सौ. मंजुश्री खनके, सदस्या यांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 16/09/2014)
1. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात असा की, वि.प.क्र. 1 हे पॅनासोनिक इंडिया प्रा.लि.कं. असून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूच्या उत्पादनाचा व विक्रीचा व्यापार करीत आहेत. तसेच वि.प.क्र. 2 हा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री करणारा डिलर आहे. तक्रारकर्त्याने आपल्या कुटूंबाच्या मनोरंजनाकरीता टी.व्ही. घेण्याच्या हेतूने वि.प.क्र. 2 सोबत संपर्क साधून वि.प.क्र. 2 यांचेकडून पॅनासोनिक प्लाझमा टी.व्ही. सेट मॉडेल क्र. P42X20D अन.क्र. QD0510876 दाखविला. तसेच तक्रारकर्त्याला खात्री करुन दिली की, नमूद टी.व्ही. खुप चांगला असून त्यावर एक वर्षाची वारंटी आहे आणि जर एक वर्षात टि.व्ही.ला काही झाले तर कंपनी/वि.प.क्र. 1 टी.व्ही.दुरुस्त करुन देईल व दुरुस्त न झाल्यास बदलवून देईल. तसेच या मॉडेलची किंमत दुस-या टी.व्ही.पेक्षा बरोबर आहे व बजेटमध्ये आहे.
तक्रारकर्ता यापुढे नमूद करतो की, वि.प.क्र. 2 च्या कथनावर विश्वास ठेवून दि.06.01.2011 रोजी अनुक्रमांक QD0510876 हा रु.45,000/- मध्ये विकत घेतला. वि.प.क्र. 2 ने टी.व्ही.सोबत वारंटी कार्ड दिले आहे. तसेच खरेदी पावती दिलेली आहे. ते तक्रारकर्त्याने दस्तऐवज क्र. 1 व 2 वर दाखल केले आहे. यापुढे तक्रारकर्ता असे नमूद करतो की, खरेदीनंतर केवळ सहा महिन्यामध्ये सदर टि.व्ही.मध्ये चित्र बरोबर दिसत नव्हते, म्हणून वि.प.क्र. 1 चे दुकानात जाऊन भेट दिली व सदर दोषाबाबत तक्रार केली. त्यावेळी वि.प.क्र. 2 ने तक्रारकर्त्याला त्याच्या तक्रारीचा क्र. 1107144 दिला. तसेच त्यानंतर कुठलीही सुचना न देता कंपनीतर्फे एक इंजिनियर तक्रारकर्त्याचे अनुपस्थित आला व त्याने सदर टी.व्ही.चे निरीक्षण करुन दुरुस्त न करता निघून गेला. त्यानंतर तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 2 ला भेट दिली व टी.व्ही. दुरुस्त करुन मागितला असता त्यांनी सदर टी.व्ही.ची पीक्चर ट्युब खराब झाली असून ती बदलविण्यासाठी रु.35,000/- खर्च लागेल असे सांगितले. तसेच तक्रारकर्त्याच्या चुकीमुळे पीक्चर ट्युब खराब झाल्याचे सांगण्यात आले व दुरुस्ती करण्यास टाळाटाळ केली. तसेच बदलवून देण्यासही नकार दिला. तक्रारकर्त्याने सदर टी.व्ही. हा अर्थसहाय्य घेऊन विकत घेतला आहे व त्याची मासिक परतफेड ही रु.1,875/- आहे. वि.प.क्र. 1 व 2 ला तक्रारकर्त्याने कायदेशीर नोटीस बजावली असता, वि.प.क्र. 1 ने ती स्विकारली परंतू उत्तर दिले नाही व वि.प.क्र. 2 यांनी घेण्यास नकार दिला. म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमोर दाखल केली असून, सदोष टी.व्ही. हा दुरुस्त करुन द्यावा किंवा नविन द्यावा, मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासाची नुकसान भरपाई मिळावी, तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत. सोबत दस्तऐवजांच्या यादीप्रमाणे दस्तऐवज दाखल केलेले आहेत.
2. तक्रार दाखल झाल्यानंतर मंचामार्फत वि.प.क्र. 1 व 2 यांचेवर नोटीस बजावण्यात आली असता वि.प.क्र. 1 यांना नोटीस प्राप्त होऊनही ते मंचासमोर हजर झाले नाही. वि.प.क्र. 2 यांनाही नोटीस प्राप्त होऊनही ते हजर न झाल्याने त्यांचेविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचे आदेश अनुक्रमे दि.14.02.2014 व 12.07.2013 रोजी पारित करण्यात आले.
3. अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तसेच तक्रारकर्त्याच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकला असता, मंचाचे विचारार्थ आलेले मुद्दे व त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1) वि.प.चे सेवेतील न्यूनता व अनुचित व्यापारी प्रथा दिसून येते काय ? होय.
2) तक्रारकर्ता प्रार्थनेप्रमाणे दाद मागण्यास पात्र आहे काय ? होय.
3) आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
- कारणमिमांसा -
4. मुद्दा क्र. 1 नुसार – तक्रारकर्त्याने तक्रारीत स्पष्टपणे नमूद केले आहे की, त्याने कुटुंबाच्या मनोरंजनाकरीता विवादित टी.व्ही. अथसहाय्य घेऊन विकत घेतलेला आहे. परंतू तो अवघ्या सहा महिन्यामध्येच बंद पडला. विवादित टी.व्ही. दि.06.11.2011 रोजी खरेदी केल्याची पावती अभिलेखावर दाखल आहे. तसेच वारंटी कार्डवर देखील विवादित टी.व्ही. खरेदी केल्याचा दिनांक नमूद आहे. तक्रारकर्त्याने विवादित टी.व्ही.च्या दुरुस्तीकरीता तक्रार नोंदविली होती व तिचा क्रमांक आपल्या शपथपत्रावर असलेल्या अभिकथनामध्ये नमूद केलेला आहे व त्यास वि.प.क्र. 1 व 2 ने उपस्थित होऊन दस्तऐवजानीशी नाकारलेले नाही. तरीही तक्रारकर्त्याचा दोष असलेला टी.व्ही. वि.प.ने दुरुस्त करुन दिलेला नाही. पुढे तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 1 व 2 ला कायदेशीर नोटीस बजावलेली आहे, परंतू वि.प.क्र. 1 व 2 ने सदर नोटीसलाही प्रतिसाद दिला नाही. वारंटी कार्डनुसार सदर टी.व्ही.ला एक वर्षाची वारंटी दिल्याचे दिसून येते. त्यामुळे एक वर्षाच्या आत टी.व्ही.मध्ये बिघाड निर्माण झाल्याने तो दुरुस्त करुन देण्याची नैतिक जबाबदारी वि.प.ची होती, परंतू त्यांनी ती पार पाडली नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याला सेवा देण्यात त्यांनी त्रुटी केल्याचे दिसून येते.
5. मुद्दा क्र. 2 नुसार – तक्रारकर्त्याला टी.व्ही. खरेदी करतांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे वि.प.ने कृती केलेली नाही. तसेच टी.व्ही. नादुरुस्त असल्याची तक्रार असतांना केवळ त्याचे निरीक्षण करणे एवढेच वि.प.चे कर्तव्य नव्हते तर त्यावर उपाय काढणेही गरजेचे होते. वारंटी कालावधीत टी.व्ही. नादुरुस्त झाला असतांना तो बदलवून अथवा दुरुस्त न करुन वि.प.क्र. 1 व 2 ने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे असे मंचाचे मत आहे. म्हणून तक्रारकर्ता मुद्दा क्र. 3 नुसार तक्रारीतील प्रार्थनेप्रमाणे अंशतः दाद मिळण्यास पात्र आहे.
उपरोक्त निष्कर्षावरुन व दाखल दस्तऐवजांवरुन मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) वि.प.क्र. 1 व 2 ला आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याचा सदोष टी.व्ही. दुरुस्त करुन द्यावा जर सदर टी.व्ही. दुरुस्त होत नसेल तर विवादित टी.व्ही. परत घेऊन त्याऐवजी नविन टी.व्ही. तक्रारकर्त्याला द्यावा.
3) वि.प.क्र. 1 व 2 ने तक्रारकर्त्याला मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासाची नुकसान भरपाई म्हणून रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रु.4,000/- द्यावा.
4) सदर आदेशाची अंमलबजावणी वि.प.क्र. 1 व 2 ने संयुक्तपणे किंवा वैयक्तीकपणे आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आत करावी.