तक्रारकर्त्यातर्फे वकील :- ॲड. आर.बी. सोमाणी
विरुध्दपक्षातर्फे वकील :- अड. पप्पू मोरवाल
( मा. अध्यक्षा, सौ. एस.एम. उंटवाले यांनी निकाल कथन केला )
::: आ दे श प त्र :::
ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 12 अन्वये तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे :-
तक्रारकर्ता हा व्यवसायाने डॉक्टर असून अकोला येथील रहिवासी आहे. तक्रारकर्त्याच्या पत्नीला श्वासोश्वासाचा त्रास असल्याकारणाने तिला औषधोपचार सुरु होता व तिला कृत्रिम ऑक्सीजन देण्याचा तज्ञ डॉक्टरांनी सल्ला दिला होता. त्याकरिता त्यांनी ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटरची व्यवस्था केली होती. परंतु ते योग्य काम करीत नव्हते म्हणून नवीन यंत्र घेणे आवश्यक होते. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाच्या शब्दावर विश्वास ठेवून दिनांक 04-06-2013 रोजी ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर 10 लिटर क्षमतेचे रु. 87,000/- ला खरेदी केले. विरुध्दपक्षाने त्यानुसार दिनांक 06-04-2012 चे बिल तक्रारकर्त्याला पाठविले. सोबत 24 महिन्याचे वॉरंटी कार्ड सुध्दा पाठविले आणि सदर यंत्र हे डी.टी.डी.सी. कुरीअरमार्फत तक्रारकर्त्याला अकोला येथे पोहचते केले. तक्रारकर्त्याने सदर यंत्रावरील नाका अकोला येथे रु. 3,480/- रोख भरणा करुन सदर पार्सलची डिलेव्हरी घेतली.
विरुध्दपक्षाने पुरविलेले ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर एस.आर. क्रमांक ई 5002733 हे यंत्र घरी आणल्यावर पॅकिंग/पार्सल उघडले असता त्यातील काही साहित्य कमी असल्याचे लक्षात आले आणि म्हणून त्याने त्वरित भ्रमणध्वनी क्रमांक 9022120120 यावर विरुध्दपक्षाचे सर्व्हिस देणारे तंत्रज्ञ यांचेशी संपर्क केला. तंत्रज्ञ व अपूर्ण साहित्य त्वरित पाठवू असे कळविण्यात आले. सदर मशीन ही मुळात क्षतीग्रस्त व अपूर्ण आली होती, परंतु सदर यंत्र चालणे व वापरण्यायोग्य करण्याची आवश्यकता होती. अनेकवेळा पाठपुरावा केल्यानंतर मुंबईचे तंत्रज्ञ श्री. प्रताप यांनी ही मशीन तपासणीसाठी श्री. बीजॉय चाको यांना नियुक्त केले.
सदर तंत्रज्ञ श्री. बीजॉय चाको हे दिनांक 07-05-2013 रोजी तक्रारकर्त्याकडे आले आणि त्यांनी सदर यंत्र तपासले असता असे सांगितले की, सदर मशीन हे नादुरुस्त असून डिफेक्टिव्ह पिस आहे आणि त्यामध्ये महत्वाचे भाग म्हणजे वॉटर बोटल, नेझल एअर टयुब, इंटर्नल टयुब हे महत्वाचे भाग त्यामध्ये जोडलेले नाही. यावेळी श्री. बीजॉय चाको यांनी पुढे विरुध्दपक्ष व त्यांचे अधिका-यांना कळवितो, असे सांगितले.
त्यानंतर तक्रारकर्ता व त्यांचे जावई डॉ. मनिष वैष्णव यांनी मिळून विरुध्दपक्षाकडे वरील भ्रमणध्वनी क्रमांकावर अनेकवेळा पाठपुरावा केला, परंतु, कोणतेही समाधान झाले नाही.
तक्रारकर्त्याला त्यांच्या पत्नीकरिता ऑक्सीजन पुरवठा अत्यंत आवश्यक होता म्हणून त्यांनी बाजारातून ऑक्सीजन सिलींडर घेऊन रु. 27,000/- खर्च करावे लागले. त्याबद्दलचे दस्तऐवज तक्रारीसोबत दाखल करण्यात येत आहेत.
तक्रारकर्त्याने शेवटी कंटाळून विरुध्दपक्षाला अड. श्री. लाहोटी यांचेमार्फत रजिस्टर्ड नोटीस पाठवून यंत्रातील दोष दूर करुन देण्याची सूचना दिनांक 15-05-2013 रोजी दिली. परंतु, विरुध्दपक्षाने यंत्र बदलून दिलेले नाही व दोष दुरुस्त केले नाही.
तक्रारकर्त्याच्या पत्नीचे दिनांक 17-05-2013 रोजी श्वासोश्वास व इतर त्रासाने निधन झाले. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला दिनांक 1 जुलै 2013 रोजी वकिलांमार्फत नोटीस पाठवून त्यांना झालेल्या त्रासाबद्दल व नुकसान भरपाई करणारी मागणीची सूचना विरुध्दपक्षाला दिली, ती त्यांना मिळाली. परंतु, विरुध्दपक्षाने दिनांक 17 जुलै 2013 चे नोटीस उत्तराद्वारे खोटा बचाव घेतला.
सबब, तक्रारकर्त्याची प्रार्थना की, 1) तक्रार मंजूर व्हावी. 2) विरुध्दपक्षाने पुरविलेल्या यंत्रामध्ये निर्मिती दोष असल्याने दोषपूर्ण सेवा दिली आहे असे ग्राहय धरण्यात यावे. 3) विरुध्दपक्षाने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे असे ग्राहय धरण्यात यावे. 4) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला पुरविलेल्या दोषपूर्ण यंत्रासाठी व अनुचित व्यापार प्रथेसाठी नुकसान भरपाई दाखल रु. 5,00,000/- तक्रारकर्त्याला देण्याबाबत विरुध्दपक्षाला आदेशित करावे. 5) तक्रारीचा खर्च रु. 10,000/- विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला दयावा.
सदर तक्रार शपथेवर दाखल केली असून त्यासोबत एकंदर 09 दस्तऐवज पुरावा म्हणून दाखल केलेले आहेत.
विरुध्दपक्षाचा लेखी जवाब :-
सदर तक्रारीची मंचातर्फे नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरुध्दपक्ष यांनी लेखी जवाब दाखल करुन तक्रारकर्त्याचे संपूर्ण कथन फेटाळत, असे नमूद केले आहे की, विरुध्दपक्षाने पुरविलेले ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर सिरीयल नंबर ई-5002733 हे यंत्र घरी आणल्यावर पॅकिंग उघडले असता काही साहित्य कमी असल्याचे लक्षात आले आणि म्हणून तक्रारकर्त्याने त्वरित फोनवर विरुध्दपक्षाचे सर्व्हिस देणारे तंत्रज्ञ यांना फोन केला व साहित्य त्वरित पाठविण्याची विनंती केली, हे म्हणणे खोटे असल्यामुळे नाकबूल आहे. सदरहू मशीन ही मुळात क्षतीग्रस्त व अपूर्ण आली होती. परंतु, सदर यंत्र चालणे व वापरण्यायोग्य करण्याची आवश्यकता होती आणि त्याकरिता तक्रारकर्ता जिकरीने पाठपुरावा करीत होता. परंतु, हे म्हणणे खोटे असल्यामुळे नाकबूल आहे की, श्री. बीजॉय यांनी असे सांगितले की, सदरहू यंत्र नादुरुस्त असून डिफेक्टिव्ह आहे आणि त्यामध्ये महत्वाचे भाग म्हणजे वॉटर बॉटल, नेझल एअर टयुब आणि इंटर्नल टयुब ही महत्वाचे भाग त्यामध्ये जोडलेले नाही. परिच्छेद क्रमांक 7 बाबत हे म्हणणे खोटे आहे की, तक्रारकर्त्याला त्यांच्या पत्नीकरिता ऑक्सीजन पुरवठा अत्यंत आवश्यक होता. परंतु विरुध्दपक्षाने पुरविलेले यंत्र व सेवाही दोषपूर्ण असल्याने तक्रारकर्त्याने बाजारातून ऑक्सीजन सिलेंडर घेऊन एप्रिल महिन्याकरिता रु. 27,000/- खर्च करुन घेतले. परिच्छेद क्रमांक 13, 14, 15 व 16 तसेच प्रार्थना यामधील संपूर्ण मजकूर खोटा असल्यामुळे नाकबूल आहे.
तक्रारकर्त्याने सदर यंत्र दिनांक 09-08-2013 पासून वापरले व ते व्यवस्थित चालले म्हणूनच तक्रारकर्त्याने कोणतीही लेखी तक्रार किंवा इंटरनेटद्वारे तक्रार दाखल केली नाही. परंतु, सदरहू यंत्राबाबत माहिती नसल्यामुळे तक्रारकर्त्याने स्वत:हून यंत्रामध्ये बिघाड केल्याचे तंत्रज्ञाने सांगितले की, त्याचे पार्टस उघडलेले दिसले. तरी सुध्दा विरुध्दपक्ष हा आज रोजी सुध्दा तक्रारकर्त्यास जर यंत्रामध्ये बिघाड असल्यास संपूर्ण दुरुस्ती करुन देण्यास तयार आहे व यंत्र खरेदी केल्याच्या तारखेपासून दोन वर्षापर्यंत सेवा देण्यास तयार आहे.
जरी तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदयाअंतर्गत प्रकरण दाखल करण्याची परवानगी सुध्दा मागितली असली तरी त्यावेळेस विरुध्दपक्षाला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली नाही व परवानगी जरी दिली असल्यास कार्यक्षेत्र ठरविणे ही बाब मंचाच्या अधिकारातील नाही म्हणून सुध्दा सदरहू प्रकरण न्यायमंच, मुंबई येथे पाठविण्यात यावे व सदरहू प्रकरण खारीज करुन विरुध्दपक्षाला न्याय दयावा, ही विनंती.
का र णे व नि ष्क र्ष
या प्रकरणातील तक्रारकर्ते यांची तक्रार, सोबत दाखल केलेले सर्व दस्तऐवज, विरुध्दपक्षाचा लेखी जवाब, उभयपक्षाचा पुरावा, विरुध्दपक्षातर्फे साक्षीदारांचा पुरावा, उभयपक्षांचा तोंडी युक्तीवाद यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देवून नमूद केला तो येणेप्रमाणे.
तक्रारकर्त्याचा युक्तीवाद असा आहे की, तक्रारकर्ते हे व्यवसायाने डॉक्टर आहेत व त्यांच्या पत्नीला श्वासोश्वासाचा त्रास असल्याकारणाने तिला कृत्रिम ऑक्सीजन देण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता म्हणून तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडून ऑक्सीजन पुरवठा करण्याचे यंत्र ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर, दहा लिटर क्षमतेचे रु. 87,000/- या रकमेत खरेदी केले होते. सदर यंत्र हे डी.टी.डी.सी. कुरीयरमार्फत तक्रारकर्त्याला अकोला येथे विरुध्दपक्षाला पोहचते केले. हे यंत्र तक्रारकर्त्याच्या घरी आल्यावर उघडले असता त्यात काही साहित्य कमी असल्याचे लक्षात आले. ही बाब तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला कळविल्यानंतर त्यांचे तंत्रज्ञ श्री. बिजॉय चाको हे यंत्र तपासणीसाठी आले असता त्यांनी सदर मशीन डिफेक्टिव्ह पिस आहे व त्यामध्ये काही महत्वाचे भाग जोडलेले नाही असे सांगितले. त्यानंतर विरुध्दपक्षाने हे यंत्र दुरुस्त करणेसाठी कुठलेही प्रयत्न केले नाही. याउलट तक्रारकर्त्याने फोनवर अनेकवेळा या तक्रारीचा पाठपुरावा केला. सदर यंत्र वॉरंटी कालावधीमध्ये असतांना देखील विरुध्दपक्षाने यंत्रातील दोष दूर केले नाही व दोषपूर्ण यंत्र पुरविले, त्यामुळे तक्रारकर्त्याच्या आजारी पत्नीला या यंत्राचा पाहिजे तसा उपयोग झाला नाही व तिचे दिनांक 17-05-2013 रोजी निधन झाले. त्यामुळे या सर्व नुकसानास विरुध्दपक्ष एकटेच जबाबदार आहेत.
यावर विरुध्दपक्षातर्फे असा युक्तीवाद करण्यात आला की, सदरहू यंत्राची तपासणी व पाहणी तक्रारकर्त्याने मुंबई येथे केली व तेव्हाच यंत्राची किंमत विरुध्दपक्षाला दिली, म्हणून विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याच्या समोर हे यंत्र पॅक करुन डी.टी.डी.सी. कुरीयर मार्फत अकोला येथे पाठविले होते. त्यामुळे या तक्रारीस कारण हे मुंबई येथे घडलेले आहे, म्हणून ही तक्रार या न्यायमंचासमोर चालू शकत नाही.
तक्रारकर्ता होमिओपॅथी डॉक्टर आहेत. ते हे यंत्र चालविण्यात कुशल नव्हते तसेच तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला वेळावेळी ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर ची एजन्सी मिळण्याबाबत व चांगले व्यापार देण्याचे आमीष विरुध्दपक्षाला दिले होते. ते विरुध्दपक्षाने नाकारल्यामुळे तक्रारकर्त्याने ही तक्रार केली. संपूर्ण यंत्र पाठविल्यावर सुध्दा तक्रारकर्त्याने काही सामानाची पुन्हा मागणी केली होती. विरुध्दपक्षाने ते सामान कुरीयर मार्फत पाठविले होते तसेच मशीनची तपासणी करण्याकरिता तंत्रज्ञ श्री. बिजॉय चाको यांना पाठवून मशीन तपासून दिली. त्यांनी सदर यंत्र व्यवस्थित आहे असे सांगितले. परंतु, तक्रारकर्त्याने दबाव आणण्याकरिता नोटीस पाठविली. विरुध्दपक्ष आज रोजी सुध्दा यंत्रातील बिघाड दुरुस्त करुन देण्यास तयार आहे व हे यंत्र खरेदी केल्याच्या तारखेपासून दोन वर्षापर्यंत सेवा देण्यास तयार आहे.
उभयपक्षांचा हा युक्तीवाद ऐकल्यानंतर मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजांवरुन जरी असे आहे की, त्यांनी सदरहू यंत्राची पाहणी व किंमत ही विरुध्दपक्षाला मुंबई येथे दिली तरी हे यंत्र कुरीयरदवारा तक्रारकर्त्यास अकोला येथे प्राप्त झाले होते व त्यानंतर हे यंत्र अकोला येथे वापरण्यात आले. तसेच उभयपक्षांच्या मते या यंत्राची तपासणी श्री. बीजॉय चाको यांनी अकोला येथे केलेली आहे, त्यामुळे सदरहू तक्रारीस कारण हे अकोला येथे देखील घडलेले आहे. म्हणून अकोला ग्राहक मंचाला सदर प्रकरण चालवण्याचे अधिकार आहे, असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्त्याच्या मते सदरहू यंत्रात निर्मिती दोष आहे. शिवाय यामध्ये काही साहित्य कमी देखील आहे, म्हणून या मशीनची पाहणी तंत्रज्ञ श्री. बीजॉय चाको यांनी केली असता त्यांनी पण सदर मशीन डिफेक्टिव्ह पिस आहे असे मत नोंदविले. परंतु, विरुध्दपक्षाने रेकॉर्डवर श्री. बीजॉय चाको यांचा शपथेवर पुरावा दाखल केलेला आहे, त्यामध्ये त्यांनी शपथेवार असे कथन केले की, “ त्यांनी दिनांक 07-05-2013 रोजी तक्रारकर्त्याचे घरी सदरहू यंत्राची तपासणी केली तेव्हा त्यांना कोणता बिघाड दिसला नाही. तक्रारकर्ता हे होमीओपॅथी डॉक्टर आहे. त्यांना हे यंत्र चालविण्याचे कोणतेही ज्ञान नव्हते. तक्रारकर्त्याच्या घरी सदरहू यंत्र तपासण्याकरिता दोनदा गेलो होतो. ” अशाप्रकारे तंत्रज्ञ श्री. बीजॉय चाको यांचे वरीलप्रमाणे शपथेवर कथन रेकॉर्डवर उपलब्ध असतांना तक्रारकर्त्याने इतर कोणत्याही तंत्रज्ञांचा सल्ला घेऊन श्री बीजॉय चाको यांच्या कथनाला नकारार्थी कथन रेकॉर्डवर उपलबध करुन दिले नाही. त्यामुळे विरुध्दपक्षाने पुरविलेल्या ऑक्सीजन कॉन्सटेटर या यंत्रात निर्मिती दोष होता, हे तक्रारकर्त्याने सिध्द् केलेले नाही, म्हणून तक्रारकर्त्याच्या पत्नीच्या निधनाशी याचा संबंध जोडून तक्रारकर्त्याने मागितलेली नुकसान भरपाई देता येणार नाही, असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा कलम 13 (1) ( सी ) अंतर्गत अर्ज करुन सदर यंत्रातील दोष पडताळणीबाबत श्री. बीजॉय चाको यांच्याच नावाचा उल्लेख केला होता, त्यानंतर श्री. बीजॉय चाको यांनी उपरोक्त पुरावा दिला. परंतु, तक्रारकर्त्याने त्याच्या पुराव्यातील कथन खोडून काढले नाही. तक्रारकर्त्याने सदरहू यंत्राचे वॉरंटी सर्टिफिकेट रेकॉर्डवर दाखल केले आहे. त्यात वॉरंटी कालावधी दिनांक 04-06-2013 ते 05-04-2015 असा नमूद आहे. म्हणजे सदरहू यंत्र अजून वॉरंटी कालावधी मध्ये आहे व विरुध्दपक्षाची अशी कबुली आहे की, ” आज रोजी सुध्दा तक्रारकर्त्याच्या यंत्रामध्ये जर बिघाड असेल तर विरुध्दपक्ष संपूर्ण यंत्र दुरुस्त करुन देण्यास तयार आहे. ” विरुध्दपक्षाच्या या कथनावरुन देखील त्यांनी अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे असे सिध्द् होऊ शकत नाही. सबब, तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यायोग्य आहे. या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. म्हणून अंतिम आदेश पारित केला तो येणेप्रमाणे.
अं ति म आ दे श
तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
न्यायीक खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाही.
उभयपक्षकारांना आदेशाची प्रमाणित प्रत विनामुल्य देण्यात यावी.