तक्रारदार ः- स्वतः
सामनेवाले ः- एकतर्फा.
(युक्तीवादाच्या वेळेस)
न्यायनिर्णय - मा. एम.वाय.मानकर, अध्यक्ष, ठिकाणः बांद्रा (पू.)
न्यायनिर्णय
(दि.10/01/2018 रोजी घोषीत)
1. तक्रारदारांनी दुरचित्रवाणी संच (टेलीव्हिजन) विकत घेतला व सामनेवाले यांनी तो वारंटी कालावधीमध्ये दोष निर्माण झाल्यानंतर, दुरूस्ती न केल्यामूळे ही तक्रार दाखल केली. तक्रारीसोबत तक्रारदारानी पावती व इतर कागदपत्रे सादर केली. सामनेवाले यांना मंचाची नेाटीस प्राप्त झाली. त्याबाबत संचिकेमध्ये ट्रॅक रिपोर्ट दाखल आहे. सामनेवाले हे उपस्थित न झाल्यामूळे त्यांचेविरूध्द तक्रार एकतर्फा चालविण्यात आली.
2. तक्रारदारानूसार त्यांनी सामनेवाले यांनी उत्पादित केलेला पॅनासोनीक एलईडी टिव्ही दि. 30/10/2013 ला रू. 42,000/-,अदा करून, विकत घेतला व त्याला तीन वर्षाची वारंटी होती. तो संच दि. 01/07/2016 ला बंद पडला. सामनेवाले तर्फे श्री. अंकुर तंत्रज्ञ यांनी संचाची पाहणी केली व टिव्ही पॅनल बदलावे लागेल असे सांगीतले. तक्रारदारानी सामनेवाले यांच्या अधिकृत सेवाकेद्रांशी दि. 04/07/2016 ला संपर्क केला असता, त्यांनी तक्रारदारांना सांगीतले की, तक्रारदारांकडे असलेल्या संचाचे उत्पादन कंपनीने बंद केले आहे, त्यामुळे तक्रारदार यांना दुसरा संच कमी दराने देण्यात येईल्. दि. 11/07/2016 च्या सामनेवाले यांच्या ई-मेल प्रमाणे तक्रारदाराना एक मॉडेल रू. 26,610/-, व दुसरे मॉडल रू. 31,110/-,किंमतीला डिस्काऊंटवर मिळणार होते. परंतू, तक्रारदार त्याकरीता तयार नव्हते. सामनेवाले यांनी दि. 28/07/2016 च्या ई-मेलप्रमाणे तक्रारदारांना त्यांचा प्रस्ताव बदलून एका प्रकारच्या संचाकरीता रू. 16,110/-,व दुस-या प्रकारच्या संचाकरीता रू. 20,610/-,अशा किंमतीला देण्यास तयार होते. तक्रारदारानूसार ते वारंटीप्रमाणे निःशुल्क सेवा प्राप्त करण्याचे अधिकारी होते. तक्रारदार यांनी त्यांचा टिव्ही दुरूस्त करून देणेबाबत किंवा त्याऐवजी दुसरा संच देण्याबाबत कळविले. सामनेवाले यांनी त्यांची विनंती मान्य न केल्यामूळे तक्रारदारानी ही तक्रार दाखल करून त्यांचा टिव्ही दुरूस्त करणेबाबत किंवा कोणतीही रक्कम न घेता त्यांना दुसरा टिव्ही देणेबाबत व मानसिक त्रासाकरीता रू.50,000/-,व सेटबॉक्सकरीता भरलेले पैसे रू. 7,200/-,अशी मागणी केली.
3. तक्रारदार यांनी पुराव्याचे शपथपत्र व लेखीयुक्तीवाद सादर केला. तक्रारदार यांचा तोंडीयुक्तीवाद ऐकण्यात आला.
4. तक्रारदार यांचा पुरावा अबाधीत आहे. तक्रारदारानी दाखल केलेल्या टॅक्स इनवाईसवरून त्यांनी रू. 42,000/-,भरल्याचे स्पष्ट होते. तसेच, त्या संचाला तीन वर्षाची वारंटी होती ही बाब त्यावर ठळकपणे नमूद केलेली आहे. सामनेवाले यांनी दिलेले प्रस्ताव सुध्दा संचिकेत सादर आहेत. आमच्या मते जेव्हा संच वारंटीच्या मुदतीत होता तेव्हा सामनेवाले यांची जबाबदारी ठरते की, त्यांनी तो दुरूस्त करावा. सामनेवाले यांनी तशा प्रकारचे संच उत्पादित करण्याचे बंद केले, त्याकरीता तक्रारदाराना जबाबदार धरता येणार नाही किंवा त्यांच्यावर अतिरीक्त बोझा टाकता येणार नाही. सामनेवाले यांच्याकडे त्यांनी तशा प्रकारचा संच केव्हा विकला व किती विकलेत याची माहिती निःश्चितपणे असणार. त्यामुळे त्यांनी तशा प्रकारच्या संचाकरीता वारंटी पिरीयडमध्ये तरी सर्व सुठे भाग उपलब्ध ठेवणे आवश्यक होते. तसे न करणे म्हणजे सेवेमध्ये कसुर ठरतो.
5. सामनेवाले यांनी तक्रारदाराकडे असलेला संच उत्पादित करणे बंद केले. त्यामुळे आमच्या मते तक्रारदार यांना तसा दुसरा संच देण्याबाबत आदेश पारीत करणे योग्य होणार नाही. तसेच त्याची अंमलबजावणी शक्य होणार नाही. आमच्या मते तक्रारदार यांना संचाऐवजी योग्य मोबदला देणे संयुक्तिक होईल. तक्रारदारानी या संचाचा जवळपास पाऊणे तीन वर्ष तक्रारदार यांनी उपभोग घेतला. या कालावधीकरीता प्रति वर्षी 10 टक्यांचा घसारा विचारात घेता, त्या संचाची किंमत दि. 01/11/2015 ला रू. 34,080/-,निश्चित होते. आमच्या मते ही रक्कम तक्रारदार यांना देणे योग्य राहील व ते त्याकरीता पात्र ठरतात.
6. वरील चर्चेनुरूप व निष्कर्षावरून आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
7. या मंचाचा कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे ही तक्रार यापूर्वी निकालात काढता येऊ शकली नाही. सबब खालीलः-
आदेश
1. तक्रार क्र 383/2016 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी सेवा देण्यात कसुर केला असे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदाराना दुरचित्रवाणी संचाकरीता रू. 34,080/-, (रूपये चौतीस हजार एंशी), मानसिक त्रासाकरीता रू. 10,000/-,(रूपये दहा हजार) व तक्रारीचा खर्च म्हणून रू. 5,000/-,(पाच हजार) दि. 28/02/2018 पर्यंत अदा करावे. तसे न केल्यास सदरहू रकमेवर दि. 01/03/2018 पासून अदा करेपर्यंत 10 टक्के व्याज लागु राहील.
4. सामनेवाले यांनी वरील क्लॉज 3 प्रमाणे रक्कम अदा केल्यास, 10 दिवसाच्या आत तक्रारदार यांच्याकडून त्यांच्या निवासस्थानामधून दूरचित्रवाणी संच प्राप्त करावा. तक्रारदार यांनी संच परत न केल्यास ते सामनेवाले यांना रू. 20,000/-,(रूपये वीस हजार) देण्यास जबाबदार राहतील.
5. आदेशाच्या प्रती उभयपक्षांना विनामुल्य पाठविण्यात याव्या.
6. अतिरीक्त संच तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
npk/-