निकाल
(घोषित दि. 07.01.2017 व्दारा श्री.सुहास एम.आळशी, सदस्य)
तक्रारदाराने त्याच्या तक्रार अर्जात नमुद केले आहे की, तक्रारदार याने दि. 20/4/2011 रोजी गणपती इलेक्ट्रॉनिक्स जालना यांचेकडुन पॅनॉसॉनिक डिजिटल कंपनीचा कलर टी.व्ही. रु. 75,000/- मध्ये खरेदी केला होता. दि. 14/01/2014 रोजी टी.व्ही.मध्ये बिघाड झाल्याने तक्रारदार यांनी पॅनॉसोनिक कंपनीच्या मेकॅनिकला दाखविला. त्याने सदर टी.व्ही मध्ये दोन बोर्ड टाकावे लागतील व त्याचा खर्च 15,000/- रुपयेयेईल असे सांगितले त्यापैकी तक्रारदाराने त्याला 7000/- रु. दिले व महिनाभरात तुमचा टी.व्ही. दुरुस्त करुन देतो असे आश्वासन मेकॅनिकने दिले. त्यानंतर 6 महिन्यांनी सदर मेकॅनिकने काही सामान आणुन टी.व्ही.ला लावून पाहिले, त्यानंतरही टी.व्ही.सुरु झाला नाही. त्यामुळे सदर टी.व्ही.औरंगाबाद येथे दाखवावा असा सल्ला मेकॅनिकने तक्रारदाराला दिला. त्यानंतर तक्रारदार याने टी.व्ही. प्रतिपक्ष क्र. 1 यांना दाखविला परंतु जवळपास वर्षभरही टी.व्ही. दुरुस्त झाला नाही व तो दुरुस्त होणारही नाही असे प्रतिपक्ष 1 याने सांगितले. त्यानंतर तक्रारदार याने प्रतिपक्ष नं. 2 कंपनीशी बोलणी केली. त्यानुसार कंपनीने नवीन टी.व्ही.ची किंमत रु. 75,000/- सांगितली व जुन्या टी.व्ही.ची किंमत 25,000/- एवढी काढून आणखी 50,000/- रु. टाकुन नवीन टी.व्ही. देतो अशी ऑफर तक्रारदाराला दिली. त्या टी.व्ही.ची वॉरंटी राहणार नाही असे सांगितले. तक्रारदाराचा टी.व्ही. वॉरंटी पिरीयेडमध्ये असतानाही तो बदलुन न दिल्याने तो बदलुन मिळावा याकरीता व नुकसान भरपाई रु. 10,000/- मिळण्याकरीता तक्रारदार याने सदर तक्रार दाखल केली आहे.
याबाबत प्रतिपक्ष क्र. 1 व 2 यांना नोटीस काढण्यात आली, प्रतिपक्ष क्र. 1 प्रकरणात हजर न झाल्याने त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. प्रतिपक्ष क्र. 2 यांनी नि.क्र. 7 वर जबाब दाखल केला. त्यामध्ये त्यांनी तक्रारदाराने टी.व्ही. 3 वर्षापर्यत चांगल्या स्थितीत वापरला, कधीही टी.व्ही.बाबत कोणतीही तक्रार केली नाही. हया तक्रारीस कोणतेही कारण घडले नाही. सेवा देण्यात कोणतीही कसूर केली नाही. बनावटीमध्ये कोणताही दोष नाही, असे म्हटले आहे. प्रतिपक्ष क्र. 2 यांनी सदर टी.व्ही.ची तीन वर्षाची वॉरंटी असल्याचे मान्य केले आहे परंतु तक्रारदाराने सर्वप्रथम माहे ऑगस्ट 2015 मध्ये सदर प्रॉडक्टबाबत तक्रार केली असल्याचे नमुद केले आहे. तक्रारदार हा चुकीच्या आधारावर नुकसान भरपाई मागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, व गैरअर्जदार यांनी प्रकरणात दाखल केलेला लेखी जबाब व युक्तीवाद ऐकून मंचाने खालील मुद्दे विचारात घेतले.
मुद्दे निष्कर्ष
1) प्रतिपक्ष यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? नाही.
2) काय आदेश ? अंतिम आदेशानुसार
कारणमीमांसा
मुददा क्र.1 ः तक्रारदाराच्या तक्रारीचे, प्रतिपक्ष यांनी दिलेल्या जबाबाचे व दोन्ही पक्षांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारदार याने दि. 20/4/2011
रोजी गणपती इलेक्ट्रॉनिक्स जालना यांचेकडुन पॅनॉसॉनिक (डिजिटल) कंपनीचा कलर टी. व्ही. रु. 75,000/- मध्ये खरेदी केला. ही बाब पावती क्र. 373 दि 20/04/2011 वरुन दिसुन येते. सदर टी.व्ही.ची 3 वर्ष वॉरंटी होती असे तक्रारदाराने नमुद केले मात्र प्रकरणात वॉरंटी कार्ड जोडलेले नाही. तक्रारदाराने गणपती इलेक्ट्रॉनिक्स यांना पार्टी करणे आवश्यक होते ते केलेले नाही, दि. 14/01/2014 रोजी टी.व्ही.मध्ये बिघाड झाल्याने तक्रारदार यांनी सदर टी.व्ही. पॅनोसोनिक कंपनीचा मेकॅनिक याला दाखविला. त्याने सदर टी.व्ही मध्ये दोन बोर्ड टाकावे लागतील व त्याचा खर्च 15,000/- रुपये येईल असे सांगितले. त्यापैकी तक्रारदाराने त्याला 7000/- रु. दिले, या बाबत कोणताही पुरावा मंचामध्ये दाखल नाही. सदर टी.व्ही. तक्रारदाराने प्रतिपक्ष क्र. 1 यांचेकडे दुरुस्तीला दिला असल्याचे नमुद केले मात्र प्रतिपक्ष क्र. 1 हे कंपनीचे अधिकृत दुरुस्ती केंद्र आहे किंवा नाही याबाबत कोणताही पुरावा दिलेला नाही. तक्रारदार याने प्रतिपक्ष नं. 2 कंपनीशी बोलणी केली. त्यानुसार कंपनीने नवीन टी.व्ही.ची किंमत रु. 75,000/- सांगितली व जुन्या टी.व्ही.ची किंमत 25,000/- एवढी काढली आणि त्यामध्ये आणखी 50,000/- रु. टाकुन नवीन टी.व्ही. देतो अशी ऑफर तक्रारदाराला दिली, याबाबत कोणताही पुरावा दाखल नाही.
तक्रारदाराचा टी.व्ही. वॉरंटी पिरीयडमध्ये असतानाही तो बदलुन न दिल्याने तो बदलुन मिळावा याकरीता व नुकसान भरपाई रु. 10,000/- मिळण्याकरीता तक्रारदार याने सदर तक्रार दाखल केली. सेल्स अॅंन्ड गुडस अॅक्ट 1930 चे कलम 12 व 13 चे अवलोकन करता वॉरंटी या सदरामध्ये वस्तु दुरुस्ती करुन देण्याबाबत स्पष्ट केले आहे. वस्तु परत करणे अथवा वस्तुचे पैसे मागुन विक्रीचा करार रद्द करणे ही बाब बेकायदेशीर आहे. त्यामुळे वस्तु बदलुन देण्याची मागणी पुर्ण करता येणार नाही. या प्रकरणामध्ये वस्तु सध्या कोणाकडे आहे, कधी दुरुस्तीकरिता दिली, कोणत्या परिस्थितीत दिली, या बाबत कोणताही पुरावा तक्रारदाराने मंचामध्ये दाखल केलेला नाही. तक्रारदार याने जे देयक (बिल) दाखल केले आहे त्या बिलावर वॉरंटी, सर्व्हीस व दोष या बाबतची जबाबदारी प्रतिपक्ष 2 वर निश्चित केलेली आहे. त्यामुळे तक्रारदाराने त्याचे टी.व्ही.तील दोषाबाबतची तक्रार/ मागणी कायदेशीररीत्या प्रतिपक्ष नं. 2 यांना कळविणे आवश्यक होते. तक्रारदाराने त्याची तक्रार प्रतिपक्ष नं. 2 यांना माहे ऑगस्ट 2015 रोजी कळविली असल्याचे प्रतिपक्षाचे म्हणणे आहे. तक्रारदाराने त्याची तक्रार मुदतीत अथवा वॉरंटी पिरियेडमध्ये प्रतिपक्ष यांना कळविल्याचा कोणताही पुरावा मंचामध्ये दाखल केला नाही. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार केवळ त्याच्या म्हणण्यानुसार मंजुर करता येणार नाही. प्रतिपक्ष यांनी सेवेमध्ये त्रुटी केल्याची बाब तक्रारदार सिध्द करु शकला नाही, त्यामुळे मुद्दा क्र. 1 चे उत्तर नकारार्थी देऊन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार नामंजुर करण्यात येत आहे.
2) खर्चाबाबत आदेश नाही.
श्रीमती एम.एम.चितलांगे श्री. सुहास एम.आळशी श्री. के.एन.तुंगार
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना.