निकालपत्र :- (दि.13/09/2010) (व्दारा-श्री एम.डी.देशमुख,अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र. 2, 4, व 10 हे सदर कामी वकीलांमार्फत हजर झाले. पैकी सामनेवाला क्र. 3, 4, 6 ते 10 यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. परंतु सामनेवाला क्र.1, 2, 11 व 12 यांना नोटीस लागू होऊनही ते सदर कामी हजर झाले नाहीत किंवा त्यांनी आपले लेखी म्हणणेही दाखल केले नाही.तक्रारदारचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला. (2) यातील सामनेवाला क्र.1 ही सहकारी कायदयानुसार नोंदणीकृत संस्था आहे. सदर संस्थेचे सामनेवाला क्र.2, 3 व 11 हे अनुक्रमे चेअरमन, व्हा.चेअरमन व मॅनेजर आहेत. सामनेवाला क्र. 4 ते 10 हे संचालक मंडळ आहे. यातील तक्रारदार यांनी सामनेवाला संस्थेत दामदुप्पट ठेव पावती क्र.109 अन्वये रक्कम रु.15,000/- दि.06/05/2002 रोजी ठेवले होते. त्याची मुदत दि.07/11/2006 पर्यंत होती. (3) सदर ठेवीची मुदत संपलेनंतर तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे व्याजासह ठेव रक्कमेची मागणी केली असता सामनेवाला यांनी त्या परत करणेस टाळाटाळ केली व असमर्थता दर्शविली.यातील तक्रारदार यांनी भविष्याची तरतुद या उद्देशाने सदर नमुद रक्कम सामनेवाला यांचेकडे ठेवलेली होती. सामनेवाला संस्थेच्या संचालकांच्या गलथान व मनमानी कार्यपध्दतीमुळे सामनेवाला संस्था नुकसानीत आलेली आहे. तक्रारदारास पैशाची निकड असलेने सामनेवाला यांचेकडे जाऊन वेळोवेळी पैशाची मागणी केली परंतु सामनेवाला हे जाणूनबुजून तक्रारदार यांची रक्कम देणेची टाळाटाळ करीत आहेत. सबब सामनेवाला यांचेकडून रक्कम मिळणेची कोणतीही खात्री राहिलेली नाही. म्हणून तक्रारदारांची दामदुप्पट ठेव पावती क्र.109 वरील दामदुप्पट रक्कम रु.30,000/-द.सा.द.शे. 16.5 टक्के व्याजासह सामनेवाला यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्या वसुल होऊन मिळावी तसेच मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च व वकील फी रु.5,000/- सामनेवाला यांचेकडून मिळणेकरिता सदरील तक्रार अर्ज या मंचासमोर दाखल केलेला आहे. (4) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत दामदुप्पट ठेव पावतीची सत्यप्रती दाखल केली आहे व शपथपत्र दाखल केले आहे. (5) या मंचाने सामनेवाला यांना नोटीसा पाठविल्या असता सामनेवाला क्र.2 ते 10 हे हजर झाले. सामनेवाला क्र. 3, 4, 6 ते 10 यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले परंतु सामनेवाला क्र.2, 5, यांनी म्हणणे दाखल केले नाही. तसेच सामनेवाला क्र.1,11 व 12 हे सदर मंचासमोर हजर झाले नाहीत किंवा त्यांनी आपले लेखी म्हणणेही दाखल केले नाही. सबब त्यांचेविरुध्द हे मंच एकतर्फा आदेश पारीत करीत आहे. (6) सामनेवाला क्र. 3, 4, 6 ते 10 यांनी आपल्या लेखी म्हणणेत तक्रारदाराची तक्रार पूर्णत: नाकारलेली आहे. प्रस्तुत सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, यातील सामनेवाला संस्था ही महाराष्ट्र सहकारी कायदयाखाली नोंदणीकृत झालेली सहकारी पत संस्था असून तिचे कामकाज सहकार कायदयानुसार व पोटनियमातील तरतुदीनुसार चालते. सामनेवाला संस्था ही सन 2005 मध्ये सहकार खात्याने अवसायानात काढली असून सदर संस्थेचे कामकाज शासन नियुक्त अवसायक यांचे अधिपत्याखाली चालू आहे. तक्रारदारास याची कल्पना असतानाही तक्रारदाराने अवसायक व अन्य संचालकांना यांना हुतूपुरस्कर व जाणीवपूर्वक पक्षकार केलेले नाही. सबब नॉन जॉइन्डर ऑफ नेसेसरी पार्टीज या तत्वाची कायदेशीर बाधा येत असलेने सदरची तक्रार चालणेस पात्र नाही. सबब सदरची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी. तसेच सामनेवाला संस्थेचे सर्वेसर्वा संस्थापक संचालक चेअरमन (मयत) शिवाजी सखाराम मोरे हे आपल्या मनाप्रमाणे व सोईप्रमाणे कामकाज पहात होते. संस्थेच्या स्थापनेवेळी यातील सामनेवाला क्र. 3 ते 11 हे संचालक नव्हते. सदर सामनेवाला हे सामनेवाला संस्थेचे संचालक निवड झालेबाबतचे सहाकर खात्याचे कोणतेही मंजूरी पत्र नाही. सामनेवाला क्र.2 चेअरमन यांनी सामनेवाला क्र.12 मॅनेजर यांचेशी संगनमत करुन खोटे व बोगस रेकॉर्ड करुन बोगस संचालक मंडळ कागदोपत्री तयार केले आहे. तसेच त्यांनी बोगस ठेवी स्विकारुन संस्थेचे कामकाज एकाधिकार शाहीने चालविले होते. त्याबाबत प्रस्तुत सामनेवाला यांनी मा.न्यायाधिश सहकार न्यायालय क्र.1 कोल्हापूर यांचे कोर्टात सि.एस.नं.103/08 व 26/08 हे दावे दाखल केले असून ते प्रलंबीत आहेत. सबब तक्रारदारांचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा. तसेच सामनेवाला क्र.11 हे सामनेवाला संस्थेचे कधीही सेक्रेटरी नव्हते त्यामुळे त्यांचेविरुध्दचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत यावा. तक्रारदार यांनी प्रस्तुत सामनेवाला यांचेकडे कधीही ठेवीची मागणी केलेली नाही अथवा त्यांना कायदयाने मागणी करता येणार नाही. तक्रारदाराने प्रस्तुत सामनेवाला यांचेविरुध्द खोटा तक्रार अर्ज दाखल करुन प्रस्तुत सामनेवाला यांची प्रतिष्ठा समाजात मलीन करण्याचे दृष्टीने व सामनेवाला यांना मानसिक/आर्थिक त्रास दिला असलेने तक्रारदार यांनी प्रत्येक सामनेवाला यांना रु.2,000/- नुकसानभरपाई देणेबाबतचा आदेश व्हावा व तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी अशी विनंती प्रस्तुत सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (7) तक्रारदाराचा तक्रार अर्ज, शपथपत्र व दाखल कागदपत्रे, सामनेवाला क्र.3, 4, 6 ते 10 यांचे लेखी म्हणणे तसेच तक्रारदाराचे वकीलांचा युक्तीवाद यांचा या मंचाने साकल्याने विचार करता तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे दामदुप्पट ठेव स्वरुपात सामनेवाला यांचेकडे रक्कम ठेवलेली होती. सदर ठेवीची मुदत संपलेली आहे व तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे वारंवार मागणी करुनही ती सामनेवाला यांनी परत केलेली नाही असे निदर्शनास येते. त्यामुळे तक्रारदारांना व्याजासह ठेव रक्कम मिळविणेकरिता या मंचासमारे तक्रार अर्ज दाखल करणे भाग पडले आहे. (8) या मंचाने सामनेवाला क्र.3 ते 14 यांना संधी देवूनही आपले म्हणणे मुदतीत दाखल केलेले नाही. सदर सामनेवाला यांचे वर्तणुकीवरुन सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या व्याजासह रक्कमा परत करण्याकरिता कोणतेही प्रामाणिक प्रयत्न केलेले नाहीत हे स्पष्ट दिसून येते. तसेच सामनेवाला क्र.2, 5, यांनी म्हणणे दाखल केले नाही. तसेच सामनेवाला क्र.1,11 व 12 हे सदर मंचासमोर हजर झाले नाहीत किंवा त्यांनी आपले लेखी म्हणणेही दाखल केले नाही. सबब सदर सामनेवाला यांना तक्रारदाराचा तक्रार अर्ज मान्य असल्याचे दाखवून दिले आहे. तसेच सामनेवाला क्र.3, 4, 6 ते 10 यांनी आपल्या लेखी म्हणणेमध्ये तक्रारदारांची ठेव रक्कम नाकारलेली नाही. सामनेवाला संस्थेचे चेअरमन व मॅनेजर यांनी संगनमताने खोटे व बोगस रेकॉर्ड तयार करुन स्वत:च्या वैयक्तिक फायदयासाठी बोगस ठेवी स्विकारल्या आहेत असे कथन केले आहे. तसेच सदर सामनेवाला यांनी मा.न्यायाधिश सहकार न्यायालय क्र.1 कोल्हापूर यांचे कोर्टात एस.नं.103/08 व 26/08हे दावे प्रलंबीत असलेचे कथन केले आहे. तसेच सामनेवाला क्र.11 हे सेक्रेटरी नसलेचे कथन केले आहे.परंतु त्याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा सदर मंचासमोर दाखल केलेला नाही. त्यामुळे त्यांचे सदरचे म्हणणे हे मंच ग्राहय धरु शकत नाही. सबब सामनेवाला क्र.1 ते 13 यांना वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या व सामनेवाला क्र.14 हे सामनेवाला संस्थेचे मॅनेजर असलेने त्यांना फक्त संयुक्तिकरित्या तक्रारदारांची व्याजासह दामदुप्पट रक्कम परत करण्याकरिता जबाबदार धरणेत यावे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (9) तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत दाखल केलेल्या दामदुप्पट ठेव पावती क्र.109चे अवलोकन केले असता सदर दामदुप्पट ठेव पावतीची तक्रार दाखल करणेपूर्वीच मुदत संपलेली असल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे त्यांच्या दामदुप्पट ठेव पावती क्र.109 वरील दामदुप्पट रक्कम रु.30,000/- मिळणेस पात्र आहेत. सदर रक्कमेवर दि.07/11/2006 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच वरील रक्कम सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या व सामनेवाला क्र.14 यांनी फक्त संयुक्तिकरित्या तक्रारदारांना देणेस जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. (2) सामनेवाला क्र. 1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या व सामनेवाला क्र.14 यांनी फक्त संयुक्तिकरित्या तक्रारदारांना त्यांचे ठेव पावती क्र.109 वरील दामदुप्पट रक्कम रु.30,000/-(रु.तीस हजार फक्त)दयावेत. सदर रक्कमेवर मुदत संपले तारखेपासून म्हणजे दि.07/11/2006 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.6 टक्के व्याज दयावे. (3) सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या व सामनेवाला क्र.14 यांनी फक्त संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |