AMIT ASHOK GAIKWAD filed a consumer case on 11 Feb 2015 against P.S.INFOTECH in the Satara Consumer Court. The case no is CC/14/47 and the judgment uploaded on 08 Sep 2015.
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार क्र. 47/2014.
तक्रार दाखल दि.20-3-2014.
तक्रार निकाली दि. 11-2-2015.
अमित अशोक गायकवाड.
रा.चंदन प्लाझा, दुसरा मजला,
रुम नं.4, प्लॉट नं.28,
विठ्ठलदेव हौसिंग सोसायटी, मलकापूर,
ता.कराड, जि.सातारा. .... तक्रारदार
विरुध्द
1. पी.एस.इन्फोटेक,
लॅपटॉप हाऊस,
83, गुरुवार पेठ, मनोरा चावडी चौक,
कराड, जि.सातारा.
2. लिनोव्हा कं.
101112 सॉलिटेयर कॉर्पोरेट पार्क,
घाटकोपर लिंक रोड, चकाला,
अंधेरी ईस्ट, मुंबई 400 093. .... जाबदार
तक्रारदारातर्फे –अँड.डी.बी.पाटील.
जाबदारातर्फे– अँड.पी.एम.बहुलेकर.
-ः न्यायनिर्णय ः-
(सदर न्यायनिर्णय मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य यानी पारित केला)
1. तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात कथन खालीलप्रमाणे-
2. तक्रारदार हा चंदन प्लाझा, दुसरा मजला, रुम नं.4, विठ्ठलदेव हौसिंग सोसायटी, मलकापूर, ता.कराड येथील रहिवासी आहे. त्यांनी त्यांच्या शिक्षणासाठी व अभ्यासोपयोगी वस्तू म्हणून जाबदार क्र.1 यांचेकडून लिनोव्हा कंपनीचा लॅपटॉप मॉडेल Lenovo Z 580, Intel core Is 3rd Gan. 4 GB Ram, Display-15.6 Win 7-O/S Sr.No.QBO5436419 चा लॅपटॉप दि.12-11-2012 रोजी रु.1,000/- अँडव्हान्स भरुन व दि.26-11-2012 रोजी रु.45,300/- भरुन जाबदार क्र.2 यानी उत्पादित केलेला लॅपटॉप जाबदार क्र.2 कडून तक्रारदाराने खरेदी केला. तक्रारदारानी सदर लॅपटॉप खरेदी घेतल्या दिवसापासून तक्रार देत होता. उदा. लॅपटॉपची प्रोसेस स्लो झाली, लॅपटॉप हँग होणे, असा बिघाड होऊ लागला. जाबदारांकडे तो वारंवार दुरुस्तीस दिला. परंतु तो जाबदारानी पूर्णपणे दुरुस्त करुन दिला नाही. तो आजपर्यंत दुरुस्तीसाठी जाबदाराकडे पडून आहे. वारंवार हेलपाटे मारुनही तो जाबदारानी तक्रारदाराना दुरुस्त करुन दिलेला नाही. जाबदारानी मुळातच निर्मिती दोष असलेला लॅपटॉप तक्रारदाराना विक्री करुन त्यांची फसवणूक केली, त्यामुळे लॅपटॉप अभावी त्यांना त्यांचा शैक्षणिक अभ्यास पूर्ण करणेत अडथळे आले. वारंवार जाबदाराना याबाबत तक्रारदारानी जाब विचारला असता त्यानी उडवाउडवीची उत्तरे दिली व लॅपटॉप दुरुस्त करुन दिला नाही किंवा त्याबदली दुसरा लॅपटॉपचा चांगला पीस दिला नाही किंवा त्यांचे पैसेही परत केले नाहीत, त्यामुळे तक्रारदारानी जाबदाराना दि.21-2-2014 रोजी वकीलांतर्फे नोटीस दिली. जाबदारानी उत्तरी नोटीस देऊन जाबदारानी लॅपटॉप बदलून देणेची जबाबदारी त्यांची नाही व जाबदार हे लिनोव्हा कंपनीचे अधिकृत विक्रेते नाहीत, ते लॅपटॉप घेऊन त्याची पुनर्विक्री करतात त्यामुळे ते तक्रारदाराना कोणतीही वॉरंटी देऊ शकत नाहीत, त्यामुळे लॅपटॉप बदलून देणेची जबाबदारी जाबदारांची नाही, त्यामुळे नाईलाजाने सदर जाबदारांविरुध्द मे.मंचात तक्रारदारानी दाद मागितली आहे व मंचाकडे जाबदार क्र.1 व 2 कडून नवीन लॅपटॉप मिळावा किंवा लॅपटॉप रक्कम रु.45,300/- त्यावर दि.26-11-2012 पासून द.सा.द.शे.18 टक्के व्याज, मानसिक त्रासापोटी रु.2,000/- व शैक्षणिक नुकसानीपोटी रु.20000/- मिळावेत अशी विनंती केली आहे.
3. सदर प्रकरणाच्या नोटीसा जाबदार क्र.1 व 2 याना मे.मंचातर्फे रजि.पोस्टाने पाठणेत आल्या. सदर नोटीसा जाबदार क्र.1 व 2 याना मिळाल्या, त्याच्या पोस्टाच्या पोचपावत्या नि.8 व 9 कडे दप्तरी दाखल आहेत, त्याप्रमाणे जाबदार क्र.1 त्यांचे वकीलांतर्फे नि.10 कडे वकीलपत्र दाखल करुन हजर झाले. त्यांनी त्यांचे म्हणणे नि.13 कडे व त्याचे पृष्टयर्थ नि.14 कडे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. जाबदारानी नि.15 कडे एकूण पुराव्याच्या 8 कागदपत्रांची यादी दाखल केली. जाबदार क्र.2 यांचे वतीने अँड.प्रताप जाधव यानी नि.17 कडे अर्ज देऊन जाबदार 2 यांचे वतीने हजर रहाण्याच्या सूचना मिळालेल्या आहेत, तांत्रिक बाबीमुळे आजरोजी वकीलपत्र दाखल करणेस मुदत मिळावी असा अर्ज दाखल केला. त्याप्रमाणे मंचाने त्यांचा अर्ज मंजूर केला. परंतु शेवटपर्यंत वरील वकीलांनी जाबदार 2 तर्फे मंचात वकीलपत्र दाखल केलेले नाही. त्यानंतर दि.5-8-14 रोजी नि.18 कडे म्हणणे व प्राथमिक आक्षेप दाखल केले व त्यासोबत लिनोव्हा वॉरंटी नियमावली सादर केली. जाबदार 2 तर्फे नि.21 कडे लेखी युक्तीवाद दाखल करुन त्यानी दि.26-11-2012 पासून तक्रारदारानी लॅपटॉप खरेदी केले दिनांकापासून दि.26-11-2013 अखेर वेळोवेळी तक्रारीतील लॅपटॉप दुरुस्त करुन दिला आहे व सदर लॅपटॉपमध्ये निर्मितीदोष असल्याचे शाबीत केलेले नाही त्यामुळे तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत यावी असे आक्षेप नोंदलेले आहेत.
4. सदर प्रकरणाच्या नोटीसा जाबदाराना मंचातर्फे रजि.पोस्टाने पाठवणेत आल्या. त्या जाबदाराना मिळाल्याच्या पोस्टाच्या पोहोचपावत्या नि.8 व 9 कडे प्रकरणी दाखल आहेत. त्याप्रमाणे जाबदार क्र.1 प्रकरणी हजर होऊन त्यांनी त्यांचे म्हणणे नि.13 कडे दाखल केले असून त्याचे पृष्टयर्थ नि.14 कडे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे व नि.15 कडे पुराव्याची एकूण 8 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्याचप्रमाणे जाबदार 2 यानी सदर प्रकरणी तक्रारदाराचे अर्जास उत्तर व त्यासोबत लिनोव्हो लिमिटेड वॉरंटी नियम,स्पेशल नियम व वॉरंटीसहित माहिती अशी एकूण 3 भागाची कागदपत्रे दाखल केली असून नि.21 कडे जाबदार क्र.2 यानी लेखी युक्तीवाद दाखल केला. तक्रारदाराचा यातील मुख्य आक्षेप हा आहे की, तक्रारदारांचा लॅपटॉप हा सुरुवातीपासून म्हणजे नवीन घेतलेपासून त्याना वेळोवेळी दुरुस्त करुन दिलेला आहे. तक्रारदारानी त्यांचा लॅपटॉप हा सदोष असल्याचे सिध्द केलेले नाही व आजरोजी सदर लॅपटॉप हा नीट चालतो त्यामुळे तक्रारदारांची तक्रार खोटी असून ती नामंजूर करावी असे आक्षेप नोंदवलेले आहेत.
5. त्यामुळे तक्रारदारांची तक्रार, दाखल केलेली पुराव्याची कागदपत्रे, वकीलांतर्फे दिलेली नोटीस व जाबदारानी दिलेले म्हणणे, पुराव्याची कागदपत्रे व त्यांचे आक्षेप पहाता सदर तक्रारीच्या निराकरणार्थ आमचेसमोर खालील मुद्दे उपस्थित होतात-
अ.क्र. मुद्दा निष्कर्ष
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. जाबदारानी तक्रारदाराना विक्री केलेला लॅपटॉप त्याना
पूर्णपणे निर्दोष करुन न देऊन वा त्याना त्यापोटी दुसरा
लॅपटॉप न देऊन तक्रारदाराना सदोष सेवा दिली आहे काय? होय.
3. अंतिम आदेश काय? तक्रार अंशतः मंजूर.
कारणमीमांसा- मुद्दा क्र.1 ते 3.
6. जाबदार क्र.1 हे जाबदार क्र.2 यांची उत्पादने विक्री करणेचा व्यवसाय करतात. ही उत्पादने म्हणजे 'लिनोव्हा कंपनी' या नावे ओळखली जाते. ते प्रामुख्याने लॅपटॉपचे उत्पादन/निर्मिती करतात. यातील जाबदार क्र.1 हे जाबदार क्र.2च्या उत्पादिल लॅपटॉपचे कंपनीच्या गॅरंटीत उत्पादनाची विक्री करतात. तक्रारदाराने त्याप्रमाणे जाबदार क्र.1 कडून लिनोव्हा कंपनीचा लॅपटॉप मॉडेल Lenovo Z 580, चा लॅपटॉप रु.45,300/- ला खरेदी केला. सदर प्रकरणी तक्रारदारानी नि.5/1 कडे व नि.5/2 कडे दाखल केलेली जाबदार 1 यानी सदर लॅपटॉप खरेदीपोटी अनुक्रमे रु.1000/-अँडव्हान्स खरेदीची पावती रु.45,300/- लॅपटॉपचे सर्व पैसे मिळालेची रोखीची पावती दिली असून प्रत्यक्ष अँडव्हान्स वजा जाता रु.44,400/- मिळालेची पावती तक्रारदाराना जाबदार 1 यानी दिली असून ती नि.5/3 कडे आहे. जाबदाराकडे तक्रारदाराना सदरच्या लॅपटॉप खरेदीची नि.5/2 कडील पावतीचे अवलोकन केले असता असे दिसते की, सदरचा लॅपटॉप तक्रारदारानी जाबदाराकडून दि.26-11-2012 रोजी खरेदी केला व सदर कॅशमेमो पावतीवरुन जाबदार क्र.1 हे 'पी.एस.इन्फोटेक', लॅपटॉप हाऊस या नावाने दुकान चालवतात. त्यांचे हे लॅपटॉप शोरुम असून ते मल्टी ब्रँड लॅपटॉप्स शोरुम आहे हे पण स्पष्ट होते व सदर पावतीवर नमूद केलेल्या नियम व अटी वाचल्यावर असेही लक्षात येते की जाबदार क्र.1 हे त्यांनी विकलेल्या वस्तु या जाबदार क्र.1 यांनी दिलेल्या रोखीचे पावती (कॅशमेमो) वरील अट क्र.3 प्रमाणे विकलेल्या उत्पादनाला One year warranty according to manufacturer’s policies प्रमाणे वॉरंटीसुध्दा देतात. त्यामुळे वरील प्रकारचे सेवेसह जाबदार क्र.1 यानी तक्रारदाराना जाबदार क्र.2 यानी उत्पादित केलेले उत्पादन विकलेले असल्याने उभयतांमध्ये ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते असल्याचे शाबीत होते. त्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो.
6.1- तक्रारदारानी प्रकरणी दाखल केलेली नि.5/6 कडील सदर लॅपटॉपचे बाबत वकीलांतर्फे जाबदार क्र.1 याना दिलेली नोटीस व त्यांची तक्रार व नि.5/7 चे तक्रारदाराचे नोटीसीस जाबदार क्र.1 यांनी त्यांचे वकीलांतर्फे तक्रारदारांचे नोटीसीला नि.5/8 कडील उत्तरी नोटीस व जाबदार क्र.1 यानी प्रकरणी नि.15/3 ते 15/4, 15/5, 15/6, 15/7, 15/8 चे पत्र, नि.15/3 कडे गुदरलेली Onsite service report अभ्यासले असता असे स्पष्टपणे दिसते की, जाबदार क्र.1 यानी तक्रारदाराना विकलेला लॅपटॉप हा सुरुवातीपासूनच सदोष होता. तक्रारदारानी वापरणेस सुरुवात केलेनंतर तो वारंवार हँग होणे, त्याचे वर्कींग अत्यंत संथ गतीने होणे, लॅपटॉपमधील प्रणाली वारंवार हँग होणे, तो गतीने काम न करणे, मदरबोर्डवरुन तक्रारदाराला अपेक्षित कृती लॅपटॉपमध्ये न दिसणे असे दोष तक्रारदाराना आढळून आले व सदर लॅपटॉप खरेदी दिनांकापासून व्यवस्थीत काम देत नव्हता व इतका खर्च करुनही त्याचा लाभ तक्रारदाराना होत नव्हता त्यामुळे ज्या शैक्षणिक कामासाठी त्यानी उत्साहाने लॅपटॉप जाबदाराकडून खरेदी केला तो उद्देशच असफल झाला असल्याचे स्पष्ट होते. तक्रारदारांचा लॅपटॉप डिसेंबर 2012 पासून आजपर्यंत जाबदार क्र.1 कडे व तेथून पुढे जाबदार क्र.2 यांचे विविध दुरुस्ती सेंटर, इंजिनियर यांचेकडे दुरुस्तीसाठी फिरत आहे. तक्रारदारानी सदर सदोष लॅपटॉप जाबदार क्र.1 चे ताब्यात वॉरेटी पिरीयड दि.26-11-2012 पासून दि.25-11-2013 अखेरच्या मुदतीत दुरुस्तीसाठी दिला परंतु जाबदाराकडून तो आजपर्यंत दुरुस्त झाला नाही. जाबदार क्र.1 यानी याकामी वेळकाढूपणा केला. वॉरंटी पिरीयड संपल्यावरही तक्रारदारानी जाबदाराकडे वारंवार पाठपुरावा केला, परंतु त्यानीही उडवाउडवीची उत्तरे दिली. शेवटी लॅपटॉपमधील दोष गेलेला नाही हे लक्षात आल्यावर शेवटी तक्रारदारानी त्यांचा लॅपटॉप दि.2-11-2013 रोजी कायमस्वरुपी दुरुस्त होऊन मिळणेबाबत जाबदार 1 कडे सोपविला परंतु आजतागायत तो दुरुस्त होऊन तक्रारदारास मिळालेला नाही, तो अदयाप जाबदार क्र.2 कडेच आहे ही वस्तुस्थिती सदर प्रकरणी स्पष्ट होते. प्रकरणातील नि.15/3 ते 15/6 कडे जाबदारानी दाखल केलेली जॉबकार्ड पाहिली असता त्यावरुनही सदर लॅपटॉप हा दोषमुक्त झाला असे दिसून येत नाही. याकामी जाबदार क्र.1 यानी जाबदार क्र.2 याना पाठवलेला नि.15/7कडील मेल पाहिला असता त्यामध्ये जाबदार क्र.1 यानी जाबदार क्र.2 याना स्पष्ट कळविले आहे की, 'तक्रारदार हे अत्यंत त्रासलेले आहेत. सदर लॅपटॉपमधील दोष अदयाप दूर झालेले नाहीत व त्याबाबत तुमचेकडून कोणतीही समाधानकारक कृती झालेली नाही. लॅपटॉप खरेदीदार 6 महिन्यापासून अत्यंत त्रासलेला आहे तेव्हा त्यांना लॅपटॉप नवीन दयावा किंवा त्यांचे पैसे परत करावेत एवढाच पर्याय उरतो व त्याबाबत तुम्ही त्वरीत निर्णय घ्यावा' असे कळविले आहे. सदरचे पत्र दि.22-2-2014 चे आहे. कंटाळून तपूर्वी दि.21-2-2014 रोजी तक्रारदारानी जाबदार क्र.1 यांना नि.5/6 प्रमाणे वकीलांतर्फे नोटीस पाठवून खराब लॅपटॉपपोटी नवीन लॅपटॉप दयावा किंवा त्याची किंमत सव्याज परत करावी अशी मागणी केली. सदरचा लॅपटॉप आजपर्यंत जाबदार 2 यांचे ताब्यात आहे. वरील सर्व विवेचनावरुन प्रकरणातील मंचापुढे आलेल्या पुराव्याच्या वस्तुस्थितीवरुन जाबदारानी तक्रारदारांचा लॅपटॉप दुरुस्तीच्या नावाखाली 2 वर्षे ठेवून घेतला, तो निर्दोष करुन दिला नाही किंवा लॅपटॉप बदलूनही दिला नाही किंवा त्याचे पैसे परत न करुन तक्रारदाराना अत्यंत गंभीर स्वरुपाची सदोष सेवा दिली असल्याचे निर्विवादरित्या शाबीत झाले आहे. त्यामुळे मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो व त्यामुळेच सदर प्रकरणी तक्रारदाराना जाबदारांच्या कृतीने झालेला आत्यंतिक मनस्ताप, गंभीर प्रकारची सदोष सेवा, त्यांच्या शैक्षणिक कार्याचे लॅपटॉप अभावी झालेले नुकसान पहाता तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजुरीस पात्र आहे व त्यामुळे तक्रारदार हे सदोष लॅपटॉप मॉडेल Lenovo Z 580, Intel core Is 3rd Gan. 4 GB Ram, Display-15.6”, Win 7-O/S Sr.No.QBO5436419 चा लॅपटॉपपोटी दुसरा तसाच लॅपटॉप मिळणेस किंवा त्याची किंमत रु.45,300/- त्यावर दि.26-11-2012 पासून द.सा.द.शे.10 टक्के व्याज, शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु.15,000/-, शैक्षणिक नुकसानीपोटी रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- जाबदाराकडून मिळणेस तक्रारदार पात्र असल्याच्या निष्कर्षाप्रत हा मंच आलेला आहे.
7. वरील सर्व कारणमीमांसा व विवेचन याना अधीन राहून खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येतात.
आदेश
1. तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करणेत येते.
2. जाबदार क्र.1 व 2 यानी तक्रारदारांचा सदोष लॅपटॉप निर्दोष करुन न देऊन किंवा त्यापोटी नवीन त्याच मॉडेलचा लॅपटॉप परत न देऊन किंवा त्याची किंमत परत न देऊन तक्रारदाराना सदोष सेवा दिली असल्याचे घोषित करणेत येते.
3. जाबदार क्र.1 व 2 यानी तक्रारदाराना त्यांच्या Lenovo Z 580 मॉडलेच्या लॅपटॉपपोटी नवीन त्याच मॉडेलचा लॅपटॉप दयावा किंवा सदर लॅपटॉपची किंमत रु.45,300/- व त्यावर दि.26-11-2012 पासून द.सा.द.शे.10 टक्के दराने संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंतच्या संपूर्ण व्याजासह होणारी संपूर्ण रक्कम आदेश प्राप्त झालेपासून 4 आठवडयाचे आत तक्रारदाराना अदा करावी.
4. जाबदार क्र.1 व 2 यानी तक्रारदारांना शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु.15,000/-(रु.पंधरा हजार मात्र) शैक्षणिक नुकसानीपोटी रु.10,000/-(रु.दहा हजार मात्र) व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/-(रु.पाच हजार मात्र) आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयाचे आत तक्रारदारांना अदा करावी.
5. जाबदारानी वरील आदेशाचे पालन विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986च्या कलम 25 व 27 अन्वये दाद मागू शकतील.
6. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
7. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि.11-2-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.