तक्रारदार : वकील श्री.बालचंद्र मेनन हजर.
सामनेवाले : एकतर्फा.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सा.वाले क्र.1 हे इलेक्ट्रॅानिक्स वस्तु बनविणारी कंपनी आहे. तर सा.वाले क्र.4 हे त्या वस्तुची विक्री करणारे आहेत. तक्रार सा.वाले क्र.2 व 3 यांचे विरुध्द दाखल सुनावणी दरम्यान रद्द करण्यात आलेली आहे. सबब या पुढे न्याय निर्णयामध्ये केवळ सा.वाले क्र.1 व 4 असे संबोधिले जाईल.
2. तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 यांनी उत्पादित केलेली दोन वातानुकुलीत यंत्रे सा.वाले क्र.4 यांचेकडून दिनांक 21.4.2009 रोजी खरेदी केली. त्यापैकी 2 टनाचे वातानुकुलीत यंत्राची किंमत रु.25,820/- होती. तर 1.5 टनाच्या वातानुकुलीत यंत्राची किंमत रु.21,500/- होती. त्या बद्दलची पावती सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांना दिली. त्यानंतर दिनांक 30.4.2009 रोजी सा.वाले क्र.1 यांच्या प्रतिनिधींनी 2 टनाचे वातानुकुलीत यंत्र तक्रारदारांच्या शयनगृहात बसविले. तर 1.5 टनाचे वातानुकुलीत यंत्र तक्रारदारांच्या पाहुण्यांच्या खोलीमध्ये बसविले. वातानुकुलीत यंत्र बसवित असतांना 2 टनाचे वातानुकुलीत यंत्रामधून आवाज येत आहे असे तक्रारदारांना दिसून आले व त्या बद्दल वातानुकुलीत यंत्र बसविण्याचे अहवालामध्ये तक्रारदारांनी तसी नोंद केली. त्यानंतर तक्रारदारांना असे दिसून आले की, शयनगृहातील 2 टनाचे वातानुकुलीत यंत्र(वादग्रस्त) हे पुरेसा थंडावा (Coolingness ) देत नाही व त्यातून बराच आवाज येतो. तक्रारदारांनी त्या बद्दल ई-मेलव्दारे सा.वाले क्र.1 यांचेकडे तक्रार केली व त्यामध्ये किरकोळ दुरुस्ती करुन देण्यात आली.
3. तक्रारदारांचे तक्रारीत पुढे असे कथन आहे की, शयनगृहातील वादग्रस्त 2 टनाचे वातानुकुलीत यंत्र रिमोट कन्ट्रोलव्दारे चालत नाही. तक्रारदारांना प्रत्येक वेळेस वातानुकुलीत यंत्र उभे राहून हाताने त्यामध्ये बदल करावा लागतो. ही बाब तक्रारदारांनी सा.वाले यांना कळविली व दिनांक 21.8.2009 रोजी सा.वाले क्र.1 यांचे प्रतिनिधी श्री.गिलबर्ड डिसोझा यांनी वातानुकुलीत यंत्राची तपासणी केली व त्यामध्ये रिमोट कन्ट्रोलव्दारे वातानुकुलीत यंत्र चालत नाही असे त्यांना दिसून आले.
4. तक्रारदारांचे पुढे असे कथन आहे की, वादग्रस्त वातानुकुलीत यंत्राची सा.वाले यांनी वेळोवेळी दुरुस्ती केली परंतु ते व्यवस्थित चालले नाही. त्यानंतर वातानुकुलीत यंत्रामध्ये गॅसची गळती होत आहे असे दिसून आले. ही दुरुस्ती हमी कालावधीनंतर आवश्यक झाली असल्याने सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांकडून दुरुस्तीकामी रु.3,000/- वसुल केले. तरी देखील पुन्हा गॅसच्या गळतीचा दोष निर्माण झाला. पुन्हा दुरुस्ती करण्यात आली व तक्रारदारांनी त्या बद्दल रु.3,200/- दुरुस्तीकामी खर्च केला.
5. तक्रारदारांचे असे कथन आहे की, वेळोवेळी दुरुस्ती करुनही वादग्रस्त वातानुकुलीत यंत्र व्यवस्थित झाले नाही, ते रिमोटव्दारे वापरले जात नाही व त्यातील शित यंत्रणा सदोष असल्याने तो पुरेसा थंडावा देत नाही. या प्रकारे सा.वाले क्र.1 यांनी सा.वाले क्र.4 यांचेकरवी मुलभूत दोष असलेले वातानुकुलीत यंत्र तक्रारदारांना विक्री केले व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला व तक्रारदारांना वातानुकुलीत यंत्राच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा आरोप करुन तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दिनांक 6.7.2011 रोजी दाखल केली.
6. तक्रारीमध्ये हजर होऊन कैफीयत दाखल करावी अशी नोटीस सा.वाले क्र.1 व 4 यांना देण्यात आली. सा.वाले क्र.4 यांना नोटीस बजावल्या बद्दलची पोच पावती प्राप्त झाली. तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 व 4 यांना नोटीस बजावल्या बद्दलचे शपथपत्र दाखल केले. व त्या सेाबत सा.वाले क्र.1 यांना नोटीस देय केल्या बद्दलचे पोस्ट खात्याचे प्रमाणपत्र सादर केले. या प्रकारे सा.वाले क्र.1 व 4 यांना नोटीस बजावल्याचे सिध्द झाले. तरी देखील सा.वाले क्र.1 व 4 प्रकरणामध्ये हजर झाले नसल्याने त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
7. तक्रारदारांनी आपले पुराव्याचे शपथपत्र तसेच लेखी युक्तीवाद दाखल केला.
8. प्रस्तुत मंचाने तक्रार, पुराव्याचे शपथपत्र, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. तक्रारदारांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले क्र.1 व 4 यांनी मुलभूत दोष असलेले वातानुकुलीत यंत्र तक्रारदारांना विक्री करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला व तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. |
2 | तक्रारदार त्या बद्दल योग्य ती दाद मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय. |
3. | अंतीम आदेश | तक्रार अशतः मंजूर |
कारण मिमांसा
9. तक्रारदारांनी तक्रारीसोबत सा.वाले क्र.4 यांचेकडून सा.वाले क्र.1 यांनी उत्पादित केलेली 2 वातानुकुलीत यंत्रे विकत घेतल्या बद्दलच्या पावतीची प्रत निशाणी-2 येथे हजर केलेली आहे. निशाणी-3 येथे दोन्ही वातानुकुलीत यंत्रे तक्रारदारांच्या सदनिकेमध्ये बसविण्यात आल्या बद्दलच्या अहवालाची प्रत दाखल आहे. त्यामध्ये तक्रारदारांनी वातानुकुलीत यंत्रामधून आवाज येतो व शितलता कमी आहे असा आक्षेप दिनांक 30.4.2009 च्या वातानुकुलीत यंत्र बसविण्याच्या अहवालावर लिहून दिल्याचे दिसून येते. निशाणी-4 येथे तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 यांना पाठविलेला ई-मेल दिनांक 3.5.2009 ची प्रत दाखल केलेली आहे. त्यामध्ये शयनगृहात बसविण्यात आलेले वातानुकुलीत यंत्र 2 टनाचे असूनही काम करीत नाही अशी तक्रार आहे. निशाणी-6 येथे तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 यांचेकडे दिनांक 15.7.2009 रोजी पाठविलेल्या ई-मेल संदेशाची प्रत दाखल केलेली आहे. त्यामध्ये शयनगृहातील 2 टनाचे वातानुकुलीत यंत्र रिमोट कन्ट्रोलव्दारे वापरले जाऊ शकत नाही अशी तक्रार नमुद आहे. या प्रकारची तक्रार ई-मेल संदेश दिनांक 17..2009, ई-मेल संदेश 22.9.2009 यामध्ये आहे. सा.वाले यांनी वादग्रस्त वातानुकुलीत यंत्राची दुरुस्ती केली हे ई-मेल संदेशावरुन दिसून येते. परंतु दुरुस्ती करुनही त्यामध्ये पुन्हा रिमोटव्दारे हाताळण्याचे संबंधात दोष निर्माण झाल्याचे दिसून येते. या बद्दल तक्रारदारांनी सा.वाले यांना दिनांक 1.2.2009 रोजी वकीलामार्फत नोटीस दिली त्याची प्रत तक्रारदारांनी निशाणी-15 येथे हजर केलेली आहे. या प्रकारे तक्रारदारांनी सा.वाले यांना वेळोवेळी पाठविलेले ई-मेल संदेश व नोटीसा या मधील कथन तक्रारदारांच्या कथनास पुष्टी देते व असे दर्शविते की, तक्रारदारांनी वारंवार तक्रारी करुन देखील वादग्रस्त वातानुकुलीत यंत्र पूर्णपणे दुरुस्त होऊ शकले नाही.
10. त्यातही महत्वाची बाब म्हणजे वादग्रस्त वातानुकुलीत यंत्र रिमोट कन्ट्रोलव्दारे हाताळले जाऊ शकत नव्हते. तक्रारदारांनी 2 टनाचे वातानुकुलीत यंत्र शयनगृहात बसविले आहे, त्या बद्दल वाद नाही. ते वातानुकुलीत यंत्र रिमोट कंन्ट्रोलव्दारे वापरले जात नसल्याने तक्रारदारांना शयनगृहात उभे राहून हाताने हाताळावे लागत होते. व त्यामध्ये वेळोवेळी बदल करावा लागत होता. दरम्यान वादग्रस्त वातानुकुलीत यंत्रामध्ये गॅस गळतीचा दोष निर्माण झाल्याने तक्रारदारांनी त्या बद्दलची दुरुस्ती करुन घेतली व त्या बद्दल रु.3,309/- खर्च केला. त्या बद्दलची पावती तक्रारदारांनी निशाणी-19 वर हजर केलेली आहे. जून,2011 मध्ये पुन्हा तोच गॅस गळतीचा दोष निर्माण झाला व तक्रारदारांनी पुन्हा दुरुस्ती करुन घेतली व त्याकामी रु.3,200/- खर्च केला. त्या बद्दलची पावती तक्रारदारांनी निशाणी-21 वर हजर केलेली आहे. या प्रकारे तक्रारदारांनी गॅस गळतीचा दोष दूर करणेकामी रु.6,509/- खर्च केल्याचे दिसून येते.
11. वरील प्रकरची दुरुस्ती करुनही व खर्च करुनही वादग्रस्त वातानुकुलीत यंत्र समाधानकारकरित्या सेवा देऊ शकले नाही व त्यामधील दोष कायम राहीला. तक्रारदारांनी लेखी युक्तीवादामध्ये असे नमुद केलेले आहे की, सद्या देखील तक्रारदारांना वादग्रस्त वातानुकुलीत यंत्र शयनगृहात उभे राहून हाताळावे लागते व त्यामुळे तक्रारदारांना खूपच त्रास होतो. तक्रारदार हे जेष्ट नागरीत असून या प्रकारच्या शाररीक हालचालीमुळे तक्रारदारांची गैरसोय व कुचंबणा होते.
12. वर चर्चा केल्याप्रमाणे सा.वाले क्र.1 यांनी उत्पादित केलेले व सा.वाले क्र.4 यांनी विक्री केलेले सदोष वातानुकुलीत यंत्र तक्रारदारांना विक्री केले व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला ही बाब सिध्द होते.
13. तक्रारीसोबत असलेल्या कागपत्रावरुन असे दिसून येते की, सा.वाले क्र.1 यांनी आपले प्रतिनिधी पाठवून वातानुकुलीत यंत्राची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला परंतु ते दुरुस्त होऊ शकले नाही. या परिस्थितीमध्ये सा.वाले यांनी वादग्रस्त वातानुकुलीत यंत्र दुरुस्त करुन द्यावे असा आदेश दिल्यास भविष्यामध्ये पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिस्थितीमध्ये सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांकडून वादग्रस्त वातानुकुलीत यंत्र आहे त्या स्थितीत परत घेऊन तक्रारदारांना वातानुकुलीत यंत्राची किंमत रु.25,820/- 9 टक्के व्याज दराने परत करावेत असा आदेश देणे योग्य राहील असे प्रस्तुत मंचाचे मत झाले आहे. तक्रारदारांनी गॅस गळतीचे सबंधात दुरुस्तीकामी जो खर्च केला त्याचा परतावा मागीतला आहे. परंतु नादुरुस्त अवस्थेत का होईना तक्रारदारांनी वादग्रस्त वातानुकुलीत यंत्राचा उपभोग घेतला व त्याचा वापर केल्याने दुरुस्तीची रक्कम सा.वाले यांनी परत करावी असा आदेश देणे योग्य न्याय्य होणार नाही. त्यातही त्या दुरुस्तीच्या रक्कमा तक्रारदारांनी एका अन्य कंपनीस अदा केल्या व त्या सा.वाले क्र.1 व 4 यांना अदा केलेल्या नव्हत्या. सबब दुरुस्तीच्या खर्चा बद्दलचा आदेश करण्यात येत नाही.
14. सा.वाले यांनी सदोष वातानुकुलीत यंत्र तक्रारदारांना विक्री केल्याने तक्रारदारांना बराच मानसीक ,शाररीक त्रास झाल्याचे दिसून येते. तक्रारदार हे वातानुकुलीत यंत्राच्या वापरातून आनंद उपभोगू शकले नाहीत. सबब तक्रारदारांना मानसीक त्रास, कुचंबणा, व गैरसोय या बद्दल व तक्रारीच्या खर्चाबद्दल एकत्रितपणे सा.वाले यांनी रु.10,000/- अदा करावेत असा आदेश देणे योग्य व न्याय्य राहील असे प्रस्तुत मंचाचे मत झाले आहे.
15. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 320/2011 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना 2 टनाचे सदोष व मुलभूत दोष असलेले वातानुकुलीत यंत्र विक्री करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला व तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर असे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले क्र.1 व 4 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तपणे तक्रारदारांच्या शयनगृहात बसविलेले 2 टनाचे वातानुकुलीत यंत्र “आहे त्या स्थितीत” परत घेऊन जावे व तक्रारदारांना वातानुकुलीत यंत्राची किंमत रु. 25,820/- त्यावर 9 टक्के व्याज दिनांक 25.4.2009 पासून ते रक्कम अदा करेपर्यत या प्रकारे अदा करावेत असा आदेश सामनेवाले क्र.1 व 4 यांना देण्यात येतो.
4. या व्यतिरिक्त सामनेवाले क्र.1 व 4 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तपणे तक्रारदारांना मानसीक त्रास,कुचंबणा,गैरसोय व तक्रारीच्या खर्चाबद्दल नुकसान भरपाई असे एकत्रित रु.10,000/- अदा करावेत असाही आदेश देण्यात येतो.
5. वरील आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रमाणित प्रत मिळाल्यापासून 6 आठवडयाचे आत करावी.
6. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्यपाठविण्यात
याव्यात.