न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांनी दि. 28/6/2021 रोजी वि.प. यांची मेंबरशीप घेतली. मेंबरशीप घेण्यापूर्वी वि.प. ने काही सेवा पुरविण्याचे वचन दिले होते. त्यातील सेवा खालीलप्रमाणे-
1) आंतरराष्ट्रीय दर्जाचे साहित्य (लाईफ फिटनेस)
2) क्रॉसफीट ट्रेनिंग (आंतरराष्ट्रीय दर्जा)
3) वातानुकूलीत
4) आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त शिक्षक
5) डायट चार्ट (आंतरराष्ट्रीय डायटिशनकडून)
6) योगा, झुम्बा, एरोबिक्स, किकबॉक्सींग
7) स्टीमबाथ, स्पा अॅण्ड वेले पार्कींग
8) आऊटडोअर अॅक्टीव्हीटी
9) 1 वर्षाचा अपघाती विमा
10) स्ट्रेंथ मशिन (आंतरराष्ट्रीय दर्जा)
वि.प.क्र.2 हे या जीमचे को-ओनर आहेत. तक्रारदार यांनी दि. 29 जून 2021 रोजी रु. 13,500/- वार्षिक फी वि.प. यांना दिली. तदनंतर लाईफ टाईम मेंबरशीपचे रु. 1,500/- वि.प. यांनी तक्रारदारांकडून घेतले. तक्रारदार यांनी जीमला जाण्यास सुरुवात केल्यानंतर असे लक्षात आले की, सगळे एसी बंद आहेत. त्याबाबत विचारणा केल्यानंतर एसी हे मेन्टेनन्सच्या कारणामुळे बंद आहेत असे वि.प. यांनी सांगितले. तदनंतर वि.प. यांनी बाकीच्या सुविधा या जुलैअखेर चालू होतील असे सांगितले. तक्रारदारांनी आंतरराष्ट्रीय डायटिशन बाबत विचारणा केली असता वि.प.क्र.2 यांनी, मी स्वतः आंतरराष्ट्रीय डायटिशन आहे, असे सांगून तक्रारदारांना डायटमध्ये फक्त ताक, भाकरी व दुपारच्या जेवणात पनीर वगैरे पध्दतीचा डायट दिला. त्यामुळे तक्रारदारांना अशक्तपणा येवू लागला व ते चक्कर येवून पडले. म्हणून तक्रारदारांनी प्रोफेशनल डायटिशन सौ डॉली नरसिंघाणी यांच्याकडून डायट बनवून घेतला. सदर डायटिशन यांनी तक्रारदार जो डायट फॉलो करत होते, तो पूर्णपणे चुकीचा होता असे सांगितले. तदनंतर दि. 28/20/2021 रोजी वि.प. क्र.2 यांनी व्हाट्सअप ग्रुपवर घोषणा केली की, सदरचे जीम बंद होणार आहे व वि.प. क्र.1 यांचेकडून सर्व पैसे परत घ्यावेत. म्हणून तक्रारदार यांनी रिफंडची मागणी केली असता अजून जीम बंद झालेले नाही, बंद होणार असेल तर पैसे परत मिळतील अशी ग्वाही त्यांनी दिली. तदनंतर तक्रारदारांनी वि.प. क्र.2 यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी नंबर बंद ठेवला असावा किंवा तक्रारदार यांना ब्लॉक केले असावे. दि. 10/11/21 रोजी तक्रारदारांनी वि.प. यांचेकडे लेखी तक्रार दिली परंतु वि.प. यांनी, आमच्याकडे नो रिफंड पॉलिसी आहे, त्यामुळे तुमचे पैसे परत देवू शकत नाही असे सांगितले. अशा प्रकारे वि.प. यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याने तक्रारदारांनी प्रस्तुची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदार यांना नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.4,99,000/-, तसेच इतर खर्चापोटी रु.15,000/- व डायटीशीयन फी रु. 20,500/- व रिफंड रु.13,500/- देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत रक्कम भरल्याची पावती, वि.प.यांना दिलेली तक्रार इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 व 2 यांचा पत्ता बरोबर असलेचे पुरावा शपथपत्र दाखल केले. वि.प. क्र.2 यांना नोटीस लागू झाल्याचा पोस्टाचा ट्रॅक रिपोर्ट दाखल केला आहे. सबब, वि.प. क्र 1 व 2 यांना नोटीस लागू होवूनही ते गैरहजर. आयोगात वारंवार पुकारता वि.प. क्र.1 व 2 हे गैरहजर. सबब, वि.प. क्र.1 व 2 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला आहे.
4. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे यांचे पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
5 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा –
मुद्दा क्र. 1 –
5. तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे ता.18/6/2021 रोजी वि.प. यांच्या अॅकॅडमीमध्ये मेंबरशीप घेतलेली होती. वि.प.क्र.2 हे पी 5 फिटनेस अॅण्ड सायन्स अॅकॅडमी याचे कोल्हापूर येथील को-ओनर (co-owner) असून सदर अॅकॅडमीच्या महाराष्ट्रात शाखा आहे. तक्रारदार यांनी ता. 29 जून 2021 रोजी रक्कम रु.13,500/- अशी वार्षिक फी वि.प. यांना अदा केली. सदर वार्षिक फीमध्ये वि.प. ने रक्कम रु.1,500/- लाईफ मेंबरशीप चार्जेस असतात असे सांगून तक्रारदार यांच्याकडून रक्कम रु.1,500/- अधिक घेतले. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी तक्रारीसोबत वि.प. यांना ता. 29/6/2021 रोजी रक्कम रु.13,500/- अदा केल्याची पावती दाखल केलेली आहे. सदर पावतीचे अवलोकन करता सदर पावतीचा नंबर 338 असून On account of - yearly असे नमूद आहे. सदरच्या पावतीवर वि.प. यांचे नाव नमूद असून त्यावर वि.प. यांची सही आहे. सदरची पावती वि.प. यांनी आयोगात हजर होवून नाकारलेली नाही. सबब, पावतीवरील रकमेचा विचार करता (consideration) तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
6. उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. वि.प. यांनी तक्रारदार यांना मेंबरशीप घेण्यापूर्वी काही सेवा पुरविण्याचे वचन दिले होते. त्यातील सेवा खालीलप्रमाणे -
1) आंतरराष्ट्रीय दर्जाचे साहित्य (लाईफ फिटनेस)
2) क्रॉसफीट ट्रेनिंग (आंतरराष्ट्रीय दर्जा)
3) वातानुकूलीत
4) आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त शिक्षक
5) डायट चार्ट (आंतरराष्ट्रीय डायटिशनकडून)
6) योगा, झुम्बा, एरोबिक्स, किकबॉक्सींग
7) स्टीमबाथ, स्पा अॅण्ड वेले पार्कींग
8) आऊटडोअर अॅक्टीव्हीटी
9) 1 वर्षाचा अपघाती विमा
10) स्ट्रेंथ मशिन (आंतरराष्ट्रीय दर्जा)
7. त्यानुसार तक्रारदार यांनी ता.30 जून 2021 पासून जीमला जाण्यास सुरुवात केली. जीम चालू केल्यानंतर तक्रारदार यांच्या असे लक्षात आले की, सगळे एसी बंद आहेत. वि.प. यांना विचारलेवर सदर एसी मेंन्टेनन्सच्या कारणामुळे बंद आहेत व बाकीच्या सर्व सुविधा जसे की, स्टीम बाथ, वॉर्म शॉवर, योगा, अॅरोबिक्स, किक बॉक्सींग हे जुलै अखेरपर्यंत चालू होते असे वि.प. यांनी तक्रारदार यांना सांगितले. तसेच वि.प. यांनी तक्रारदार यांना आंतरराष्ट्रीय डायटेशियनकडून डायट चार्ट देणार असे सांगितले. तथापि तक्रारदार यांनी सदर डायेट चार्टबद्दल वि.प.क्र.2 यांना विचारले असता वि.प.क्र.2 यांनी स्वतः आंतरराष्ट्रीय डायटीशीयन आहेत व त्यांनी डायेटमध्ये फक्त ताक, भाकरी व दुपारच्या जेवणात पनीर वगैरे असा डाएट दिला. सदर डाएटमुळे तक्रारदार यांना अशक्तपणा येवू लागला व ता.8 सप्टेंबर 2021 रोजी आजारी पडले. ता. 28 ऑक्टोबर 2021 रोजी वि.प. क्र.2 यांनी सदर वि.प. यांची अॅकॅडमी, कोल्हापूर येथे बंद होणार आहे अशी घोषणा केली व वि.प. क्र.1 यांचेकडून पैसे परत घ्यावेत असे सांगितले. सबब, तक्रारदार यांनी दि.11 नोव्हेंबर 2021 रोजी सदर अॅकॅडमीमध्ये लेखी तक्रार दिली व परताव्याची मागणी केली असता वि.प. यांनी नो रिफंड पॉलिसी आहे व तुमचे पैसे आम्ही देवू शकत नाही असे सांगून तक्रारदार यांना वि.प. क्र.1 यांचेकडे विचारणा करण्यास सांगितले. वि.प.क्र.1 यांनी तक्रारदार यांना त्यांची नवीन जीम टेम्पल फिटनेमध्ये कंटीन्यू करावी, पण पैसे देवू शकत नाही असे तक्रारदार यांना सांगितले. सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांचेकडून सदर अॅकॅडमीकरिता मेंबरशीपपोटी रक्कम स्वीकारुन देखील सदर अॅकॅडमीमध्ये असणा-या सेवासुविधा न पुरवून तसेच तक्रारदार यांनी सदर अॅकॅडमी बंद होणार आहे हे कळताच परताव्याची मागणी केली असता वि.प. यांनी तक्रारदार यांना सदर अॅकॅडमीप्रमाणे सोयीसुविधा न देवून तसेच परताव्याची रक्कम न देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्याचे अनुषंगाने प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी तक्रारीसोबत वि.प. यांचे व्यवस्थापक यांचेकडे केलेल्या तक्रारीची प्रत दाखल केलेली आहे. सदर प्रतीचे अवलोकन करता,
It was promised from your gym that there will be steam bath twice a week. Yoga, Aerobic, Kickboxing and Zumba Session’s every week from which only Zumba classes were organized from your management and the classes were stopped after one month.
I paid membership fee 13,500/- for the services you promised and as I stated above, none was offered. Even the equipments are not in proper condition. So I humbly request you to refund Rs.13,500/-.
अशी तक्रार तक्रारदार यांनी वि.प. यांना दिलेली असून त्यावर सदरची तक्रार वि.प. यांनी स्वीकारलेची त्यावर सही असून ता. 10/11/2021 नमूद आहे. सदरचा कागद वि.प. यांनी आयोगामध्ये हजर होवून नाकारलेला नाही. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी ता. 17/10/22 रोजी आयोगामध्ये कागदपत्रे दाखल केलेली असून सदर कागदपत्रांचे अवलोकन करता अ.क्र.2 ला तक्रारदार यांनी वि.प. अॅकॅडमीचे Advertisement pamphlet दाखल केलेले आहे. सदरच्या pamphlet वर तक्रारदार यांनी तक्रारीमध्ये नमूद केलेल्या सर्व सुविधा नमूद आहेत. अ.क्र.3 ला तक्रारदार यांनी वि.प. अॅकॅडमीचे ता. 6/7/2021 रोजीचा तक्रारदार यांना दिलेला 30 दिवसांचा डाएट प्लॅन दाखल केलेला असून सदर डाएट प्लॅनवर डाएटीशियनची सही आहे. सदरचा बेसीक डाएट प्लॅन हा वि.प. अॅकॅडमीच्या लेटरपॅडवर असून सदरचा डाएट वि.प. यांनी आयोगामध्ये हजर होवून नाकारलेला नाही. तक्रारदार यांचे तक्रारतील कथनांचे अवलोकन करता,
तक्रारदार यांनी वि.प. नं.2 प्रशांत मेश्राम यांनी सांगिेतले की स्वतः आंतरराष्ट्रीय डाएटीशियन आहेत व त्यांनी डाएटमध्ये फक्त ताक भाकरी आणि दुपारच्या जेवणात पनीर, वगैरे अशा पध्दतीचा डाएट दिला, ज्याच्यामुळे तक्रारदार यांना अशक्तपणा येवू लागला व चक्कर येवून पडले. दि. 8 सप्टे 2021 पासून तक्रारदार आजारी पडले व त्यांना अशक्तपणा येवू लागला. तक्रारदार यांनी पुन्हा प्रोफेशनल डायटिशन सौ डॉली नरसिंघाणी यांच्याकडून डायट बनवून घेतला. सदर डायटिशन यांनी तक्रारदार जो डायट फॉलो करत होते, तो पूर्णपणे चुकीचा होता असे सांगितले.
तक्रारदारांनी सदरची कथने अॅफिडेव्हीटवर कथन केली असून सदरची कथने वि.प. यांनी आयोगात हजर राहून नाकारलेली नाहीत. त्याकारणाने तक्रारदार यांनी केलेली कथने खरी व बरोबर असून वस्तुस्थितीप्रमाणे कथन केलेली आहेत या निष्कर्षास हे आयेाग येत आहे. सबब, तक्रारदार यांनी वि.प. यांना दिलेल्या डायटीशन प्लॅन मुळे अशक्तपणा आला ही बाब नाकारता येत नाही.
8. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी वि.प. यांना ता.18/1/2022 रोजी पाठविलेले मॅसेजेसचे स्क्रीन शॉट दाखल केलेले आहेत. सबब, वरील सर्व कागदपत्रांचा व तक्रारदारांच्या तक्रारीचा बारकाईने विचार करता वि.प. अॅकॅडमी यांनी तक्रारदार यांचेकडून तक्रारीत नमूद केलेल्या सेवेबदृल वार्षिक फी रक्कम रु.13,500/- घेतलेली होती. तसेच त्यानुसार तक्रारदार यांना डाएट चार्ज देखील दिलेला होता. सदरच्या वि.प. यांनी दिलेल्या डाएट चार्टमुळे तक्रारदार यांना अशक्तपणा येवू लागला व तक्रारदार आजारी पडले. या सर्व गोष्टींची तक्रार तक्रारदार यांनी वि.प. यांना दि.10 नोव्हेंबर 2021 रोजी करुन परताव्याची मागणी देखील केली होती. तथापि वि.प. यांनी तक्रारदार यांना कोणताही परतावा न देता तसेच वि.प. यांच्या अॅकॅडमीमध्ये नमूद केलेल्या सोयीसुविधा न देता तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत गंभीर त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3
9. उपरोक्त मुद्दा क्र.1 व 2 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. सबब, तक्रारदार हे वि.प. यांचेकडून तक्रारदार यांनी वि.प. यांना अदा केलेली रक्कम रु.13,500/- मिळणेस पात्र आहेत. तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 17/12/2021 पासून संपूर्ण रक्कम तक्रारदार यास मिळेपावेतो द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तक्रारदार यांनी आयोगामध्ये नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.4,99,000/- इतकी मागणी केलेली आहे. तथापि त्याअनुषंगाने कोणताही कागदोपत्री पुरावा आयोगात दाखल केलेला नाही. याकारणाने सदरची नुकसान भरपाईची रक्कम हे आयोग विचारात घेत नाही. तसेच तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून तक्रारदारास डाएटीशिएन फी रु.20,500/- ची मागणी केली आहे. तथापि त्याअनुषंगाने कोणतीही फी भरलेची पावती आयोगामध्ये दाखल केलेली नाही. त्याकारणाने सदरची रक्कम मिळणेस तक्रारदार अपात्र आहेत. परंतु सदर वि.प. यांनी दिलेल्या डाएटमुळे तक्रारदार हे आजारी पडले ही बाब नाकारता येत नाही. त्याकारणाने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून नुकसान भरपाईपोटी पोटी रक्कम रु.10,000/- तसेच तक्रारीचा खर्च रक्कम रु.5,000/- मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4 - सबब आदेश.
- आ दे श - - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प.क्र.1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे भरलेली मेंबरशीपची रक्कम रु.13,500/- अदा करावी व सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 17/12/2021 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यास मिळेपावेतो द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे.
- वि.प. क्र.1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदारांना नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदयातील तरतुदींअन्वये वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
|