नि. 29
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र.548/2010
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : 27/10/2010
तक्रार दाखल तारीख : 29/10/2010
निकाल तारीख : 29/03/2012
----------------------------------------------------------------
श्री निसार बाबासाहेब रोहिले
वय 45 वर्षे , व्यवसाय – व्यापार
रा.रेवणी गल्ली, तांदूळ मार्केट,
मिरज – 416410 ..... तक्रारदार
विरुध्द
1. पंडीत ऑटोमोटीव्ह प्रा.लि.
गेस्ट हाऊसजवळ, सांगली-मिरज रोड
सांगली 416416
2. टाटा मोटार्स लि.
तीन हात नाका
ज्ञान-साधना कॉलेज सर्व्हिस रोड,
ठाणे – 400 604 .....जाबदार
तक्रारदारतर्फे: अॅड श्री.एस.सी.करंदीकर, बी.एम.रेळेकर
जाबदारक्र.१तर्फे : अॅड श्रीएस.जे.कुलकर्णी
जाबदार क्र.२ तर्फे : अॅड श्री रवी भारद्वाज
नि का ल प त्र
द्वारा- मा. अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
1. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज आपले वाहनाचे नुकसानभरपाईबाबत दाखल केला आहे.
2. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार यांनी जाबदार क्र.1 यांचेकडून जाबदार क्र.2 यांनी उत्पादित केलेले विंगर हे वाहन दि.30/6/2009 रोजी खरेदी केले. सदर खरेदी केलेल्या वाहनासाठी खरेदी केल्या तारखेपासून 18 महिने अथवा 1,50,000 कि.मी. रनिंग एवढया कालावधीसाठी वॉरंटी आहे. तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या वाहनामध्ये गाडी विकत घेतल्यापासून दोन महिन्यांच आतच गाडीमध्ये पहिला दोष निर्माण झाला. त्यानंतर गाडीमध्ये काही ना काही तरी दोष निर्माण होत गेले. वारंवार दुरुस्त करुनही गाडी व्यवस्थित होत नाही, जाबदार यांचेकडे गाडी दुरुस्तीसाठी दिली असता गाडी दुरुस्त करण्यासाठी विलंब होतो. गाडी दुरुस्त केली असतानाही ती व्यवस्थित चालत नाही. तक्रारअर्ज दाखल करेपर्यंत गाडीचे 76000 कि.मी. रनिंग झाले आहे. एवढया कमी कालावधीमध्येही गाडीचे टायर्स बदलावे लागले. तसेच स्टार्टर असेम्ब्लीही बदलावी लागली. ती जाबदार क्र.1 यांनी आपल्या खर्चाने बदलून न देता तक्रारदार यांनाच खर्च करण्यास भाग पाडले. गाडी सारखी नादुरुस्त होत असलेने सदरची गाडी आहे तशी वापरणे तक्रारदाराला अशक्य व तोटयाचे झाले आहे. त्यामुळे तक्रारदारांनी सदरचा तक्रारअर्ज जाबदारांनी तक्रारदारांना दिलेली गाडी परत घेवून गाडीपोटी घेतलेली संपूर्ण रक्कम परत मिळावी या मागणीसाठी व इतर तदानुषंगिक मागण्यांसाठी दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.3 ला शपथपत्र व नि.5 चे यादीने 17 कागद दाखल केले आहेत.
3. जाबदार क्र.1 यांनी नि.12 वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. तक्रारदार यांनी खरेदी केलेली गाडी ही स्वत:साठी न वापरता सदर गाडी बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीसाठी वापरली आहे. तक्रारदार यांनी गाडीचे दिलेल्या नियोजित वेळेमध्ये सर्व्हिसिंग केलेले नाही. गाडीचे बरेचसे काम बाहेरच्या गॅरेजमध्ये करुन घेतलेले आहे. गाडी घेतल्यानंतर सुरुवातीलाच अपघात झाला असल्याने गाडीची वॉरंटी नियमाप्रमाणे संपुष्टात आली आहे. गाडीचा वापर हा विनापरमिट व्यावसायिक कारणासाठी होत असल्याने तक्रारदार हा ग्राहक होऊ शकत नाही. जाबदार क्र.1 यांनी तक्रारदार यांना उत्कृष्ट सेवा दिली असून तक्रारदार यांनी स्वत: दि.1/11/2010 रोजी जाबदार क्र.1 यांना गाडीचे काम व्यवस्थित करुन दिल्याचे व काही तक्रार नसल्याचे लेखी पत्र दिलेले आहे. या सर्व वस्तुस्थितीचा विचार होवून तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. जाबदार क्र.1 यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.13 ला प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
4. जाबदार क्र.2 यांनी नि.16 वर आपले विस्तृत म्हणणे शपथपत्राच्या स्वरुपात दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार हे सदर गाडीचा वापर प्रवासी वाहतुक करण्यासाठी करीत असलेने तक्रारदार हे ग्राहक होत नाहीत या कारणास्तव तक्रार फेटाळणेत यावी. तक्रारदार यांनी गाडीचे सर्व्हिसिंग वेळच्या वेळी केलेले नाही त्यामुळे वॉरंटीमधील अटींचा भंग होतो. तक्रारदार यांनी गाडीमध्ये उत्पादन दोष असल्याचे केलेले कथन निराधार असून त्याबाबत कोणताही तज्ञ व्यक्तीचा पुरावा तक्रारदार यांनी दिला नाही या सर्व बाबींचा विचार करुन तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळण्यात यावा असे जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. जाबदार क्र.2 यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.18 च्या यादीने 12 कागद दाखल केले आहेत.
5. जाबदार क्र.2 यांनी नि.19 वर ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम 13(1)(सी) प्रमाणे सदर गाडीची तपासणी तक्रारदार यांनी Appropriate Laboratory कडून करुन घेणेसाठी तक्रारदार यांना आदेश करणेत यावा असा अर्ज दिला आहे. सदर अर्जाबाबत तक्रारदार यांनी नि.20 वर म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांची मागणी विचारात घेता तक्रारदार यांना असे निर्देश देणे संयुक्तिक होणार नाही असे मंचाचे मत झालेने प्रस्तुतचा अर्ज नामंजूर करणेत आला. तक्रारदार यांनी नि.23 वर साक्षीदार यांचे शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदारतर्फे नि.25 ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. जाबदार क्र.1 यांनी नि.27 ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे व नि.28 ला तोंडी युक्तिवाद करणेचा नाही अशी पुरशिस दाखल करण्यात आली आहे. जाबदार क्र.2 यांनी आपला लेखी युक्तिवाद दाखल केला नाही अथवा जाबदार क्र.2 हे तोंडी युक्तिवादासाठीही उपस्थित राहिले नाहीत. तक्रारदार यांचे विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला.
6. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे व दाखल कागदपत्रे व लेखी युक्तिवाद यांचे अवलोकन केले. तक्रारदार यांचे विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला. प्रस्तुत प्रकरणी जाबदार यांनी तक्रारदार हे ग्राहक होत नाहीत असा मुद्दा उपस्थित केला आहे. सदर वाहनाचा वापर तक्रारदार यांनी व्यापारी कारणासाठी व प्रवासी वाहतुकीसाठी केला असल्याने तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक होत नाहीत असे जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. परंतु जाबदार यांनी असे दर्शविणारा कोणताही पुरावा मंचासमोर आणलेला नाही त्यामुळे जाबदार यांचे कथनामध्ये कोणतेही तथ्य नाही असे या मंचाचे मत आहे.
7. तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारअर्जाचे कामी गाडी परत घेवून त्या गाडीपोटी घेतलेली संपूर्ण रक्कम परत मिळावी अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांनी अशी मागणी करताना सदर गाडीमध्ये मूलभूत दोष आहे असेही कथन केले आहे. याउलट जाबदार यांनी तक्रारदार यांनी सदरची बाब शाबीत करण्यासाठी कोणत्याही तज्ञ व्यक्तीचा अहवाल दाखल केलेला नाही असे नमूद केले आहे. जाबदार यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांनी गाडीचे वेळच्या वेळी सर्व्हिसिंग केलेले नाही गाडीचे दुसरे, तिसरे, सातवे आठवे, नववे व दहावे सर्व्हिसिंग केले नसल्याचे विस्तृत म्हणणे दिले आहे. तसेच जाबदार यांनी सदर गाडीचे Appropriate Laboratory तपासणी करुन घेण्यात यावी अशीही मागणी केली होती. प्रस्तुत प्रकरणी तज्ञ व्यक्तीचा अहवाल अथवा Appropriate Laboratory कडून तक्रारदार यांनी तपासणी करुन घेतलेली नाही. तक्रारदार यांनी याकामी तज्ञ व्यक्ती म्हणून नि.23 वर साक्षीदार अब्दुल दांडेल या मेकॅनिकचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. सदर साक्षीदार यांनी प्रस्तुत प्रकरणी गाडीची कंडिशन खराब आहे.
तसेच कोणत्याही गाडीमध्ये मूलभूत दोष असल्याशिवाय ती वारंवार नादुरुस्त होत नाही असा माझा आजवरचा अनुभव आहे असे नमूद केले आहे. सदर साक्षीदार यांचे प्रतिज्ञापत्र गाडीमध्ये गाडीमध्ये मूलभूत दोष आहे हे ठरविण्यासाठी पूरेसा पुरावा होत नाही. तक्रारदार यांनी गाडीमध्ये मुलभूत दोष आहे आणि त्यापोटी घेतलेली संपूर्ण रक्कम परत मिळावी अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांनी आपले युक्तिवादामध्ये गाडीचे वारंवार काम करावे लागले असे नमूद केले व त्यासाठी दाखल असलेल्या जॉब कार्डकडे मंचाचे लक्ष वेधले. गाडीचे एकूण रनिंग 76,000 कि.मी. झाले आहे. तक्रारदार यांच्या गाडीस अपघात झालेमुळेही गॅरेजमध्ये काम करुन घेतल्याचे दिसून येते. गाडीचे वेळच्यावेळी सर्व्हिसिंग केले नसल्याचे दाखल कागदपत्रांवरुन स्पष्ट होते. केवळ गाडी गॅरेजमध्ये वारंवार दुरुस्त करावी लागली ही बाब गाडीमध्ये मूलभूत उत्पादन दोष आहे हे ठरविण्यास पुरेशी नाही. त्यासाठी तज्ञ व्यक्तिचा अहवाल दाखल करणे आवश्यक आहे. गाडीमध्ये मूलभूत दोष आहे हे सिध्द करण्याची जबाबदारी नेमकी कोणावर येते ? हे ठरविण्यासाठी सन्मा.राष्ट्रीय आयोग यांनी रिव्हीजन पिटीशन नं.40/2006 Rakesh Gautam Vs. Sanghvi Brothers चे कामी दि.04/05/2010 रोजी दिलेल्या निर्णयामध्ये Onus to prove manufacturing defect is on complainant असा निष्कर्ष काढला आहे. तक्रारदार यांनी गाडीमध्ये मूलभूत दोष आहे हे दर्शविण्यासाठी कोणताही आवश्यक पुरावा मंचासमोर आणलेला नाही त्यामुळे प्रस्तुतचा तक्रारअर्जाचे अनुषंगाने तक्रारदारांची मागणी मान्य करता येणारी नाही असे या मंचाचे मत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार याचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
२. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
सांगली
दिनांक: 29/03/2012
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.