::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 06.02.2017 )
आदरणीय अध्यक्षा श्रीमती एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार
1. सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, दाखल करण्यात आली. सदर तक्रारीचा सारांश खालील प्रमाणे आहे.
तक्रारकर्त्याने दि. 2/2/2016 रोजी रक्कम रु. 3,70,000/-, पावती क्र. पी.आर. 2016001158 अन्वये बुकींग रक्कम विरुध्दपक्ष क्र. 1 कडे जमा करुन ह्युडाई Creta 1.4 CRDi S Sleek Silver Colour ही गाडी बुक केली, कोटेशन प्रमाणे सदर वाहनाची पुर्ण किंमत रु. 10,70,000/- होती, विरुध्दपक्षाने हमी दिली की, दि. 27/2/2016 किंवा त्या आधी सदर गाडीची डिलीव्हरी देण्यात येईल. म्हणून तक्रारकर्त्याने दि. 24/2/2016 रोजी डी.डी.द्वारे रु. 7,00,000/- विरुध्दपक्षाकडे जमा केले, परंतु वारंवार विरुध्दपक्ष क्र. 1 ला फोनद्वारे संपर्क करुन व भेट देवून गाडी मागणी करुनही विरुध्दपक्ष क्र. 1 गाडीची डिलीव्हरी देण्यास असमर्थ राहीले. विरुध्दपक्ष क्र. 1 ने तक्रारकर्त्यास दि. 25/3/2016 रोजी नोटीस पाठवून, दि. 1/3/2016 पासून गाडीच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याचे कळविले. तक्रारकर्त्याने संपुर्ण रक्कम बजेट घोषीत होण्यापुर्वीच विरुध्दपक्ष क्र. 1 कडे जमा केली होती व विरुध्दपक्ष क्र. 1 ने गाडीची डिलीव्हरी दि. 27/2/2016 रोजी देण्याचे कबुल केले होते, त्यामुळे विरुध्दपक्षाने पाठविलेली नोटीस गैरकायदेशिर असून तक्रारकर्त्यावर बंधनकारक नाही. अशा प्रकारे विरुध्दपक्षाने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला असून सेवेत न्युनता दर्शविली आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 कडे भरलेली रक्कम, ही त्यांनी बँकेकडून कर्ज घेऊन विरुध्दपक्ष क्र. 1 कडे भरलेली आहे व तक्रारकर्त्यास सदर रकमेवर व्याज भरावे लागले आहे. तक्रारकर्त्याने दि. 28/3/2016 रोजी वकीलामार्फत विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना नोटीस देऊन अतिरिक्त रक्कम न देता तक्रारकर्ता आर.टी.ओ. ची व इतर कार्यवाही पुर्ण करुन वाहन घेण्यास तयार आहे, असे कळविले, परंतु विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी कुठलेही उत्तर दिले नाही. तक्रारकर्त्याने सदरहु तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करण्यात यावी व तक्रारकर्त्याने दि. 2/2/2016 व दि. 24/2/2016 रोजी विरुध्दपक्ष क्र. 1 कडे भरणा केलेल्या रु. 3,70,000/- व रु. 7,00,000/- या रकमेवर 18 टक्के दराने व्याज देण्यात यावे, तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु. 1,00,000/- कार्यवाहीचा खर्च रु. 5,000/- व तक्रारीचा खर्च रु. 5,000/- देण्याचा आदेश व्हावा. विरुध्दपक्षाकडे तक्रारकर्त्यास त्याच्या गाडीकरिता दि. 1/2/2016 व दि. 25/3/2016 चे कोटेशनच्या फरकातील भरावी लागणारी अतिरिक्त रक्कम ही विरुध्दपक्षाकडून 18 टक्के दराने व्याजासहीत वसुल करुन देण्यात यावी.
तक्रारकर्त्याने सदर तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून त्यासोबत एकूण 9 दस्तऐवज दाखल केलेले आहेत.
विरुध्दपक्ष क्र. 1 यांचा लेखी जबाब :-
2. विरुध्दपक्ष क्र.1 यांनी सदर प्रकरणात त्यांचा लेखी जबाब दाखल करुन तक्रारीतील आरोप अमान्य केले व असे नमुद केले की, तक्रारकर्ता, विरुध्दपक्ष क्र. 1 चे शोरुम मध्ये आला असता, त्यांनी सिल्व्हर रंगाच्या गाडीची मागणी केली, विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी, सदर गाडी ही नव्यानेच बाजारात आली असून त्या गाडीबाबत खुप मागणी असल्याने सदर गाडीस कमीतकमी तिन ते चार महिन्यांचा अवधी लागु शकतो, या बाबीची माहीती तक्रारकर्त्यास दिली. तक्रारकर्त्यास विरुध्दपक्ष यांनी फोर व्हीलर गाडीची बुकींग करीत असतांना गाडीची डिलेव्हरी देतांना सदर गाडीच्या कोटेशनमध्ये बजेटनुसार बदल होवू शकतो व बदल झाल्यास तो लागु असेल, या बाबत माहीती दिली होती व ही माहिती जाणुन घेऊन सदर गाडीची बुकींग केली होती. तक्रारकर्त्याने दि. 24/2/2016 रोजी उर्वरित रक्कम रु. 7,00,000/- भरणा केल्यावर गाडीची डिलेव्हरी मागीतली असता, विरुध्दपक्ष यांनी सदर कलरची गाडी यायची असून थोडा विलंब लागु शकतो, या बाबत माहीती दिली. विरुध्दपक्षाला फेब्रुवारीमध्ये केवळ क्रेटा गाड्यांचा कोटा मिळाला होता व त्यामध्ये तक्रारकर्त्याचा समावेश नव्हता. विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास दि. 27/2/2016 रोजी किंवा पुर्वी सदर गाडी देतो, असे कुठल्याही प्रकारचे आश्वासन दिले नव्हते. सदर गाडी ही शोरुमला आली असता विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्यास वारंवार लेखी व तोंडी सुचना दिल्या, परंतु तक्रारकर्त्याने हेतुपुरस्सर गाडीची डिलेव्हरी घेण्यास विलंब लावला. दि. 29/2/2016 मध्ये सदर गाडीबाबतच्या शासकीय बजेटमध्ये गाड्यांच्या रकमेमध्ये वाढ झाली व या बाबतची माहीती विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्याला लेखी व तोंडी दिली. सदर गाडीच्या कोटेशन मध्ये The above price is as of today price/taxes/insurance may change, The price at the time of delivery of the vehicle will be applicable असा मजकुर असून तो तक्रारकर्त्यास बंधनकारक आहे. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी सेवेमध्ये त्रुटी दर्शविली नाही व त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी.
विरुध्दपक्ष क्र. 2 यांचा लेखी जबाब :-
विरुध्दपक्ष क्र. 2 ने मुदतीत लेखी जबाब दाखल केला नाही, त्यामुळे प्रकरण विरुध्दपक्ष क्र. 2 चे विरुध्द लेखी जबाबाशिवाय पुढे चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
3. त्यानंतर तक्रारकर्त्याने प्रतिउत्तर व लेखी युक्तीवाद दाखल केला, विरुध्दपक्ष क्र. 1 क्र. 2 यांनी स्वतंत्र लेखी युक्तीवाद दाखल केला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4 तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्दपक्ष क्र. 1 यांचा लेखी जबाब, उभय पक्षांनी दाखल केलेले सर्व दस्तएवेज, तक्रारकर्ते यांचे प्रतिउत्तर, व उभय पक्षांचा लेखी युक्तीवाद यांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देऊन नमुद केला.
उभय पक्षांना मान्य असलेल्या बाबी अशा आहेत की, दि. 1/2/2016 रोजी विरुध्दपक्ष क्र. 1 जे विरुध्दपक्ष क्र. 2 निर्मित ह्युंडाई मोटर्स कारचे विक्रेता आहे, त्यांनी तक्रारकर्त्याला ह्युंडाई फोर व्हीलर कार ( Creta 1.4 CRDi S Sleek Silver Colour ) हया गाडीचे कोटेशन दिले होते, त्यानुसार तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्ष क्र. 1 कडे सदर वाहनाची बुकींग रक्कम रु. 3,70,000/- जमा केली, तसेच उभय पक्षात या बद्दलही वाद नाही की, सदरच्या कोटेशननुसार तक्रारकर्त्याने सदर कारच्या किंमतीपोटी दि. 24/2/2016 रोजी उर्वरित रक्कम रु.7,00,000/- चा भरणा विरुध्दपक्ष क्र. 1 कडे केला होता, म्हणून अशा परिस्थितीत तक्रारकर्ता, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 चा ग्राहक आहे, या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे.
तक्रारकर्ते यांचे असे म्हणणे आहे की, दि. 1/2/2016 च्या कोटेशननुसार सदर वाहनाची पुर्ण किंमत रु. 10,70,000/- ही होती व रक्कम भरल्यानंतर दि. 27/2/2016 किंवा त्याचे आधी विरुध्दपक्ष क्र. 1 वाहनाची डिलेव्हरी देणार होते, परंतु विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी विनाकारण गाडीची डिलेव्हरी लांबविली व ते गाडी देण्यास असमर्थ राहीले, या बाबत तक्रारकर्त्याने फोनद्वारे संपर्क करुन व वेळ प्रसंगी भेट देवून गाडीची मागणी केली होती, मात्र विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्यास दि. 26/3/2016 रोजी पत्र व नवीन कोटेशन पाठवून, असे कळविले की, दि. 29/2/2016 च्या बजेट मध्ये गाडयांच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे तक्रारकर्त्याने विकत घेतलेल्या गाडीची किंमत दि.1/3/2016 पासून वाढलेली आहे. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी पाठविलेल्या वाढीव कोटेशननुसारची रक्कम तक्रारकर्त्यावर बंधनकारक नाही, कारण विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी गाडीची डिलेव्हरी दि. 27/2/2016 किंवा त्यापुर्वी देण्याची हमी देवूनही, दिली नाही, त्यामुळे यात विरुध्दपक्षाची सेवा न्युनता आहे, म्हणून प्रार्थनेनुसार तक्रार मंजुर करावी.
यावर, विरुध्दपक्ष क्र. 1 चा युक्तीवाद असा आहे की, तक्रारकर्त्याने मागणी केलेली गाडी नव्यानेच बाजारात आली असून त्या बाबत मागणी उच्चप्रतीची आहे, त्यामुळे ही गाडी येण्यास 3-4 महीन्यांचा अवधी लागु शकतो, अशी माहीती तक्रारकर्त्याला दिली होती. तक्रारकर्त्याने बुकींग रक्कम भरल्यानंतर उर्वरित रकमेचा भरणा लवकरात लवकर जमा करतो, असे आश्वासन दिले होते, परंतु तक्रारकर्त्याला लोन केसची रक्कम मिळण्यास उशीर झाल्यामुळे त्यांनी दि. 24/2/2016 रोजी उर्वरित रकमेचा भरणा केला हेाता, त्यामुळे फेब्रुवारी 2016 मध्ये जो गाडयांचा कोटा विरुध्दपक्ष क्र. 1 यांना मिळाला, त्यात तक्रारकर्त्याच्या गाडीचा समावेश नव्हता, तसेच कोटेशनच्या अटी शर्तीनुसार गाडीच्या रकमेत, टॅक्स व इंन्शुरन्स रकमेत बदल झाल्यास, डिलेव्हरीच्या दिवशी जी किंमत असेल, त्यानुसारच रक्कम घेतल्या जाते. तक्रारकर्त्याची सदर गाडी शो-रुमला आल्यावर वारंवार तक्रारकर्त्याला लेखी – तोंडी सुचना देवून गाडीची डिलेव्हरी घ्या, असे कळविले, परंतु तक्रारकर्त्यानेच विलंब लावला. त्यामुळे यात विरुध्दपक्ष क्र. 1 चा दोष नाही.
विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी मुदतीत लेखी जबाब दाखल केला नाही, म्हणून प्रकरण विरुध्दपक्ष क्र. 2 विरुध्द लेखी जबाबाशिवाय पुढे चालवावे, असे आदेश मंचाने पारीत केले होते. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी फक्त कायदेशीर बाबी नमुद करुन, त्यांचा लेखी जबाब रेकॉर्डवर दाखल केला, त्यानुसार तक्रारकर्त्याच्या संपुर्ण तक्रारीत विरुध्दपक्ष क्र. 2 च्या संबंधात आरोप नाही. विरुध्दपक्ष क्र. 1 हे प्रिन्सीपल टु प्रिन्सीपल या धोरणावर अधिकृत विक्रेते म्हणून नेमलेले आहेत, त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी सेवा देतांना जर एखादी चुक केली तर त्यासाठी विक्रेताच जबाबदार राहील, कारण तक्रारकर्त्याची तक्रार दोषयुक्त गाडी दिली अशी नाही, त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 2 ची अशा परिस्थितीत कोणतीही जबाबदारी येत नाही. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी काही न्यायनिवाडयांचा उल्लेख केला, परंतु सदर न्यायनिवाडे रेकॉर्डवर दाखल केले नाही. विरुध्दपक्ष क्र. 2 चे जबाबातील बचावाचे इतर कथन तपासता येणार नाही.
अशारितीने उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना सदर प्रकरण मंचात दाखल करण्यापुर्वी कायदेशिर नोटीस पाठवली होती, त्याला विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी स्वतः लेखी उत्तर दिले व त्याची प्रत रेकॉर्डवर दाखल केली आहे, त्यातील कथन व त्यांनी मंचात दाखल केलेल्या लेखी जबाबातील कथन हे भिन्न आहे, कारण विरुध्दपक्ष क्र. 1 च्या दि. 11/4/2016 रोजीच्या नोटीस उत्तर, या कथनातुन असा बोध होतो की, तक्रारकर्त्याने वाहनाची बुकींग रक्कम भरल्यानंतर उर्वरित पुर्ण रक्कम दि. 7/2/2016 च्या पुर्वीच भरायला पाहीजे होती, कारण विरुध्दपक्ष क्र. 1 कडे सदर वाहनाचे वाटप महीन्याच्या सात तारखेलाच होत होते, त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 यांना सदर वाहनाची ऑर्डर ही उर्वरीत पुर्ण रक्कम भरुन दि. 10/2/2016 पर्यंत देणे भाग होती, परंतु तक्रारकर्त्याने उर्वरित रक्कम ही दि. 24/2/2016 रोजी भरल्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी सदर गाडीची ऑर्डरच दिली नव्हती. या उत्तरात पुढे विरुध्दपक्ष क्र. 1 चे असेही कथन आहे की, विरुध्दपक्ष क्र. 1 यांना असेही कळाले होते की, तक्रारकर्त्याची लोन केस अॅक्सीस बँकेने नामंजुर केली होती. त्यामुळे जर तक्रारकर्त्याने या गाडीची ऑर्डर रद्द केली असती तर विरुध्दपक्ष क्र. 1 यांना नुकसान झाले असते, म्हणून उर्वरित पुर्ण रक्कम प्राप्त होईपर्यंत विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी सदर गाडीची ऑर्डर दिलेली नव्हती. परंतु विरुध्दपक्ष क्र. 1 चे वरील कथन मंचाला पटत नाही, कारण तक्रारकर्त्याने मोठी रक्कम बुकींग करतेवेळी भरलेली होती, शिवाय त्याचे लोन मंजुर होण्याचा विरुध्दपक्ष क्र. 1 शी संबंध नव्हता, कारण विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्या कोटेशन दस्तावरच असे नमुद आहे की, बुकींग केलेली गाडी शोरुमध्ये आल्यापासून 3 दिवसात गाडीचे संपुर्ण पेमेंट मिळाले पाहीजे, नाहीतर त्या रकमेवर द.सा.द.शे. 15 टक्के प्रमाणे व्याज आकारुन, रक्कम प्राप्त करुन घेतल्या जाईल व त्यानंतरच गाडीची डिलेव्हरी देण्यात येईल. म्हणजे विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्याकडून दि. 2/2/2016 रोजी बुकींग रक्कम स्विकारल्यानंतर जर सदर गाडीची ऑर्डर केली असती तर गाडी वेळेत विरुध्दपक्ष क्र. 1 कडे आली असती व तक्रारकर्त्यास जरी उर्वरित रक्कम देण्यास विलंब झाला असता, तरी वरील कोटेशन अटीनुसार विरुध्दपक्ष क्र. 1 चे नुकसान झाले नसते, परंतु विरुध्दपक्ष क्र. 1 च्या दिरंगाईमुळे गाडी उशिरा प्राप्त झाली व तो पर्यंत दि. 29/2/2016 च्या बजेट मध्ये सदर गाडीची किंमत वाढली. म्हणून यात तक्रारकर्त्याचा दोष नाही, असे मंचाचे मत आहे, म्हणून यात विरुध्दपक्ष क्र. 1 ची सेवा न्युनता दिसून येते. उभय पक्षाला हे कबुल आहे की, तक्रारकर्त्याने सदर गाडीची डिलेव्हरी, विरुध्दपक्ष क्र. 1 च्या दि. 25/3/2016 च्या वाढीव रकमेच्या कोटेशननुसार, त्याचा हक्क अबाधीत ठेवून रक्कम भरुन घेतली, त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्ष क्र.1 विरुध्द अंशतः मंजुर करुन खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत केला.
::: अं ति म आ दे श :::
- तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
- विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी त्यांच्या दि. 25/3/2016 रोजीच्या वाढीव रकमेच्या कोटेशननुसार तक्रारकर्त्याकडून स्विकारलेली अतिरिक्त रक्कम, द.सा.द.शे 8 टक्के व्याज दराने दि. 11/4/2016 ( प्रकरण दाखल तारीख ) पासून तर प्रत्यक्ष रक्कम अदाईपर्यंत व्याजासहीत तक्रारकर्त्यास द्यावी, तसेच शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु. 10,000/- ( रुपये दहा हजार फक्त ) व प्रकरण खर्चापोटी रु. 3000/- ( रुपये तिन हजार फक्त ) तक्रारकर्त्यास द्यावी.
- सदर आदेशाची पुर्तता, निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांच्या आंत करावी.
- विरुध्दपक्ष क्र. 2 विरुध्द तक्रार खारीज करण्यात येते.
सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना नि:शुल्क देण्यात याव्या.