(घोषित दि. 30.03.2013 व्दारा श्रीमती नीलिमा संत, अध्यक्ष)
तक्रारदाराचे तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हे शेतकरी असून सुमारे साडेतीन हेक्टर जमिनीवर शेती करतात 1995 पासून ते सोयाबीन पीक घेतात.
दिनांक 02.06.2011 रोजी तक्रारदाराने गैरअर्जदार 1 कडून महाबीज अकोला उत्पादित प्रमाणित सोयाबीन रुपये 3,400/- ला खरेदी केले. त्याची लागवड केली, खत पाणी दिले पण उगवण झाली नाही. म्हणून त्यांनी कृषी विकास अधिकारी, जालना यांचेकडे तक्रार केली. दिनांक 20.07.2011 रोजी कृषी अधिका-यांनी शेताची पाहणी केली, पंचनामा केला. त्या पंचनाम्याची प्रत तक्रारदाराला दिनांक 08.08.2011 रोजी मिळाली. पंचनाम्यात पीकाचे 100 टक्के नुकसान झाल्याचे म्हटले आहे.
अपेक्षित पीक न मिळाल्याने तक्रारदाराचे नुकसान सुमारे 1,50,000/- रुपयाचे झाले. त्याप्रमाणे पेरणी, मशागत, औषधी इत्यादीचा खर्च 25,000/- रुपये झाला. त्याचेही नुकसान झाले. म्हणून त्याची गैरअर्जदारा विरुध्द तक्रार आहे.
गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 मंचासमोर हजर झाले त्यांना त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले. गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे म्हणण्याप्रमाणे त्यांनी प्रमाणित केलेले गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे बीज अर्जदाराला विकले. त्यामुळे त्यांच्या विरुध्दची तक्रार खारिज करण्यात यावी. गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या लेखी म्हणण्याप्रमाणे ते सोयाबीन जे.एस.335 या वाणाचे बीयाणे उत्पादीत करतात व ते शासन यंत्रणेने तपासल्यावरच त्यांना प्रमाणपत्र मिळते असे प्रमाणित बियाणेच अर्जदाराला विकण्यात आले. बियाणाची उगवण शक्ती इतरही अनेक गोष्टींवर अवलंबून असते. तक्रारदाराने बियाणे कधी पेरले याचा उल्लेख नाही त्याने दिनांक 02.06.2011 ला ते खरेदी केले होते. पण जर ते बियाणे नीट हताळले नाही तर त्याची उगवण कमी होते. पंचनामा करण्यापूर्वी गैरअर्जदार 1 व 2 यांना नोटीस दिली नव्हती. पंचनामा कृषी संबंधीच्या तज्ञ व्यक्तीने केलेला नाही. अर्जदाराने प्रतिवादी 2 कडे कधीही बीयाणे बाबत तक्रार केली नाही. त्याच्या नुकसानीचे त्याने केलेले कथन खोटे आहे म्हणून त्याची तक्रार फेटाळण्यात यावी.
अर्जदारा तर्फे विद्वान वकील श्री.रहेमत अली व गैरअर्जदार क्रमांक 2 तर्फे विद्वान वकील श्री.पी.डब्ल्यू.कुलकर्णी यांचा युक्तीवाद ऐकला. अर्जदाराच्या वकीलांनी सांगितले की, अर्जदार याला 1995 पासून सोयाबीनचे पीक घेण्याचा अनुभव होता. त्यांनी सोयाबीन पीकाच्या तक्रारी संबंधात झालेल्या बैठकीची इतिवृत्ताची नक्कल दाखल केली. त्यात जालना तालुक्यात 732 तक्रारी आल्याचा उल्लेख आहे व 811 हे तक्रारक्षेत्र आहे असे लिहीले आहे. त्याचप्रमाणे सदरच्या तक्रारी संदर्भात शेतक-यांना 30 दिवसाचे आत नुकसान भरपाई द्यावी असे कृषी अधिका-यांचे पत्र आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 च्या वकीलांनी सांगितले की, अर्जदाराने बियाणे अधिकृतपणे प्रयोगशाळेतून तपासून घेतलेले नाही. दिनांक 20.07.2011 रोजी केलेला पंचनामा बघता त्यात उगवण झालेली रोपांची संख्या असे म्हणून पूढे जागा सोडली आहे. ती संख्या नमूद केलेली नाही. पंचनाम्याची काही एक सूचना गैरअर्जदार क्रमांक 1 किंवा 2 यांना दिलेली नव्हती. दाखल कागदपत्रांत कोठेही अर्जदाराने कृषी अधिका-याकडे दिलेली तक्रार दाखल केलेली नाही. अथवा नुकसान झालेल्या शेतक-यांची गाव निहाय यादी दाखल केली नाही. तक्रारदाराने खोटी तक्रार दाखल केली आहे. म्हणून ती फेटाळून लावावी.
वरील विवेचनावरुन खालील मुद्दे मंचाने विचारात घेतले.
मुद्दे उत्तर
1. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी उत्पादीत केलेले
सोयाबीन बियाणे सदोष असल्याचे तक्रारदाराने
सिध्द केले आहे का ? नाही
2. आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे
कारणमीमांसा
दिनांक 27.07.2011 रोजी कृषी अधिका-यांनी केलेला पंचनामा केवळ तक्रारदाराच्या शेतात सोयाबीनची उगवण झालेली नाही ऐवढेच दाखवतो. त्यात सदोष बियाणाचा उल्लेख नाही. तक्रारदाराने जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीकडे तक्रार दिलेली दिसत नाही. पंचनाम्यात रोपांची संख्या रिक्त ठेवलेली आहे. कोणत्याही तज्ञ व्यक्तीने शेताची पाहणी केलेली नाही. अशा परिस्थितीत गैरअर्जदार क्रमांक 2 ने उत्पादीत केलेले बियाणे सदेष आहे असे म्हणता येणार नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देवून मंच खालील प्रमाणे आदेश करत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येत आहे.
2. खर्चा बाबत आदेश नाहीत.