जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 499/2009. तक्रार दाखल दिनांक : 14/09/2009. तक्रार आदेश दिनांक : 11/02/2011. 1. श्री. अर्जून बाबुराव जाधव, वय 56 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. प्लॉट नं. सी-3, निर्मल नगरी, 4527/बी/सी, पंढरपूर, हॉटेल सहाराजवळ. 2. श्री. महादेव अर्जून जाधव, वय 31 वर्षे, व्यवसाय : व्यापार, रा. वरीलप्रमाणे. तक्रारदार विरुध्द 1. मे. श्री. पांडुरंग डेव्हलपर्स, भागिदारी फर्म तर्फे भागिदार श्री. अविनाश प्रभाकर भाटे, वय 57 वर्षे, व्यवसाय : व्यापार, रा. 3029, शिवाजी चौक, पुजारी कॉम्प्लेक्स, मु.पो. पंढरपूर, जि. सोलापूर. 2. श्री. परिमल अविनाश भाटे, वय सज्ञान, व्यवसाय : व्यापार, रा. उमा कॉलेजजवळ, मु.पो. पंढरपूर, जि. सोलापूर. 3. श्री. तुकाराम रामहरी राऊत, वय सज्ञान, व्यवसाय : व्यापार, रा. लिंकरोड, मु.पो.ता. पंढरपूर, जि. सोलापूर. 4. श्री. श्रीहरी पुरुषोत्तम पंचवाडकर, वय सज्ञान, व्यवसाय : व्यापार, रा. हरिदास वेस, मु.पो. ता. पंढरपूर, जि. सोलापूर. 5. पांडुरंग इंजिनिअरींग अन्ड कन्स्ट्रक्शन्स् प्रा.लि. तर्फे संचालक : श्री. अविनाश प्रभाकर भाटे, वय 57 वर्षे, व्यवसाय : व्यापार, रा. 3029, शिवाजी चौक, पुराजी कॉम्प्लेक्स, मु.पो.ता. पंढरपूर, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : जी.एच. कुलकर्णी विरुध्द पक्ष 1, 2 व 5 यांचेतर्फे अभियोक्ता : व्ही.एन. कुलकर्णी विरुध्द पक्ष 3 व 4 यांचेतर्फे अभियोक्ता : आर.बी. घोगरदरे आदेश सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, विरुध्द पक्ष यांनी डि. व सब-डि. सोलापूर पैकी तालुका पंढरपूर येथील कराड नाक्याजवळील पंढरपूर नगरपालिका हद्दीतील सर्व्हे नं.4527/ब व 4527/क पैकी क्षेत्र प्रत्येकी 2250 चौ.मी. मिळकतीवर 'निर्मल नगरी' नांवे वसाहत बांधून सदनिका विक्री करणार असल्याचे समजल्यानंतर तक्रारदार क्र.1 व 2 यांनी अनुक्रमे सदनिका क्र.सी-3 व सी-7 खरेदी करण्याचे ठरविले. सदरनिकेची किंमत रु.3,40,000/- निश्चित करण्यात येऊन तसा तोंडी करार जानेवारी 2002 मध्ये झाला आणि तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांना रु.2,20,000/- अदा केले असून उर्वरीत रक्कम देण्यास तयार होते व आहेत. विरुध्द पक्ष यांनी मिळकतीवर बांधकाम सुरु केले, परंतु त्यांच्यामध्ये अंतर्गत विवाद निर्माण झाल्यामुळे बांधकाम रखडले गेले. शेवटी तक्रारदार यांनी अपूर्ण अवस्थेतील सदनिका क्र.सी-3 ताब्यात घेतली आणि सदनिका क्र.सी-7 चे काम अद्याप पूर्ण केलेले नाही. तक्रारदार यांनी ताब्यात घेतलेल्या सदनिका क्र.सी-3 चे अपूर्ण काम स्वत: करुन घेतले आणि खरेदीखत लिहून देण्याबाबत विनंती करुन विरुध्द पक्ष यांनी टाळाटाळ केली आहे. तसेच विरुध्द पक्ष यांनी देऊ केलेल्या ड्रेनेज लाईन, पाणी पुरवठा पाईप लाईन, ग्राऊंड वॉटर स्टेअरेज टॅंक, ओव्हरहेड स्टोअरेज टँक, कंपाऊंड वॉल, एंट्रन्स गेट, सेप्टीक टँक इ. सुविधा दिलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांना गैरसोईंना सामोरे जावे लागत आहे. तसेच सदनिका खरेदी करण्यासाठी कर्ज घेतलेले असल्यामुळे बँकेकडून सदनिकेचा ताबा घेण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीद्वारे विरुध्द पक्ष यांनी सामाईक पार्कींग, ड्रेनेज लाईन, पाण्याची पाईप लाईन, इलेक्ट्रीक लाईन, ग्राऊंड वॉटर स्टेअरेज टॅंक, ओव्हरहेड स्टोअरेज टँक, कंपाऊंड वॉल, एंट्रन्स गेट, सेप्टीक टँक व पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत विरुध्द पक्ष यांना आदेश करावा, अशी विनंती केली आहे. तसेच त्यांनी सदनिका क्र.सी-7 सदनिकेचे बांधकाम पूर्ण करुन ताबा देण्याबाबत व खरेदीखत लिहून देऊन भूमापन कार्यालयातील मिळकत रजिस्टरमध्ये त्यांचे नांवाची नोंद करण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करावा आणि मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रार खर्चापोटी रु.5,000/- देण्याचा आदेश करावा, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष क्र.1, 2 व 5 यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी तक्रारदारांस सर्व सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत आणि ताबा दिल्यानंतर पंढरपूर येथील दिवाणी न्यायाधीश, व.स्तर येथे विरुध्द पक्ष क्र.3 व 4 यांनी स्पे.मु.क्र.142/03 दाखल केला आणि त्यामध्ये हस्तांतर करण्यास मनाई हुकूम झालेला आहे. तसेच तक्रारदार यांना प्रत्येकी रु.3,40,000/- मध्ये सदनिका देण्याचा तोंडी अथवा लेखी करार झालेला नाही आणि तक्रारदार यांनी फक्त रु.1,60,000/- च्या पावत्या जोडल्या आहेत. विरुध्द पक्ष क्र.3 हे पंढरपूर नगरपालिकेचे सदस्य आहेत आणि त्यांनी नगरपालिकेकडे तक्रार करुन मिळकतीमध्ये राहणा-या लोकांना कोणत्याही सुविधा न देण्याबाबत कळविले आहे. त्यांनी ड्रेनेज लाईन, पाणी पुरवठा पाईप लाईन, ग्राऊंड वॉटर स्टेअरेज टॅंक, ओव्हरहेड स्टोअरेज टँक, सेप्टीक टँक इ. सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या असून त्याची स्वच्छता व साफसफाई करणे त्यांचे काम नाही. विरुध्द पक्ष क्र.3 व 4 यांनी वेगवेगळया मार्गांनी अडथळे आणल्यामुळे काही कामे करावयाची राहिलेली असून त्यास त्यांना जबाबदार धरता येत नाही. शेवटी त्यांच्या विरुध्द तक्रार रद्द करण्याची विनंती त्यांनी केलेली आहे. 3. विरुध्द पक्ष क्र.3 व 4 हे मंचासमोर हजर झाले. त्यांना उचित संधी देऊन त्यांनी म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द कैफियतीशिवाय तक्रार चालविण्याचा आदेश करण्यात आला. 4. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 5. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार क्र.1 व 2 यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून विवाद्य सदनिका क्र.सी-3 व सी-7 खरेदी करण्याचे ठरल्याविषयी विवाद नाही. तसेच तक्रारदार यांना सदनिकेचा ताबा प्राप्त झालेला नाही, याविषयी विवाद नाही. सदनिकेचा ताबा न देण्यासह, कामे अपूर्ण ठेवणे व खरेदीखत करुन न दिल्याच्या तक्रारदार यांच्या तक्रारी आहेत. विरुध्द पक्ष क्र.1, 2 व 5 यांच्या म्हणण्यानुसार विरुध्द पक्ष क्र.3 व 4 यांनी वेगवेगळया मार्गांनी अडथळे आणल्यामुळे काही कामे करावयाची राहिलेली असून त्यास त्यांना जबाबदार धरता येत नसल्याचे नमूद केले आहे. 6. तक्रारदार किंवा विरुध्द पक्ष यांनी त्यांच्यातील सदनिका खरेदीचे करारपत्र रेकॉर्डवर दाखल केलेले नाही. असे असले तरी, तक्रारदार व विरुध्द पक्ष यांच्यामध्ये सदनिका क्र. सी-3 व सी-7 करिता खरेदी-विक्री व्यवहार झाल्याचे व त्या अनुषंगाने विरुध्द पक्ष यांना काही रक्कम प्राप्त झाल्याचे निदर्शनास येते. 7. मंचाच्या नोटीसची बजावणी होऊनही विरुध्द पक्ष क्र.3 व 4 हे मंचासमोर अनुपस्थित राहिले आणि त्यांनी म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे तक्रारदार यांची तक्रार त्यांना मान्य आहे, या अनुमानास आम्ही येत आहोत. विरुध्द पक्ष क्र.1, 2 व 5 यांनी काहीअंशी तक्रारदार यांची तक्रार मान्य करुन बांधकाम परवान्याची मुदत वाढ न मिळाल्यामुळे काही कामे अपूर्ण राहिल्याचे कबूल केले आहे. निर्विवादपणे, विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांच्या सदनिकेचे बांधकाम पूर्ण करुन दिलेले नाही आणि त्यांचे सदर कृत्य सेवेतील त्रुटी ठरते. 8. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांना सदनिका क्र. सी-3 व सी-7 करिता प्रत्येकी रु.3,40,000/- द्यावयाचे ठरले होते. परंतु सदनिकेची कामे पूर्ण करण्यात आलेली नाहीत. रेकॉर्डवर दाखल पावत्यांचे अवलोकन करता, तक्रारदार यांनी एकूण रु.1,60,000/- विरुध्द पक्ष यांना अदा केल्याचे निदर्शनास येते. विरुध्द पक्ष यांनी सदनिकेचे बांधकाम न केल्यामुळे तक्रारदार यांनी अपूर्ण अवस्थेतील सदनिका क्र.सी-3 ताब्यात घेतलेली आहे आणि सदनिका क्र.सी-7 चे काम अद्याप पूर्ण आहे. तक्रारदार यांनी ताब्यात घेतलेल्या सदनिका क्र.सी-3 चे अपूर्ण काम स्वत: पूर्ण केल्याचे नमूद केले आहे. तसेच त्यांनी विरुध्द पक्ष यांना खरेदीखत लिहून देण्याबाबत विनंती करुन विरुध्द पक्ष यांनी टाळाटाळ केल्याचे त्यांनी नमूद केले आहे. 9. तक्रारदार यांनी सदनिका क्र.सी-3 चे स्वत: काम करुन घेतलेले आहे. त्यामुळे तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांना उर्वरीत रक्कम देणे क्रमप्राप्त ठरत नाही. परंतु सदनिकेचे खरेदीखत करुन देण्याची जबाबदारी निश्चितच विरुध्द यांच्यावर येते. तसेच सदनिका क्र.सी-7 चे काम पूर्ण केलेले नाही आणि तक्रारदार यांनी त्याचा देय मोबदला विरुध्द पक्ष यांना दिलेला नाही. त्यामुळे विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांच्या सी-7 सदनिकेचे काम पूर्ण करुन देणे आणि तक्रारदार यांनी त्याचा मोबदला विरुध्द पक्ष यांना देणे उचित ठरते. तसेच त्यानंतर सदनिका क्र.सी-7 चे खरेदीखत करुन देण्याची जबाबदारी विरुध्द पक्ष यांच्यावर येते. 10. विरुध्द पक्ष यांनी सामाईक पार्कींग, ड्रेनेज लाईन, पाण्याची पाईप लाईन, इलेक्ट्रीक लाईन, ग्राऊंड वॉटर स्टेअरेज टॅंक, ओव्हरहेड स्टोअरेज टँक, कंपाऊंड वॉल, एंट्रन्स गेट, सेप्टीक टँक व पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्या नसल्याचे तक्रारीमध्ये नमूद असून त्याचे आदेश व्हावेत, अशी विनंती करण्यात आलेली आहे. विरुध्द पक्ष यांनी सदर सुविधा उपलब्ध करुन दिल्याचे नमूद केले आहे. तक्रारदार किंवा विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर आपआपल्या कथनाच्या पृष्ठयर्थ कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. उचित पुराव्याअभावी त्या सेवा-सुविधांची जबाबदारी निश्चित करणे कठीण ठरते. 11. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांच्या सदनिका क्र.सी-7 चे बांधकाम पूर्ण करुन तक्रारदार तक्रारदार यांच्या ताब्यात द्यावी. 2. सदनिका क्र.सी-7 चा ताबा स्वीकारताना तक्रारदार यांनी सदनिकेची उर्वरीत किंमत/मोबदला विरुध्द पक्ष यांना अदा करावा. 3. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांच्या सदनिका क्र.सी-3 व सी-7 चा ताबा दिल्यानंतर तक्रारदार यांचे हक्कामध्ये त्याचे खरेदीखत करुन द्यावे. 4. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.2,000/- द्यावेत. 5. उपरोक्त सर्व आदेशाची पूर्तता विरुध्द पक्ष यांनी आदेश प्राप्तीपासून 90 दिवसाचे आत करावी. (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/10211)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |