(द्वारा मा. सदस्या – श्रीमती. माधुरी एस. विश्वरुपे)
1. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्या मौ. नेवाळी नाका, ता. अंबरनाथ, जि. ठाणे येथील चाळीचे बांधकामाच्या नविन गृहप्रकल्पातील ता. 07/05/2013 रोजीच्या पुण्य नगरी वृत्तपत्रातील जाहीराती नुसार दिलेल्या पत्यावर सामनेवाले यांचे ऑफीसमध्ये जावुन अक्षतृतीयेच्या मुहुर्तावर ता. 13/05/2013 रोजी 450 चौ.फुट क्षेत्रफळाच्या सदनिकेचे बुकींग केले सदर जाहीरातीची प्रत मंचात दाखल आहे.
2. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे सदनिका बुकींगची रक्कम रु.5,000/- रोखीने तसेच व रु. 80,000/- व रु. 15,000/- चेक द्वारे अदा केली. सामनेवाले यांनी सदर सदनिका बुकींगची पावती दिली असुन बुकींगच्या पावतीची प्रत मंचात दाखल आहे. तक्रारदार यांनी सदनिकेची उर्वरित रक्कम रु. 2,00,000/- हप्त्याने सामनेवाले यांना द्याव्याचे ठरले होते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना ता. 14/08/2013 रोजी सदर सदनिका विक्रीचा करारनामा (नोटराईज) रु. 100/- स्टँप पेपरवर करुन दिला तक्रारदार यांनी सदर करारनाम्यानुसार नोव्हेंबर 13 पासून रु. 5555/- प्रतिमहा सामनेवाले यांचेकडे भरणा करावयाचे ठरले होते.
4. तक्रारदार यांनी बुकींगची रक्कम रु. 28,000/- व नोव्हेंबर 13 पासून रु. 5,555/- प्रमाणे एकुण 11 हप्ते (रु. 57,435/-) सामनेवाले यांचेकडे सदर सदनिका खरेदीपोटी एकुण रक्कम रु. 85,435/- जमा केले.
5. तक्रारदार यांच्या बहीनीने सामनेवाले यांचेकडे रूमचे बुकींग केले होते परंतु तिला हप्ते भरणा करणे शक्य नसल्याने रुमचे बुकींग रद्द करुन सदर रुमची रक्कम रु. 36,000/- तक्रारदार यांच्या खात्यामध्ये जमा केली.
6. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे एकुण रक्कम रु. 1,93,435/- सदनिका खरेदी पोटी जमा केल्यानंतर सामनेवाले यांचे ऑफीस जुलै – ऑगस्ट 2014 मध्ये बंद असल्याची तसेच साईट वरचे बांधकाम ठप्प झाल्याची माहीती मिळाली.
7. सामनेवाले यांचे ऑफीस बंद आहे व सामनेवाले हे सुध्दा बेपत्ता झाले असल्याने तक्रारदार यांनी वकीलामार्फत ता. 21/08/2015 रोजी सामनेवाले यांना पाठवलेली नोटिस न बजावता परत आली. सबब तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे कडे भरणा केलेली रक्कम अथवा बुकींग केलेल्या सदनिकेचा ताबा मिळण्यासाठी प्रस्तुत तक्रार मंचात दाखल केली आहे.
8. सामनेवाले यांना जाहीर प्रगटनाद्वारे नोटिसची बजावणी करुनही गैरहजर असल्याने त्यांचे विरुध्द प्रस्तुत प्रकरण एकतर्फा चालविण्याबाबतचा आदेश पारित झाला आहे.
9. तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचे मंचाले वाचन केले. तक्रारदारांनी त्यांचे लेखी युक्तिवाद हाच तोंडी युक्तिवाद समजण्यात यावा अशी पुरशिस दिली. सबब उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मंच खालील प्रमाणे निष्कर्ष काढीत आहे.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | सामनेवाले यांनी सदनिका खरेदीपोटी तक्रारदारांकडून रक्कम स्विकारुनही सदनिकेचा ताबा न देऊन अथवा सदनिका खरेदीपोटी स्विकारलेली रक्कम परत न देऊन तक्रारदारांना त्रुटीची सेवा दिल्याची बाब तक्रारदारांनी सिध्द केली आहे काय? | होय |
2 | तक्रारदार दाद मिळण्यास पात्र आहेत काय? | होय |
3 | अंतिम आदेश? | निकालाप्रमाणे |
10. कारणमिमांसाः
अ) तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडुन मौ. नेवाळी, ता. अंबरनाथ, जि. ठाणे येथील सर्व्हे नं. 67, हिस्सा नं. 4 मिळकतीत 450 चौ.फुट क्षेत्रफळाची रक्कम रु. 3,00,000/- एवढया किमतीची खोली विकत घेण्याचे ता. 14/08/2013 रोजीच्या करारानुसार निश्चित केले.
ब) तक्रारदार यांनी सदर करारातील परिच्छेद 4 प्रमाणे सामनेवाले यांचेकडे खोली खरेदीपोटी रु. 1 लाख भरणा केले असुन उर्वरित रक्कम रु. 2 लाख हप्त्याने द्यावयाचे उभय पक्षामध्ये निश्चित झाल्याचे दिसुन येते.
क) तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे सदर खोली खरेदी पोटी खालील प्रमाणे पैसे जमा केल्याबाबतच्या पावत्या मंचात दाखल आहेत.
अनु.क्र. पावती क्र. तारीख रक्कम तपशील
1. 018 13/05/2013 रु. 5,000/- रोख
कोटक बँकेचा 20/06/2013 रु. 80,000/- चेक
कोटक बॅकेचा 15/07/2013 रु. 15,000/- चेक
बुकींगच्या सदर पावतीवर नमुद केल्याप्रमाणे रु. 1,00,000/-
2. 022 02/11/2013 रु. 11,110/- चेक
3. - 03/12/2013 रु. 5,555/- रोख
4. 42 18/01/2014 रु. 11,110/- चेक
5. - 30/03/2014 रु. 11,110/- चेक 057942
6. - 30/03/2014 रु. 11,110/- चेक 057943
7. 124 02/11/2014 रु. 7,440/- चेक
8. Additional amt. transfer 30/03/2014 रु. 36,000/-
from Geeta Rajkumar रु. 1,93,435/-
ड) वरील परिस्थितीनुसार तक्रारदारांचा पुरावा मान्य करण्यास कोणतीही कायदेशिर अडचण दिसुन येत नाही. तक्रारदारांनी सदनिकेच्या ताब्याची मागणी केलेली असल्यामुळे तक्रार मुदतबाह्य ठरत नाही.
इ) तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्या कडुन सदर खोली खरेदी पोटी रु. 1,93,435/- एवढी रक्कम स्विकारुनही खोलीचा ताबा दिला नाही. तक्रारदार यांनी इमारतीच्या बांधकामाबाबत चौकशी केली असता चाळीचे बांधकाम पुर्णपणे बंद असुन सामनेवाले यांचे साईटवरील ऑफीस बंद आहे. सामनेवाले गायब झाले आहेत. यावरुन सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे बरोबर केलेला ता. 14/08/2013 रोजीचा खोली खरेदीच्या कराराची पुर्तता केली नाही. सामनेवाले यांची सदरची कृती सेवेतील त्रृटी आहे असे मंचाचे मत आहे.
इ) तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे सदर रुमच्या खरेदी पोटी एकुण रु. 1,93,435/- एवढी रक्कम जमा केल्याबाबतच्या पावत्या मंचात दाखल आहेत. प्रस्तुत प्रकरणात सामनेवाले यांचा आक्षेप दाखल नाही. सबब तक्रारदार यांचा पुरावा अबाधित आहे असे मंचाला वाटते. अशा परिस्थितीत तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे सदर रुम खरेदीपोटी एकुण रु. 1,93,435/- एवढी रक्कम जमा केल्याची बाब ग्राहय धरण्यात येते. तक्रारदारांनी त्यांचा कष्टाचा पैसा (Hard Money) सामनेवाले यांना रुम खरेदी करीता दिला आहे.
ई) तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे रुम खरेदी पोटी रक्कम रु. 1,93,435/- जमा करुनही सदनिका खरेदीकरारानुसार सोई व सुविधायुक्त रुमचा ताबा दिला नाही अथवा रुम खरेदी पोटी स्विकारलेली रक्कमही परत केली नाही. त्यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाले यांना दि. 21/08/2015 रोजी या संदर्भात कायदेशिर नोटिस पाठवली. तक्रारदार यांनी पाठवलेली सदर नोटिस न बजावता परत आली आहे. सामनेवाले यांनी नोटिसला प्रतिउत्तर दिले नाही. अथवा त्याप्रमाणे कोणतीही कार्यवाही केली नाही. सबब तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार सामनेवाले यांचे विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार इमारतीचे बांधकाम पुर्णपणे बंद आहे. अशा परिस्थितीत तक्रारदारांची सदनिका ताब्यात मिळण्याची मागणी मान्य करता येत नाही. तक्रारदार यांनी सदनिका खरेदी पोटी सामनेवाले यांचेकडे जमा केलेली रक्कम परत देणे योग्य आहे असे मंचाचे मत आहे.
10. “या मंचातील कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही”. सबब मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करत आहेः
आदेश
1. तक्रार क्र. 1000/2015 अंशतः मान्य करण्यात येते.
2 सामनेवाले यांनी तक्रारदारांना समझोता करारानुसार रुमचा ताबा दिला नाही अथवा तक्रारदारांनी खोली खरेदीपोटी जमा केलेली रक्कमही परत न देऊन त्रुटीची सेवा दिल्याचे जाहिर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदारांची खोली खरेदीपोटी जमा असलेली रक्कम रु. 1,93,435/- (अक्षरी रु. एक लाख त्र्याण्णव हजार चारशे पस्तीस फक्त) ता. 14/08/2013 पासून द.सा.द.शे 12% व्याजदरासह ता. 31/05/2017 पर्यंत द्यावी. विहीत मुदतीत अदा न केल्यास सदर रक्कम ता. 01/06/2017 पासून आदेशाच्या पुर्ततेपर्यंत द.सा.द.शे 15% व्याजदराने द्यावी.
4. सामनेवाले यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासाकरीता रक्कम रु. 15,000/- (अक्षरी रु. पंधरा हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चाची रक्कम रु.10,000/- (अक्षरी रु. दहा हजार फक्त) दि. 31/05/2017 पर्यंत द्यावी. विहीत मुदतीत रकमा अदा न केल्यास दि. 01/06/2017 पासुन संपुर्ण रक्कम अदा होईपर्यंत 9% व्याजदराने द्याव्यात.
5. आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनाविलंब व विनामुल्य पोष्टाने पाठविण्यात याव्यात.
6. संचिकेच्या अतिरिक्त प्रती असल्यास तक्रारदारांना परत करण्यात याव्यात.