तक्रार दाखल तारीख – 4/12/17
तक्रार निकाली तारीख – 05/03/18
न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रारदाराचे सदर तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार या करंजफेण, ता.पन्हाळा, जि. कोल्हापूर येथील कायमस्वरुपी रहिवाशी आहेत. वि.प.क्र.1 पॅनकार्ड क्लब्ज लि. ही कंपनी असून वि.प.क्र.2 ही सदर कंपनीची शाखा आहे. वि.प. क्र.3 हे मार्केटींग पर्सन आहेत. सदर वि.प. क्र.1 व 2 कंपनीची जगभरामध्ये खूप हॉटेल्स असून कंपनी अॅडव्हान्समध्ये रुम नाईट्स बुकींग करुन घेते. तक्रारदाराने वि.प. कंपनीकडे दि. 10/10/2012 रोजी रोख रक्कम रु.10,920/- एवढी रक्कम भरुन दि. 10/10/12 ते 10/01/16 इ. रोजी पर्यंतचे कालावधीकरिता वि.प. कंपनीकडे अॅडव्हानसमध्ये रुम नाईट्सचे बुकींग केले होते व आहे. तक्रारदार यांनी वि.प. कंपनीकडे अॅडव्हान्समध्ये रुम नाईट्सचे बुकींग केलेल्या कालावधीत जर तक्रारदार यांनी वि.प. कंपनीचे हॉटेल्सचा वापर केला नाही तर वि.प. कंपनी तक्रारदार यांना व्याजासह त्यांचे पैसे रक्कम रु.15,120/- इतकी रक्कम दि.10/01/2016 रोजी परत करेल, अशी खात्री व विश्वास वि.प. कंपनीने तक्रारदार यांना दिला होता व आहे. त्यामुळे मुदतीनंतर ठरलेप्रमाणे तक्रारदार यांनी वि.प. कंपनीचे कोल्हापूर शाखेमध्ये रकमेची मागणी केली असता सदर शाखेतील संबंधीत अधिकारी यांनी दि. 21/01/16 रोजी तक्रारदाराकडून पावती जमा करुन घेवून तक्रारदार यांनी तशी पोच पावती दिली व लवकरात लवकर तुमचा चेक मिळेल असे सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने वि.प. कडे वारंवार विचारणा केली असता वि.प. क्रि.2 व 3 यांनी सदर कंपनीच्या कोर्टात केसेस चालू असलेने चेक मिळणेस उशिर होत आहे, अशी कारणे सांगून रक्कम देणेस टाळाटाळ करत आहेत. सबब, तक्रारदाराने त्यांचे वकील एल.बी. पाटील यांचेमार्फत दि.31/7/17 रोजी वि.प. यांना नोटीस पाठविली व देय रकमेची मागणी केली. सदर नोटीस वि.प.क्र.1 व 3 यांना लागू झाली आहे. तरीही प्रस्तुत वि.प. ने नोटीसला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. अशा प्रकारे वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे. सबब, तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुतकामी वि.प. यांचेकडून व्याजासह देय रक्कम रु.15,120/- वसूल होवून मिळावी. प्रस्तुत रकमेवर दि. 10/1/2016 पासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 18 टक्के प्रमाणे व्याज वि.प. कडून वसूल होवून मिळावे, तक्रारदाराला वि.प. यांचे गैरकृत्याने झाले मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- वि.प.कडून वसूल होवून मिळावेत, कोर्ट खर्चापोटी रक्कम रु.20,000/- वि.प. कडून वसुल होवून मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने प्रस्तुत कामी अॅफिडेव्हीट, कागदयादीसोबत अ.क्र.9 कडे अनुक्रमे तक्रारदाराकडून वि.प. ने बुकींगसाठी स्वीकारले रकमेची पावती, तक्रारदाराला वि.प. ने दिलेले प्रमाणपत्र, तक्रारदार यांना वि.प. ने दिलेले ओळखपत्र, तक्रारदार यांनी वि.प. क्र.2 कडे रक्कम परत मिळणेसाठी अस्सल प्रमाणपत्र दिलेबाबत वि.प. क्र.2 ने दिलेली पावती, तक्रारदाराने वि.प.ला पाठवलेली नोटीस, वि.प. क्र.1 ते 3 यांना नोटीस पाठवलेची पावती, तक्रारदाराने वि.प. ला पाठवलेली नोटीस, वि.प. क्र.1 ते 3 यांनी नोटीस पाठवलेची पावती, वि.प.क्र.1 ते 3 यांना नोटीस पोहोचलेच्या पावत्या, वि.प. क्र.2 ची नोटीस परत आलेचा लखोटा, पुराव्याचे शपथपत्र तसेच याकामी दाखल कागदपत्रे व पुराव्याचे शपथपत्र हाच युक्तिवाद समजणेत यावा म्हणून दिलेली पुरसीस वगैरे कागदपत्रे तक्रारदार यांनी याकामी दाखल केली आहेत.
4. प्रस्तुतकामी वि.प.क्र.1 ते 3 यांना नोटीस लागू होवूनही सदर वि.प. क्र.1 ते 3 हे याकामी हजर झालेले नाहीत तसेच त्यांनी कोणतेही म्हणणे दाखल केले नाही व तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कथन खोडून काढलेले नाही. वि.प. क्र.1 ते 3 याकामी गैरहजर राहिलेने त्यांचेविरुध्द मंचाने नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत केला आहे.
5. वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ.क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार वि.प. कडून देय रक्कम व्याजासह वसूल होवून मिळणेस तसेच नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दे क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे दि.10/10/2012 रोजी रक्कम रु.10,920/- रोख अदा करुन दि.10/10/12 ते दि. 10/01/16 रोजीपर्यंतचे कालावधीकरिता वि.प. कंपनीकडे अॅडव्हान्समध्ये रुम नाईट्सचे बुकींग केले होते व आहे. त्याची पावती याकामी कागदयादी अ.क्र.1 कडे दाखल आहे तसेच प्रमाणपत्र दाखल आहे. वि.प. कडे सदर रुम नाईट्सचे अॅडव्हान्स बुकींग केलेनंतर सदर कालावधीत जर सदर रुम नाईट्सचा वापर न केलेस बुकींगसाठी भरलेली सर्व रक्कम व्याजासह रक्कम रु.15,120/- वि.प. ने तक्रारदार यांना अदा करणेची हमी व खात्री दिली होती. सदरची बाब नमूद कामी दाखल प्रमाणपत्रावरुन स्पष्ट होते तसेच तक्रारदार या वि.प. कंपनीचे ग्राहक झालेबाबत ओळखपत्रही तक्रारदार यांना वि.प. ने दिले आहे. तक्रारदार यांचा ग्राहक क्र. 1018-01-17723/आरएलएक्स/1018-01-85402 असा आहे. या बाबींवरुन तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब स्पष्ट होते.
तसेच तक्रारदाराने वि.प. कंपनीकडे बुकींग केले रुमचा वापर तक्रारदाराने बुकींगचे ठरले कालावधीत केला नाही, त्यामुळे मुदतीनंतर वि.प. यांचेकडे तक्रारदाराने बुकींग केले रकमेची मागणी केली असता वि.प. यांनी सदरची व्याजासह रक्कम तक्रारदाराला अदा केली नाही व ती रक्कम देणेस टाळाटाळ केली आहे. आजअखेर वि.प. यांनी तक्रारदाराला तक्रारदाराने बुकींगसाठी वि.प. कडे जमा केलेली रक्कम व्याजासह परत अदा केली नाही ही सेवेतील त्रुटीच आहे. या सर्व बाबी किंवा तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कोणतीही बाब वि.प. ने खोडून काढलेली नाही. वि.प. यांनी याकामी नोटीस लागू होवून सुध्दा हजर झाले नाहीत म्हणून वि.प. क्र.1 ते 3 यांचेविरुध्द नि. 1 वर एकतर्फा आदेश पारीत झाला आहे. सबब, सदरचे प्रकरण एकतर्फा चालविणेत आले. म्हणजेच वि.प. क्र.1 ते 3 ने तक्रारअर्जातील कोणतीही बाब खोडून काढली अथवा नाकारली नाही हे स्पष्ट होते.
अशा प्रकारे तक्रारदार यांना वि.प. ने सदोष सेवा पुरविली असून तक्रारदार वि.प. यांचेकडून नमूद बुकींगची व्याजासह रक्कम तसेच मानसिक त्रास व अर्जाचे खर्चाची खाली नमूद केलेप्रमाणे रक्कम वि.प. कडून वसूल होवून मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे स्पष्ट मत आहे.
बुकींगची व्याजासह परत मिळणारी रक्कम रु.15,120/- सदर रकमेवर दि.10/1/16 पासून तक्रारदाराचे हाती रक्कम पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजासह वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रास व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- अशी रक्कम वि.प. कडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत असे या मंचाचे स्पष्ट मत आहे.
सबब, प्रस्तुत कामी आम्ही पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2) वि.प. क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदाराला रक्कम रु. 15,120/- अदा करावेत. प्रस्तुत रकमेवर दि.10/01/2016 या तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याज वि.प. क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तपणे तक्रारदाराला अदा करावेत.
3) मानसिक त्रास व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- (रक्कम रुपये पाच हजार मात्र) वि.प. क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदाराला अदा करावी.
4) वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. क्र.1 ते 3 यांनी यांनी आदेशाची प्रत मिळालेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत वर नमूद आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.