:: निकालपत्र ::
(पारीत व्दारा मा.अध्यक्ष श्री भास्कर बी.योगी)
(पारीत दिनांक–21 जुलै, 2018)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली उभय विरुध्दपक्षां विरुध्द त्याला मंचाचे आदेशा नुसार नव्याने बदलवून मिळालेल्या सदोष भ्रमणध्वनी संबधाने दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे त्याने खरेदी केलेल्या विरुध्दपक्ष क्रं-1) पॅनासोनिक कंपनी निर्मित भ्रमणध्वनी Novo-P55 IMEI No.-352112072362111 मधील दोषा संबधाने यापूर्वीच जिल्हा मंच, भंडारा येथे तक्रार क्रं-29/2016 विरुध्दपक्ष क्रं-1) निरंकारी मोबाईल स्टोअर्स व्दारा प्रोप्रायटर, देसाईगंज (वडसा), जिल्हा गडचिरोली तसेच वि.प.क्रं-2) पॅनासोनिक लिमिटेड, नवी दिल्ली (निर्माता कंपनी) आणि वि.प.क्रं-3) लक्ष्मी मोबाईल केअर सेंटर, भंडारा (सर्व्हीस सेंटर) यांचे विरुध्द दाखल केली होती, त्यामध्ये जिल्हा मंच, भंडारा यांनी दिनांक-15.10.2016 रोजी निकाल पारीत करुन तक्रार ही विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या मंजूर केली होती आणि आदेशा मध्ये विरुध्दपक्षांना आदेशित केले होते की, त्यांनी त्याच किमतीचा व त्याच मॉडेलचा नविन भ्रमणध्वनी पुढील एका वर्षाच्या वॉरन्टीसह तक्रारकर्त्याला बदलवून द्दावा व असे करणे शक्य नसल्यास भ्रमणध्वनीची किम्मत रुपये-8250 दिनांक-29.08.2015 पासून ते प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो वार्षिक-9% दराने व्याजासह परत करावी, या शिवाय तक्रारकर्त्याला नुकसान भरपाई दाखल आणि तक्रारखर्च मिळून एकूण रुपये-5000/- द्दावेत, आदेशाची पुर्तता निकालपत्र प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आत विरुध्दपक्षांना करावी असे आदेशित केले होते.
03. तक्रारकर्त्याने पुन्हा प्रस्तुत तक्रार दाखल करुन नमुद केले की, मंचाचे आदेशा प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं-1) निर्माता कंपनीने बदलवून दिलेला भ्रमणध्वनी सुध्दा दोषपूर्ण असून त्यावरुन बाहेरुन येणारा दुरध्वनी संदेश तसेच त्यावरुन बाहेर केलेल्या संदेशाचा आवाजच ऐकू येत नव्हता, त्यामुळे त्याने दिनांक-18.01.2017 रोजी विरुध्दपक्ष क्रं 1 निर्माता कंपनीकडे लेखी तक्रार ई-मेल व्दारे केली. दरम्यानचे काळात त्याने विरुध्दपक्ष कंपनीचे इन्चॉर्ज नझिर खान आणि झोनल मॅनेजर विनोद यादव यांचेशी सुध्दा अनेकदा दुरध्वनीवरुन संपर्क साधून दोषपूर्ण भ्रमणध्वनी बदलवून देण्याची विनंती केली परंतु नविन तक्रार दाखल करे पर्यंत सुध्दा भ्रमणध्वनी बदलवून दिला नाही आणि मॅनेजर श्री यादव यांनी ग्राहक मंचात तक्रार केल्यामुळे दोषपूर्ण भ्रमणध्वनी दिला असल्याचे तक्रारकर्त्याला सांगितले, या प्रकारामुळे त्याला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागल्याने तसेच मंचाचे पूर्वी दाखल तक्रारीतील आदेशाचे पुर्ततेपोटी विरुध्दपक्ष क्रं-1) निर्माता कंपनीने बदलवून दिलेला भ्रमणध्वनी सुध्दा दोषपूर्ण निघाल्याने पुन्हा ही तक्रार नव्याने मंचा समक्ष दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्षांनी दोषपूर्ण भ्रमणध्वनी बदलवून द्दावा किंवा त्याऐवजी किम्मत रुपये-8250/- परत करावी तसेच नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च असे मिळून एकूण रुपये-70,000/- रुपये मिळावेत अशी मागणी केलेली आहे.
04. प्रस्तुत तक्रारी मध्ये दोन्ही विरुध्दपक्षांना मंचाचे मार्फतीने नोटीस तामील झाली परंतु वि.प.क्रं-2) लक्ष्मी मोबाईल केअर टेकर, सर्व्हीस सेंटर, भंडारा तर्फे कोणीही उपस्थित न झाल्यामुळे त्याचे विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला होता. दरम्यानचे काळात तक्रार मंचा समक्ष चालू असताना विरुध्दपक्ष क्रं-1) पॅनासोनिक या निर्माता कंपनी तर्फे अधिकारपत्रान्वये श्री इम्रान ए. खान, एरिया सर्व्हीस मॅनेजर हे दिनांक-01.07.2017 रोजी मंचा समक्ष हजर झाले व त्यांनी एक अर्ज करुन त्यात नमुद केले की, तक्रारकर्त्याने यापूर्वीच मंचा समक्ष दाखल केलेली ग्राहक तक्रार क्रं-29/2016 मधील आदेशाच्या अनुषंगाने वि.प.क्रं-1) निर्माता कंपनी व्दारे त्याला नुकसान भरपाई आणि तक्रारखर्च मिळून देय एकूण रक्कम रुपये-5000/- आणि दोषपूर्ण भ्रमणध्वनी Novo-P55 IMEI No.-352112072362111 बदलवून त्याऐवजी पुन्हा विरुध्दपक्ष क्रं-1 पॅनासोनिक कंपनी निर्मित त्याच मॉडेलचा नविन भ्रमणध्वनी Novo-P55 IMEI No. -352452082238145 दिनांक-17.01.2017 रोजी बदलवून दिला. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं-1) निर्माता कंपनी कडून मंचा समोर पूर्वी दाखल केलेल्या ग्राहक तक्रार क्रं-29/2016 मधील मंचा तर्फे दिनांक-15/10/2016 रोजी पारित केलेल्या निकालपत्रातील आदेशाची संपूर्ण पुर्तता त्यांनी केलेली आहे.
06. परंतु वर उल्लेख केल्या प्रमाणे विरुध्दपक्ष कं-1) निर्माता कंपनी तर्फे मंचाचे ग्राहक तक्रार क्रं-29/2016, निकाल पारीत दिनांक-15/10/2016 मधील आदेशान्वये बदलवून दिलेला भ्रमणध्वनी सुध्दा दोषपूर्ण निघाल्याने पुन्हा तक्रारीचे कारण घडल्याने तक्रारकर्त्याने पुन्हा ही नविन तक्रार क्रं-सी.सी./17/27 मंचा समक्ष दाखल केली व या नविन तक्रारी मध्ये पुन्हा विरुध्दपक्ष क्रं-1) निर्माता कंपनीचे एरिया सर्व्हीस मॅनेजर श्री इम्रान खान यांनी मंचा समक्ष दिनांक-01 जुलै, 2017 रोजी अर्ज दाखल करुन ते समझोत्यासाठी (Full & Final Settlement) तयार असल्याचे नमुद करुन त्यांनी रुपये-10,000/- समझोत्यापोटी तक्रारकर्त्याला रक्कम देण्याची तयारी दर्शवली तसेच श्री इम्रान खान यांनी आपल्या या कथनाचे पुष्टयर्थ्य प्रतिज्ञालेख सुध्दा मंचा समक्ष दाखल केला. सदर अर्जाचे अनुषंगाने तक्रारकर्त्याने मंचा समक्ष दिनांक-06 जुन, 2018 रोजी पुरसिस दाखल करुन तो समझोत्यासाठी तयार असल्याचे त्यात नमुद केले. त्यानंतर आपसी समझोत्याचे नि.क्रं-1 वरील आदेशाचे पुर्ततेपोटी मंचा समक्ष दिनांक-28 जून,2018 रोजी आणि दिनांक-20/07/2018 रोजी प्रकरण नेमलेले असताना दोन्ही तारखांवर तक्रारकर्ता मंचा समक्ष हजर झाला परंतु विरुध्दपक्ष क्रं-1) तर्फे कोणीही उपस्थित झाले नसल्याने शेवटी हे निकालपत्र मंचा तर्फे पारित करण्यात येत आहे.
07. मंचाने तक्रारीतील उपलब्ध दस्तऐवजांचे काळजीपूर्वक अवलोकन केले व प्रकरणातील एकंदरीत परिस्थिती वरुन हा निकाल पारीत करण्यात येत आहे.विरुध्दपक्ष क्रं-1) पॅनासोनिक निर्माता कंपनी तर्फे एरिया सर्व्हीस मॅनेजर याने मंचाचे आदेशा प्रमाणे तक्रारकर्त्याला पुन्हा देऊ केलेला नविन भ्रमणध्वनी हा दोषपूर्ण असल्याचे आपल्या अर्जात मान्य करुन तडजोडीपोटी रुपये-10,000/- तक्रारकर्त्याला देण्याची तयारी दर्शवली होती व शपथपत्र सुध्दा मंचा समक्ष दाखल केले होते परंतु त्यानंतरही वर उल्लेख केल्या प्रमाणे दोन तारखा होऊनही विरुध्दपक्ष क्रं-1) निर्माता कंपनी तर्फे कोणीही मंचा समक्ष उपस्थित झाले नाही व त्यांनी मान्य केल्या प्रमाणे तडजोडी नुसार पुर्तता केली नाही या सर्व प्रकारामुळे मंचाचा वेळ सुध्दा वाया गेला आणि तक्रारकर्त्याला विनाकारण मंचा समक्ष वारंवार उपस्थित राहावे लागले तसेच शारिरीक, मानसिक त्रास सहन करावा लागला.
08. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
1) तक्रारकर्त्याची विरुध्दपक्ष क्रं-1) पॅनासोनिक लिमिटेड या भ्रमणध्वनी निर्माता कंपनी आणि विरुध्दपक्ष क्रं-2) लक्ष्मी केअर टेकर मोबाईल केअर सेंटर यांचे विरुध्दची तक्रार वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या (Jointly & Severally) अंशतः मंजूर करण्यात येते.
2) विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याला दोषपूर्ण भ्रमणध्वनीची किम्मत रुपये-8250/- (अक्षरी रुपये आठ हजार दोनशे पन्नास फक्त) खरेदी दिनांक-29/08/2015 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% व्याजासह परत करावी. तक्रारकर्त्याला अशी रक्कम प्राप्त होताच त्याने त्याचे कडील नव्याने बदलवून दिलेला दोषपूर्ण भ्रमणध्वनी विरुध्दपक्षांना परत करावा.
3) विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-2000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) आणि तक्रारीचे खर्चा बद्दल रुपये-1000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्त) तक्रारकर्त्याला द्दावेत.
4) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांनी आदेशाची प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आत वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या (Jointly & Severally) करावे.
5) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
6) तक्रारकर्त्याला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.