(मंचाचे निर्णयान्वये, रोझा फुलचंद्र खोब्रागडे, अध्यक्षा (प्र.))
तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असुन तक्रारीचा आशय थोडक्यात खालिल प्रमाणे..
1. तक्रारकर्ता हा राह. नवेगाव, कॉप्लेक्स, गडचिरोली येथील रहीवासी असुन त्याचा वडसा(देसाईगंज) येथे कापड दुकान आहे. तक्रारकर्ता दि.13.08.2018 रोजी विरुध्द पक्षांचे दुकानात कापड खरेदीसाठी गेला तेव्हा त्यांचे सोबत त्यांचे मित्र श्री. अतुल दादाजी येनुगवार होते. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून 2 नग पॅन्ट, 1 नग शर्ट, 1 शटपिस, 2 टि शर्ट, तसेच 1 नग ब्लेझर सुट अशाप्रकारे एकूण रु.20,856/- ची खरेदी केली त्यावेळी विरुध्द पक्षाने बिलावर डिस्काउंट दिल्यानंतर रु.15,402/- इतकी रक्कम अदा केली. त्यावेळी जर कपडयांमध्ये काही कमीजास्त झाल्यास 4-5 दिवसांत बदलवुन दिल्या जाईल अशी हमी विरुध्द पक्षांनी दिली.
2. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षांकडून खरेदी केलेला ब्लेझर घालून पाहीला असता तो लहान व तंग असल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे तक्रारकर्त्याने दि.16.08.2018 रोजी पुन्हा आपल्या मित्रास सोबत घेऊन बदलवण्यासाठी गेले असता विरुध्द पक्षाने तो बदलवुन देण्यास नकार दिला. त्यावेळी तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास ग्राहक मंचात तक्रार करेल असे सांगितले असता त्यांनी भडकून ‘तुम हमको ज्यादा शहाणपनत मत पढा, नखरे मत कर, ग्राहक मंच में जा नही तो कई पे जा, हमारा कोई कुछ नही बिगाड सकता’ असे बोलून अपमानित केले. तक्रारकर्त्याने पुढे नमुद केले आहे की, वास्तविक पाहता तक्रारकर्त्यास खरेदीबाबत दिलेल्या बिलावर 4-5 दिवसात कपडे बदलवून मिळतील अशी नोद आहे. असे असतांनाही विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास कपडे बदलवून तर दिलेच नाही, उलट दुकानात असलेल्या इतर लोकांसमोर मोठ्याने अपशब्दात बोलून अपमानित केले. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, त्यांनी विरुध्द पक्षाला दि.18.08.2018 रोजी वकीलामार्फत कायदेशिर नोटीस बजावली असता विरुध्द पक्षांनी त्याची कोणतीही दखल घेतली नाही व नोटीसला उत्तरही दिले नाही. म्हणून तक्रारकर्त्याने सदरची तक्रार मंचासमक्ष दाखल करुन खालिलप्रमाणे मागण्या केलेल्या आहेत.
अ) विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास खरेदी केलेला ब्लेझर-सुट बदलवुन दुसरा मोठ्या साईजचा त्याच कंपनीचा बदलवुन देण्याचा आदेश व्हावा.
ब) विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- दंड आकारण्यांत यावा तसेच तक्रारीचा खर्च विरुध्द पक्षावर बसविण्यांत यावा.
3. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे अनुषंगाने विरुध्द पक्षांना नोटीस बजावण्यात आली असता विरुध्द पक्षाने प्रकरणात हजर होऊन निशाणी क्र.8 वर आपले लेखीउत्तर दाखल केले. विरुध्द पक्षाने आपल्या लेखीउत्तरात तक्रारकर्ता हा आपल्या मित्रासह त्यांचे दुकानात खरेदीसाठी आला होता व तक्रारकर्त्याने रु.20,856/- ची खरेदी असुन त्यावर डिस्काउंट देऊन तक्रारकर्त्याने रु.15,402/- अदा केल्याचे मान्य केले आहे. तसेच तक्रारकर्त्याने ब्लेझर-सुट पूर्ण निरखून आणि स्वतःचे अंगावर परिधान करुन पसंत केला होता ही बाब जाणून बुजून लपवून ठेवली आहे, असे विरुध्द पक्षांचे म्हणणे आहे. तसेच तक्रारकर्त्याने ब्लेझर सुट परिधान केला असता तो लहान/ कमी मापाचा असल्याने तंग झाला हे तक्रारकर्त्याचे कथन नाकबुल केले आहे. कारण खरेदीचे वेळी तक्रारकर्त्यास सदरचा ब्लेझर सुट लहान व तंग असल्याचे सांगुन दुसरा सुट पसंत करण्यास सांगितले असता तक्रारकर्त्याने हाच ब्लेझर पाहिजे असा आग्रह धरुन खरेदी केला व त्याचा वापर करीत आहे. विरुध्द पक्षांचे पुढे असे म्हणणे आहे की, दि.16.08.2018 रोजी तक्रारकर्ता ब्लेझर बदलविण्याकरीता आला असता त्यांना दुसरे ब्लेझर बदलवुन देण्यांत येईल असे सांगितले. परंतु तक्रारकर्त्याने विनाकारण हुज्जत घालून ग्राहक मंचात तक्रार करीत असे म्हणून अनाप शनाप बोलू लागले, त्यामुळे तक्रारकर्त्यास अपमानीत करुन ब्लेझर बदली करुन देण्यास विरुध्द पक्षाने नकार दिला हे तक्रारकर्त्याचे म्हणणे खोटे असुन नाकबुल आहे. विरुध्द पक्षाने पुढे नमुद केले आहे की, ते सदरचा ब्लेझर सुट बदलवुन देण्यास पुर्वीही तयार होते व आजही आहेत. तसेच तक्रारकर्त्याने दि.18.08.2018 रोजीर दिेलेल्या नोटीसला दि.10.09.2018 रोजी वकीलांचे वतीने पंजीकृत डाकेव्दारे उत्तर पाठविले होते परंतु तक्रारकर्ता त्यांचे कायम पत्त्यावर गैरहजर असल्यामुळे ते बंद लिफाफ्यासह परत आलेले आहे. विरुध्द पक्षाने पुढे नमुद केले आहे की, त्यांनी तक्रारकर्त्याचा अपमान होईल असे कोणतेही कृत्य केले नसुन आजही ते तक्रारकर्त्यास लहान आकाराचे सुट ऐवजी मोठ्या आकाराचा ब्लेझर सुट देण्यास तयार आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याला विरुध्द पक्षाविरुध्द कोणतीही मागणी करण्याचा अधिकार नसल्यामुळे सदरची तक्रार खर्चासह खारीज होण्यांस पात्र आहे.
4. तक्रारकर्त्याव्दारे दाखल तक्रार, विरुध्द पक्षाव्दारे दाखल लेखीउत्तर, शपथपत्र, लेखी व तोंडी युक्तीवादाचे अवलोकन केले असता मंचसमक्ष खालील मुद्दे निघतात.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ता विरुध्द पक्षाची ग्राहक आहे काय ? होय
2) विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याप्रती सेवेत त्रुटी देऊन अनुचित
व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे दिसुन येते काय ? होय
3) आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
- // कारण मिमांसा // –
5. मुद्दा क्र.1 बाबतः- तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून 2 नग पॅन्ट, 1 नग शर्ट, 1 शटपिस, 2 टि शर्ट, तसेच 1 नग ब्लेझर सुट अशाप्रकारे एकूण रु.20,856/- ची खरेदी केली त्यावेळी विरुध्द पक्षाने बिलावर डिस्काउंट दिल्यानंतर रु.15,402/- इतकी रक्कम अदा केली होती हे तक्रारकर्त्याने निशाणी क्र.3, दस्त क्र.7 वर दाखल केलेल्या बिलावरुन स्पष्ट होते. तसेच सदरची बाब दोन्ही पक्षांना मान्य असल्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षांचा ग्राहक आहे हे सिध्द होते.
6. मुद्दा क्र.1 व 2 बाबतः- तक्रारकर्त्यातर्फे दाखल तक्रार त्यावर विरुध्द पक्षांचे लेखीउत्तर तसेच उभय पक्षांचे तक्रारीतील कथन यावरुन तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षांकडून ब्लेझर सुट खरेदी केला होता ही बाब मान्य केली आहे. विरुध्द पक्षांनी आपल्या लेखीउत्तरात नमुद केले आहे की, ते सदरचा ब्लेझर सुट बदलवुन देण्यास पुर्वीही तयार होते व आजही आहेत. तसेच विरुध्द पक्षांना शपथपत्राकरीता वारंवार संधी देऊन सुध्दा त्यांनी दाखल केले नाही म्हणून मंचाने दि.11.01.2019 रोजी प्रकरण पुढे चालविण्याचा आदेश पारित केला. त्यानंतर विरुध्द पक्षांनी निशाणी क्र.15 वर दस्तावेज दाखल करण्यांस परवानगीचा अर्ज सादर केला असता सदर अर्ज दंडासह मंजूर करुन त्यावर सुनावणी ऐकण्यात आली. त्यात उभय पक्षांना सदर प्रकरणी आपसी समझोता करण्याकरीता संधी देण्यांत आली, परंतु त्यांची आपसी समझोता केलेला नाही. म्हणून हे मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- // अंतिम आदेश // -
1. तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल विरुध्द पक्षांविरुध्दची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास विक्री केलेला ब्लेझर सुट परत घेऊन कोणत्याही कंपनीचा दुसरा ब्लेझर सुट किंवा त्याच किमतीचे दुसरे कोणतेही कपडे द्यावे.
3. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.1,500/- व तक्रारीचा खर्च रु.1,500/- अदा करावे.
4. विरुध्द पक्षाने वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 15 दिवसांचे आत करावी. अन्यथा वरील रकमेवर द.सा.द.शे. 12% व्याज देय राहील.
4. दोन्ही पक्षांना आदेशाची प्रथम प्रत विनामुल्य द्यावी.
5. तक्रारकर्त्यास प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.