि.5 सोबत एकूण 8 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. जाबदारने आपले शपथपत्र आपल्या कैफियतीखालीच जोडलेले आहे. तक्रारदाराने आपले पुराव्याचे शपथपत्र नि.13 ला दाखल केलेले आहे तर जाबदारातर्फे त्यांचे कार्यकारी संचालक श्री ब्रिजमोहन मुनानी यांनी आपले शपथपत्र नि.16 ला दाखल केलेले आहे. त्यासोबत नि.18 च्या यादीसोबत जाबदारांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत सांगली यांची नोटीस दि.29/4/2010 आणि भारतीय मानांकन ब्युरो यांचेकडील अनुज्ञप्ती अशी 2 कागदपत्रे दाखल करण्यात आली आहेत.
5. तक्रारदारतर्फे त्यांचे विद्वान वकीलांनी आपला लेखी युक्तिवाद नि.14 ला सादर केलेला असून जाबदारतर्फे त्यांचे विद्वान वकीलांनी आपला लेखी युक्तिवाद नि.18 ला दाखल केला आहे.
6. प्रस्तुत कामी आलेला पुरावा, दाखल केलेली कागदपत्रे व एकूण कथने यांचा विचार करता खालील मुद्दे आमच्या निर्णयासाठी उपस्थित होतात.
मुद्दे निर्णय
1. तक्रारदार हा ग्राहक होतो काय ? होय.
2. जाबदार यांनी दिलेल्या सेवेत त्रुटी केली आहे किंवा
सदोष सेवा दिली आहे किंवा अनुचीत व्यापारी प्रथेचा
अवलंब केला आहे ही बाब तक्रारदाराने सिध्द केली आहे काय ? होय.
3. अंतिम आदेश खालीलप्रमाणे.
आमच्या वरील निष्कर्षांची कारणे खालीलप्रमाणे आहेत.
कारणे
7. मुद्दा क्र.1 ते 3
तक्रारदार हा जाबदारचा ग्राहक होतो याबाबत जाबदारांनी कोणताही उजर केलेला नाही किंवा ग्राहक या नात्याने तक्रारदाराने जाबदारची सेवा स्विकारली होती हे जाबदार स्पष्टपणे मान्य करतात. जाबदारने हे मान्य केले आहे की, तक्रारदाराने तीन वेगवेगळया व्यासाच्या पी.व्ही.सी.पाईप त्यांच्याकडून विकत घेतल्या. तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे त्याने दि.08/03/10 रोजी जाबदारकडून 15 एम.एम., 32 एम.एम., 50 एम.एम. या व्यासाच्या पी.व्ही.सी. पाईप विकत घेतल्या होत्या ही बाब जाबदाराने अमान्य केलेली नाही. 15 एम.एम. आणि 50 एम.एम.व्यासाच्या पाईप बद्दल तक्रारदाराची कोणतीही तक्रार दिसत नाही. वाद केवळ 32 एम.एम. या व्यासाच्या पाईपबद्दल आहे. अशा परिस्थितीत तक्रारदार हा स्पष्टपणे ग्राहक या संज्ञेत मोडतो आणि त्यास ग्राहक संरक्षण कायद्याखाली तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे हे स्पष्ट होते. म्हणून वर काढलेल्या मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी द्यावे लागेल असे या मंचाचे मत आहे आणि त्यानुसार आम्ही त्याचे उत्तर होकारार्थी दिले आहे.
8. जाबदारची लेखी कैफियत वाचता प्रथमदर्शनी असे दिसते की, जाबदारने त्याने विकलेल्या 32 एम.एम.व्यासाच्या पाईपऐेवजी कमी व्यासाची पाईप तक्रारदारास मिळाली हे तक्रारदाराचे कथन जाबदारने अमान्य केले आहे. या मंचासमोर झालेल्या घडामोडींमध्ये तक्रारदाराचे कथन स्पष्टपणे सिध्द झाले आहे हे याठिकाणी नमूद करावे लागेल. ज्यावेळी सदरची तक्रार युक्तिवादाकरीता सदर मंचासमोर घेण्यात आली, त्यावेळेला परस्पर विरोधी कथनांवरुन या मंचाचे असे मत झाले की या तक्रारीशी निगडीत असलेल्या पी.व्ही.सी.पाईपचे निरिक्षण मंचाचे आयुक्त नेमून करुन घेणे व त्याचा अहवाल याकामी मागवणे आवश्यक आहे. त्यानुसार या मंचाचे वकील श्री.पी.आर.कुलकर्णी यांची या मंचाचे आयुक्त म्हणून नेमणूक केली व त्यांस वादातील संबंधीत 32 एम.एम.च्या पी.व्ही.सी. पाईपची पहाणी करुन व मुख्यतः त्या पाईपवर 32 एम.एम. आणि आय.एस.आय.मार्क असे लिखाण आहे किंवा नाही याची पहाणी करावी तसेच त्या खरोखरच 32 एम.एम. व्यासाच्या पाईप आहेत किंवा नाहीत याची पहाणी करुन त्वरीत या मंचास आपला अहवाल सादर करण्याचे आदेश देणेत आले. हा आदेश पारीत केल्याबरोबर जाबदारतर्फे नि.25 ला जाबदार यांनी पुरशीस दाखल करुन त्यांनी तक्रारदारास दिलेली पाईप 32 एम.एम.ऐवजी 25 एम.एम.ची दिली गेली आहे ही बाब स्पष्टपणे मान्य केली. तसेच त्या पाईपवर त्या पाईपच्या व्यासाचे शिक्केदेखील चुकीचे छापले गेले होते ही गोष्टदेखील त्यांनी मान्य केली. या चुकीमुळे जाबदारांचीदेखील गफलत झाली होती असे कबूल केले आहे. ज्याअर्थी जाबदार यांनी पुरशीस दाखल करुन तक्रारदाराचे कथन स्पष्टपणे कबूल केले आहे, त्याअर्थी सदर कामातील वस्तुस्थितीवर पुराव्याचे विवेचन करण्याची अजिबात गरज नाही असे आमचे नम्र मत आहे. ही गोष्ट आपोआपच सिध्द होते की, तक्रारदारास त्याच्या मागणीप्रमाणे 32 एम.एम. व्यासाची पाईप न देता जाबदारने त्यांना 25 एम.एम.व्यासाची पाईप विकली आणि एवढेच नाही तर तक्रारदारास विकलेल्या पाईपवर चुकीचा व्यास छापलेला होता ही गोष्टदेखील त्यांनी मान्य केलेली आहे. या स्पष्ट कबुलीनंतर जाबदारने तक्रारदारास दुषीत सेवा दिली तसेच अनुचीत व्यापारी प्रथेच अवलंब केला या गोष्टी आपोआपच सिध्द होतात असे आमचे न्रम मत आहे. त्यामुळे वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी दिलेले आहे.
9. ज्याअर्थी तक्रारदाराची सर्व कथने जाबदाराने कबूल केली आहेत, त्याअर्थी तक्रारदाराने मागितल्याप्रमाणे भरपाई मिळणे आवश्यक आहे असे या मंचाचे मत आहे. जाबदारने त्याच्या पाईपवर चुकीने त्या पाईपचा व्यास चुकीचा लिहीला गेला आहे असे म्हटले तर एक उत्पादक म्हणून निर्मीती केलेल्या पाईपचा व्यास त्या पाईपवर योग्यरित्या व खरा लिहीलेला आहे किंवा नाही याची पडताळणी / खबरदारी घेणेची जबाबदारी ही जाबदारांची आहे. केवळ चुक झाली या सबबीखाली जाबदार आपल्या देयत्वातून सुटू शकत नाहीत. ग्राहक हा विक्रेत्यावर विश्वास ठेवून आपल्या मागणीप्रमाणे वस्तू विकत घेत असतो. या ठिकाणी जाबदार हा केवळ विक्रेता नव्हता तर उत्पादकदेखील आहे. सामान्यतः ज्या पाईपवर त्याचा व्यास नमूद केलेला असतो, त्या नमूद केलेल्या व्यासावर विश्वास ठेवून त्याला आवश्यक त्या व्यासाची पाईप विकत घेत असतो. विकत घेतल्यानंतर पाईपचा व्यास कोणीही सामान्यतः मोजून बघत नाही. तक्रारदाराचे सुदैवाने त्याचे शेतात आधीच असेलेल्या 32 एम.एम. पाईपला जेव्हा नवीन पाईपची जोडणी करण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी नविन पाईप त्यात बसत नाही ही गोष्ट दिसून आली आणि त्यानंतर जाबदारने विकलेली पाईप ही त्या पाईपवर नमूद केलेल्या शिक्क्यापेक्षा कमी व्यासाची पाईप आहे ही गोष्ट आढळून आली. अशा कित्येक पाईप्स इतर ग्राहकांनी जाबदारकडून 32 एम.एम. च्या पाईप म्हणून डोळे झाकून घेतल्या असतील, कित्येक ग्राहकांनी आपल्याला जाबदारकडून विकत घेतलेल्या पाईप अमूक इतक्या व्यासाच्या आहेत हे तपासूनही पाहिलेले नसेल याची या मंचास खात्री आहे. त्यामुळे जाबदारांनी केवळ तक्रारदारच नव्हे तर इतर अनेक ग्राहकांची, ज्यांनी जाबदारांकडून पी.व्ही.सी.पाईप तयाने छापलेल्या शिक्यावर विश्वास ठेवून विकत घेतल्या, त्या सर्वांची फसवणूक केलेली आहे अशा परिस्थितीत जाबदारकडून तक्रारदाराने अर्जात मागितलेल्या सर्व रकमा तक्रारदारास मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत असे आमचे मत आहे. सबब हे मंच खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार ही खर्चासह मंजूर करणेत येत आहेत.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना तक्रारअर्जात मागणी केलेली रक्कम रु.89,591/- या आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांचे आत द्यावेत.
3. सदर रक्कम विहीत मुदतीत न दिल्यास त्यावर तक्रार दाखल तारखेपासून रक्कम देईपर्यंत द.सा.द.शे.8.5% व्याज तक्रारदारास द्यावे.
4. तसेच जाबदार यांनी तक्रारदार यांना रु.500/- तक्रारीचा खर्च म्हणून द्यावेत.
5. जाबदार यांनी आदेशाची अंमलबजावणी विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. 10/04/2013
( के.डी.कुबल ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या अध्यक्ष