नि.नं. 26
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 99/2011
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीख – 11/04/2011
तक्रार दाखल तारीख – 15/04/2011
निकाल तारीखः - 21/03/2012
----------------------------------------------
1. श्री धोंडीराम कुंडलिका पवार
वय 64 वर्षे, धंदा – शेती
रा.घर नं.1375, संत ज्ञानेश्वर नगर,
बुधगांव, ता.मिरज जि.सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
1. पै.जोतिरामदादा पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
सांगली, पद्मप्रभा प्लाझा, आंबेडकर रोड, सांगली-416416
2. श्री दत्तात्रय कृष्णाजी पाटील, चेअरमन
कृष्णावूदिन, क्रांतीनगर, सांगली
3. श्री कल्लू आबा कांबळे
रा.हिरवळ, पंचायत ऑफिसजवळ, इस्लामपूर
ता.वाळवा जि.सांगली
4. श्री अरुण रामचंद्र कुलकर्णी,
रा.द्वारा रयत बॅंक एम्प्लॉईज को-ऑप.क्रेडीट सोसायटी
लि. सांगली, खणभाग, रिसाला रोड, सांगली
5. श्री आप्पासाहेब आनंदराव पवार
रा.मु.पो. कवठे एकंद, ता.तासगांव जि.सांगली
6. श्री बाळासाहेब आप्पासाहेब डोंबे
रा. मंगळवार पेठ, मारुती देवळाजवळ,
जत ता.जत जि.सांगली
7. श्री गुरुपादप्पा शंकर आरळी
रा.चाटी गल्ली, जत ता.जत जि.सांगली
8. श्री अशोक भगवान पाटील
रा.मु.पो.चिंचणी, ता.तासगांव जि.सांगली
9. श्री सुरेश व्यंकटराव इनामदार,
रा.सुविधा, सुभाषनगर, सावर्डेकर प्लॉट सांगली
10. श्री नारायण शिवाप्पा पुजारी
रा.हॉटेल शिवप्रसाद, शंभर फुटी रोड, सांगली
11. श्री मुन्नाशेठ इब्राहिम तांबोळी
रा.दादाभाई मंजिल, हॉटेल बार्बी मागे,
कुपवाड रोड, सांगली
12. श्री शंकरराव पांडुरंग शिंदे
रा.भवानीनगर, ता.वाळवा जि.सांगली
13. सौ पल्लवी सुनिल भाटे,
रा.रतनशी नगर, पी/९, प्लॉट नं.६, सांगली ..... जाबदार
तक्रारदार तर्फे - अॅड श्री एन.बी.सांबारे
जाबदार क्र.1 व 2 तर्फे – अॅड श्री आर.आर.पाटील
जाबदार क्र.3 ते 13 – नो से
नि का ल प त्र
द्वारा- मा. सदस्या- गीता घाटगे
1. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्थेने मुदत ठेवी अन्वये व बचत खात्यान्वये गुंतविलेल्या रकमा परत दिल्या नाहीत म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार पै.जोतिरामदादा पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगली (ज्यांचा उल्लेख यापुढे ‘पतसंस्था’ असा केला जाईल) यांचेकडे रकमा गुंतविलेल्या होत्या. ठेवींच्या मुदती पूर्ण झालेल्या आहेत. तक्रारदारांनी गुंतविलेल्या रकमांची पतसंस्थेकडे मागणी केली असता पतसंस्थेने ती देण्यास नकार दिला अशी तक्रारदारांची तक्रार आहे. सबब, आपल्याला रकमा देवविण्यात याव्यात अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ प्रतिज्ञापत्र व नि.4 अन्वये एकूण 6 कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
2. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार क्र. 3 ते 13 यांचेवर मंचाच्या नोटीसीची बजावणी झाल्यानंतर ते प्रस्तुत प्रकरणी हजर झाले. परंतु त्यांनी त्यांचे म्हणणे दाखल न केल्याने त्यांचेविरुध्द नि.1 वर “ नो से ” आदेश करण्यात आले.
3. मंचाच्या नोटीशीची बजावणी जाबदारांवर झाल्यानंतर जाबदार क्र.1 व 2 यांनी विधिज्ञांमार्फत हजर होवून त्यांचे म्हणणे प्रस्तुत प्रकरणी दाखल केले. त्यांच्या म्हणण्यामध्ये त्यांनी तक्रारदारांनी जाबदार संस्थेत ठेवलेल्या ठेवी हा संस्थेच्या दैनंदिन व्यवसायाचा भाग आहे, त्याच्याशी जाबदार क्र.2 ते 13 यांचा प्रत्यक्ष संबंध नसतो, त्यामुळे तक्रारदारांच्या ठेवी परत करणेस जाबदार क्र.2 ते 13 यांना जबाबदार धरता येणार नाही व संस्थेच्या दैनंदिन कामकाजाशी जाबदार क्र.2 ते 13 यांचा संबंध नसल्याने ते याकामी आवश्यक पक्षकार नाहीत असे नमूद करुन त्यांना प्रस्तुत प्रकरणातून वगळणेत यावे अशी विनंती केली आहे. त्याचप्रमाणे तक्रारदारांनी मुदतीपूर्वी रक्कम मागताना त्या रकमेवर बचत खात्यावरील व्याजदराप्रमाणे रक्कम स्वीकारण्यास नकार दिला त्यामुळे त्यामध्ये जाबदारांचा काही दोष नाही. जाबदार संस्थेने लोकांकडून घेतलेल्या ठेवीची रक्कम कर्जवाटपासाठी वापरली आहे व दिलेले कर्ज एकरकमी एकाच वेळी वसलू होवू शकत नसलेने ठेवीदारांच्या ठेवी देणे अशक्य झाले आहे. ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवींचा अपहार अथवा गैरवापर झालेला नाही असे म्हणणे जाबदारांनी मांडले आहे व या कारणांचा विचार होवून तक्रारअर्ज नामंजूर करणेत यावा अशी विनंती त्यांच्या म्हणण्यात केली आहे. म्हणण्याच्या पुष्ठयर्थ जाबदारांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
4. तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्कम देण्यास जाबदार पतसंस्थेबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो. या मुद्याच्या अनुषंगाने सन्मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. 5223/09 सौ.वर्षा इसाई विरुध्द राजश्री चौधरी या कामी दिनांक 22 डिसेंबर 2010 रोजी जो निर्णय दिला आहे. त्याचे अवलोकन करता त्यामध्ये पुढील प्रमाणे निष्कर्ष काढल्याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.
सन्मा. उच्च न्यायालयाने वर दिलेल्या या निष्कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्ट्र सहकार कायदयातील कलम 83 व 88 अन्वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्यांचे दायित्व निश्चित केल्याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे असल्याचे मंचास वाटते. आणि म्हणून जाबदार क्र. 2 ते 13 यांना पुराव्या अभावी तक्रारदाराची रक्कम देण्यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्कर्ष निघतो व पर्यायाने रकमेची मागणी करुनही ती न देवून पतसंस्थाने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्याने पतसंस्थाच तक्रारदाराच्या ठेवीसाठी सर्वस्वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्कर्ष निघतो.
5. प्रस्तुत प्रकरणी दाखल मुदत ठेवपावत्यांच्या सत्यप्रतींचे अवलोकन करता तक्रारदारांना ठेवीत गुंतविलेल्या रकमेवर दि.31/12/08 पर्यंत व्याज मिळाल्याचे दिसून येते. तसेच ठेवींच्या मुदती पूर्ण झालेल्या आहेत. सबब या ठेवींमध्ये गुंतविण्यात आलेल्या रकमा दि.1/1/2009 पासून ठेवपावतीमध्ये नमूद केलेल्या व्याजदराने मंजूर करण्यात येत आहेत. तसेच बचत खात्यातील शेवटच्या तारखेस शिल्लक असलेली रक्कम त्या शेवटच्या तारखेपासून द.सा.द.शे. 10 टक्के व्याजदराने मंजूर करण्यात येत आहे. हे व्याजदर मंजूर करीत असताना गुंतविलेल्या रकमांची मागणी करुनही ती न देवून पतसंस्थेने तक्रारदारांना दूषित सेवा पुरविल्याची बाब लक्षात घेणेत आलेली आहे.
सबब, मंचाचा आदेश की,
आदेश
1. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.2209 मधील रक्कम रु.50,000/- (अक्षरी रुपये पन्नास हजार फक्त) दि.1/1/2009 पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.12 टक्के व्याजदराने अदा करावी.
2. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.2210 मधील रक्कम रु.20,000/- (अक्षरी रुपये वीस हजार फक्त) दि.1/1/2009 पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.12 टक्के व्याजदराने अदा करावी.
3. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना बचत खाते क्र.273 मधील रक्कम रु.49,500/- (अक्षरी रुपये एकोणपन्नास हजार पाचशे फक्त) दि.20/11/2009 पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.10 टक्के व्याजदराने अदा करावी.
4. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्हणून रक्कम रु.2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) अदा करावेत.
5. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्थेने दि.6/5/2012 पर्यंत न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
सांगली
दिनांक: 21/03/2012
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.