नि का ल प त्र :- (दि. 16/09/2011) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष)
(1) प्रस्तुत प्रकरणी या मंचाने दि. 12/10/2009 रोजी तक्रारदारांची तक्रार मंजूर करण्यात आलेली होती. सदर आदेशाला नाराज होऊन सामनेवाला यांनी मा. राज्य आयोग, मुंबई यांचेकडे पहिले अपिल नं. 415/10 करणेत आले होते. सदर अपिल दाखल झालेले आहे. प्रस्तुत अपिलामध्ये दि. 23/03/2011 रोजी आदेश पारीत करुन प्रस्तुत प्रकरण फेरचौकशीसाठी परत पाठविण्यात आलेले आहे. दोन्ही बाजूंना पुर्ण संधी दिलेली आहे. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी,
तक्रारदार कंपनीचा लॉजिंग व बोर्डिंगचा व्यवसाय आहे. सामनेवाला हे इलेक्ट्रीक अॅन्ड मेकॅनिक वर्क्स करणारी प्रोपायटर फर्म आहे. तसेच इलेक्ट्रीक अॅन्ड मेकॅनिक लिफट (उदवाहक) तयार करणे, त्या पुरविणे, विक्री करणे, फीटींग करणे व विक्रीनंतरची सेवा देणे असा व्यवसाय आहे. तक्रारदारांचे हॉटेलमध्ये दोन लिफट उभा करणेच्या होत्या. त्याप्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदारांचेकडे दि. 20/07/2007 रोजी दोन कोटेशन देऊन लिफट उभारण्याची तयारी दर्शविली. याप्रमाणे चर्चा होऊन रक्कम रु. 4,40,000/- इतक्या रक्कमेस पुरवठा करुन योग्य ते फीटींग करुन लिफट सुरु करुन देण्याचे ठरले. ठरलेली रक्कम रु. 4,40,000/- पैकी 50 टक्के रक्कम ताबडतोब देण्याचे ठरले होते. तसेच 30 टक्के रक्कम त्यांचे सर्व साहित्य आलेनंतर व 20 टक्के दोन्ही लिफटचे संपूर्ण काम पुर्ण झालेनंतर देण्याचे निश्चित झाले होते. त्याप्रमाणे रक्कम रु. 4,40,000/- पैकी 50 टक्के रक्कम रु. 2,20,000/- दि. 21/07/2007 रोजी चेक क्र. 17934 महालक्ष्मी को.ऑप. बँक लि. शाखा- कोल्हापूर यांचे चेकद्वारे सामनेवाला यांना दिलेली आहे. व त्यावेळी दोन्ही बाजूंमध्ये लेखी अटी व शर्ती ठरलेल्या आहेत.
तक्रारदार त्यांचे तक्रारीत पुढे सांगतात तक्रारदारांच्या हॉटेलचा एक मजला बंद झाला म्हणून दि. 26/12/2007 रोजी तक्रारदार व सामनेवाला यांचेत मिटींग होऊन लिफटची सुधारीत किंमत रक्कम रु. 4,15,000/- इतकी निश्चित झाली. परंतु अटी व शर्ती त्याच राहिल्या. व त्यानंतर सामनेवाला यांनी अटी व शर्तीप्रमाणे लिफटचे साहित्य हॉटेलच्या ठिकाणी आणल्याचे खोटे सांगून 30 टक्के रक्कमेची उचल तक्रारदारांचेकडून केली आहे. व सदर रक्कम रु. 1,00,000/- तक्रारदारांनी सामनेवाला यांना दिलेली आहे. परंतु लिफटचे संपूर्ण साहित्य व मटेरियल हॉटेलचे ठिकाणी पोहचलेले नव्हते. तक्रारदारांनी लिफट उभारण्यासाठी आवश्यक असलेले बांधकाम ऑगस्ट-2007 मध्येच पूर्ण केले होते. व उर्वरीत रक्कम 20 टक्के देण्याची तयारी दर्शविली. अशा रितीने 80 टक्के रक्कम सामनेवाला यांना पोहचूनही एप्रिल-2008 अखेर दोन्ही लिफटचे काम पूर्ण केले नाही व लिफट सुरु करुन दिल्या नाहीत. याबाबत सामनेवाला यांना वारंवार समक्ष भेटून व फोनवर संपर्क साधलेला आहे. दोन्ही लिफटचे सामनेवाला यांनी काम पूर्ण केलेले नाही. व आवश्यक ते प्रमाणपत्र दिलेले नाही. व लिफटचे काम मुदतीत पुर्ण केलेले नाही. त्यामुळे हॉटेलमध्ये येणारे पॅसेंजर यांना लिफटची सुविधा तक्रारदार देऊ शकलेले नाहीत. त्यामुळे हॉटेलचे बुकींगही रद्द झालेले आहे. याबाबत सामनेवाला यांना नोटीस पाठविण्यात आलेली आहे. सबब, सामनेवाला यांनी स्विकारलेली रक्कम रु. 3,20,000/- दि. 15/08/2008 पासून 18 टक्के व्याजाने देण्याचा आदेश व्हावा. व व्यावसायिक नुकसानी रक्कम रु. 3,00,000/- व मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,00,000/- व तक्रारीचा खर्च रु.3,000/- असे देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती तक्रारदारांनी केलेली आहे.
(3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत तक्रारदार कंपनीने दि. 25/04/2008 चे मिटींगध्ये दिलेला अधिकाराचा ठराव, सामनेवाला यांनी तक्रारदार यांना दिलेले पॅसेजर लिफटचे कोटेशन, व गुडस लिफटचे कोटेशन, तक्रारदार यांनी सामनेवाला यांना दिलेली वर्क ऑर्डर, तक्रारदार यांनी सामनेवाला यांना दिलेले पत्र, तक्रारदार यांना ट्रॅव्हल् टुडे या टुरिस्ट कंपनीकडून आलेले पत्र, तक्रारदार यांनी सामनेवाला यांना वकिलामार्फत पाठविलेल्या नोटीसा, व त्यांची पोहोच पावती, व नॉट क्लेम्ड म्हणून परत आलेले आलेले लखोटे, व पोस्टाच्या पावत्या, व पोस्टाचे दाखला इत्यादीच्या झेरॉक्स प्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
(4) सामनेवाला यांनी त्यांचे म्हणण्याअन्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्याच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांची हॉटेल कंपनी कायद्याखाली नोंद असून तक्रारदार कंपनीत हॉटेल व लॉजिंग-बोर्डिंगचा व्यवसाय आहे यावरुन तक्रारदारांचे हॉटेल हे पूर्ण व्यावसायिक स्वरुपाचे असून सदर हॉटेलकरिता स्विकारलेली सेवा ही व्यावसायिक स्वरुपाची आहे. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार चालण्यास पात्र नाही. सामनेवाला यांनी कोणतीही सेवा त्रुटी ठेवलेली नाही. तक्रारदारांचे तांत्रिक अडचणीमुळे त्यांनी लिफटचे कामकाज करुन घेतलेले नाही. त्यामुळे झालेल्या तांत्रिक विलंबास सामनेवाला हे जबाबदार नाही. तक्रारदारांचे कथनाप्रमाणे त्यांनी रक्कम रु. 2,20,000/- अदा केलेले आहेत. व उर्वरीत रक्कम अदा न केलेने तक्रारदारांनीच कराराच्या अटींचा भंग केलेला आहे.
सामनेवाला त्यांचे म्हणण्यात पुढे सांगतात, सामनेवाला यांनी लिफटचे बांधकाम चालू केले होते. दि. 26/12/2007 रोजी झालेल्या मिटींगमध्येच दि. 21/07/2007 ते 27/12/2007 यामध्ये तक्रारदारांच्याच अडचणीमुळे लिफटचे कामकाज पूर्ण करता आले नाही हे सिध्द होते. तक्रारदारांनी बांधकाम केले नाही तसेच लाईटची व्यवस्था केलेली नाही. तसेच अटींची पूर्तता केलेली नाही. सामनेवाला यांनी लिफटचे बांधकाम केलेले आहे. व लिफट चालू करुन दिलेले आहे. तक्रारदारांनी कागदपत्रांची पुर्तता न केलेने आवश्यक त्या कागदपत्रांची सामनेवाला यांना करता आलेली नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार फेटाळण्यात यावी व तक्रारदारांना रक्कम रु. 25,000/- दंड करण्यात यावा अशी विनंती सामनेवाला यांनी केली आहे.
(5) या मंचाने तक्रारदारांची तक्रार, सामनेवाला यांचे म्हणणे तसेच उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केलेले आहे. तक्रारदार कंपनी ही कंपनी कायद्याखाली नोंद असलेली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असून सदर कंपनीचा हॉटेल व लॉजिंग-बोर्डिंगचा व्यवसाय कोल्हापूर येथे आहे. तक्रारदारांनी घेतलेली लिफट (उदवाहक) ची सुविधा ही व्यावसायिक कारणासाठी घेतलेली आहे. ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 2(1)(d) यातील तरतुदीचा विचार करता व्यावसायिक कारणासाठी घेतलेली सेवा-सुविधा व त्या अनुषंगाने निर्माण झालेला वाद हा ग्राहक वाद होत नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत यावी या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, आदेश.
आ दे श
1. तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत येते.
2. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.