जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
मा.अध्यक्षा-श्रीमती.वी.वी.दाणी. मा.सदस्या-श्रीमती.एस.एस.जैन.
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – १५/२०१२
तक्रार दाखल दिनांक – ०२/०२/२०१२
तक्रार निकाली दिनांक – २४/०५/२०१३
रतिलाल एकनाथ पाटील. ----- तक्रारदार.
उ.व.३०,कामधंदा-वकील
मु.पो.फागणे,ता.जि.धुळे.
विरुध्द
(१)मा.शाखाधिकारी ----- सामनेवाले.
पंजाब नॅशनल बॅंक
गल्ली नं.६ शाखा धुळे.
(२)मा.शाखाधिकारी
सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया,
गल्ली नं.६, धुळे.
शाखा ता.जि.धुळे.
न्यायासन
(मा.अध्यक्षाः श्रीमती.वी.वी.दाणी.)
(मा.सदस्याः श्रीमती.एस.एस.जैन.)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.एस.वाय.शिंपी.)
(सामनेवाले नं.१ तर्फे – गैरहजर.)
(सामनेवाले नं.२ तर्फे – स्वत:.)
-------------------------------------------------------------------------
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा - श्रीमती.वी.वी.दाणी.)
(१) तक्रारदारांनी, सामनेवाले यांच्याकडून सेवेत ञृटी झाल्यामुळे सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांचे सामनेवाले नं.१ पंजाब नॅशनल बॅंक येथे बचत खाते क्र.०१३९०००१०९१९३४१९ असून त्यांनी सामनेवाले यांच्याकडून ए.टी.एम. सेवेचा लाभ घेतलेला आहे. त्यांचा ए.टी.एम.कार्ड नं. ५१२६-५२००-३२५६-७१३८ आहे.
(३) तक्रारदार यांना दि. ०९-१०-२०११ रोजी रक्कम रु.३०,०००/- काढावयाचे होते. परंतु सामनेवाले नं.१ यांची ए.टी.एम. सुविधा बंद असल्याने तक्रारदारांनी सामनेवाले नं.२ यांच्या ए.टी.एम. मशीनद्वारे दि.०९-१०-२०११ रोजी प्रथम रु.१०,०००/- वेळ १८.३६ वाजता काढले, त्याच दिवशी दुस-यांदा रु.१०,०००/- वेळ १८.३७ वाजता काढले, व त्याच दिवशी तीस-यांदा रु.१०,०००/- वेळ १८.४५ वाजता काढावयास गेले असता पैसे न मिळता त्यावेळी “Withdrawal Limit Reached” या शे-याची पावती त्यांना मिळाली. त्यामुळे तक्रारदार हे दुस-या दिवशी दि.१०-१०-२०११ रोजी पैसे काढावयास गेले असता त्यांच्या असे लक्षात आले की, दि.०९-१०-२०११ रोजी रक्कम रु.२०,०००/- व्यतिरिक्त रु.५,०००/- अधिक काढल्याची नोंद त्यांचे खातेपुस्तकात आहे. सदरची रक्कम ही काढलेली नसतांना चुकीची नोंद त्यांचे खात्यावर दिसत आहे. त्यामुळे तक्रारादार यांनी सामनेवाले नं.१ यांच्याकडे टोल फ्री क्रमांकावर व दि.१६-११-२०११ रोजी लेखी तक्रार दिली. परंतु सामनेवाले नं.१ यांनी त्या बाबत उडवाउडवीची उत्तरे दिलेली आहेत. सामनेवाले नं.१ यांची तक्रारदारांच्या पासबुकमधील चुकीची नोंद दुरुस्त करण्याची जबाबदारी आहे. सामनेवाले नं.१ व २ यांच्या अंतर्गत प्रणालिमध्ये असलेल्या दोषामुळे तक्रारदारांना मानसिक व शारीरिक ञास सहन करावा लागलेला आहे. सामनेवाले नं.१ हे हेतुपुरस्सर सदरची चुकीची झालेली नोंद दुरुस्त करण्यास टाटळाटाळ करीत असून ग्राहकांना सदोष सेवा देत आहेत. त्यामुळे त्यांचे विरुध्द सदरचा तक्रार अर्ज दाखल करावा लागला आहे.
(४) तक्रारदारांची विनंती अशी आहे की, तक्रारदार यांच्या खात्यावर झालेली रक्कम रु.५,०००/- ची विड्रावलची चुकीची नोंद सामनेवाले यांनी रद्द करावी व सदर रक्कम त्यांचे खात्यावर जमा करावी. या रकमेवर १८ टक्के प्रमाणे व्याज द्यावे. तसेच मानसिक ञासापोटी रु.१०,०००/- व अर्जाचा खर्च रु.५,०००/- देण्यात यावा.
(५) सामनेवाले नं.१ यांना मंचाची नोटिस मिळूनही ते सदर प्रकरणी नेमलेल्या सर्व तारखांना गैरहजर आहेत. तसेच त्यांनी स्वत: अथवा अधिकृत प्रतिनिधीद्वारे स्वत:चे बचावार्थ कोणताही खुलासा दाखल केलेला नाही. त्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश दि. २२-१०-२०१२ रोजी करण्यात आला आहे. तसेच सामनेवाले नं. २ हे मंचात उपस्थित आहेत, परंतु त्यांनी त्यांचे म्हणणे दाखल केलेले नाही. त्यामुळे त्यांचे विरुध्द दि.२२-१०-२०१२ रोजी नो-से आदेश करण्यात आला आहे.
(६) तक्रारदारांचा अर्ज नि.नं.२, शपथपञ नि.नं.३, कागदपञ नि.नं.५ वर एकूण १ ते ३, पाहता तसेच तक्रारदारांच्या विद्वान वकीलांनी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर, आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ) तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय. |
(ब) सामनेवाले नं.१ यांच्या सेवेत ञृटी स्पष्ट होते काय ? | : होय. |
(क) आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे. |
विवेचन
(७) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांचे सामनेवाले नं.१ पंजाब नॅशनल बॅंक येथे बचत खाते क्र.०१३९०००१०९१९३४१९ असून त्यांनी सामनेवाले यांच्याकडून ए.टी.एम. सेवेचा लाभ घेतलेला आहे. त्यांचा ए.टी.एम.कार्ड नं. ५१२६-५२००-३२५६-७१३८ असा आहे. सदर कागदपञ नि.नं. ४/१ व ४/२ वर दाखल आहेत. ते पाहता तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत हे स्पष्ट होते. तसेच तक्रारदार यांचे सामनेवाले नं.२ यांच्या बॅंकेत खाते नाही परंतु सामनेवाले नं.२ यांनी ग्राहकांना पैसे काढणेकामी ए.टी.एम. सेवा त्यांच्या बॅंकेमार्फत दिलेली आहे. याचा विचार होता तक्रारदार हे त्यांचे ग्राहक आहेत. म्हणून मुद्दा क्र. “अ” चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(८) मुद्दा क्र. ‘‘ब’’ –
(१)तक्रारदार यांची तक्रार अशी आहे की, त्यांच्या खात्यातून दि.०९-१०-२०११ रोजी सामनेवाले नं.१ यांच्या ए.टी.एम. मशीनमधून पैसे काढावयाचे होते. परंतु सदर मशीन बंद असल्याने तक्रारदार हे सामनेवाले नं.२ यांच्या ए.टी.एम. मशीनद्वारे पैसे काढावयास गेले. ए.टी.एम. च्या नियमा प्रमाणे तक्रारदार यांनी दि.०९-१०-२०११ रोजी दोन वेळा प्रत्येकी रु.१०,०००/- असे एकूण रु.२०,०००/- काढले व तीस-यांदा पैसे काढतांना “Withdrawal Limit Reached” असा शेरा आल्याने उर्वरीत रक्कम रु.१०,०००/- काढता आले नाहीत. या बाबत तक्रारदार यांनी ए.टी.एम. च्या पावत्या नि.नं.५/१ वर दाखल केल्या आहेत. सदर पावत्या सामनेवाले नं.२ सेंट्रल बॅंक यांच्या बस स्टॅण्ड परिसर,धुळे येथील असून, एकूण तीन पावत्या तक्रारदारांनी दाखल केलेल्या आहेत. त्यामध्ये (१) दि.०९-१०-२०११ रोजी रु.१०,०००/- वेळ १८.३६, वाजता काढले. शिल्लक रक्कम रु.२४,८३४.००/- (२) दि.०९-१०-२०११ रोजी रु.१०,०००/- वेळ १८.३७ वाजता काढले. शिल्लक रक्कम रु.१४,८३४.००/- आणि (३) दि.०९-१०-२०११ रोजी रु.१०,०००/- वेळ १८.४५ वाजता पैसे मिळाले नाहीत. त्यावेएवजी ए.टी.एम. द्वारे मिळालेल्या पावतीवर “Withdrawal Limit Reached” असा शेरा मारलेला असून त्यावर शिल्लक रक्कम नमूद केलेली नाही.
या तीन्ही पावत्यांवरुन असे दिसते की, तक्रारदार यांनी दि.०९-१०-२०११ रोजी रक्कम रु.२०,०००/- काढलेले आहेत व तीस-या पावती प्रमाणे तक्रारदार यांना पैसे मिळालेले नाहीत.
त्यानंतर तक्रारदार हे दि.१०-१०-२०११ रोजी पैसे काढावयास गेले असता त्यावेळी त्यांच्या असे लक्षात आले की, दि.०९-१०-२०११ रोजी रु.५,०००/- त्यांच्या खात्यातून काढल्याची नोंद त्यांचे खाते पुस्तकात दिसत आहे. त्या बाबतचे खाते पुस्तक नि.नं.५/१ वर दाखल केलेले आहे. त्याचे अवलोकन केले असता असे लक्षात येते की, दि.०९-१०-२०११ रोजी दोन वेळेस प्रत्येकी र.१०,०००/- असे एकूण रु.२०,०००/- व रक्कम रु.५,०००/- काढले गेलेले आहेत. यावरुन असे लक्षात येते की, दि.०९-१०-२०११ रोजी तीन वेळा त्यांचे खात्यावरुन पैसे काढले गेलेले आहेत. परंतु तक्रारदाराने दाखल केलेल्या ए.टी.एम. कार्डच्या पावत्यांवरुन तक्रारदारांना केवळ दोन ए.टी.एम. कार्डच्या पावत्यांप्रमाणे एकूण रक्कम रु.२०,०००/- मिळालेले आहेत व उर्वरीत रु.५,०००/- हे मिळालेले दिसत नाहीत. त्यामुळे दि.०९-१०-२०११ रोजी काढल्या गेलेल्या रु.५,०००/- च्या नोंदी बबाबत शंका निर्माण होत आहे.
वरील विवेचनावरुन असे लक्षात येते की, तक्रारदार यांचे सामनेवाले नं.१ यांच्या बॅंकेत खाते आहे परंतु सामनेवाले नं.१ यांचे ए.टी.एम. मशीन मधील सिस्टीम मध्ये तांञीक अडचण निर्माण झालेली असल्याने तक्रारदार यांनी सामनेवाले नं.२ यांच्या ए.टी.एम. मशीनचा वापर केलला आहे. त्यावेळी सामनेवाले यांच्या ताञीक अडचणीमुळे तक्रारदार यांच्या खात्यामधून रक्कम र.५,०००/-ए.टी.एम. द्वारे न काढताही विड्रावल झाल्याची नोंद दिसत आहे. त्यावरुन सामनेवाले नं.१ हे या तांञीक दोषास जबाबदार आहेत या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत.
या बाबत अधिक खुलासा हा होऊ शकत नाही. कारण सामनेवाले नं.१ हे तक्रार अर्जात हजर नाहीत. त्यांनी त्यांचा लेखी खुलासा दिलेला नाही. तसेच सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या विनंती अर्जालाही खुलासा दिलेला नाही. याचा विचार होता सामनेवाले नं.१ यांच्या सेवेत कमतरता स्पष्ट होत आहे. त्यामुळे तक्रारदाराची रक्कम रु.५,०००/- काढल्याबाबतची खाते पुस्तकातील नोंद दुरुस्त करण्याची मागणी रास्त आहे असे आम्हास वाटते. म्हणून मुद्दा क्र. “ब” चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
तक्रारदार यांचे सामनेवाले नं.२ यांचेकडे बचत खाते नाही. सामनेवाले नं.२ यांनी केवळ ए.टी.एम. ची सेवा उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यामुळे सामनेवाले नं.२ यांचेवर पैसे देण्याची जबाबदारी नाही. त्यामुळे सामनेवाले नं.२ यांना सदर तक्रार अर्जास जबाबदार धरता येणार नाही असे स्पष्ट होत आहे.
(९) मुद्दा क्र. ‘‘क’’ – वरील सर्व कारणांचा व कागदपञांचा विचार होता तक्रारदारांची मागणी योग्य व रास्त आहे. त्यामुळे तक्रार अर्ज मंजूर करावा या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. सबब खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
(ब) सामनेवाले नं.२ यांचे विरुध्दचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
(क) सामनेवाले नं.१ यांनी या आदेशाच्या तारखे पासून पुढील तीस दिवसांचे आत.
(१) तक्रारदार यांच्या बचत खाते क्र.०१३९०००१०९१९३४१९ मधून दि.०९-१०-२०११ रोजी रक्कम ५,000/- (अक्षरी रु.पाच हजार मात्र) ए.टी.एम.द्वारे काढले गेल्याची चुकीची झालेली नोंद, रद्द करण्यात यावी आणि सदरील रक्कम तक्रारदारांचे उपरोक्त बचत खात्यात जमा होईपर्यंतचे दिनांकापर्यंत, द.सा.द.शे.४ टक्के व्याजासह जमा करण्यात यावी.
(२) तक्रारदार यांना मानसिक ञासापोटी रक्कम ५,00/- (अक्षरी रु.पाचशे मात्र) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम ५,00/- (अक्षरी रु.पाचशे मात्र) द्यावेत.
धुळे.
दिनांकः २४/०५/२०१३.
(श्रीमती.एस.एस.जैन.) (श्रीमती.वी.वी.दाणी.)
सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.